केल्याने देशाटन (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 30 सप्टेंबर 2018

प्रवास हा पालकत्वाच्या प्रक्रियेतला खूप मोठा टप्पा असतो. मुलांना नवनवीन अनुभव द्यायची ही एक छान संधी असते. अचानक आलेल्या समस्यांना तोंड द्यायला ती शिकतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण साधायला, नवीन चवीचं अन्न खायला, नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडीफार अडचण आनंदानं सहन करायलाही शिकतात. त्यांना अगदी घरच्यासारखं वाटावं असा प्रयत्न करायची गरज नाही. उलट तसं केलं, तर हेतू साध्य होणार नाही. लांबच्या प्रवासाला, परदेशीच जायला हवं असंही नाही. जवळपासची छोटी गावं, किल्ले, किंवा अगदी एखादी छोटी पिकनिकही पुरेशी असते ताजंतवानं व्हायला.

प्रवास हा पालकत्वाच्या प्रक्रियेतला खूप मोठा टप्पा असतो. मुलांना नवनवीन अनुभव द्यायची ही एक छान संधी असते. अचानक आलेल्या समस्यांना तोंड द्यायला ती शिकतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण साधायला, नवीन चवीचं अन्न खायला, नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडीफार अडचण आनंदानं सहन करायलाही शिकतात. त्यांना अगदी घरच्यासारखं वाटावं असा प्रयत्न करायची गरज नाही. उलट तसं केलं, तर हेतू साध्य होणार नाही. लांबच्या प्रवासाला, परदेशीच जायला हवं असंही नाही. जवळपासची छोटी गावं, किल्ले, किंवा अगदी एखादी छोटी पिकनिकही पुरेशी असते ताजंतवानं व्हायला.

घरभर सगळा पसारा पडला होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. सुटकेसेसच्या अडथळ्यांमधून वाट काढत स्वातीनं तो घेतला. ""झाली का गं तयारी?'' गिरिजाचा आवाज ऐकून स्वातीनं त्या पसाऱ्यात चक्क बसकण मारली. ""छे गं, कुठलं काय? अजून सामान गोळा करणंच चाललंय. कुठून हे ट्रिपचं काढलं असं झालंय...'' थोड्या वेळानं तिनं फोन बंद करून घड्याळात पाहिलं तर तब्बल अर्धा तास झाला होता. ""बाप रे!'' असं म्हणून ती नव्या जोमानं कामाला लागली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन मुलांना घेऊन त्यांना ट्रिपला जायचं होतं.

मुलं लहान असताना कुठंही गावाला जायचं म्हणजे पालकांच्या पोटात गोळा येतो. पु. ल. देशपांडे यांच्या कोचरेकर मास्तरांच्या वरताण सामान वाढत जातं! थंडी वाजली तर बरोबर असावेत, म्हणून गरम कपडे; पाऊस आलाच तर असावेत म्हणून रेनकोट; ऊन लागू नये म्हणून टोप्या, स्कार्फ, पाण्याच्या बाटल्या; वरचा खाऊ, औषधांच्या बाटल्या, करमणुकीसाठी खेळ, आवडती बाहुली, जिच्याशिवाय झोप येत नाही अशी उशी... त्यातून तिथं गेल्यावर मुलांना काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार, अशी भीती असते. सगळ्यात मोठी भीती असते आजारी पडण्याची आणि ही भीती काही अनाठायी नसते. एक तर मुलं लहान असतात, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, काही लशी द्यायच्या राहिलेल्या असतात. शिवाय नेहमीपेक्षा बरीच जास्त दगदग होते. हवेत बदल होतो. बाहेरच्या खाण्यापिण्यातूनही जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते.
गावाला जाण्याआधी पालक नेहमी मला विचारतात ः " कोणती औषधं बरोबर ठेवू?' आपल्या मुलाला काही औषधं चालू असतील, तर त्यांचा पुरेसा साठा जवळ ठेवायला हवाच. शिवाय तापाचं औषध, उलटीचं औषध, एखादं ऍलर्जीवरचं औषध, मलम, कापूस, जखम स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक, बॅंडेज असं किट डॉक्‍टरांच्या सल्ल्यानं तयार करायला हरकत नाही. औषधांच्या या किटमधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे "ओआरएस'ची पावडर. उलट्या-जुलाब, ताप, मलूलपणा असं काही झालं, तर या जलसंजीवनीनं तरतरी येते.

इतकी सगळी काळजी घेऊनही वैद्यकीय मदतीची गरज लागू शकते. त्यामुळं मुलं खूप लहान असताना फार दुर्गम, दवाखाने नसतील अशा जागा टाळणं श्रेयस्कर. मुलं फार मलूल झाली, खाणं-पिणं बंद केलं, प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नसली, तर अंगावर काढायला नको. कारण लहान मुलांचे आजार पटकन्‌ गंभीर स्वरूप धारण करू शकतात. साधे जुलाब, सर्दी-खोकला, ताप, उलट्या ही कुठल्यातरी गंभीर आजाराची सुरवात असू शकते. उत्साहाच्या भरात काही वेळा रस्ता चुकणं, अपघात, पाण्यातले अपघात, जखमा, विषारी दंश अशा नकोशा गोष्टी घडतात. मोठी माणसं गप्पांमध्ये किंवा सोय लावण्यामध्ये दंग असतात. नैसर्गिक कुतूहलामुळं मुलं नवनवीन गोष्टी शोधत, उद्योग करत राहतात. त्यामुळं मुलं बरोबर असताना अनोळखी ठिकाणी जास्त धोके न पत्करलेले बरे. आणि कुणीतरी जबाबदार प्रौढानं मुलांवर लक्ष ठेवायला हवं. बऱ्याच मुलांना कुत्र्यांशी खेळायची सवय असते. बहुधा या कुत्र्यांना काही लशी वगैरे दिलेल्या नसतात. खेळताना कुत्र्याचे दात लागले, किंवा खरचटलेल्या जागी त्यांनी चाटलं तर ताबडतोब साबणाच्या पाण्यानं ती जागा स्वच्छ करायला हवी आणि शक्‍य तितक्‍या लवकर श्वानदंशाची लस घ्यायला हवी. चावण्याच्या जागेवरून आणि तीव्रतेवरून लशीबरोबर "इम्युनोग्लोब्युलीन' नावाचं इंजेक्‍शन द्यायची गरज डॉक्‍टर ठरवतात. (चेहऱ्याजवळचे चावे आणि रक्त निघेल इतके खोल चावे धोकादायक) रेबीज या जीवघेण्या रोगावर अजून तरी कोणताही उपाय उपलब्ध नाही. त्यामुळं या बाबतीत चालढकल नको. आपल्या मुलाला नेहमीच कुत्र्यांशी खेळायला आवडत असेल, तर सगळ्यात उत्तम म्हणजे रेबीज-प्रतिबंधक लशीचे तीन डोस डॉक्‍टरांच्या सल्ल्यानं आधीच देऊन टाकायचे.

प्रवासात, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पिण्याकडं विशेष लक्ष ठेवायला लागतं. काही वेळा पाणी मर्यादित असतं म्हणून, काही वेळा ते संपतं म्हणून; पण बहुतेक वेळा त्या सगळ्या एक्‍साइटमेंटमध्ये ते प्यायचं विसरून जातं म्हणून, मुलं पाणी कमी पितात. नेहमीपेक्षा जास्त उन्हा-तान्हात फिरणं होतं. परिणामत: डिहायड्रेशन होतं. एक-दोन दिवसांची छोटी सहल असेल, तर पुरेसं पाणी घरून नेता येतं. नाहीतर शुद्ध पाण्याची सोय करावी लागते. आजकाल बाटलीबंद पाण्याचीही खात्री छातीठोकपणे देता येत नाही. अशा वेळी नारळपाणी, चहा-कॉफी (ज्यात पाणी उकळलं जातं), काकडी, संत्रं द्राक्षं अशी पाणीदार फळं यांचा वापर तात्पुरती तहान भागवण्यासाठी करता येतो.

बाहेरचं खाण्याच्या बाबतीत लोकांची दोन टोकांची मतं दिसतात. काही जण स्वच्छतेचा अतिरेक करतात, तर काही जण वाट्टेल ते खायला घालतात. "असं केल्याशिवाय मूल कडक कसं होईल,' असा त्यांचा युक्तिवाद असतो. या दोन्हींच्या मधली भूमिका घ्यायला हवी खरंतर. फार चिकित्सा केली, तर उपाशीच राहायची वेळ यायची! मात्र, त्याचबरोबर काही किमान स्वच्छता तरी असली पाहिजे तिथं. कोरडा खाऊ, फळं, अशा गोष्टी बरोबर असल्या, की नाईलाजानं मुलांना भुकेपोटी मिळेल ते खायला घालायची वेळ येत नाही.

हल्ली गणपतीपासून प्रत्येक गोष्ट इकोफ्रेंडली असायला हवी, असा आपण आग्रह धरतो. आपला प्रवास तरी त्याला अपवाद का असावा? भूतानच्या एका देखण्या रानवाटेवरून चालताना किंगा नावाच्या आमच्या गाइडनं आम्हांला नम्रपणे; पण ठामपणे सांगितलं होतं ः ""जाताना इथून फक्त छान आठवणी न्या, आणि मागं फक्त तुमच्या पाऊलखुणा ठेवून जा!'' गंमतीची गोष्ट म्हणजे पुष्कळदा मुलंच आई-बाबांना याची आठवण करून देताना आढळून येतात. आपापली पाण्याची बाटली बरोबर ठेवणं (त्यात हॉटेलमधून निघताना तिथलं निर्जंतुक केलेलं पाणी भरून नेता येतं), प्लॅस्टिकचा वापर टाळणं, निघताना मागं कचरा न सोडणं, गेलेल्या जागेचं पावित्र्य राखणे, तिथून आठवण म्हणून उगीचच काही उचलून न आणणं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती असतात, तरीही सहलीची ठिकाणं हळूहळू बकाल आणि कुरू का बनतात?

मुलांबरोबरचा प्रवास काहीसा तणावपूर्ण आणि त्याचबरोबर खूप आनंददायी असतो. त्यांच्याबरोबर आपणही बरंच काही शिकतो. कामाचा दट्ट्या मागं नसतो, निवांत मूड असतो. नेहमीपेक्षा वेगळ्या जागी होणाऱ्या गप्पाही वेगळ्या होतात. मुलांना नवनवीन अनुभव द्यायची ही एक छान संधी असते. अचानक आलेल्या समस्यांना तोंड द्यायला ती शिकतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण साधायला, नवीन चवीचं अन्न खायला, नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडीफार अडचण आनंदानं सहन करायलाही शिकतात. त्यांना अगदी घरच्यासारखं वाटावं असा प्रयत्न करायची गरज नाही. उलट तसं केलं, तर हेतू साध्य होणार नाही. त्याचबरोबर टिपिकल, एक्‍झॉटिक जागांवरच जायला हवं; लांबच्या प्रवासाला, परदेशीच जायला हवं असंही नाही. जवळपासची छोटी गावं, किल्ले, इतिहासाच्या पुस्तकातली प्रेक्षणीय स्थळं, अगदी एखादी छोटी पिकनिकही पुरेशी असते ताजंतवानं व्हायला. आणि जिथं जाऊ तिथल्या सर्वच्या सर्व प्रेक्षणीय स्थळांवर टिकमार्क करायलाच हवा का? त्यापेक्षा काही मोजकी ठिकाणं व्यवस्थित बघितली तर? नाही तर मुलं कंटाळून जातात, किरकिर करायला लागतात आणि त्यांनी ती थांबवावी म्हणून त्यांच्या हाती टॅब किंवा मोबाईल सुपूर्द केला जातो. हे "डिजिटल शत्रू' सगळ्या नियोजनाचा विचका करायला पुरेसे असतात. त्याऐवजी मुलांच्या हातात एखादं स्केचबुक, गोष्टीचं पुस्तक, साधा कॅमेरा आणि डायरी अशी आयुधं सोपवली, तर मुलं त्यात गुंतूनही राहतात आणि सहलीच्या छान आठवणीही राहतात. चित्रं, फोटो, प्रवासाची माहिती नोंदवून ठेवायला आवडतं त्यांना. नंतर ते कधीतरी नातेवाईकांना, मित्रमंडळीला बोलावून खाऊ-गप्पांबरोबर शेअरही करता येतं... आणि खरं सांगू का? क्रिकेट, बॅडमिंटन, पत्ते आपण घरीही खेळू शकतो, व्हिडिओ गेम्स खेळू शकतो, पिक्‍चर बघू शकतो. त्यापेक्षा जिथं जातोय, तिथलं वेगळेपण का अनुभवू नये? नुसतं भटकत भटकत आजूबाजूचा निसर्ग, गाव न्याहाळायचा, गावकऱ्यांशी गप्पा मारायच्या, पक्ष्यांचे आवाज, समुद्राची गाज, नदीच्या पाण्याची झुळझुळ ऐकायची! एरवी कधी अशी संधी मिळणार?
...आणि हो, प्रवासाच्या नियोजनात आणि तयारीत मुलांना सहभागी करून घेतलं, तर सोन्याहून पिवळं! मुलांबरोबर प्रवासाला जाताना त्यांची सोय आणि करमणूक महत्त्वाची आहेच; पण आई-बाबांनाही त्यातून ऊर्जा आणि आनंद मिळवायचाय हे आपल्याला विसरायचं नाही.

Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang