परिपूर्णतेचं मिथक (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 23 डिसेंबर 2018

परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय ठेवण्यापेक्षा त्या सुहाना सफरीचाच आनंद का घेऊ नये?

परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय ठेवण्यापेक्षा त्या सुहाना सफरीचाच आनंद का घेऊ नये?

एका अतिशय नीटनेटक्‍या घरात गेले होते. सगळं अगदी व्यवस्थित होतं, एकही गोष्ट तसूभरसुद्धा इकडची तिकडे हललेली नव्हती. त्याबद्दल मालकीणबाईंची प्रशंसा केली, तर त्या म्हणाल्या ः ""आता मुलं शिक्षण- नोकरीसाठी बाहेर पडलीयत, तर पसारा करायलाही कुणी नाही. आय मिस दॅट!''

एका शाळेजवळून एकदा जात होते. शाळेसमोर छोटंसं मैदान होतं. मधली सुटी असणार. मुलं इतकी मनसोक्त खेळत होती, की सगळीकडे चक्क धूळ उडत होती, अंगावरच्या युनिफॉर्मचीही त्यांना पर्वा नव्हती. त्याउलट काही स्वच्छ, परीटघडीचे युनिफॉर्म असणाऱ्या शाळांत भलंमोठं सुसज्ज मैदान असूनही मुलं घोळक्‍याघोळक्‍यानं फक्त गप्पा मारत बसलेली दिसतात. मला आठवतंय, मुलांना गरवारे बालभवनमध्ये प्रवेश घ्यायला गेले होते. पहिल्याच दिवशी बालभवनच्या संचालिका शोभाताई भागवत यांनी सगळ्या पालकांना आवर्जून सांगितलं ः ""इथं पाठवताना मुलांना फार महागातले, नवे कपडे घालून पाठवू नका. नाहीतर मुलाचं सगळं लक्ष "कपडे खराब होतील का' आणि "आई काय म्हणेल' याकडेच लागून राहतं. मुलांना मनसोक्त चिखला-मातीत खेळू द्या. मातीत खेळून आलेल्या अस्ताव्यस्त मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो स्वच्छ, टापटिपीचा भांग पाडलेल्या मुलाच्या चर्येवर दिसतो का?''

मात्र, तरीही एकूणच परिपूर्णतेला खूप महत्त्व दिलं गेलंय. अर्थातच हे महत्त्व मुलांच्या बाबतीतही आपण बाळगतो. "माझं मूल परफेक्‍ट असावं' यासाठी आटापिटा करतो. बाळ जेव्हा आईच्या पोटात विकसित होत असतं, तेव्हाची परिस्थिती काय असते? फक्त एका पेशीचं विभाजन होऊन त्यापासून एक अतिशय गुंतागुंतीची शरीररचना तयार होत असते. इतक्‍या सगळ्या अवघड प्रक्रियेतून जाऊनही बहुतेक मुलं अव्यंग जन्माला येतात हा चमत्कारच आहे एक. दुर्दैवानं काही वेळा यात घोळ होतो आणि जन्माला येणारं बाळ दिव्यांग असतं. जेव्हा जेव्हा मी या विशेष बाळांच्या पालकांना पाहते, तेव्हा तेव्हा लक्षात येतं, की किती धैर्यानं सामोऱ्या आलेल्या परिस्थितीचा त्यांनी स्वीकार केलेला असतो! अनेक आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दिव्यांमधून जाऊनही त्यांची धडपड अथकपणे चालू असते. काही अपवाद वगळता अतिशय समजूतदारपणे आपल्या या मुलाला, त्याच्या गुण दोषांसकट ते आपल्यात सामावून घेतात.

असं काही विशेष न्यून बाळामध्ये जन्माच्या वेळी नसलं, तरीही ते मोठं होईल तसतशी आव्हानं उभी ठाकायला लागतात. कारण पालक होण्यासाठी कुणी आपल्या शिकवण्या घेतलेल्या नसतात. मला वाटतं सगळ्यात अवघड आणि मोठं आव्हान तंत्रज्ञान आणि गॅजेट्‌स यांनी आपल्यासमोर उभं केलंय. एका कार्यशाळेत नुकतंच ऐकलेलं वाक्‍य आठवलं. "आजच्या तंत्रज्ञानाच्या जगातले आपण फक्त निर्वासित आहोत, उपरे आहोत. मात्र, आपली मुलं मात्र या जगाची जन्मापासून नागरिक आहेत.' गॅजेट्‌सबरोबर मोठं होणं म्हणजे काय हे आपण कधी अनुभवलेलंच नसतं. ज्या गोष्टीचा आपल्याला गंध नाही त्याबाबतीत आपण त्यांना अचूक सल्ला कसा काय देणार? आणि त्यांना तो कसा काय पटणार? अशा अनेक व्यावहारिक गोष्टींमधून पालक म्हणून आपल्यातल्या उणिवांची जाणीव होत रहाते, करून दिली जाते. मनात शंका उत्पन्न करणारे कितीतरी प्रसंग येतात. द्विधा मनस्थिती होते. भूतकाळातले अनुभव आणि भविष्यकाळाच्या चिंता मनात कोलाहल माजवतात. सरळ विचार करणं अवघड होतं; पण त्या पसाऱ्यात, अव्यवस्थेत, गोंधळात, राग-संताप-दु:खासारख्या नकारात्मक भावनांच्या कल्लोळातही प्राण असतो. त्याच्या स्वीकारातूनच जन्माला येतात समजूतदारपणा, सहनशीलता, प्रेम, प्रगती आणि स्वातंत्र्य.

जपानी संस्कृतीत एक "वाबी-साबी' म्हणून संकल्पना आहे. ती बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे. जीवनाच्या अधुरेपणात सौंदर्य शोधणारी आणि त्याच्या नैसर्गिक अपूर्णतेचा, ऱ्हासाचा अलवारपणे स्वीकार करणारी ही संकल्पना! त्या तत्त्वज्ञानानुसार, परिपूर्णता आणि अचूकता या कधीच साध्य न होणाऱ्या गोष्टी आहेत, ती एक प्रक्रिया आहे. कोणतीही गोष्ट शाश्वत, अजरामर, चिरंतन आणि अचूक नसते. हे अपूर्णत्वच तर आपल्याला पुढं जाण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतं आणि तेच प्रत्येकाला युनिक, खास बनवतं. पौर्णिमेच्या वर्तुळाकार चंद्रापेक्षा चंद्रकोरीचं सौंदर्य अधिक मनमोहक. गोंडस बाळाला काजळाची एखादी तीट लावावी लागतेच. त्याच कारणानं फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या गोष्टींपेक्षा हॅंडमेड वस्तूंना मागणी जास्त असते, त्या अगदी परिपूर्ण नसल्या तरी. या सगळ्याचं प्रतीक म्हणून, जपानी लोक बनवलेल्या गोष्टींमध्ये मुद्दामहून थोडीशी खोट ठेवतात, जीर्ण वस्तूंना मानाचं स्थान देतात. त्यांच्या देशात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चहा-समारंभातला टी-सेट घ्या. त्यातला चहा पिण्याचा कप जुना असेल, त्याला एखादी भेग पडलेली असेल तर त्याचं महत्त्व अधिक.

पूर्णत्वाचा ध्यास धरताना हे लक्षात ठेवायला लागतं की तो एक प्रवास आहे आणि तो फारच वैयक्तिक आणि सापेक्ष आहे. म्हणजे माझी कल्पना पूर्णत: वेगळी असणार दुसऱ्या कुणापेक्षा, अगदी माझ्या मुलांपेक्षाही! मग मुलांनी अमुक प्रकारे दिसावं, अमुक डिग्री मिळवावी, इतके पैसे मिळवावेत, तमुक कला आत्मसात कराव्यात; म्हणजे ती परिपूर्ण होतील हे कशावरून ठरवायचं? अधुरेपणाला नेहमीच महत्त्व दिलं गेलंय, कारण खरं पूर्णत्व अजून कुणाला सापडलंय? म्हणताना आपण "नोबडी इज परफेक्‍ट' असं म्हणतो; पण ते इतकं सहज आणि नैसर्गिक असूनही स्वतःच्या बाबतीत स्वीकारणं जड जातं आपल्याला. परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय ठेवण्यापेक्षा त्या सुहाना सफरीचाच आनंद का घेऊ नये?

Web Title: dr vaishali deshmukh write guardianship article in saptarang