म्हणून ही नवरात्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून ही नवरात्र...

पावसाळा संपायच्या सुमारास दांडियाच्या तालावर वाजतगाजत नवरात्र येऊन थडकते. देशव्यापी अशा या उत्सवाची अनेक रूपं पाहून सर्वत्र उत्साह ओसंडून वाहताना दिसतो.

म्हणून ही नवरात्र...

पावसाळा संपायच्या सुमारास दांडियाच्या तालावर वाजतगाजत नवरात्र येऊन थडकते. देशव्यापी अशा या उत्सवाची अनेक रूपं पाहून सर्वत्र उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. कुठं दुर्गापूजा तर कुठं भोंडला, कुठं रामलीला तर कुठं गरबा. रावण दहनाचा कार्यक्रम तर फारच लोकप्रिय ठरतो. रामायण, महाभारत, महिषासुराचा वध अशा अनेक घटनांचा नवरात्राशी संबंध आहे, त्यामुळे हा उत्सव अर्थातच बराच प्राचीन असावा.

नवरात्रामध्ये सीमोल्लंघनालाही विशेष महत्त्व आहे. परराज्यात जाऊन पराक्रम गाजवून परत येणे हा त्यातील प्रकार मराठा इतिहासात आपल्याला पाहायला मिळतो. शेतीची कामं उरकल्यावर सैन्य जमवायला सुरुवात होत असे. जरी हुजुरातची फौज तयार असली, तरी इतर सरंजामदार आपापल्या तुकडीसह येऊन मिळायला थोडे दिवस लागत. प्रत्येक सरंजामाच्या उत्पन्नावर प्रत्येक सरदाराने विशिष्ट सैन्य उभं करून घेऊन यायचं, अशी पद्धत होती. सरंजामदारांवर पेशवे नजर ठेवून असत आणि वेळोवेळी पूर्ण संख्या भरली हे पाहण्यास गणती होत असे.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या बारा वर्षांनी अशाच एका नवरात्रीत निघालेलं मराठा सैन्य फेब्रुवारीच्या सुमारास दिल्लीत पोचल्याचं आपण पाहतो. तेथून येसूबाईसाहेबांची सुटका करून स्वराज्याच्या सनदा घेऊन परत सातारा इथं शाहू महाराजांकडे ही विजयी सेना येऊन पोचते. दिल्ली हे लक्ष्य शिवकाळापासून होतंच, त्याची पूर्तता प्रथम १७१९ मध्ये झाली. यानंतर पुन्हा १७३६ च्या नवरात्रात निघाली होती, बाजीराव पेशव्यांची स्वारी जी दिल्लीवर थडकली.

१७४० नंतर मराठा फौजा हिंदुस्थान व कर्नाटकात मोहिमेस जाऊ लागल्या. १७४२ च्या अशाच एका महाअष्टमीची पूजा बंगालमध्ये भागीरथीकिनारी चालली असताना अचानक मराठा सेनापती भास्कर दास याच्यावर अलीवर्दी खानाने छापा घातला. अर्थात, पुढे अलीवर्दीला मराठ्यांना चौथ देणं मान्य करावं लागलं.

पानिपतपूर्व काळात १७६० मध्ये जेव्हा दिल्लीवर मराठ्यांनी कब्जा मिळवला, तेव्हा तिथं पैसा, अन्न, घोड्याला दाणा मिळेनासा झाला. पावसाळा संपला आणि घटस्थापना झाल्याबरोबर मराठे कुंजपुऱ्याकडे सरसावले. कुंजपुरा इथं अनेक अफगाण सरदार सैन्य, मुबलक धान्य आणि पैसा बाळगून अब्दालीला सामील होण्यास आले होते. शिवाय, दत्ताजी शिंदे यांचा खून करणारा कुत्ब शाहही तिथं होता. नवरात्रातच कुंजपुऱ्यावर मराठ्यांनी तुफान हल्ला चढवला. बखरीत याचं वर्णन असं आहे :

‘चोहोकडून हर! हर! म्हणोन घोडे घातले. ते समयी मोठी धुंदी जाली. चोहोंकडून तोंडे लागून लांडगेतोड जाली. ते दिवशी मराठियांनी चित्तात करुणा आणिली नाही.’ कुत्ब शाहला पकडून एका हत्तीवरून सदाशिवराव भाऊंकडे आणत असताना भाऊसाहेब म्हणाले, ‘‘या मात्रागमनियास एवढे प्रतिष्ठेने कशास आणिले? हत्तीवरून लोटून द्यावा!’’ आज्ञा केली, ‘‘ढालेपाशी नेऊन याचा शिरच्छेद करावा!’’ दत्ताजीच्या या खुन्याने जेव्हा मृत्युदंडापूर्वी पाणी मागितलं, तेव्हा भाऊसाहेबांनी, ‘‘यांस लघुशंका प्राशन करवणे,’’ असा हुकूम दिला.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येस आणखीन एक महिषासुर मारला गेला. विजयादशमीचा दिवस कुंजपुऱ्यास मराठ्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.

यानंतर तीन दशकांनंतर मराठे व इंग्रज फौजांनी टिपू सुलतानचा पराभव केला. १७९२ मध्ये मराठेशाही वैभवाच्या उच्च टापूपर्यंत पोचली होती. या वेळी जेम्स वेल्स हा चित्रकार पुण्यात होता आणि नवरात्रातील मिरवणूक पाहण्यास हा शनिवारवाड्यापाशी पोचला. त्या दृश्याचं वर्णन आणि चित्र त्याने काढून ठेवलं आहे. स्वतः वेल्स निनीगज नामक साडेअकरा फूट उंच हत्तीवर चार्ल्स मॅलेट या इंग्रज वकिलाबरोबर बसला होता. तिथून त्याने जे दृश्य पाहिलं, ते असं :

‘‘मी पेशवे व महादजी शिंदे उपस्थित असलेली एक प्रचंड मिरवणूक पाहिली. जवळजवळ सत्तर हजार ते एक लक्ष जनसमुदाय मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरला होता. पेशव्यांच्या मिरवणुकीत चाळीस हत्ती होते. शिंदेंच्या जथेतदेखील बरेच होते. चाळीसपैकी वीस हत्तींवर अंबारी होती. हत्तींचा शांत स्वभाव पाहून मला आश्चर्य वाटलं. जणू मेंढरंच! त्यांची शक्ती मात्र अचाट आहे.’’

हा काळ मराठेशाहीचा शेवटचाच वैभवाचा काळ होता आणि नवरात्रात हे वैभव पाहण्यास हजारोंची गर्दी झाली होती. यानंतर मात्र अवघ्या दहा वर्षांत मराठेशाहीला उतरती कळा लागली. राष्ट्राला सक्षम नेतृत्व असणं किती महत्त्वाचं असतं, हे हा इतिहास सांगून जातो.

नवरात्र आणि विजयादशमी हा क्षात्रधर्माच्या उधाणाचा उत्सव आहे. भारतात हा भाव पुरातन आहे. हा क्षात्रधर्म जागृत राहावा, सदैव देशाच्या योग्य संरक्षणाची याद राहावी म्हणूनच ही नवरात्र.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकाच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)