फुटाण्याची भीक!

समाज झपाट्याने बदलतोय. प्रत्येक पिढीला वाटतं, पुढच्या पिढीने नैतिकता सोडली आहे, एकंदर अधःपतनाची सर्व लक्षणं स्पष्ट दिसू लागलीत, प्रस्थापित रूढींना बगल दिली जात आहे.
ramshashtri prabhune
ramshashtri prabhunesakal
Summary

समाज झपाट्याने बदलतोय. प्रत्येक पिढीला वाटतं, पुढच्या पिढीने नैतिकता सोडली आहे, एकंदर अधःपतनाची सर्व लक्षणं स्पष्ट दिसू लागलीत, प्रस्थापित रूढींना बगल दिली जात आहे.

समाज झपाट्याने बदलतोय. प्रत्येक पिढीला वाटतं, पुढच्या पिढीने नैतिकता सोडली आहे, एकंदर अधःपतनाची सर्व लक्षणं स्पष्ट दिसू लागलीत, प्रस्थापित रूढींना बगल दिली जात आहे. पूर्वी जेव्हा नऊवार सोडून सहावारी साड्या आल्या, तेव्हाही नाक मुरडणारी मंडळी होती. आता साडी प्रामुख्याने समारंभांसाठी; जीन्ससारखं सुख नाही, असं वातावरण आहे.

लग्नसंस्थेचंही तेच. कशाला हवं ते लग्न? परदेशात कायदेशीररीत्या पार्टनरला सर्व हक्क मिळाले आहेत, आपल्याकडेही येतीलच. या लिव्ह-इन प्रकरणाची सुरुवातच कदाचित या कायदेशीर बंधनात न अडकण्यासाठी झाली असावी आणि आता कायदा या नात्याला सामावून घेताना दिसतंय.

कधी कधी या ‘लिव्ह-इन’मागे कायद्याव्यतिरिक्तही कारणं असतात. उदाहरणार्थ धर्म- जाती- भाषा- प्रांत- वर्ण इत्यादी. आई-वडिलांची संमती नसणं हेही कारण असतं. ‘ऑनर किलिंग’ हा प्रकार तर एकविसाव्या शतकातही आपण पाहतोय. प्रेमात पूर्णपणे मश्गूल झालेल्या, कदाचित ऑफिस किंवा नेहमीच्या बस अथवा लोकलमध्ये भेटणाऱ्या युवक-युवतीला अर्जुनाप्रमाणेच फक्त आपलं लक्ष्य दिसत असतं.

धर्म-जाती वगैरे गोष्टींचा विचार त्या बसमधून उभं राहून प्रवास करताना कसला डोकावतोय! मात्र, जेव्हा दोन्ही घरांत हे प्रेम प्रकरण पोचतं आणि चित्रपटात ज्याप्रमाणे आई-वडील एका प्रसंगात ‘‘But वैजयंती he is not an Iyer’’ म्हणतात, थोडक्यात पूज्य माता-पितांचा विरोध होतो, तेव्हा हे प्रेमात पडलेलं जोडपं, त्याला एकच मार्ग दिसतो - पळून जाणं आणि एकत्र राहणं!

तर, हा झाला किस्सा दुतर्फी प्रेमाचा. पण, कधीकधी ‘किसी को प्यार करना और उसी से प्यार पाना - बहोत कम लोगों को नसीब होता है’ हे यश चोप्रा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकतर्फी प्रेम होतं आणि मग कधी ‘क-क-क किरणपर्यंत’ गाडी पोचू शकते. मुलगी पळवली यात नवीन ते काय! सुभद्राहरण अर्जुनाने केलं, रामायण तर पूर्ण या मूळ प्रकरणावर रचलं गेलं.

कधी कधी मात्र मियाँ बिबी राजी असतात, पण पुढे पटेनासं होतं. मुलीचे माहेरशी संबंध तुटलेले असतात, तिच्यावर अत्याचार होतात आणि काही वेळा दुर्दैवाने खुनापर्यंत मजल जाते. अलीकडेच दिल्लीमध्ये झालेल्या अशा प्रकरणामुळे समाज बेचैन झाला. आपल्या रूढी सोडल्या तर गाडी रुळावरून घसरू शकते काय, असा विचार करण्याचीही वेळ आली.

एकतर्फी प्रेमातून मूल पळवणं नवीन नाही. १७७८ मध्ये पुण्यात अशीच एक घटना घडली आणि प्रकरण वेदशास्त्रसंपन्न न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणेंसमोर आलं. त्रिंबक धारप नामक युवकाने आपल्या चुलतभावाच्या मदतीने करमरकरांची मुलगी पळवली आणि लगेच आपल्या वाड्यात जोशी नामक भटजीस बोलावून लग्नही लावण्याची तयारी केली. तोच प्रकरण कोतवालाकडे पोचलं आणि शिपायांनी येऊन या सगळ्यांना पकडून रामशास्त्रींसमोर उभं केलं. या प्रकरणात रामशास्त्रींना आपल्या वेदशास्त्रातील ज्ञानाची गरज पडली नाही. त्यांनी हुकूम दिला, तो असा - ‘‘जोशी आणि त्याचा चुलतभाऊ हे दोघे वाड्यात होते, त्यास शहरात फिरऊन, दवंडी पिटून असे फिरोन (पुन्हा) कोणी न करी असे लोकांस कलऊन, तोफखान्यात अटकेस बिडी (बेडी) खेरीज ठेवावे.’

आपली शिक्षा सुनावली गेली असं गुन्हेगारांना वाटलं तोच शास्त्रीबुवा पुढे बोलले, ‘...आणि फुटाणे गावात भीक मागून खावे.’ या भीक मागण्यासाठी लोकांसमोर जाणे आलं, त्यात स्वतःची आणि कुटुंबाची मानहानी आहे, अपकीर्ती आहे, असं गुन्हेगारांस वाटे आणि त्या लोकलज्जेस सामोरं जाणे हा शिक्षेचा सर्वांत दुखरा भाग असे.

आज अर्थात फुटाणे भीक मागून खाण्याची शिक्षा कोणी न्यायाधीश ठोठावीत नाहीत. पण यात ना आधुनिक न्यायव्यवस्थेचा, ना त्या शिक्षेचा दोष. फुटाण्याची भीक मागण्याची शिक्षा बंद व्हायचं खरं कारण हे, की लोकलज्जा लुप्त झाली आहे.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातल्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com