सूक्ष्मजंतूंबरोबरच्या संबंधांचा रंजक वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sukshmjantu book
सूक्ष्मजंतूंबरोबरच्या संबंधांचा रंजक वेध

सूक्ष्मजंतूंबरोबरच्या संबंधांचा रंजक वेध

- डॉ. वेदवती पुराणिक

कोणत्याही वैज्ञानिक संदर्भातील विषयावर लेखन करताना त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेऊन ती वाचकाला भावेल अशा पद्धतीनं सांगणं महत्त्वाचं असतं. विज्ञानाची गोडी असणाऱ्यांना त्याविषयी सखोल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करणं आणि नव्यानं वाचू पाहणाऱ्यांना सोपं करून सांगणं हा वैज्ञानिक लिखाणाचा मुख्य उद्देश असतो. 

अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांचं ‘सूक्ष्मजंतू’ हे सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीमधून साकार झालेलं पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंची ओळख करून देताना त्यांच्याशी निगडित अनेक गोष्टी, चित्रपट, कविता यांच्या माध्यमातून रंजक भाषेत सांगितल्यानं वाचकाला रोग आणि त्यामागचं विज्ञान सोप्या भाषेमध्ये कळते. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना गोडबोले आणि लिमये यांनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते २१व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. यासंबंधीचे सर्व संदर्भ पुस्तकाच्या शेवटी अचूक दिलेले आहेत.

सुरेश भटांच्या ‘रंग माझा वेगळा’ तसंच कुसुमाग्रजांच्या ‘घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य’ अशा काव्यपंक्तींचा सूचक आणि सुयोग्य वापर करून लेखकद्वयींनी सूक्ष्मजंतूंच्या व्यापक विश्वामध्ये अनोखे रंग भरले आहेत. जीवसृष्टीची निर्मिती, सूक्ष्मजीवांचा उगम अशा रहस्यांचा मागोवा घेताना प्राचीन काळापासून विज्ञानाची प्रगती कशी होत गेली, जनुकीय विज्ञानाचा कसा उपयोग झाला हे वाचताना मानवी जीनोम आणि सूक्ष्मजंतू यांच्यामधल्या ऋणानुबंधाचे रेशमी पदर अलगद आपल्यासमोर उलगडत जातात आणि नकळत आपण अंतर्मुख होतो.

प्लेगपासून ते आजही वैद्यक विश्वासाठी गूढ ठरलेला झोपेचा आजार यांच्या मनोज्ञ कथांनी हे पुस्तक रंजक झाले आहे. डिसेंबर २०१९ पासून संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या कोरोना विषाणूवरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. कोट्यवधी सूक्ष्मजंतूंपैकी रोगकारक जंतूचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे सर्वच सूक्ष्मजंतू काही वाईट नसतात, उलट माणसाच्या अ‍ॅपेंडिक्समध्ये घर करून राहणारे सूक्ष्मजंतू त्याच्यासाठी किती उपयोगी असतात; इडली, डोसा, दही, पनीर, लोणची अशा अनेक पदार्थांतून आपल्याला आरोग्यासाठी आवश्यक असलेले सूक्ष्मजंतू कसे मिळतात या बाबी अतिशय रंजक भाषेमध्ये लिहिल्या आहेत. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणार्‍या, त्यावर लस शोधून काढणार्‍या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेलं हे पुस्तक ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याबरोबरच गोष्टी वाचण्याचा आनंद देतं.

महत्त्वाचं म्हणजे या विषयाचा असलेला प्रचंड आवाका पेलून सुक्ष्मजंतूंबद्दलची वैज्ञानिक माहिती ओघवत्या भाषेत सांगण्यात आलेली आहे. सुक्ष्मजीवांचं विश्व सविस्तरपणे उलगडत मायक्रोबायोलॉजी या स्वतंत्र विषयाचा उदय, या क्षेत्रात सतत सुरू असलेलं संशोधन अशा प्रत्येक पैलूचा पुस्तकात अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून अवघं जग कोरोनाच्या थैमानानं त्रस्त असताना सुक्ष्मजंतूसारख्या अत्यावश्यक विषयावरचं हे पुस्तक वाचनप्रेमींनी आवर्जून वाचायला हवं.

पुस्तकाचं नाव : सूक्ष्मजंतू

लेखक : अच्युत गोडबोले, डॉ. वैदेही लिमये.

प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पुणे (०२०-२४४३६६९२, ०२४०-२३३२६९२)

पृष्ठं : ३५२

मूल्य : २९० रुपये.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Book
loading image
go to top