कौतुकाचे बोल (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुलांचं कौतुक करावं की नको याविषयी अगदी दोन टोकांची मतं असतात. कौतुक केल्यानं मुलं शेफारतात असं ठामपणे मानणारा एक गट आहे, तर कौतुक केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळतं यावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहेत आणि केलंच तर ते "किती, कधी आणि कसं करावं?' हे नेहमी सतावणारे प्रश्न. कौतुक आवश्‍यक आहेच. त्यानं नुसतंच प्रोत्साहन मिळतं असं नाही, तर आपलं प्रेम, सहभाग, पाठिंबा आणि उत्साहही दिसून येतो; पण ते दुधारी शस्त्र आहे. ते वेळ-काळ पाहून, काळजीपूर्वक आणि मोजून-मापून वापरायला हवं.

मुलांचं कौतुक करावं की नको याविषयी अगदी दोन टोकांची मतं असतात. कौतुक केल्यानं मुलं शेफारतात असं ठामपणे मानणारा एक गट आहे, तर कौतुक केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळतं यावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहेत आणि केलंच तर ते "किती, कधी आणि कसं करावं?' हे नेहमी सतावणारे प्रश्न. कौतुक आवश्‍यक आहेच. त्यानं नुसतंच प्रोत्साहन मिळतं असं नाही, तर आपलं प्रेम, सहभाग, पाठिंबा आणि उत्साहही दिसून येतो; पण ते दुधारी शस्त्र आहे. ते वेळ-काळ पाहून, काळजीपूर्वक आणि मोजून-मापून वापरायला हवं.

अकबर एकदा म्हणाला ः ""माझा राजपुत्र म्हणजे जगातलं सर्वात सुंदर मूल आहे.'' दरबारी लोकांनी माना डोलावल्या. बिरबल मात्र गप्प होता. त्याला हे मान्य नाहीये, हे अकबरानं ताडलं. ""तुझं काय म्हणणं आहे बिरबल? तुला आणखी कुणी माहिती आहे का राजपुत्राहून सुंदर? दाखव तरी आम्हाला.'' बिरबल म्हणाला ः ""त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल.'' वेशांतर करून ते निघाले. एका साध्याशा घरासमोर बिरबल थांबला. एक नाक गळत असलेला मुलगा तिथं मातीत खेळत होता. त्याचा चेहरा, हात, कपडे मळलेले होते. अकबर आश्‍चर्यचकित झाला आणि थोडासा नाराजही. म्हणाला ः ""काय चाललंय काय बिरबल?'' बिरबल काही बोलणार, तितक्‍यात त्या बाळाची आई बाहेर आली. त्याला प्रेमानं उचलून घेऊन ती त्याच्याशी खेळायला लागली. खेळता खेळता ती त्याच्याशी बोबड्या बोलात बोलत होती, त्याचं कौतुक करत होती. अकबर अवाक झाला. प्रत्येक आईबाबांना त्यांचं मूल सर्वाधिक प्रिय हे त्याच्या लक्षात आलं.

किती विनाअट होतं गोष्टीतल्या या आईचं कौतुक! आपण करतो का असं? की ते फक्त यशावर आणि कामगिरीवर अवलंबून असतं? मुळात कौतुक करावं की नको याविषयी अगदी दोन टोकांची मतं असतात. कौतुक केल्यानं मुलं शेफारतात असं ठामपणे मानणारा एक गट आहे, तर कौतुक केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळतं यावर विश्वास ठेवणारे अनेक जण आहेत आणि केलंच तर ते "किती, कधी आणि कसं करावं?' हे नेहमी सतावणारे प्रश्न.

बहुतेक वेळा आपलं कौतुक एका ठराविक साच्याचं असतं. "कित्ती शहाणा मुलगा आहेस तू!', "मस्त!' "छान!' "परफेक्‍ट', " गुड जॉब.' यातून मुलाला फारसा काही बोध होत नाही. कित्येकदा तर हे शब्द इतके यांत्रिकपणे वापरलेले असतात, की त्याचा आनंद किंवा उपयोग ना बोलणाऱ्याला होतो ना ऐकणाऱ्याला. मग कसं बरं करायला हवं ते? मानसतज्ज्ञांनी यावर काही मार्गदर्शक तत्त्वं सुचवली आहेत.
- कौतुक प्रयत्नाचं करायला हवं. ते त्यातून मिळणाऱ्या समाधानाचं असणंही चांगलंच. त्याचा फायदा असा, की चक्क अपयश आल्यावरही प्रशंसा करणं शक्‍य होतं. कारण मुळात आपलं बोलणं होणार ते यशाचं किंवा अपयशाचं नाहीच, ते होणार तिथपर्यंतच्या प्रवासाचं.

- ते वर्णनात्मक आणि नेमकं असावं. त्या गोष्टीतलं नक्की काय मनाला भिडलंय ते नेमक्‍या शब्दांत सांगितलं, तर मुलांना ते कौतुक अस्सल वाटतं. शिवाय पुढच्या वेळी काय करायला हवं हेही कळणं सोपं जातं. ही दोन वाक्‍यं पाहा - "मस्त आवरलीस खोली' आणि "काय छान वाटतंय या खोलीत आल्यावर! सगळी खेळणी जागेवर आहेत आणि बेडशीटवर एकही सुरकुती नाहीये. वा!' यातलं कुठलं वाक्‍य ऐकायला आवडेल?
- मुलांच्या नजरेला नजर मिळवून, हातातलं काम बाजूला ठेवून ते करायला हवं. त्यातून मुलांबद्दलचा आदर दिसतो आणि त्यांच्या कृतीला योग्य ते महत्त्वही दिलं जातं.

- व्यक्तीची स्तुती करण्याऐवजी गुणांची किंवा कृतीची स्तुती केली, तर ती अधिक प्रेरणादायी होते. उदाहरणार्थ, "तू किती नीटनेटका आहेस' असं म्हणण्यापेक्षा "किती व्यवस्थित घड्या घातल्यायस तू कपड्यांच्या! याला म्हणतात नीटनेटकेपणा.'
कौतुक कसं नसावं या विषयावर तर बरंच काम झालंय. त्यातले काही मुद्दे असे ः
- ते चांगला, वाईट असा शिक्का मारणारं नसावं. उदाहरणार्थ, "गुड गर्ल', "शहाणा बाळ.'
- ते हातात नसलेल्या किंवा न बदलता येणाऱ्या गुणांबद्दल नसावं. उदाहरणार्थ, "किती बुद्धिमान आहेस गं!' याच्या ऐवजी तिच्या कष्टांची प्रशंसा केलेली अधिक उपयुक्त. "अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन'च्या क्‍लॉडिया म्युलर यांनी केलेल्या अभ्यासात असं स्पष्ट दिसून आलंय, की जेव्हा कष्टांचं कौतुक केलं जातं, तेव्हा ती मुलं अपयशाला सहजपणे सामोरी जाऊ शकतात आणि चुकांमधून अधिक चांगली शिकूही शकतात. त्याउलट नैसर्गिक गुणांबद्दल बोललेल्या मुलांना मात्र अपयश ही आपली वैयक्तिक कमतरता वाटते आणि ती निराश होतात. कारण कष्ट करणं आपल्या हातात असतं, बुद्धिमत्ता दैवदत्त असते.
- ते प्रमाणाबाहेर, भरमसाट नसावं. "वा, उत्तम चित्र. जगात असं कुणी काढलं नसेल आत्तापर्यंत.'
- त्यात उपरोध नसावा. उदाहरणार्थ, "वाटलं नव्हतं तू हे करू शकशील!' ते मुलांना अपमानास्पद वाटू शकतं.
- ते तुलनात्मक नसावं. उदाहरणार्थ, "शौनकपेक्षा तुझा आवाज जास्त चांगला आहे.' त्यात समाधानापेक्षा स्पर्धा आणि ईर्ष्या येते. त्यापेक्षा त्याच्यात मागच्या वेळेपेक्षा काय सुधारणा आहे ही स्वत:शी केलेली तुलना बरी.
- ते विसंगत नसावं. म्हणजे एखादा बिघडलेला पदार्थ खाल्ल्यावर, "तू मास्टरशेफमध्ये भल्याभल्यांना मागे टाकशील,' असं म्हटलं, तर कुणाला खरं वाटेल?
- आणि वरवरचं, खोटं-खोटंही नसावं. मुलांच्या ते लगेच लक्षात येतं आणि त्यातून प्रेरणा मिळण्याऐवजी ती हिरमुसली होतात.
- कौतुक म्हणजे बक्षिसांचा भडीमार का? मला वाटतं आपल्या सगळ्यांचंच याला नकारार्थी उत्तर असेल; पण तरीही सवयीनं आपण तसं करू जातो. जसं "वा वा, छान!' म्हणून टाकणं सोपं वाटतं; तसंच पटकन एखादी वस्तू देऊन टाकली की काम झालं असं वाटतं; पण अर्थातच त्यामुळे मुलांचं लक्ष त्यांच्या आतल्या आनंदापासून दूर जातं. ट्रेकिंग करून माथ्यावर पोचल्यावरचा आनंद कसा आतून उमलून आलेला असतो आणि म्हणूनच तो अमूल्य आणि टिकाऊ असतो. आपलं कौतुक किंवा बक्षीसही असं हवं, की ज्यामुळे तो कृतार्थतेचा क्षण हिरावून घेतला जाणार नाही.
असं म्हणतात, की रडकं मूल आईचं असतं आणि हुशार, हसरं मूल सर्वांचं असतं. कारण कसंही असलं, तरी आईला ते प्रिय असतं, इतरांच्या मात्र आवडण्यासाठी अटी असतात. मग त्यात तुलना येते, टीका येते. अशा वेळी मात्र आई-बाबांना आपल्या मुलाच्या लहानमोठ्या कर्तृत्वाचे गोडवे लोकांसमोर गाण्याची गरज वाटायला लागते. आपण पालकलोक मग आपल्या गोल, त्रिकोणी, षटकोनी मुलांना एकाच चौकोनी चौकटीत कोंबायला लागतो आणि त्यालाच परफेक्‍शन समजायला लागतो. कारण परफेक्‍ट मुलाचं कौतुक होतं ना! काही वेळा आई-बाबांकडून हे कौतुक प्रमाणाबाहेर केलं जातं. अहमहमिकेनं ते केल्यासारखं वाटतं. इतकंच नव्हे तर इतरांना ते कंटाळवाणं, नकोसं वाटू शकतं. मुलांच्या इतरांसमोर केलेल्या बेसुमार कौतुकामागे काहीवेळा जाणवते ती एक छुपी महत्त्वाकांक्षा. एक ठुसठुसणारी अस्वस्थता. काहीशा कमीपणाची भावना...आणि ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी दुरान्वयानं येऊन पडते मुलांवर.

प्रत्येक मूल वेगळं असतं हेही लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे आत्ता आपण चर्चा केलेल्या गोष्टी क्वचित काही वेळा अपुऱ्या वाटू शकतील. काही मुलांना उपजतच अंत:प्रेरणा असते. बाह्य प्रोत्साहनाची त्यांना फार गरज वाटत नाही; पण काहींना मात्र कौतुकाची ढकलगाडी लागते पुढे जायला. शिवाय अतिकौतुक ही कुबड्यांसारखी गरज बनू देता कामा नये. नाहीतर त्याचा पुरेसा डोस मिळाल्याशिवाय मुलांना काही करताच येत नाही आणि दुसरीकडे ती पायातली बेडीही बनता कामा नये. नाहीतर त्यातल्या अपेक्षांच्या ओझ्यानंच मुलं दाबून जायची. कौतुक आवश्‍यक आहेच. त्यानं नुसतंच प्रोत्साहन मिळतं असं नाही, तर आपलं प्रेम, सहभाग, पाठिंबा आणि उत्साहही दिसून येतो; पण ते दुधारी शस्त्र आहे. ते वेळ-काळ पाहून, काळजीपूर्वक आणि मोजून-मापून वापरायला हवं.

Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang