मुलं आणि गॅजेट्‌स (डॉ. स्वप्नील देशमुख)

डॉ. स्वप्नील देशमुख swapnilsdesh@gmail.com
रविवार, 23 डिसेंबर 2018

शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर दुसरीकडं गॅजेट्‌स दिलीच नाहीत, तर मुलं इतरांपासून वेगळी पडतील अशीही भीती वाटते आहे. या सगळ्याचा सुवर्णमध्य काढायचा कसा, गॅजेट्‌सच्या वापराचं नियंत्रण कसं ठेवायचं, मुलांच्या दृष्टीनं कसा विचार करायचा आदींबाबत मार्गदर्शन.

शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर दुसरीकडं गॅजेट्‌स दिलीच नाहीत, तर मुलं इतरांपासून वेगळी पडतील अशीही भीती वाटते आहे. या सगळ्याचा सुवर्णमध्य काढायचा कसा, गॅजेट्‌सच्या वापराचं नियंत्रण कसं ठेवायचं, मुलांच्या दृष्टीनं कसा विचार करायचा आदींबाबत मार्गदर्शन.

सहाव्या वर्गात शिकणाऱ्या रोहितला (नाव बदललं आहे) मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागलं, म्हणून त्याचे आई-बाबा माझ्या क्‍लिनिकला घेऊन आले होते. वयाच्या अकराव्या वर्षी निस्तेज चेहरा, खोल गेलेले डोळे, उतरलेलं वजन आणि हरवलेला आत्मविश्वास घेऊन रोहित माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला होता. असं एक उदाहरण नाही. गॅजेट्‌सच्या प्रचंड आहारी गेल्यामुळं आधी शारीरिक आणि नंतर मानसिक परिणाम झालेले किती तरी रुग्ण आमच्याकडं गेली चार-पाच वर्षं येत असतात. लहान मुलांपासून अगदी प्रौढ व्यक्तींपर्यंत. गेल्या काही काळात मात्र लहान मुलं येण्याचं प्रमाण वाढलंय. गॅजेट्‌सची, गेम्सची, आमिषांची दुनिया लहान मुलांना मोहवत चाललीय आणि पालक अतिशय संभ्रमित झालेत असं दिसतंय.
राज्य सरकार शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' हा दिवस सुरू करणार, अशी बातमी वाचली आणि हळूहळू पसरत चाललेल्या या गॅजेट्‌सच्या राक्षसाबाबत विचार सुरू झाले. एकीकडं लहानपणापासून गॅजेट्‌सच्या अवतीभोवती असणारी मुलं आणि दुसरीकडं अलीकडंच या गॅजेट्‌सच्या दुनियेत प्रवेश केलेले आणि गॅजेट्‌सशिवाय छान शिक्षण घेतलेले त्यांचे पालक यांच्यातली रस्सीखेच तीव्र होतेय असं दिसतंय. गॅजेट्‌स लहान मुलांना द्यायची की नाहीत, द्यायची तर किती वेळ द्यायची, एकदा दिल्यावर ती मुलं बंद करतील याची खात्री कशी करून घ्यायची, गॅजेट्‌सच्या राक्षसानं त्यांना ताब्यात घेतलंय हे कसं ओळखायचं, असे कित्येक प्रश्न सध्या पालकांपुढं उपस्थित होत आहेत.

संपर्क साधावा म्हणून दिलेल्या साध्या फोनचं रूपांतर निरनिराळी ऍप्स आणि गेम्स असलेल्या स्मार्टफोनमध्ये कधी होते हे पालकांच्याही लक्षात येत नाही. रोहितच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. सोय म्हणून दिलेल्या मोबाईलवर वेगवेगळे गेम्स कधी डाऊनलोड झाले हे त्याच्या पालकांच्या लक्षात आलं नाही. हरवलेल्या रोहितला बोलतं केल्यावर त्यानंही काही मुद्दे मांडले. उदाहरणार्थ, कामावरून घरी आल्यानंतरही आई-बाबांकडून होणारा टीव्ही आणि मोबाईलचा वापर, जास्त मित्र नसल्यामुळं मोबाईल हा एकच विरंगुळा उरणं, गेम लेव्हलवरून होणारी चढाओढ आणि त्यातून मिळणारं थ्रिल (उत्तेजना); तसंच मित्रांमध्येसुद्धा याच विषयावर होणारी सततची चर्चा...

पालकांकडूनच मूळ प्रोत्साहन
गॅजेट्‌स ही मुलांना देवानं दिलेली गोष्ट नाही. पालकच मुलांची गॅजेट्‌सशी ओळख करून देतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मूल रडत आहे म्हणून शांत करण्याकरता, जेवणाच्या वेळी त्यांना भरवण्यासाठी, आपलं काम आवरेपर्यंत त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये पालकच मुलांची मैत्री गॅजेट्‌सशी करून देतात. यातूनच लहान वयात मन शांत ठेवण्याकरता इमोशन आणि गॅजेट्‌स यांचं असोसिएशन तयार होतं. मित्र-मैत्रिणींशी या बाबतीत स्पर्धा सुरू होते, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्टफोनबाबत गेम्सबाबत चढाओढ सुरू होते. "पिअर प्रेशर'मुळे किंवा इतर मुलांच्या निरीक्षणातून गंड तयार झाल्यामुळंही जी मुलं आधी स्मार्टफोन वापरत नसत, तीदेखील स्पर्धेत राहण्यासाठी स्मार्टफोनची मागणी करू लागतात.

नक्की कशामुळं व्यसन?
असं या गॅजेट्‌समध्ये आणि मोबाईलमध्ये काय असतं जे आपल्याला त्याच्या "नादी' लावतं? याचं उत्तर गॅजेट्‌सच्या वापरामुळे आपल्या मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलांमध्ये आहे. यांच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा मेंदूमध्ये डोपामिन नावाचं संप्रेरक निर्माण करतो. डोपामीनमुळं मिळणारा उत्साह आणि समाधान आपल्याला या चक्रव्यूहामध्ये अडकवतो. शारीरिक खेळांमध्ये आनंद मिळवण्याकरता मित्र जमवणं, त्यांच्याशी संवाद साधणं, स्पर्धा, शारीरिक मेहनत घेणं आणि विजय मिळवणं या सगळ्या गोष्टींनंतर डोपामिन निर्माण होत असतं; परंतु या मोठ्या प्रक्रियेपेक्षा मोबाईलवर हाताच्या बोटांच्या हालचालींवर ते निर्माण होत असेल, तर यापेक्षा सोपी पद्धत ती काय? तसंच करमणुकीच्या माध्यमांचा वापर करण्याचं स्वातंत्र्य, आपल्याला हवं ते बघायला मिळण्याची सोय, त्यासाठी स्थळ, काळ आणि वेळ यांचं बंधन न पाळण्याची वृत्ती यामुळंदेखील मोबाईल ऍप्स आणि गेम्स यांचा वापर करण्याचा कल वाढत जातो.

व्यसनाची लक्षणं
अर्थात हे सगळं असलं, तरी मोबाईल किंवा इतर गॅजेट्‌स वापरणारं प्रत्येक मूल त्याच्या आहारी जातच असं नाही. गॅजेटच्या व्यसनाची काही ठळक लक्षणं पुढीलप्रमाणं असतात ः
- सतत मोबाइलवर असणं, मोबाईल हाताबाहेर न जाऊ देणं, अंथरुणात आणि जेवतानादेखील मोबाईल चेक करत राहणं, मोबाईलवर असताना वेळेचं आणि सभोवतालच्या जगाचं भान न राहणं
- एकलकोंडेपणा आणि अबोलपणा येणं, चिडचिड होणं
- अभ्यास आणि खेळातली गुणवत्ता कमी होणं, मोबाईल काढून घेतल्यास घरी वस्तूंची तोडफोड करणं, स्वतःला इजा पोचवून घेणं, घर सोडून जाण्याची धमकी देणं, जेवण न करणं इत्यादी.
गेल्या तीन-चार वर्षांत आठ ते चौदा वर्षं वयोगटातल्या मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, लक्ष केंद्रित न करू शकणं, हिंसक वर्तन, झोपेचे आजार, शैक्षणिक पीछेहाट अशा स्वरूपाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या वाढली आहे.

शारीरिक, मानसिक दुष्परिणाम
लहान मुलांमध्ये प्रामुख्यानं मोबाईल आणि गॅजेट्‌सच्या अतिवापरामुळं होणारे अनेक दुष्परिणाम आहेत. याचे साधारणत: शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम असे दोन भाग करता येऊ शकतात.
शारीरिक दुष्परिणाम ः
- दृष्टी कमी होणं
- डोकं दुखण्याचा त्रास होणं,
- झोप न लागणं
- डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं
- मान आणि मणक्‍याचे आजार
- रेडिएशनमुळं होणारे अपाय

मानसिक दुष्परिणाम ः
- सतत मोबाईल, टीव्ही, कॉंप्युटर वापरल्यामुळं मुलं एकलकोंडी बनतात
- कोणतीही गोष्ट विचार करून करण्याची सवय जाते
- व्यवहारज्ञान खुंटतं, सामाजिक कौशल्य वाढत नाही
- मानसिक; वर्तणूकविषयक, भावनिक तसंच शालेय समस्या सुरू होतात
- एकाग्रता कमी होतं, उदास वाटणं, निर्णयक्षमता कमी होणं, संवादकौशल्याचा विकास न होणं
- मुलं हिंसक आणि रागीट बनतात
- झोप पुढं ढकलल्यामुळं अपुरी होते आणि त्यातून येणारा अशक्तपणा, चिडचिड; तसंच सकाळच्या सर्व क्रिया उशिरा सुरू होणं याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो.
- हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं, वजन वाढतं, लठ्ठपणा येतो, व्यायामास वेळ न दिल्यामुळं मानसिक आणि शारीरिक विकास खुंटतो.

गॅजेटच्या विळख्यात न अडकण्यासाठी उपाय काय?
- स्क्रीन टाईम एक तासापेक्षा जास्त नसावा
- मैदानी खेळात किमान एक तास घालवावा
- मोबाईलचा वापर झोपताना करणं टाळावं
- मित्रांबरोबर संवाद आणि ग्रुप ऍक्‍टिविटीवर भर द्यावा
- वयाच्या मर्यादेनुसारच गॅजेट्‌स उपलब्ध करून द्यावी
- मुलांशी संवाद वाढवावा
- मुलांना आवडणारे गेम्स किती घातक आहेत, हे esrb.org या वेबसाईटवर तपासून बघावेत
- झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल बंद करणं
- मूल त्यांच्या मोबाईलवर नक्की काय करत आहे, काय बघत आहे याची माहिती करून घेणं आणि वेळोवेळी ते चेक करणं
- अँटी-व्हायरस आणि पॅरेंटल कंट्रोलच्या मदतीनं मुलांना नको त्या संकेतस्थळांना भेट देण्यापासून ब्लॉक करता येतं.
- एका संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे, की संध्याकाळनंतर सर्व कुटुंबीयांनी आपापले मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवून एकत्र वेळ घालवला, तर कुटुंबातला संवाद तर वाढतोच; तसंच मुलांचं मोबाईल ऍडिक्‍शन लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.

आनंदाची अनेक रूपं
आनंदाची अनेक रूप आपल्या सभोवती आहेत. खेळ, कला, छंद, निसर्ग सगळीच आनंदाची माध्यमं आहेत. माणसापासून ती दुरावता कामा नयेत. कुटुंब, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, गुरुजन आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण ही आयुष्यभराची आनंदाची शिदोरी आहे. सुसंवाद हा सुखी आयुष्याचा आधार आहे. साधनांचा संग मर्यादित करून माणसानं माणसांसोबत जगायला हवं. नुसतं शारीरिक अर्थानं एका घरात राहण्यापेक्षा "एकमेकांसोबत' राहायला हवं. आपले सुख-दुःख, आवडी, आशा, निराशा, स्वप्नं, इच्छा अशा सर्व भावना व्यक्त होणं आणि जगणं गरजेचं आहे. मुलांना आभासी जगातून बाहेर येऊन खरंखुरं आयुष्य जगायला आपण शिकवायला हवं. लहान मुलं अनुकरणानं शिकतात म्हणून आधी आपण मोठ्यांनी खऱ्या अर्थानं "मोठं' व्हायला हवं. आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीला आदर्श ठेवायला हवा.

या दिशेनं एक पाऊल म्हणून "नो गॅजेट्‌स डे'कडे बघता येईल. भारताला ऑलिंपिकमध्ये मेडल्स कमी मिळतात, असं का होतं याची मीमांसा करत असताना, आजची तरुण पिढी माध्यमांच्या आहारी गेल्यानं खेळ आणि व्यायामाकडं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्या सरकारच्या आणि अभ्यासकारंच्या लक्षात आलं आणि म्हणून आठवड्यातला एक दिवस शाळेत "गॅजेट-फ्री डे' असावा अशी संकल्पना समोर आली. या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी कुठलीच गॅजेट्‌स न वापरता मैदानी खेळ खेळावेत, छंद जोपासावेत इत्यादी. थोडक्‍यात साधनांच्या बाहेरच्या सुंदर जगाशी मुलांची ओळख व्हावी आणि त्यातला आनंद त्यांना अनुभवता यावा- जेणेकरून मुलांना व्यायामाचं महत्त्व पटवून देता येईल, हा त्यामागचा हेतू आहे. व्यायाम करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मैदानी खेळ खेळणं लहान मुलांसाठी, त्यांच्या विकासासाठी सर्वांत जास्त महत्त्वाचं आहे.

गॅजेट्‌सचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आणि उपयोग आपण नाकारू शकत नाही; परंतु म्हणतात ना "लाइफ इज बॅलन्सिंग ऍक्‍ट'... संतुलन हा आयुष्याचा पाया आहे. विचार आणि आचारांच संतुलन, अर्थ आणि परमार्थाचं संतुलन, प्रगती आणि प्रकृतीचं संतुलन, स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचं संतुलन आणि कुठल्याही टोकाच्या निर्णयाला पोचण्याआधी सारासार विचारांचं संतुलन हवं. म्हणून गॅजेट्‌स आणि इतर साधनांचा वापर करतानादेखील "संतुलित मती आणि संतुलित गती' असावी असं वाटतं. "अति सर्वत्र वर्जयेत' याप्रमाणंच गॅजेट्‌सचा अतिउपयोग करणं टाळावं, हा संस्कार लहानपणापासून मुलांवर व्हायला हवा. जेणेकरून पुढं होणारं त्यांचं इमोशन आणि गॅजेट्‌सचं चुकीचं असोसिएशन वेळीच थांबवता येईल. हे थांबविण्यासाठी इतर मैदानी खेळांनादेखील तेवढंच प्रोत्साहन देता येऊ शकतं. "गॅजेट- फ्री' डेसारखे उपक्रम हे त्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल आहे. मात्र, मुळात गॅजेट्‌सच्या दुनियेत असूनही मन आणि भान जागेवर असणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. ते जमलं, तर सगळंच साधेल, एवढं मात्र नक्की!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr swapnil deshmukh write no gadget day article in saptarang