चौथ का बारवाडा : काल आणि आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौथ का बारवाडा : काल आणि आज
चौथ का बारवाडा : काल आणि आज

चौथ का बारवाडा : काल आणि आज

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

दोन प्रसिद्ध अशा चित्रपट कलावंतांचा गेल्याच महिन्यात राजस्थानच्या ‘चौथ का बारवाडा’ या गावात विवाह संपन्न झाला. यामुळे हे गाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं. सवाई माधोपूरच्या पश्चिमेकडील हे छोटं गाव आणि मराठ्यांचा अठराव्या शतकातला इतिहास यांचा संबंध आहे.

अठराव्या शतकात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या काळात शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं बृहत महाराष्ट्र निर्माण झालं. चंबळ - यमुनेपासून, तुंगभद्रा - कावेरीपर्यंत मराठा सैन्याचं घोडदळ दौडत होतं. १७५० नंतर उत्तरेकडं जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी यमुनापार करून रोहिला पठाणांचा पराभव केला. १७५२ मध्ये मोगल पातशहा मराठ्यांचा आश्रित झाला. नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथरावांनी होळकरांबरोबर १७५४ मध्ये दिल्ली जिंकली. तेथील वजिरानं मराठा सैन्याच्या मदतीनं पातशहा बदलला. १७५५ मध्ये विठ्ठल शिवदेवनं ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला.

मराठ्यांच्या या झंझावातासमोर उत्तर व पश्चिमेतल्या सत्ताधीशांना झुकावं लागलं. मात्र यातील रोहिला सरदार नजीब खान यानं सीमेपलीकडच्या प्रदेशातून अहमदशाह अब्दालीला आमंत्रित करून दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. मथुरा शहरात मोठे अत्याचार केले. अब्दाली १७५७ च्या उन्हाळ्यात परत फिरला आणि रघुनाथराव आणि सरदार होळकर यांनी दिल्ली काबीज केली. पंजाबात शिरून लाहोर, अटक, पेशावर आणि मुलतान शहरांतून अब्दालीच्या सैन्याची हकालपट्टी केली आणि मराठेशाहीचा अंमल निर्माण केला. रघुनाथराव आणि होळकर दक्षिणेकडं आल्यावर त्यांची जागा दत्ताजी शिंदे यांनी घेतली.

नानासाहेब पेशव्यांनी दत्ताजीस काही अवघड अशा कामगिऱ्या सांगितल्या होत्या. पंजाब आणि दिल्ली या यवनग्रस्त प्रदेशांचं रक्षण, दुआब ओलांडून अयोध्येच्या नवाबाकडं जाऊन काशी, प्रयाग आपल्या पदरी पाडून इंग्रजांच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बंगालवर स्वारी करायची. वेळापत्रक आणि कार्य अवघड होतं. कारण नजीब खानानं मराठ्यांविरोधात सर्व पठाण आणि शूजा उद्दोला हा अयोध्येचा नवाब यांना आपल्याकडं ओढून घेतलं होतं. शिवाय अब्दालीकडं दूत पाठवून मदतीची याचना केली होती.

याउलट दत्ताजींनी गंगेवर पूल बांधण्याचं महत्त्वाचं काम होळकरांच्या सांगण्यावरून नजीब खानाकडं सोपवलं होतं. जसा १७५९ चा पावसाळा संपत आला, तसं नजीबचं वागणं बदललं आणि शुक्रतल येथे तो दत्ताजीचा गंगेपारचा मार्ग अडवून बसला. ऑक्टोबर १७५९ मध्ये अब्दालीही भल्यामोठ्या सैन्यासह कंदाहारहून निघाला. भारतात जन (स्त्रिया), जर (सोनं) आणि जमीन मिळेल या आशेनं मोठ्या प्रमाणात या सैन्यामध्ये भरती झाली होती. मराठ्यांची लाहोरपर्यंतची ठाणी त्यानं उठवली. हे सैन्य जसं शुक्रतलला पोचलं, तशी या धोक्याची जाणीव दत्ताजी शिंदे यांना झाली.

बिलकुल न डगमगता दत्ताजी यमुना ओलांडून ठाणेश्वरजवळ अब्दालीचा दिल्लीकडील मार्ग अडवून उभे राहिले. मात्र, अब्दाली यमुना नदी ओलांडून नजीब खानाच्या सैन्याला जाऊन मिळाला आणि यमुनेच्या पूर्व किनाऱ्याकडून दिल्लीकडं सरकू लागला. दत्ताजी तातडीनं दिल्लीला पोचले. आपले जादा बुणगे, कुटुंबकबिला कोटपुतलीला पाठवून त्यांनी मल्हारराव होळकर यांना मदतीस येण्याचे निरोप पाठविले.

मल्हारराव या वेळी बारवाडा या गावातून चौथा किंवा खंडणी वसूल करण्यात गुंतले होते. बारवाडाभोवती तट होता आणि जयपूरनरेश माधोसिंहदेखील त्या गावाला मदत करत होता. आपल्या भल्याथोरल्या तोफा मागवून होळकर या झुंजीत गुंतले होते, तरी दत्ताजी शिंदेचा निरोप आल्यावर येथून लवकर अंग काढून दिल्लीला जाण्याची तयारी होळकर करू लागले.

दिल्लीत दत्ताजी, यमुनेपार लुनी गावात अब्दाली अशी परिस्थिती होती. थंडीचे दिवस होते. १७६० ची मकर संक्रांत, १० जानेवारी १९६० चा दिवस उजाडला. त्या दिवशी नजीब खान आणि अब्दालीच्या सैन्यानं यमुनेच्या कोरड्या पात्राला बुराडी घाट इथं पार करण्यास सुरुवात केली. दत्ताजींनी आपली कुमक तिथं पाठवली, पण शत्रू मोठ्या संख्येनं येतोय हे पाहून दत्ताजी स्वतः तिथं सैन्यानिशी पोचले. आपला भाला व तलवार यांनी ते अफगाणांना मागं ढकलू लागले. तोच एका गोळीनं त्यांचा वेध घेतला. दत्ताजी घोड्यावरून खाली पडताच, एक मोठी अफगाण टोळी घेऊन कुतुबशाह तिथं पोचला. क्यों पटेल? और भी लडोगे? असं जखमी पडलेल्या दत्ताजींना हिणवलं. ‘जरूर! बचेंगे तो और भी लडेंगे!’ असं दत्ताजी यांनी उत्तर दिलं. पण, त्यानंतर अफगाणांनी संयम सोडून दत्ताजी यांचा शिरच्छेद केला. मागं आलेले जनकोजीही गोळी हातास लागून जखमी झाले.

शिंदेंचं सैन्य मागं हटलं आणि येत असलेल्या मल्हाररावाच्या सैन्याला मिळालं. होळकरांनी गनिमी काव्यानं अजून दोन महिने दिल्लीभोवती जागा जिंकल्या; पण लवकरच मल्हाररावांचाही पराभव झाला. या बलवान शत्रूला तोंड देण्यासाठी दक्षिणेतून मोठं सैन्य आलं पाहिजे असा निरोप पुण्याला पोचला. येथूनच सदाशिवराव भाऊ याच्या पानिपत स्वारीचा प्रारंभ झाला. बारवाडा गावानं स्वसंरक्षणार्थ मल्हारराव होळकर यांस चौथ न देता अडकवून ठेवलं. यामुळे दत्ताजी शिंदेंच्या मदतीला जाण्यासाठी त्यांना उशीर झाला. दत्ताजी शिंदे यांच्यासारखा उमदा सरदार त्या लढाईत मृत्युमुखी पडला. पुढील इतिहास विपरीत झाला. या घटनेनंतर बारवाडाच्या नावापुढं एक विशेषण जोडलं जाऊ लागलं, ते म्हणजे - चौथ का बारवाड!

(डॉ उदय कुलकर्णी शल्यचिकित्सक असून भारतीय नौदलातून कमांडर या पदावरून निवृत्त झाले आहेत. अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top