इंग्रज चढी लागला आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रज चढी लागला आहे!

सशस्त्र सेना, आर्थिक बळ, सामाजिक आणि राजकीय स्थैर्य असलं तर राष्ट्र ध्येयपूर्तीकडे वाटचाल करू शकतं. यातील एक अंग लंगडं पडलं, तर त्याची किंमत आंतरराष्ट्रीय व्यवहारात मोजावी लागते.

इंग्रज चढी लागला आहे!

- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com

युद्ध आणि शिष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू. जिथं एक अपुरा पडतो, तिथं दुसरा वापरण्याची वेळ येते; आणि युद्धात यश मिळाल्यानंतर त्याचा पुरता फायदा मिळवण्यासाठी मुत्सद्दी आणि राज्यकर्ते यांची खरी कसोटी असते. युद्ध लढण्याचं कारण न विसरता, लवचिकपणा आणि कणखरपणाचं योग्य मिश्रण वापरून, हवी ती फलश्रुती मिळवणारा, तोच यशस्वी शासक. केवळ द्वेष किंवा दुरभिमानाने पछाडलेले राज्यकर्ते युद्ध जिंकूनही फार काळ यशाचे स्वामी होत नाहीत. 

सशस्त्र सेना, आर्थिक बळ, सामाजिक आणि राजकीय स्थैर्य असलं तर राष्ट्र ध्येयपूर्तीकडे वाटचाल करू शकतं. यातील एक अंग लंगडं पडलं, तर त्याची किंमत आंतरराष्ट्रीय व्यवहारात मोजावी लागते. याशिवाय द्रष्टा राज्यकर्ता आणि चाणाक्ष मुत्सद्दी यांची भर पडली, तर राष्ट्रतेजाला बहर येतो.

अलीकडेच भारताने तेल कोठून विकत घ्यायचं हे आमच्या राष्ट्रहिताप्रमाणे ठरेल, अशी भूमिका घेतली. यासाठी चतुरंग शक्ती असणं गरजेचं. पूर्वीदेखील, १९७१ चं युद्ध, पोखरणचे अणुस्फोट या वेळी आपलं परराष्ट्र धोरण यशस्वी झालं. 

भारतीय इतिहासात जशी मनसुबेबाज वागणं कमी पडल्याची उदाहरणं आहेत, तसे त्यांच्या यशाचे दाखलेही उपलब्ध आहेत. १८ व्या शतकाने भारतीय इतिहासाला कलाटणी दिली. प्रदीर्घ गुलामगिरीनंतर शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळवून दिलं. हा जगन्नाथाचा रथ पुढे दीडशे वर्षं हाकत, मराठेशाही एका विशाल वटवृक्षाप्रमाणे पेशावर ते दक्षिणी समुद्र आणि द्वारकेपासून कलकत्त्यापर्यंत पसरली. पानिपतनंतरच्या पडझडीचा फायदा इंग्रजांनी पुरेपूर घेतला. पूर्वेकडून ते काशीपर्यंत पसरले आणि दिल्लीपती पातशाहास प्रयाग इथं आपल्या ताब्यात ठेवलं. 

पानिपतनंतर नव्या जोमाने मराठ्यांनी दक्षिणोत्तर विजयश्री मिळवली. श्रीरंगपट्टण ते दिल्ली मराठा सत्ता दृढ झाली. त्याबरोबर पातशाह शाह आलमची चुळबुळ सुरू झाली. महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण यांच्याशी बोलणी करून, शाह आलम इंग्रजांना सोडून दिल्लीकडे निघाला आणि फेब्रुवारी १७७१ मध्ये या नामधारी पातशाहला दिल्लीत बसवून, मराठे आपले ध्येय पुरं करून घेऊ लागले. 

या काळी माधवराव पेशवे इंग्रजांच्या कारवायांवर लक्ष ठेवून होते. इंग्रज प्रबळ सत्ता होतीच आणि पुढील काळात त्यांना थोपवणं गरजेचंच होतं. दिल्लीचं राजकारण आपल्याच हातात ठेवून इंग्रजांना तंबी कशी देता येईल याविषयी सरदार विसाजी कृष्ण यांना माधवरावांनी सूचक पण काहीसं खरमरीत पत्र लिहिलं. यातून त्यांची दूरदृष्टी प्रकट होते.

‘इंग्रेजचे पातशाहजवळ प्राबल्य. ते पातशाहास दिल्लीस आणते, तर त्यांचे सामर्थ्य नव्हते असे नाही. आणितेच. परंतु ते पाण्यातील पाव प्यादे, इतकी हिम्मत त्यांची नाही. म्हणोन, पातशाहास ‘दिल्लीस न जावे’ म्हणत होते. परंतु पातशाहाने ऐकले नाही. आलेच.’

जरी दिल्ली जिंकली असली, पातशाहा आपल्या हातातलं बाहुलं झाला असला, तरी त्यावर भुरळून न जाता, पुढे त्यास निष्प्रभ कसं करावं, याविषयी माधवराव लिहितात :

‘इंग्रजांचा प्रवेश दिल्लीस होऊ देऊ नये. दिल्लीस प्रवेश जाल्यास उखळणार नाही. टोपीकरात इंग्रजांनी डोई उचलली आहे. बंगाला व कलकत्ता व मछलीबंदर वगैरे बंदरे सुरतपावेतो आपल्या जप्तीत आणली. सुरत तो मुंबईप्रमाणे इंग्रजांनी आपली केली. इंग्रज चढीस लागला आहे. त्याचे सुख कोणास नाही. तरी, अमीर सर्व आपले करून, सरदारांची फूट मोडून, एक होऊन, इंग्रज माघारे जात ते करावे. इंग्रजांनी बंगाला पातशाहापासून लिहोन घेतला आहे, तोही तजविजीने सुटे, ते पुढे केल्यास होईल. मनसुबेबाजपणाचा प्रकार हरहुन्नरे, एकास बैसवावे, एकास उठा म्हणावे, आपले वजन पुरते त्याजवर पडावे, ऐसा समय आहे.’

माधवराव अल्पायुषी ठरले. या पत्रानंतर दीडच वर्षात त्यांना मृत्यूने गाठलं. परंतु त्यांचं सूत्र दीर्घायुषी ठरलं. या पत्रानंतर तब्बल बत्तीस वर्षं इंग्रजाला दिल्लीत शिरकाव मिळाला नाही. महादजी शिंदेंनी आपल्या पराक्रमाने लाल किल्ल्यावर मराठ्यांची पताका फडकत ठेवली.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतहासावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.)

टॅग्स :Warsaptarang