बाप-लेक (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं "युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये, पारंपरिक बंधनांमध्ये बंदिस्त असलेलं. जबाबदाऱ्यांच्या, आशा-अपेक्षांच्या, हेतूंच्या विळख्यात गुंतलेलं. थोडंफार व्यक्त; पण बरंचसं अव्यक्त! किशोरवयात हे नातं ताणायला लागतं. अनेकदा तुटेपर्यंत ताणतं. जेव्हा या नात्याला वेळीच सूर गवसतो तेव्हा मात्र वडील आणि मुलगा, दोघांनाही त्याची गोमटी फळं मिळतात.

कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं "युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये, पारंपरिक बंधनांमध्ये बंदिस्त असलेलं. जबाबदाऱ्यांच्या, आशा-अपेक्षांच्या, हेतूंच्या विळख्यात गुंतलेलं. थोडंफार व्यक्त; पण बरंचसं अव्यक्त! किशोरवयात हे नातं ताणायला लागतं. अनेकदा तुटेपर्यंत ताणतं. जेव्हा या नात्याला वेळीच सूर गवसतो तेव्हा मात्र वडील आणि मुलगा, दोघांनाही त्याची गोमटी फळं मिळतात.

"माझ्या बाबांचं आणि माझं नातं खूप तणावाचं होतं, मी कधीच त्यांच्याशी मोकळेपणानं बोलू शकलो नाही. ते माझ्यावर प्रेम करतात हे माहीत असूनही त्यांच्याविषयी खूप राग राहिला मनात. चिनूच्या बाबतीत मला हे होऊन द्यायचं नाहीये; पण आजकाल आमचं पटतच नाही! त्याच्याशी बोलणं फार अवघड होऊन बसलंय...'' माझ्यासमोर बसलेल्या चिनूच्या बाबांच्या स्वरात थोडा हताशपणा होता आणि त्यावर उपाय शोधण्याचा ठाम निश्‍चयही होता.

कुटुंबात वडील आणि मुलाचं नातं फार महत्त्वाचं असतं; पण आजकाल पाश्‍चिमात्य देशात कुटुंबाची ठेवण बरीच बदलतेय. कधी लग्नाआधी मूल, किशोरवयीन गरोदरपण यामुळे वडील कुटुंबाचा भाग नसतात. काहीवेळा वडील असतात; पण शरीरानं किंवा मनानं ते पालक म्हणून कशात भाग घेत नाहीत. कधी काही कारणानं आई-वडील विभक्त होतात आणि ओघानं पालकत्व आईकडे येतं. (आपल्याकडंही घडतंय हे सगळं आता, कालाय तस्मै नम:!) अशा कुटुंबातल्या मुलांच्या मानसिकतेचा, प्रवृत्तींचा, वर्तणुकीचा अभ्यास केला गेला. त्यातून निघालेला निष्कर्ष हादरवून टाकणारा आहे. या मुलांमध्ये हिंसा, गुन्हेगारी, नैराश्‍य, व्यसनं, शालेय अधोगती असे अनेक प्रकारचे नकारात्मक परिणाम दिसून येतायत. रिमांड होममध्ये असलेल्या मुलांपैकी किंवा शाळांमध्ये गोळीबार करणाऱ्या मुलांपैकी अनेक मुलं वडिलांशिवाय वाढत होती, असं दिसून आलंय. मुलांच्या आयुष्यात आईचं स्थान आणि महत्त्व वादातीत आहे. ते अगदी नैसर्गिकही आहे; पण आई-बाबा हे जेव्हा एकक म्हणून एकत्र मुलाची काळजी घेतात, तेव्हा त्याचा सकारात्मक आणि संरक्षक परिणाम अनेक पटींनी वाढतो. काही वेळा वडील जरी कुटुंबाचा भाग नसले, तरी निदान वडिलकीच्या नात्याची एखादी "फादर फिगर' सहवासात असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो.

इतकं जर हे नातं महत्त्वाचं आणि आवश्‍यक असेल, तर घोडं कुठं अडतं? वडील-मुलामध्ये दरी का पडते? एक मोठा अडथळा म्हणजे संवाद! एकतर बहुधा वडिलांना मनातल्या भावना व्यक्त करायची सवय नसते. दुसरं म्हणजे त्यासाठी लागणारा वेळ पुरेसा देता येत नाही. पारंपरिकरित्या वडिलांचं काम आखून दिलेलं आहे- त्यांनी घराबाहेरची कामं करायची, पैसे मिळवायचे, घरातल्या व्यक्तींना संरक्षण द्यायचं आणि जरब बसवायची. यात निवांत संवादाला कुठं जागा नसते. काही वेळा वडील गोंधळतात, मुलाशी मित्रत्वानं वागावं, तर तो डोक्‍यावर बसेल. त्याच्याशी रिंगमास्तरच्या भूमिकेतून वागावं तर तो दुरावेल, कडवट होईल. याचा सुवर्णमध्य कसा काढायचा?

मुलं लहान असताना बाबा म्हणजे त्यांचे हिरो असतात. बाबांशी दंगमस्तीचे खेळ खेळता येतात. त्यांच्याबरोबर धाडसी मोहिमा आखता येतात. एक पुरुषी उदाहरण म्हणून मुलं त्यांच्याकडे पाहतात. आपले बाबा आईशी कसे वागतात हे निरीक्षून मुलं स्त्रियांशी वागण्याचे ठोकताळे बनवतात. ते संताप कसा व्यक्त करतात यावरून रागाला हाताळण्याच्या पद्धती ठरवतात. ताणाला कसे सामोरे जातात यावरून "स्ट्रेस मॅनेजमेंट' शिकतात.

थोडं मोठं झाल्यावर मात्र मुलं आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला धडपडायला लागतात. वडिलांबरोबरचं नातं ती नव्यानं आजमावून बघायला लागतात. मग बाबांची कुठलीच गोष्ट पटेनाशी होते. आधी हवाहवासा वाटणारा त्यांचा सहवास टाळण्याकडे आता कल वाढतो. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारांनी मुलं त्यांचा विरोध दर्शवायला लागतात. अर्थात, जसं लहानपणी मुलांनी म्हटलं म्हणून वडील "परफेक्‍ट हिरो' होत नाहीत, तसंच मुलांच्या या वागवण्यानं ते अचानक "व्हिलन' होणार नसतात; पण स्थित्यंतराच्या या काळात डोकं शांत ठेवून थोडंसं पडतं घ्यायची, मदतीचा हात पुढे करायची, परिस्थिती कुशलतेनं हाताळायची जबाबदारी असते वडिलांची. कारण या सगळ्याचं आकलन होण्याइतकी मुलांना समज आलेली नसते. दोघांच्या नात्यात प्रेम, समजूतदारपणा, मोकळेपणा असणार की तणाव, लपवाछपवी, आकस असणार हे इथं ठरणार असतं. त्याचबरोबर हेही खरं, की मुलांना मित्र अनेक असू शकतात, बाबा मात्र एकच असतात. म्हणजे बाबा अगदी बरोबरीचे, मित्रासारखे असायला हवेत असं नाही. त्यांच्याकडून मुलांना जशी आदराची, प्रामाणिकपणाची आणि पूर्वग्रहविरहित असण्याची अपेक्षा असते, तशीच थोडीफार अधिकाराची, कणखरपणाची आणि मार्गदर्शनाचीही असते. त्यामुळेच संवाद अतिशय महत्त्वाचा ठरतो.

त्या संवादाची परिणती दरवेळी भांडणात होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तो "शब्देविण संवादू' असला तरी चालेल. उलट कमी बोलणं आणि जास्त ऐकणं अधिक उपयुक्त. कुणी म्हटलंय, की बोलणं फक्त पंचवीस टक्के हवं, बाकी सगळं ऐकणं. प्रश्न विचारणं, सल्ले देणं याची कितीही ऊर्मी आली, तरी ती आवरायला हवी. निसर्ग हा एक छान सोबती आहे संवाद उमलू देणारा. कुठल्याही गॅजेटपासून दूर, बाबा जेव्हा मुलासाठी खास, वेगळा वेळ काढतात तेव्हा कितीतरी विषय निघतात, मनाच्या कोपऱ्यात दबून राहिलेली गुपितं उफाळून वर येतात. वडिलांच्या जगात आपण महत्त्वाचे आहोत, त्यांना आपण आवडतो, आपल्याबरोबर वेळ घालवायला आवडतो हे मुलांना एरवी कसं कळणार? ते जेव्हा कळतं तेव्हा मुलांची स्वप्रतिमा उजळते. त्यांचा आत्मविश्वास उंचावतो, जगातल्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास बसतो. या आतून उत्स्फूर्तपणे आलेल्या विश्वासामुळे ही मुलं अधिक समाधानी, लोकप्रिय असतात. त्यांची सामाजिक कौशल्यं सफाईदार असतात.

आपलं मूल आपल्याला काही सांगू बघतंय याचा अर्थ त्यावर उपाय सुचवण्याची त्याला अपेक्षा आहे असं वाटतं. मग पटकन उपाय सुचवण्याच्या नादात, पूर्णपणे ऐकून न घेताच मुलाचं म्हणणं मोडीत काढण्याची घाई होते, त्याला टफ बनवायचं म्हणून! "काही होत नाही रे, दे सोडून, एक ठोसा ठेऊन द्यायचा, रडत घरी काय येतोस!' असं काय काय सांगितलं जातं. नाहीतरी "बी अ मॅन!' असा अप्रत्यक्ष दबाव असतोच समाजाकडून मुलांवर. (नंतर हा मर्दपणा सिद्ध करण्यासाठी व्यसनं, लैंगिक अनुभव, नियम मोडणं, बेफिकीर, बिनधास्त वागणं असे मार्ग चोखाळले जाणार असतात.) वडिलांचा फायदा असा, की हा दबाव काय असतो आणि तो किती आव्हानात्मक असू शकतो याची त्यांना कल्पना असते, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो. त्याला किती महत्त्व द्यायचं, आणि तो यशस्वीपणे हाताळण्यासाठी काय क्‍लृप्त्या वापरायच्या याविषयी वडील मुलांबरोबर चर्चा करू शकतात. शारीरिक बदल, लैंगिकता, पोर्नोग्राफी हे पालकांना संकोचून टाकणारे विषय. त्याविषयी एकदाच बसवून गंभीरपणे व्याख्यान देण्यापेक्षा प्रसंगानुरूप बोलत राहणं अधिक फायदेशीर. त्याबद्दल शास्त्रीय माहिती देणारी अनेक पुस्तकं आणि अधिकृत इंटरनेट साईटस आहेत. फार अवघड वाटत असेल तर डॉक्‍टरांची मदत घेता येऊ शकते.

वडिलांना मुलाला भेटण्याच्या संधी मुद्दामहून काढायला लागतात. आणि ते शक्‍य आहे. वेळ तसा लवचिक असतो. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीसाठी तो नक्कीच उपलब्ध होतो. त्यामुळे "वेळ नाही' ही सबब देऊन चालणार नाही. मस्त गप्पा होण्याच्या या काही वेळा पहा : रात्री झोपायची वेळ, सकाळी शाळेत सोडताना, जेवताना, टेकडीवर फिरायला गेलेलं असताना, ट्रेकिंगच्या वेळी, दोघांनी मिळून एखादी मोडलेली गोष्ट दुरुस्त करताना, शेजारीशेजारी लोळत पुस्तकं वाचताना, खेळताना, एकत्र मॅच बघताना, सुट्टीच्या दिवशी पत्ते किंवा चेस खेळताना, सगळ्यांनी मिळून घर साफ करताना, काहीही न करता सगळे निवांत हॉलमध्ये बसलेले असताना.... आठवून पहिल्या तर आणखी कितीतरी वेळा सापडतील.

कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याशी असलेलं नातं "युनिक' असतं, खास असतं. त्यातलं वडील-मुलाचं नातं काहीसं धूसर, दूरस्थ वाटणारं. अनेक चौकटींमध्ये, पारंपरिक बंधनांमध्ये बंदिस्त असलेलं. जबाबदाऱ्यांच्या, आशा-अपेक्षांच्या, हेतूंच्या विळख्यात गुंतलेलं. थोडंफार व्यक्त; पण बरंचसं अव्यक्त! किशोरवयात हे नातं ताणायला लागतं. अनेकदा तुटेपर्यंत ताणतं. जेव्हा या नात्याला वेळीच सूर गवसतो तेव्हा मात्र वडील आणि मुलगा, दोघांनाही त्याची गोमटी फळं मिळतात.

Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang