ज्ञानाचं नवं क्षितिज (डॉ. सुनील मगर)

dr sunil magar
dr sunil magar

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी असा हा अभ्यासक्रम असणार आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना नक्की काय मिळेल, त्याची रचना करताना कोणता विचार केला आहे, या अभ्यासक्रमाकडं कशा पद्धतीनं बघावं या सगळ्या गोष्टींबाबत विवेचन.

'शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे.’ समाजाला ज्या पद्धतीचं मनुष्यबळ अपेक्षित आहे, अशा प्रकारचं सक्षम मनुष्यबळ तयार करणं, सुजाण नागरिक तयार करणं, या बाबी डोळ्यांसमोर ठेवून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमांची सातत्यानं पुनर्रचना करणं अपेक्षित आहे आणि ती सतत बदलणाऱ्या काळाची गरज आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० या संदर्भानं प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमांचं अवलोकन केलं असता, या आराखड्यास आणि अभ्यासक्रमास अनुसरून निर्माण केलेली पाठ्यपुस्तकं आणि त्या अनुरोधानं मुलांच्या प्रत्येक टप्प्यावरच्या शैक्षणिक विकासाचा प्रवास नियोजनपूर्वक करण्याचा प्रयत्न केला आहे.

शालेय स्तरावर आपल्या पाल्यानं इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मार्क्‍स मिळवावेत अशा प्रकारची प्रत्येक पालकाची नेहमीच इच्छा असते. अथवा पाल्यानं प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले पाहिजेतच, अशा ध्यासानं पाल्याच्या पाठीमागं लागून हे मार्क्‍स मिळवण्याचा आग्रह पालकांकडून सातत्यानं धरला जातो. आपल्या पाल्यानं जास्तीत जास्त मार्क्‍स मिळवावेत ही पालकांची अपेक्षा निश्‍चितच चुकीची नाही. मात्र, आपल्या पाल्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कुवत, त्याचा परिसर, त्याची इच्छाशक्ती या बाबींचाही सारासार विचार मार्क्‍स मिळवण्याची अपेक्षा करताना पालकांनी सतत करणं आवश्‍यक आहे. खरं तर पालकांनी आपलं शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला किती मार्क्‍स मिळाले होते, ते मार्क्‍स मिळवून त्यांना जीवनात जे साध्य अपेक्षित होतं ते साध्य करू शकलो काय, याचा स्वत:मध्ये डोकावून विचार करणं आवश्‍यक आहे. ‘जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलानं मात्र केलंच पाहिजे’ असा दुराग्रह, अट्टहास मुलांच्या मनावर आणि बुद्धिमत्तेवर सततपणे प्रचंड ताण निर्माण करत आहे. त्यात मुलांची फरपट होताना दिसत आहे. हे चित्र सार्वत्रिक नसलं, तरी प्रातिनिधिक आहे.

वास्तविक परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्‍स हे जरी विद्यार्थ्यांच्या संपादणुकीचे निदर्शक असले, तरी ज्ञानावर आधारित किंवा सोप्या प्रश्‍नांतून मिळालेले गुण हे त्याच्या बुद्धिमत्तेच्या पातळीचे निदर्शक आहेत, असं निश्‍चितच मानता येत नाही. त्यामुळे खूप मार्क्‍स मिळाले, तरी हे विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. किंबहुना समाजामध्ये थोडंफार तसंच चित्र दिसत आहे. या वस्तुस्थितीचा विचार करता, विद्यार्थ्याला मिळालेले गुण, विषयातली संपादणूक आणि पुढील शिक्षणाचा प्रवेश यांचा सहसंबंध असला, तरी विद्यार्थ्यांमध्ये जे अंगभूत आहे, त्याच्या विचाराशी जे सुसंगत आहे, ते त्याच्या अभिव्यक्तीमधून प्रतीत होऊन जे गुण त्याला मिळतील तेच त्याचे खरे गुण असणं आवश्‍यक आहे. मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तीला, स्वमताला चालना देणं आणि त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढीस लावणं हे आवश्‍यक आहे आणि मूल्यमापन प्रक्रियादेखील तशाच पद्धतीनं राबवली जाणं आवश्‍यक आहे. हे विचारात घेऊन सरकारनं सन २०१७-१८ मध्ये सुरवातीला इयत्ता नववी आणि सन २०१८-१९ मध्ये इयत्ता दहावीसाठी सर्व विषयांकरता प्रश्‍नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिकांचा अवलंब केला. या कृतिपत्रिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला चालना देणं आणि त्यांच्या स्वमताचा आदर करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वत:बद्दलचा आत्मविश्वास वाढीस लागणार आहे आणि त्याचा फायदा त्याला त्याचं पुढचं सर्व उच्चशिक्षण घेण्यासाठी निश्‍चितच होणार आहे.

आशयामध्ये एकात्मिक मांडणी
काळाप्रमाणं बदल करणं हे अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असते. ही बाब विचारात घेऊन सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये सरकारनं बदल करण्यास सुरवात केली आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता सहावी, सन २०१७-१८ मध्ये इयत्ता सातवी आणि नववी आणि सन २०१८-१९ मध्ये इयत्ता पहिली, आठवी आणि दहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमाची कालसुसंगत पुनर्रचना करून त्यास अनुसरून पाठ्यपुस्तकांची रचना आणि मूल्यमापन पद्धती विकसित करण्यात आली आहे. या पुनर्रचनेचं मुख्य उद्दिष्ट हे प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अभ्यासक्रमामध्ये आणि त्यानुसार आशयामध्ये चढत्या क्रमानं एकात्मिक मांडणी करणं हा आहे.

उच्च माध्यमिक स्तरावरच्या शाखांची निवड करत असताना विद्यार्थ्यांनी प्रामुख्यानं त्यांच्या आवडीनिवडी आणि विषयाचं संपादित मूलभूत ज्ञान विचारात घेऊन शाखेची निवड करणं अपेक्षित आहे. काही वेळेस शिक्षणाची उपलब्धता, पालकांची इच्छा याचा प्रभाव शाखानिवडीवर होण्याची शक्‍यता असते. परंतु, उच्च माध्यमिक स्तरावर शाखानिवड हा त्याच्या उच्चशिक्षणाचा शैक्षणिक आरंभबिंदू असतो. त्यामुळे पालकांनी  सजगपणे आपल्या पाल्याच्या योग्यतेनं त्याच्या आवडीची शाखा निवडण्यास प्राधान्य देणं आवश्‍यक आहे.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक स्तरावरच्या इयत्ता अकरावी आणि प्राथमिक स्तरावरच्या इयत्ता दुसरी, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावी आणि प्राथमिक स्तरावरच्या इयत्ता तिसरी या इयत्तांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून पाठ्यपुस्तकांची रचना करण्यात येत आहे. ही प्रक्रिया स्तर आणि इयत्तानिहाय पुढं सुरू राहील. प्राथमिक स्तरावरच्या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा त्या त्या वर्गामधल्या प्रत्येक विषयातल्या अनेक बाबी त्या विद्यार्थ्याला येणं अपेक्षित आहे, या दृष्टीने अध्ययन अनुभव (Learning outcome) निश्‍चित करून त्याच्या आधारे अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. हाच धागा पकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विषयनिहाय क्षमता विधानांच्या स्वरूपात (Competency sentences) मांडणी करण्यात आली आहे. विषयनिहाय तयार केलेली क्षमता विधानं ही माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यानं घेतलेल्या ज्ञानाची सांधेजोड करणारी अशी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यास त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे पुढचं ज्ञान मिळण्यासाठी ती मधला दुवा ठरणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील सांधेजोड उत्तम प्रकारे झाली, तर निश्‍चितपणे त्याला उच्चस्तरावरचं शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. उच्च माध्यमिक स्तरानंतर विद्यार्थ्यास महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं असतं. विविध विद्यापीठांचे विविध विषय, विविध पदव्यांचे अभ्यासक्रम हे स्वतंत्र असतात. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेत असताना त्याला या कुठल्याही विषयाचं पूर्वज्ञान नाही अथवा संबंधित विषयाचा पाया पक्का झालेला नाही असं म्हणण्यास वाव राहणार नाही याचा विचार करून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्‍चितपणे विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन शिक्षण या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकते.

विषयांची फेररचना
प्रचलित उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये विषयांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान. प्रचलित अभ्यासक्रमामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखांचा स्वतंत्र अभ्यासक्रम निश्‍चित करून तिन्ही शाखांसाठी स्वतंत्र पुस्तकं तयार करण्यात आली आहेत. तसंच व्यावसायिक अभ्यासक्रम आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या शाखांची विषयनिश्‍चिती करण्यात आली आहे. वास्तविक माहिती संप्रेषण हा विषय हा काळाच्या ओघात अत्यंत महत्त्चाचा विषय झाला असून, या विषयासंबंधी आवश्‍यक असणारं सर्व ज्ञान तिन्ही शाखांतल्या विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्या जीवनामध्ये स्वत:चं करिअर करण्यास या ज्ञानाचा निश्‍चितपणे उपयोग होणार आहे. या तिन्ही शाखांकरता माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान या विषयाकरता आता एकच अभ्यासक्रम तयार करून त्यासाठी एकच पाठ्यपुस्तक तयार करण्यात येत आहे. याचप्रमाणे पूर्वी भाषा विषय आणि भाषेचं साहित्य असे दोन स्वतंत्र विषय ठेवण्यात आलेले होते. परंतु, भाषा आणि साहित्य या दोन बाबी वेगळ्या करता येत नाहीत. त्यांचं एकात्म स्वरूपाचं उपयोजनात्मक ज्ञान विद्यार्थ्यांना देणं आवश्‍यक आहे, म्हणून भाषा आणि साहित्य यांचा एकात्मिक विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, मराठी भाषा आणि साहित्य असा एकत्रित विचार करून त्या त्या विषयाचा एकच अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. याचं आता एकच पाठ्यपुस्तक राहील.

आपल्याशी सुसंगत व समाजाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अशा नागरिकांची पिढी तयार करण्याच्या संदर्भातला विचार अभ्यासक्रम पुनर्रचना आणि पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये करण्याचा प्रयत्न निश्‍चितपणे केलेला आहे. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्षम भारतीय नागरिक तयार होण्यास या अभ्यासक्रमाचा आणि त्यानुसार तयार होणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा निश्‍चितपणे उपयोग होणार आहे.

कृतिपत्रिका हे मुख्य वैशिष्ट्य
माध्यमिक स्तरावर ज्या पद्धतीनं मूल्यमापन पद्धतीमध्ये योग्य ते बदल करून विषयनिहाय कृतिपत्रिका तयार केलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं उच्च माध्यमिक स्तरावर विषयनिहाय कृतिपत्रिका हे मूल्यमापन पद्धतीचं खरं वैशिष्ट्य असणार आहे. मूल्यमापनातल्या या कृतींमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: करायच्या, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं तयार करायच्या, पालकांसमवेत घरी करायच्या, प्रयोगशाळेत करायच्या, शाळा आणि शाळेबाहेरची निरीक्षणं अशा अनेकविध कृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. शिकण्याचं प्रमुख साधन कृतीच आहे. पाठांतर, घोकंपट्टीपासून विद्यार्थी दूर राहतील. कृतींबरोबरच प्रायोगिक कौशल्यांच्या विकासाचाही विचार करण्यात आला आहे. पाठांची मांडणी करताना आंतरविद्याशाखीय सहसंबंधाचा काळजीपूर्वक विचार केला गेला आहे. अभ्यासक्रमानुसार विषयाच्या आशयामध्ये विद्यार्थ्याच्या जीवनाशी जोडलेल्या प्रत्येक घटकावर आधारित माहिती आणि माहितीच्या उपयोजनांचा विचार केला आहे. यामुळे दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक प्रश्‍नांची उकल करता येणार आहे.

पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या विविध कृतींच्या सहजसोप्या अध्ययनासाठी माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, विविध कृती कशा काळजीपूर्वक वाचून कराव्यात याची माहिती विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मिळेल याची दक्षता घेतली आहे.पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली माहिती ही पूर्ण नसते. विस्तारभयास्तव कमीत कमी आणि अचूक शब्दांत आशयाची मांडणी करण्याचा प्रयत्न पाठ्यपुस्तकात केला जातो. शिक्षकांनी तो आशय त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या आधारे; तसंच इतर विविध माध्यमांतून घेतलेल्या ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे अनुभवांच्या आधारे देणं अपेक्षित असतं. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाद्वारे सर्व विषय शिकवावेत या प्रचलित भूमिकेपेक्षा ‘ज्ञानरचनावादा’चा अंगिकार करून विद्यार्थ्यांनी स्वत: पाठ्यपुस्तक वाचावं, त्यातल्या कृती स्वत: कराव्यात, या कृतींच्या मांडणीतून आणि त्याच्या निरीक्षणातून प्रत्येक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासामध्ये शिक्षकानं एका जाणत्या, समंजस, प्रगल्भ मार्गदर्शकाची भूमिका निभवावी. हे करण्यासाठी विद्यार्थ्यांमधल्या विषयनिहाय विविध क्षमतांचा विकास करणं, नवीन कृतीयुक्त अध्यापन पद्धती आणि त्यास अनुसरून असणारी सर्व आधुनिक तंत्रं वापरणं आता अपरिहार्य ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या उत्तरदायित्वात निश्‍चितच वाढ होणार आहे आणि या बदलांचा विचार करून शिक्षक संबंधित विषयाचं ज्ञान योग्य प्रकारे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातूनच उद्याचे यशस्वी विद्यार्थी घडतील.

फेररचनेबाबत विचारात घेतलेले मुद्दे

  •  विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देण्यात येऊन त्यातून त्यांचं वर्तन, परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणं
  •  एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नव्या आशयाचा प्रत्येक विषयात समावेश करणं
  •  माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणं
  •  विविध कौशल्यांचा विकास आणि त्यासाठी संधीची समानता उपलब्धता करून देणं
  •  प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम आणि त्यातला आशय हा विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडित ठेवणं
  •  तणावरहीत, आनंददायी जीवनशैलीस अनुकूल अशा विविध घटकांचा अंगीकार करण्यास सक्षम आशय तयार करणं
  •  भविष्याचा वेध घेण्याची तयारी अभ्यासक्रमातून होणं

असे काही प्रमुख मुद्दे विचारात घेऊन प्रत्येक टप्प्यावरच्या अभ्यासक्रमाची नव्यानं  मांडणी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातल्या प्रत्येक घटकाचा आणि त्यास अनुसरून असलेल्या विषयांचा विचार करून विद्यार्थ्यांना दर्जेदार पाठ्यसाहित्य पाठ्यपुस्तकांच्या रूपानं उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

शिक्षणपद्धतीमध्ये ज्ञानरचनावादाचा अंगीकार हे विद्यार्थ्यांना सजगपणे घडवण्यासाठी टाकलेलं मोठं पाऊल आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना त्याचं बौद्धिक वय आणि क्षमता, त्यांचा सामाजिक परिसर, त्यांची ग्रहणक्षमता, त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती आणि सत्याप्रती कुतूहल अशा पूरक मांडणीतून दिलेलं शिक्षण हे विद्यार्थ्याला केवळ माहितीच देत नाही, तर त्याची ज्ञानग्रहण करण्याची क्षमता, माहितीचा यथायोग्य उपयोग करून घेण्याची क्षमता, आलेल्या अनुभवांतून निरीक्षण काढण्याची क्षमता, त्यावर चिंतन आणि मनन करण्याची क्षमता आणि वेळप्रसंगी त्यावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता अशाद्वारे विकासाच्या पायऱ्यांमार्फत त्याच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करतं. हा व्यक्तिमत्त्वविकास शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावरच्या अभ्यासक्रमानुसार आणि त्यावर आधारित असलेल्या संदर्भसाहित्यावर म्हणजेच पाठ्यपुस्तकं, संदर्भग्रंथ यावर अवलंबून असतो.

ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश हा आनंददायी स्वयंस्फूर्त आणि स्वअनुभूती शिक्षण असतो. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर या भूमिकेतून अभिप्रेत शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी हा योग्य अशी वैचारिक बैठक असणारा एक जबाबदार नागरिक बनेल आणि तोच नव्या समृद्ध समाजनिर्मितीप्रती उचललेले एक ठोस पाऊल असेल.

स्वाध्याय, उपक्रम यांमध्ये विविधता
विविध प्रश्‍नप्रकारांचा समावेश, उच्च मानसिक क्षमता विकसित होण्यासाठी आवश्‍यक अशी प्रश्‍नांची रचना करण्यात आली आहे. कृतिपत्रिकेविषयी आत्मीयता वाढवण्याच्या दृष्टीनं, विचारांना चालना देणाऱ्या स्वाध्यायांची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन दैनंदिन जीवनात करता यावं, यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये विविध उपक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. या सर्व टप्प्यांवरच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास अनुसरून परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थांचं मूल्यमापन करताना वैशिष्ट्यपूर्ण असे विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. प्रश्‍नांची प्रचलित मांडणी बदलण्यात आली आहे. किती समजलं यापेक्षा कसं समजलं आणि समजलेलं कसं व्यक्त करता येईल याचा प्रामुख्यानं विचार करण्यात आला आहे.

भविष्यात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या विचारांतून विविध घटकांची चर्चा करण्यात आली आहे. जल व्यवस्थापन आणि जल साक्षरता, वन व्यवस्थापन, मूल्यशिक्षण, पर्यावरण संरक्षण, उद्योग व्यवस्थापनातल्या विविध क्षेत्रांची ओळख, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर, समतामूलक तत्त्वांचा समावेश, सुधारित  कायदाविषयक ज्ञान, आर्थिक साक्षरता इत्यादींचा या अभ्यासक्रमात आणि विषयनिहाय पाठ्यपुस्तकातल्या आशयामध्ये समावेश करण्यात आला आहे. कालबाह्य माहितीला बगल देऊन अद्ययावत आणि अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहे. सामाजिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या समाजाशी निगडित घटकांचा समावेश पाठ्यक्रमात झाला आहे. यांतून संवेदनशीलता, सामाजिक भान यांची जाणीव जागृती होईल अशी अपेक्षा आहे.

आधुनिक संकल्पनांचा विचार
नव्या जगात वावरताना प्रत्येक विषयामधल्या आधुनिक संकल्पनांचा विचार आता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, गणितामध्ये जीएसटी, शेअर मार्केट इत्यादी. भूगोल विषयात जीपीएस, क्षेत्रभेट इत्यादी. विज्ञानामध्ये अवकाश विज्ञान, हवामानशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, शेती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान इत्यादी. सामाजिक शास्त्रामध्ये प्रत्येक क्षेत्राचा इतिहास, कला, क्रीडा इत्यादी. संविधानाची ओळख आणि नागरिकत्वाची जाणीव इत्यादी. भाषा विषयांचा विचार करता प्रामुख्यानं उपयोजित लेखन, विद्यार्थांनी तयार केलेल्या साहित्याचा समावेश असेल.

शिक्षकांना अध्यापन सुलभपणे करता येण्यासाठी मदत म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले क्‍यूआर कोड आणि त्यामागं माहिती देण्याकरता असलेलं दृक्‌श्राव्य स्वरूपातलं शैक्षणिक साहित्य याचा उपयोग करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकतील. महाराष्ट्रानं सन २०१६-१७ पासून क्‍यूआर कोडचा पाठ्यपुस्तकांमध्ये उपयोग करण्यास सुरवात केली. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांचा सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्‍यूआर कोडचा समावेश करण्यात आला आहे. मराठी आणि इंग्रजी या माध्यमासाठी शिक्षकांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची आकर्षक दृक्‌श्राव्य माहिती तयार करून ते ‘दीक्षा’ ॲपवर उपलब्ध करून देणारं आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. या अनुभवातून इयत्ता अकरावी आणि बारावीच्याही पाठ्यपुस्तकामध्ये क्‍यूआर कोडचा समावेश करण्यात आलेला आहे. नजीकच्या काळात क्‍यूआर कोडसाठी उपयुक्त अशी दृक्‌श्राव्य शैक्षणिक साधनं तयार करून ती अपलोड करण्यात येणार असून, त्याचा फायदा शिक्षक; तसंच विद्यार्थीसुद्धा अध्ययनासाठी करू शकतील. याचा उपयोग पालकांनाही विद्यार्थ्यांसाठी करून देता येणार आहे.

मूल्यमापनाची पद्धत
मूल्यमापनातला महत्त्वाचा प्रवाह म्हणून माध्यमिक स्तरावर काही विषयांच्या तोंडी परीक्षेकरता वीस गुणांचा विचार केला जातो. सैद्धांतिक पातळीवर तोंडी परीक्षा असावी किंवा नसावी याविषयी वाद, मत-मतांतरं असू शकतात. परंतु, वास्तव हे आहे, की शाळेतले शिक्षक हे विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेमध्ये सर्रास गुण देताना दिसतात. त्यामुळे तोंडी परीक्षेमुळे जी उद्दिष्टं साध्य होणं अपेक्षित होतं, ती न होता केवळ गुण देणं एवढंच साध्य होत असून, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये फुगवटा निर्माण होत आहे. वास्तविक या पद्धतीनं केवळ गुणांचा फुगवटा न करता विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे कष्ट, अभिव्यक्ती अशा गोष्टींतून कष्टानं जे गुण मिळतील ते त्याचे स्वत:चे गुण असतील आणि हे गुण त्याच्या पुढच्या यशस्वी शिक्षणासाठी महत्त्वाचे गुण ठरतील आणि म्हणून तोंडी गुणांची पद्धत सन २०१७-१८ पासून इयत्ता नववी आणि सन २०१८-१९ पासून इयत्ता दहावीसाठी बंद करण्यात आली आहे. याच पद्धतीनं उच्च माध्यमिक स्तरावर वीस तोंडी गुणांची पद्धत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या प्रत्येक विषयाचा अभ्यास स्वत:च्या गतीनं करून, प्रत्येक कृती त्यांनी आत्मविश्वासपूर्वक करून त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना देणाऱ्या स्वमताचा पुरस्कार करणाऱ्या मूल्यमापन पद्धतीचा विचार उच्च माध्यमिक स्तरावर केला जाणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासवाढीला निश्‍चितच चालना मिळणार आहे.

एकात्मिक दृष्टिकोन
माध्यमिक स्तरावर इयत्ता दहावीची परीक्षा देत असताना केवळ दहावीच्या ज्ञानावर आधारित परीक्षा न घेता (इतिहास विषय वगळता) त्यांनी इयत्ता नववीमध्ये संबंधित विषयामध्ये मिळविलेल्या ज्ञानावर आधारित उपयोजित स्वरूपाचे वीस टक्के प्रश्‍न समाविष्ट करण्यात आले आहेत. कारण इयत्ता नववी आणि दहावी हे माध्यमिकचे वर्ग असल्यानं त्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. याच पद्धतीनं इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही इयत्तांचा विचार एकात्म स्वरूपात (Integrated) करून इयत्ता अकरावीतल्या संबंधित वीस टक्के उपयोजित ज्ञानाचा विचार इयत्ता बारावीच्या मूल्यमापनामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला भविष्यातलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणं, स्वत:च्या करिअरसाठी विषयांचा सखोल अभ्यास करणं यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यास उच्च माध्यमिक शिक्षणानंतर भविष्यकालीन व्यवसायाची संधी, नोकरीची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला कोणत्या क्षेत्रांमध्ये स्वत:चं करिअर करायचं आहे हे ठरवण्यासाठी योग्य आत्मविश्वास निर्माण होईल याचा विचार करून प्रत्येक क्षेत्रातल्या करिअरच्या संधी टप्प्याटप्प्यानं त्यास माहिती करून दिल्या जाणार आहेत.

शिक्षकांची, पालकांची जबाबदारी
पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या संदर्भानं शिक्षकांची भूमिकादेखील अतिशय महत्त्वाची आहे. विषयज्ञान अद्ययावत करून घेणं, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा अवलंब करणं, अध्यापनाचे विविध पैलू राबवणं, विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न करणं, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं अशा अनेकविध बाबींचा विचार शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमानुसार देण्यात आलेल्या अध्ययन निष्पत्ती/ क्षमताविधानांचा विचार/ पडताळा करून घेणं आवश्‍यक आहे.
तंत्रज्ञानामुळे ज्ञानाच्या विस्फोटामुळे सर्व विषयांचं ज्ञान इंटरनेटद्वारे सहजपणे प्राप्त होतं. असं ज्ञान विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा दोन पावलं पुढं ठेवून संबंधित विषयाचं परिपूर्ण ज्ञान शिक्षकांनी पूर्वतयारीनं मिळवलं तरच शिक्षक सक्षमपणे आपल्या विषयाचं अध्यापन आत्मविश्वासपूर्वक करतील आणि ते विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र राहतील. पालकांनीही आपल्या पाल्यास शाखा आणि विषयनिवडीसाठी स्वातंत्र्य देऊन आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न कटाक्षानं टाळावा. आत्मविश्वासाचे पंख लावून गगनभरारी घेण्याचं स्वप्न पाल्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com