श्रमप्रतिष्ठा (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

कष्टाची कामं दुय्यम आणि ते करणारी माणसंही दुय्यम समजतो आपण. बौद्धिक कामाला आपलं प्राधान्य असतं. प्रत्येक काम आवश्‍यक आणि महत्त्वाचं आहे आणि आपण स्वत: ते करत नसलो, तरी ते प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती आपल्या दयेला नव्हे, तर आदराला पात्र असली पाहिजे. आपल्या मुलांच्यात ही श्रमप्रतिष्ठा लहानपणापासून रुजली, तर कामाकडं, करिअरकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलून जाईल. कुणी सांगावं, आजच्या जीवघेण्या स्पर्धेतून त्यांची सोडवणूक होण्याचा मार्ग कदाचित यातूनच खुला होईल. प्रामाणिक कामाप्रतीचा हा आदर आपल्या रोजच्या जगण्यात, विचारांत आणि भविष्याच्या नियोजनात मुलांपर्यंत पोचवायला हवा.

"अभ्यास केला नाहीस, तर त्या कामवाल्या मावशींसारखा आयुष्यभर केर काढणं-फरशी पुसणं अशी कामं करायला लागतील...'', ""असा टाईमपास केलास, तर बॅंकेत शिपायाची नोकरीपण देणार नाही कुणी तुला!'', ""काय रे, जन्मभर खर्डेघाशी करायचीय का?''... दंगेखोर, अभ्यास न करणाऱ्या उनाड मुलांना कायम ही वाक्‍यं ऐकायला लागतात. आपण नि:संकोचपणे, खुशाल बोललेल्या या वाक्‍यांमधून काय बरं अर्थ ध्वनित होतो? केर काढणं-फरशी पुसणं, शिपायाची नोकरी, "खर्डेघाशी' ही कमीपणा देणारी कामं आहेत आणि ती कामं करणारी माणसं खालच्या दर्जाची आहेत? नक्की काय संदेश देतोय आपण मुलांना यातून?
मागच्या आठवड्यात एका छानशा शाळेत गेले होते मुलांशी गप्पा मारायला. आठवी-नववीतली ती मुलं उत्सुकतेनं आणि उत्साहानं रसरसलेली होती. बहुतेक सगळी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घरांतून आलेली. दारू पिणं, मारझोड, शिवीगाळ आणि अस्वच्छता पदोपदी अनुभवणारी; पण मोठं होऊन काहीतरी बनण्याची जिद्द उरात बाळगून असलेली. त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती. मोठेपणी कोण बनणार या प्रश्नाला त्यांची उत्तरं होती कलेक्‍टर, डॉक्‍टर, वकील, आणि पोलीस अधिकारी. क्वचित एखादं उत्तर "शिक्षक' म्हणूनही होतं. ऐकून खरंच छान वाटलं. त्या मुलांचं आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचं कौतुक वाटलं.

नंतर विचार करताना मात्र जरा प्रश्न पडला. आपल्या मते प्रतिष्ठेच्या असणाऱ्या प्रोफेशन्समध्ये मुलांच्या आशा-आकांक्षा आपण कैद तर करून ठेवत नाही आहोत ना? लहानपणी सांगायचो तसं मी तिकीट कलेक्‍टर, नावाडी, लिफ्टमन होईन, असं कुणीच का सांगत नाही? किंवा चित्रकार, सुतार, लोहार? किंवा भाजीवाली, स्वयंपाकी किंवा रस्ते झाडणारा? आपण या कामांविषयी तुच्छतेनं बोलतो म्हणून? ही सगळी कामं करणं म्हणजे कमीपणा आहे, असं आपण लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलंय म्हणून? आणि उच्चशिक्षणासाठी हव्या असलेल्या शैक्षणिक पात्रतेपर्यंत कितीजण प्रत्यक्ष पोचतात? (विद्यार्थ्यांची गळती होतेय हे आपण सतत ऐकत असतो, विशेषत: मुलींची. अनेक कारणांनी मुलं शिक्षण पुरं करू शकत नाहीत.) जे पोचतील, त्यातल्या किती जणांना प्रवेश मिळेल? आणि त्यातले किती जण तो कोर्स यशस्वीपणे पूर्ण करतील? नोकरी लागणं आणि प्रत्यक्ष कामामध्ये यशस्वी होणं ही तर पुढची गोष्ट. मग जे यातल्या एखाद्या पायरीवर गळतील, त्यांचं काय?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी "आमचा बाप आन्‌ आम्ही' नावाचं आत्मचरित्र लिहिलंय. त्यांचे वडील दलित समाजात जन्मलेले, अशिक्षित; पण अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले. ते आपली ठाम मतं व्यक्त करताना बिलकुल कचरत नसत. छोट्या नरेंद्राला ते सांगत ः ""लोक तुला सांगतील, तू डॉक्‍टर व्हय, इंजिनिअर व्हय, बालिस्टर व्हय; पन तू कुनाचं काय आयकू नको. तुझ्या बुद्धीला योग्य वाटंल तेच होन्याचा प्रयत्न कर. पन तू जे करशील, त्याच्यात टापला जायाला पायजे. तुला चोर व्हायाचं? हरकत नाही. मग असा चोर व्हय, का दुनियाने सलाम केला पायजे.''
समाजाची रचना असते पिरॅमिडसारखी. त्यात वर उल्लेख केलेल्या व्यक्ती त्या मानानं कमी संख्येनं लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांपेक्षाही कितीतरी मोठ्या संख्येनं नर्सेस, आया, वॉर्डबॉईज, सफाई कामगार, तंत्रज्ञ लागतात. स्पेशालिस्ट डॉक्‍टरांहून जनरल प्रॅक्‍टिशनर्सची संख्या अधिक असण्याची गरज असते. हा पाया काय कमी महत्त्वाचा असतो? पाश्‍चात्य देशातल्या स्वच्छतेचे, टापटिपीचे आणि संपन्नतेचे आपण गोडवे गातो; पण प्रकर्षानं जाणवणारी आणि भावणारी गोष्ट म्हणजे तिथं दिसून येणारी कामाला दिली गेलेली प्रतिष्ठा! हाताखालचा माणूसही बॉससमोर आपलं मत निर्भीडपणे मांडतो आणि स्वच्छतागृहाचे कर्मचारी आपलं काम अभिमानानं करतात. कचरा गोळा करणारे लोक आत्मसन्मानानं काम करून लखपती होतात.

एकदा खूप पहाटे मी कुठली तरी ट्रेन पकडायला निघाले होते, तेव्हा महापालिकेचे रस्ता झाडणारे कर्मचारी कामालासुद्धा लागले होते. इतक्‍या लवकर कामाला सुरवात करण्यासाठी त्यांना किती वाजता उठायला लागत असेल कोण जाणे! मात्र, त्यांचं अस्तित्व आपल्या गावीही नसतं. एखाद्या दिवशी सफाई कर्माचाऱ्यांचा संप होतो, जागोजागी कचऱ्याचे ढीग साठतात, तेव्हा कुठं कुणी तरी हे काम करत होतं, याचा साक्षात्कार होतो. आपल्याला मात्र रस्त्यावरचा जाऊदे, आपल्या घरातला कचरा साफ करण्यातही कमीपणा वाटतो. कष्टाची कामं दुय्यम आणि ते करणारी माणसंही दुय्यम समजतो आपण. बौद्धिक कामाला आपलं प्राधान्य असतं. आपल्या समाजात खोलवर पाय रोवून असलेली वर्णव्यवस्था हे असू शकेल का याचं कारण? मग आपण कुणी तरी आपल्याला पांढरपेशी नोकरी देण्याची वाट पाहत राहतो. कितीतरी हट्टेकट्टे तरुण योग्य नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत निराश होतात; पण पडेल ते काम करायची त्यांची तयारी नसते. कारण एकदा का पदवी मिळाली, की हातानं कष्टाची कामं करायची लाज वाटायला लागते. इतकंच नव्हे, तर तसं काम करणाऱ्या आई-बाबांचीही लाज वाटायला लागते.

या सगळ्याचा अर्थ असा नव्हे, की स्वप्नं बघू नयेत; पण प्रत्येकानं तीच ती, ठराविक साच्याचीच स्वप्नं बघावीत असा अट्टाहास नको. एखाद्याला जसं टापटिपीची नोकरी करून खूप पैसे मिळवायला आवडतं, तसं एखाद्याला डोंगरदऱ्यांत भटकायला आवडत असेल, किंवा रात्रंदिवस मातीची भांडी बनवायला आवडत असेल किंवा खेड्या-पाड्यांत जाऊन मुलांना शिकवायला आवडत असेल! प्रत्येकाला कलेक्‍टरच व्हावंसं वाटेल असं नाही. प्रत्येक काम आवश्‍यक आणि महत्त्वाचं आहे आणि आपण स्वत: जरी ते करत नसलो, तरी ते प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती आपल्या दयेला नव्हे, तर आदराला पात्र असली पाहिजे. जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन, महात्मा गांधी, ईश्वरचंद्र विद्यासागर अशा कितीतरी थोर लोकांनी याची उदाहरणं घालून दिलीयेत.
आपल्या मुलांच्यात ही श्रमप्रतिष्ठा लहानपणापासून रुजली तर कामाकडं, करिअरकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलून जाईल. कुणी सांगावं, आजच्या जीवघेण्या स्पर्धेतून त्यांची सोडवणूक होण्याचा मार्ग कदाचित यातूनच खुला होईल. प्रामाणिक कामाप्रतीचा हा आदर आपल्या रोजच्या जगण्यात, विचारांत आणि भविष्याच्या नियोजनात मुलांपर्यंत पोचवायला हवा. फक्त बोलण्यातूनच नाही तर कृतीतूनही. त्यासाठी करण्यासाठीच्या या काही गोष्टी ः
- आपल्या घरी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य त्या सन्मानानं आणि आदरानं वागवायचं. त्यांना हिडीसफिडीस न करता योग्य नावानं, संबोधनानं हाक मारायची. आपलं दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यामध्ये त्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे याची अधूनमधून उजळणी करायची.

- घरातली छोटीछोटी कामं सर्वांनी आपापली करायची. उदाहरणार्थ, जेवण्याआधी वाढून घेणं, जेवल्यानंतर स्वत:चं ताट विसळून ठेवणं (गडचिरोलीला गेलेलो असताना पाहिलं, की इतर साऱ्यांबरोबर डॉ. अभय बंग यांनीही आपापलं ताट धुवून ठेवलं होतं.), कपडे वाळत घालणं, भाजी आणणं इत्यादी. बहुधा ही कामं आईकडं असतात. त्या कामांकडं आणि ओघानं आईकडं, जरा तुच्छतेनं पाहिलं जातं.
- घरात एखाद्यानं काही सांडलं, तर त्यानंच ते आवरायला, पुसून घ्यायला हवं. त्यासाठी कामाच्या मावशींना हाक मारली, तर "हे काम माझं नाही, त्यांचं आहे,' ही भावना प्रबळ होते.
- पोलिसकाका, भाजीवालेकाका/ मावशी, सोसायटीतले सफाईकामगार यांच्याविषयी अधूनमधून कृतज्ञता व्यक्त करायची; त्यांना दिवाळीची शुभेच्छापत्रं देऊन, राखी बांधून किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करून. त्यात दया केल्याची आढ्यता न येण्याची कटाक्षानं खबरदारी घेऊन!
- रस्त्यानं जाताना वाटेत दिसलेली रिकामी प्लॅस्टिकची बाटली, कागदाचा बोळा उचलून जवळच्या कचरापेटीत टाकायचा.
- सार्वजनिक स्वच्छता अभियानात सामील होणं; परिसराची, मैदानांची, गड-किल्ल्यांची, टेकड्यांची स्वच्छता.
याशिवायही वेगळे काही उपाय कुणाला सुचू शकतील. शेवटी श्रमप्रतिष्ठा घरातल्या प्रत्येकात रुजवणं महत्त्वाचं इतकंच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com