‘कर्मनाशा’ आणि तिचा पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

River Bridge

सकाळच्या प्रहरी वृत्तपत्र वाचन म्हणजेच अपघात, गुन्हे, थोरांचे मृत्यू या बातम्यांची मांदियाळी. अनेकदा अशा बातम्या मन विषण्ण करून जातात.

‘कर्मनाशा’ आणि तिचा पूल

सकाळच्या प्रहरी वृत्तपत्र वाचन म्हणजेच अपघात, गुन्हे, थोरांचे मृत्यू या बातम्यांची मांदियाळी. अनेकदा अशा बातम्या मन विषण्ण करून जातात. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा अपघाती मृत्यू, लग्नाचं वऱ्हाड किंवा देवदर्शनाच्या बसेस, सणाच्या दिवशी अपघातामुळे पसरलेली शोककळा हे आता सामान्य झालं आहे. कुठंतरी काहीतरी चुकतंय, नाही तर वाहतूक अपघातांत आपल्या देशाने जगात पहिला नंबर पटकाविला नसता.

मोरबी गावात २३ वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे मच्छू नदीवरील मातीचं धरण फुटलं आणि अवघं गावच वाहून गेलं, मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. असं म्हणतात की, वीज कधी एकाच ठिकाणी दोनदा पडत नाही. मोरबी गाव मात्र याबाबतीत अपवाद ठरलं. ‘झुलतो पूल’ हे या गावाचं ठळक आकर्षण.

पाव किलोमीटर लांब, चार फूट रुंद आणि पाण्यापासून पन्नास फूट उंच असा हा पूल १८८० मध्ये तेथील राजाने आपल्या दोन महालांना जोडण्यासाठी बांधला. काही दिवसांपूर्वी एका भीषण अपघातात पूल पडला आणि शंभरावर लोकांना जलसमाधी मिळाली.

नदीवर पूल बांधणं हे भारतात पूर्वापार चालत आलं आहे. रामसेतू हा तर समुद्रावर बांधलेला पूल! पण आधुनिक युगात दिल्लीचा बारापुला किंवा सोळाव्या शतकातला जौनपूरचा पूल लगेच लक्षात येतो. पुण्यात अठराव्या शतकात १७६१ मध्ये नानासाहेब पेशवे यांनी लकडी पूल बांधला, त्यानंतर होळकर पूल आणि संगमावरील वेलेस्ली पूल बांधले गेले. असंही म्हणतात की, मुठा नदीवर अठराव्या शतकात बांधला जाणारा एक पूल अनेक अपशकुनांनंतर सोडून देण्यात आला.

मराठा साम्राज्याचा जसा विस्तार झाला, राज्यकर्त्यांच्या नजराही दूरच्या प्रदेशापर्यंत पोचल्या. १७९५ मध्ये नाना फडणीस यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर वाहणाऱ्या कर्मनाशा नदीवर पूल बांधण्याचं ठरवलं. याचं कारण असं की, या नदीच्या पाण्याचा स्पर्श झाला तर त्या मनुष्याचे सुकर्म नाश पावतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. सत्यव्रत नामक राजा शरीरासह स्वर्गात जाऊ इच्छित होता आणि त्यासाठी त्याने प्रथम वसिष्ठ ऋषी आणि त्यांनी नकार दिल्यावर विश्‍वामित्र ऋषींना प्रार्थना केली. आपल्या तपोबळाने विश्‍वामित्राने राजास स्वर्गात शरीरासह पाठवले; मात्र इंद्राला राग आला आणि त्याने राजाला पृथ्वीवर माघारी धाडले. विश्‍वामित्र आणि इंद्र यांच्या या चढाओढीत या राजाची ‘त्रिशंकू’ अवस्था होऊन, तो पाय वर आणि शिर खाली असा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या मध्येच अडकून बसला. या त्रिशंकूची लाळ मात्र पृथ्वीवर गळत राहिली आणि या गळणाऱ्या लाळीतून एक नदी तयार झाली. या अशुद्ध नदीच्या पाण्याच्या स्पर्शाने सुकर्मनाश होतो अशा समजेतून नदीचं नाव कर्मनाशा पडलं.

नाना फडणीस यांनी काशीतील आपल्या भास्करपंत कुंटे नामक कारकुनास पूल बांधायला सांगितलं. मात्र, तिथे वाळू आणि पाण्याच्या प्रवाहामुळे पाया टिकेना. मांत्रिकांनी अनुष्ठान सुरू केलं, असं जेव्हा नानांना कळलं, तेव्हा मात्र त्यांनी हे काम बेकर नामक इंग्रज अभियंत्याला वीस हजार रुपये देऊन करायला सांगितलं, तरी पुलाचा पाया बांधण्यापलीकडे फारसं काम होऊ शकलं नाही. १८०० मध्ये आपल्या मृत्यूपूर्वी नानांनी या कर्मनाशावरील पुलासाठी दोन-तीन लक्ष रुपये तरी खर्च केले होते.

हा पूल बांधण्याचे प्रयत्न चालूच राहिले. शेवटी तेथील राजा पटनीमलने ९ जून १८२९ ला हे काम हाती घेतलं. नानांच्या काळातला पाया अजून तिथे होताच. त्याची मदत घेऊन तीन कमानी असलेला पूल जुलै १८३१ मध्ये प्रवाशांना खुला करण्यात आला. हा पूल राजाच्या मुलाच्या देखरेखीखाली बांधला गेला आणि थोडी तांत्रिक मदत काशीमधील एका इंग्रजाने दिली. हा पूल आजही उभा आहे.

१८३१ नंतर पुलाचा वापर होऊ लागला. ‘कर्मनाशा’पासून प्रवासी सुरक्षित झाले. अर्थात, पुढील दीडशे वर्षांत समाजात इतके बदल झाले की, पौराणिक कथा विसरून फक्त कर्मनाशा हे नदीचं नावच शिल्लक आहे. कर्मनाशावर पक्का पूल जिद्दीने बांधला गेला, तसाच मच्छू नदीवरही होईल. आपल्याकडे असे अपघात होऊन असे अनर्थ घडू नयेत एवढीच या युगातील कर्त्यांना प्रार्थना. आणखी काय?

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातल्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)