समुपदेशन? बाप रे! (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा. आजच्या व्यक्तिकेंद्रित काळात, भर गर्दीतही साधं मन मोकळं करण्यासाठी कुणी आसपास नसताना अशी तज्ज्ञ-मदत फार उपयोगाची ठरते.

समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्‍यकता आहे, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरताही वाटते आपल्याला. मात्र, आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा. आजच्या व्यक्तिकेंद्रित काळात, भर गर्दीतही साधं मन मोकळं करण्यासाठी कुणी आसपास नसताना अशी तज्ज्ञ-मदत फार उपयोगाची ठरते.

एखाद्या अनोळखी रस्त्यावर कधी कधी आपण हरवतो. काही वेळा हा रस्ता ओळखीचाही असतो; पण अचानक आजूबाजूला धुकं दाटतं. काही दिसेनासं होतं, दिशांचं भान सुटतं. आपण तिथंच घुटमळत राहतो, नाहीतर चुकीची दिशा पकडून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी जेव्हा एखादं होकायंत्र दिशा दाखवतं, एखादा मदतीचा हात पुढं येतो, तेव्हा जिवात जीव येतो. थोडा थोडा रस्त्याचा अंदाज यायला लागतो. आपण चाचपडत पुढं पावलं टाकतो. काही वेळानं धुक्‍याच्या त्या पट्ट्यातून बाहेर येतो आणि पुढचा प्रवास सुखरूप सुरू राहतो. काही अडथळे येतीलही आणि कधी ना कधी ते संपतीलही, असा एक विश्वास अशा वेळी आपल्यात निर्माण होतो. त्यामुळे आपण खचून जात नाही, प्रयत्न करत राहतो. आता परीक्षांचा काळ जवळ आलाय. घराघरात - त्यातही दहावी-बारावी असलेल्या घरांमध्ये - तणावाचं, अनिश्‍चिततेचं धुकं दाटायला लागलंय. पालक म्हणून आपल्या मुलांच्या संदर्भात अशा इतरही अनेक वेळा येतात, जेव्हा कुठल्या तरी मार्गदर्शनाची आवश्‍यकता वाटू
लागते. कधी नापास होण्यासारख्या शैक्षणिक समस्या येतात; कधी खोटं बोलणं, चोरी करणं यासारख्या वर्तणुकीच्या समस्या येतात. काही वेळा मूल आपल्याच कोशात जातं आणि त्याच्या मनाचा थांग लागेनासा होतो. कधी चुकीची संगत, तर कधी प्रेमप्रकरण, कधी सिगारेट ओढून पाहणं, तर कधी मोबाईलचं व्यसन. काही खेळाडू-मुलांना ऐनवेळी अवसानघात होण्याची समस्या असते, काहींच्या मनात करिअरविषयीचा गोंधळ असतो. काही वेळा घरातल्या काही गोष्टींचा मुलांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ ः आई-बाबांमधला बेबनाव, आर्थिक समस्या, व्यसनं इत्यादी. असेही प्रसंग येतात, जेव्हा खरं म्हणजे बोट ठेवावं अशी काही समस्या नसते; पण संवादाचा पूर्ण अभाव असतो. नेहमीप्रमाणे कुणाशी तरी बोलून हाती काही लागत नाही; पण प्रोफेशनल मदत घेण्याचं धाडस होत नाही. त्यामागं अनेक पूर्वग्रहही असतात. असं कुणाला तरी काउन्सिलिंग घ्यायला सांगितलेलं, आजकाल आपण ऐकत असतो. अशा व्यक्तीकडं बघण्याची आपली दृष्टी काहीशी दयेची, काहीशी तुच्छतेची असते. काही वेळा मन
एक इशाराही देतं ः "या व्यक्तीपासून, कुटुंबापासून जरा दूर राहायला हवं, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय.' कारण, "मानसोपचार हे केवळ वेड्या लोकांना, मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांना द्यायचे असतात,' असा आपला समज असतो. कुठंतरी पाहिलेल्या, वाचलेल्या टोकाच्या प्रतिमा डोळ्यासमोर येतात. शून्यात नजर लावून बसलेल्या रिकाम्या डोळ्यांच्या व्यक्ती किंवा स्वत:शीच बडबडत, हातवारे करत चाललेल्या व्यक्ती किंवा डोळ्यांत रक्त उतरलेल्या हिंस्र व्यक्ती...समुपदेशन घ्यायची ही वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशन लागतंय, हा जणू आपला काहीतरी अपराध आहे असं वाटतं, ती आपली कमतरता वाटते. काही लोक खचतात, काहीजण समस्याच नाकारतात. काही संतापतात आणि विचारतात ः "म्हणजे? आमच्या मुलाच्या डोक्‍यावर परिणाम झालाय असं म्हणायचंय की काय तुम्हाला? अहो, आमच्या घराण्यात कुणाला साधा विस्मरणाचा आजारही नाही आणि तुम्ही आम्हाला मानसोपचारतज्ज्ञाकडं जायला सांगताय?' इत्यादी इत्यादी... आजकाल शाळांमध्येही समुपदेशक असतात. शालेय समस्या, वर्तणूकसमस्या अशांसाठी मुलांना त्यांच्याकडं पाठवण्यात येतं. तेव्हा मुलांना आणि त्यांच्या आई-बाबांना खूप काळजी वाटायला लागते. इतर मुलं, त्यांचे पालक काय म्हणतील याची भीतीही वाटते. अलीकडच्या काळात यावर आधारित "डिअर जिंदगी'सारखे काही चित्रपट येऊन गेले. समुपदेशन म्हणजे काय याची थोडीफार कल्पना लोकांना त्यावरून आली. समुपदेशनाच्या शास्त्रीय पद्धती असतात. देशोदेशीच्या मानसतज्ज्ञांनी गेली कित्येक वर्षं त्यावर खूप खोलवर विचार केलाय, प्रत्यक्ष पेशंटवर त्यांचा वापर करून निष्कर्ष काढलेत. या नव्या, आधुनिक काळात मानसशास्त्रासमोरची आव्हानंही नव्यानं उभी ठाकली आहेत. काळाच्या ओघात त्यातल्या काही पद्धती बदलल्या, काहींची उपयुक्तता नव्यानं सिद्ध झाली, तर काही पद्धती निरुपयोगीही ठरल्या. त्यांविषयी आपण इथं फार खोलात जायला नको. कुणासाठी कुठली पद्धत वापरायची हे आपण तज्ज्ञांवर सोडून देऊ. मात्र, समुपदेशन म्हणजे नुसतं मार्गदर्शन किंवा सल्लामसलत नव्हे, त्यासाठी काही खास प्रशिक्षण घ्यावं लागतं, समुपदेशनप्रक्रियेच्या काही खासियती आत्मसात कराव्या लागतात, हे लक्षात घ्यायला हवं. उदाहरणार्थ ः कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळगणं; समोरच्या व्यक्तीची मतं, दृष्टिकोन यांचा - मग ती मतं, दृष्टिकोन आपल्याला पटत नसले तरी - आदर करणं; पेशंटच्या समस्येचा सखोल विचार करत असतानाच त्यापासून भावनिकरीत्या अलिप्त राहणं इत्यादी. समुपदेशक उपाय सुचवत नाहीत किंवा सल्ले देत नाहीत, तर परिस्थिती स्पष्टपणे पाहायला मदत करतात, तिच्याकडं बघण्याचा नवा दृष्टिकोन सुचवतात, तिच्यातून बाहेर येण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या सर्व शक्‍यता शोधायला मदत करतात आणि त्यातल्या योग्य उपायाची निवड करण्यासाठी मार्गदर्शनही करतात. मात्र, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पेशंटचा सक्रिय सहभाग असतो आणि त्याचबरोबर निवडलेल्या पर्यायाचा निर्णय पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारीही. आणि खरं सांगायचं तर, सल्ले कुणाला हवे असतात? बहुतेक वेळा जेव्हा आपण कुणाबरोबर तरी आपली समस्या शेअर करतो तेव्हाही समोरच्यानं आपलं ऐकून घ्यावं आणि आपल्याला थोडीफार सहानुभूती दाखवावी इतपतच आपली अपेक्षा असते. आजारपणात औषध घेतलं की आजार बरा होतो. मनाचे आजार मात्र असे एखाद्याच सेशनमध्ये पळून जात नाहीत. त्यासाठी अनेक वेळा भेटावं लागतं, अनेक सत्रं करावी लागतात, बराच धीर धरावा लागतो, सातत्यानं प्रयत्न करत राहावे लागतात. समुपदेशनाचा व्हावा तितका उपयोग होत नाही असं वाटलं तर किंवा मनाचा हा आजार गंभीर असेल तर अधिक तीव्रतेचे उपचार करावे लागतात. काही वेळा औषधांचा वापर करावा लागतो. मानसिक आजारांसाठी औषधं घ्यायला आपण नेहमीच कां कू करतो. त्याविषयी बरेच गैरसमज असतात. त्यांची सवय लागेल...एकदा सुरू केले की कायम घ्यावे लागतील...त्याचे खूप दुष्परिणाम असतात...इत्यादी इत्यादी. प्रत्यक्षात त्यांची सवय नाही लागत. एकदा लक्षणं आवाक्‍यात आली की ती सुरू ठेवण्याचं प्रयोजनही संपतं. अर्थात इतर कुठल्याही औषधांप्रमाणे यांचेही काही दुष्परिणाम असतात. या सगळ्याचा अंदाज घेऊन आणि त्या त्या पेशंटच्या गरजेप्रमाणेच मानसोपचारतज्ज्ञ औषधयोजना करतात. प्रशिक्षित डॉक्‍टरकडून घेतलेले उपचार साह्यकारीच ठरतात. काही वेळा तर एखादी व्यक्ती इतकी संभ्रमात असते की समुपदेशन परिणामकारक होत नाही. ते व्हावं यासाठी औषधं आवश्‍यक ठरतात. समुपदेशन म्हणजे मासिकात येणारा "ताईचा सल्ला' नव्हे. एक तज्ज्ञ व्यक्ती आणि एक समस्याग्रस्त व्यक्ती अशा दोन व्यक्तींमधला तो करार असतो. आवश्‍यक असेल तेव्हा समुपदेशन घेण्याचा निर्णय आपण काळजीपूर्वक घ्यायला हवा. मात्र, आपल्या जीवनातलं अडलेलं पाणी वाहतं करण्यासाठी, अडचणीच्या काळात दिशा दाखवण्यासाठी, इतकंच नव्हे तर, जीव वाचवण्यासाठीही हा हस्तक्षेप अमूल्य ठरू शकतो. मुख्यत: आजच्या व्यक्तिकेंद्रित काळात, भर गर्दीतही साधं मन मोकळं करण्यासाठी कुणी आसपास नसताना अशी तज्ज्ञ-मदत फार उपयोगाची ठरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang