
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला धोंडू नायक नावाचा कृष्णभक्त होता. निरनिराळ्या पदांतून तो कृष्णगान करायचा. आख्यायिकेनुसार, त्याची भक्ती बघून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले.
भाववादी घराणं : किराणा घराणं
- डॉ. विकास कशाळकर vikaskashalkar@gmail.com
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला धोंडू नायक नावाचा कृष्णभक्त होता. निरनिराळ्या पदांतून तो कृष्णगान करायचा. आख्यायिकेनुसार, त्याची भक्ती बघून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते म्हणाले, ‘वत्सा, काय हवंय तुला?’ धोंडू म्हणाला, ‘देवा तुमच्या बासरीचा सूर माझ्या गळ्यात द्या.’ भगवान ‘तथास्तु’ म्हणाले. तेव्हापासून धोंडू नायक गोड बासरीच्या सुरात धृपद गायचा. त्याच्या गाण्यानं श्रोते मुग्ध व्हायचे. किराणा घराण्याचे गायक याच धोंडूला घराण्याचा मूळ पुरुष मानतात. त्याच्या या धृपदगायकीच्या अंगातून किराणा गायकी उदयाला आली असा समज आहे. पुढं याच घराण्याचे गायक हे बीनकार झाले आणि
दिल्लीदरबारात वादक म्हणून नोकरी करू लागले. दिल्लीची सत्ता खालसा झाल्यावर हे सगळे बीनकार, सारंगिये अठराव्या शतकात हुसेनपूरजवळ कैराना गावात स्थायिक झाले. त्यातलेच एक उत्तम बीनकार उस्ताद बंदेअलीखाँ हे अतिशय भावपूर्ण वादन करायचे. मिंड, दीर्घ स्वराकृती, गहरे सूर, घनगंभीर आवाज यामुळे त्यांचं बीनवादन हृदयाला भिडायचं. अनेक नवोदितांना ते गाणं म्हणून बीन शिकवायचे. बीनसारखा घुमारदार स्वर, त्यांच्या गळ्यातून निघणारा आवाज काहीसा कृत्रिम; पण कर्णमधुर असायचा. हेच या गायकीचं वैशिष्ट्य ठरलं. तंतुवाद्यासारखी आलापचारी हे या गायकीचं मुख्य अंग बनलं. कैरानातील कलाकार बीन, सतार, सारंगी ही वाद्यं जशी कुशलतेनं वाजवत असत, तसंच त्यांचं गायन मधुर, सुरेल व भावरसपूर्ण सूफी परंपरेशी जुळणारं होतं. कैरानातून नन्हे खाँ आणि काले खाँ यांच्याकडून तालीम घेऊन गायक बनण्यासाठी अब्दुल करीम खाँ हे फिरत फिरत बडोदा इथं पोहोचले. त्यांच्या गायनातील भक्तिभाव, लालित्य, घुमारदार आवाज, सहजता, सुरांचा टोकदारपणा यांमुळे त्यांनी प्रस्थापितांच्या समोर एक आव्हान उभं केलं. सगळ्या तत्कालीन संस्थानांमध्ये आपल्या भावपूर्ण गायकीनं त्यांनी श्रोत्यांची मनं जिंकून घेतली. या घराण्यात नेहमीच्या प्रचारातील यमन, शुद्ध कल्याण, मालकंस, दरबारी कानडा असे भावानुवर्ती राग गायिले जातात व रागरसपरिपोष हे या गायकीचं मुख्य तत्त्व मानलं जातं, त्यामुळे रागामधल्या स्वरांचे सूक्ष्म लगाव यात दिसतात. रागातल्या प्रत्येक सुराचा जर एक परीघ कल्पिला तर त्याच्या मध्य भागाला छेदणारे लगाव स्वरांना खोली प्राप्त करून देतात, त्यामुळे किराणा घराण्याचं गाणं स्वरयुक्त न राहता श्रुतियुक्त असतं.
शारंगदेवांनी ‘संगीत रत्नाकरा’त म्हटलं आहे, ‘वाद्यवादन हे श्रुतियुक्त असतं, तर गायन हे स्वरयुक्त असतं.’ वादन अंगातून निर्माण झाल्यामुळे वादनाचे गुणधर्म या गायकीत आहेत. वाद्य अंगानं होत असलेल्या गायनाला भरतमुनींनी ‘धातुयोग-गायन’ म्हटलं आहे. स्वरांची दीर्घता, एकसंधता आणि भावात्मकता हे गुण यात असतात. त्यासाठी ख्यालाच्या शब्दांचे उच्चार थोडे मृदू आणि लवचिक करावे लागतात, त्यामुळे साहजिकच तालाच्या प्रत्येक मात्रेचं, खंडाचं दर्शन या गायकीतून होत नाही. एखाद्या नदीतल्या आंतरप्रवाहासारखा ताल-लयीचा प्रवाह पुढं सरकत असतो. मात्र, वरून शांत-गंभीर स्वरांचं दर्शन होतं, त्यामुळे ‘या गायकीत तालाला महत्त्व नाही,’ असं चुकीचं विधान काही लोक करतात. ‘सूर गया तो सिर गया, ताल गया तो बाल गया’ असं चुकीचं विधान ‘किराणा’च्या बाबतीत केलं जातं. उगीचच तालाची छेडछाड करणं या गायकीला मान्य नाही, म्हणून बोलबनावाची लयकारी या घराण्यात दिसून येत नाही. अगदी सहजपणे सम गाठणं हा याचा स्थायीभाव आहे. भरतमुनींनी म्हटलं आहे, ‘तालो यस्य कनिष्ठः स्यात स लयांतरितः स्मृतः’ म्हणजे, या गायकीला लयांतरित गायकी म्हटलं पाहिजे; परंतु त्याचा अर्थ तालाकडे दुर्लक्ष करणं असा नाही.
सिनेमा बघताना इतर दिवे थोडे मंद करावे लागतात, तसा स्वरांचा आनंद घेण्यासाठी ताल झाकावा लागतो एवढंच! तसंच रागाचा रंग पुढं आणण्यासाठी चमत्कृती, खटके, मुरक्या हे प्रकार बाजूला ठेवावे लागतात. रागाची शांत, सोज्वळ प्रतिमा उभी करणं हे या घराण्याचं ब्रीद आहे. त्यामुळे टप्पे, तराणे, त्रिवट गाण्याची पद्धत यात नाही.
अब्दुल करीम खाँ यांनी या गायकीबरोबरच ठुमरींचा अभ्यास करून त्या श्रोत्यांसमोर मांडल्या. मुळात ते सूफी विचारांचे असल्यामुळे त्यांच्या ठुमरीत आर्तता जास्त जाणवायची. त्यांची ‘जमुना के तीर...’ ही ठुमरी ऐकताना जीवनाचा पैलतीर दिसायचा. उत्कटता हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. एकदा ‘हेचि दान देगा देवा’ हे भजन ते शिर्डीच्या साईबाबांसमोर गायले. साईबाबांना अश्रू आवरता आले नाहीत.
धार्मिक वृत्तीचे करीम खाँ एकदा ताजुद्दीनबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी नागपूरला गेले. भोसल्यांकडे बाबांची वाट बघून बघून ते थकले. शेवटी, तिसऱ्या दिवशी एका निर्जन जंगलात त्यांची भेट झाली. बाबांनी त्यांना तिथंच त्या पालापाचोळ्यात बसून गायला सांगितलं. स्वत्त्व, गर्व व अहंकार विसरून त्यांनी ज्या तन्मयतेनं गायन सादर केलं. त्यावर खूश होऊन ताजुद्दीनबाबांनी त्यांना साधना, एकरूपता, नवतेचा ध्यास आणि निरभिमानी वृत्तीची दीक्षा दिली. त्यामुळेच पुढं त्यांची संतवृत्ती वाढली. अब्दुल करीम खाँ यांचे कर्नाटकात खूप कार्यक्रम व्हायचे. कर्नाटक संगीतातील सरगम आणि अनेक राग त्यांनी हिंदुस्थानी संगीतात लोकप्रिय केले. ही गायकी निर्माण करण्यात बंदेअली खाँ यांचा महत्त्वाचा वाटा असला, तरी ती जनमानसात रुजवण्याचं कार्य अब्दुल करीम खाँ यांनी केलं. सवाई गंधर्व, संगमेश्वर गुरव, कपिलेश्वरी, गंगूबाई हनगल, हिराबाई बडोदेकर यांनी ही गायकी गायली; पण ती लोकप्रिय करण्याचं खरं श्रेय भीमसेन जोशी यांचं आहे. आवाजाचा पोत, स्वरलगाव, स्वच्छ दाणेदार ताना हे तर त्यांच्या गायकीचं बलस्थान आहेच; पण त्याचबरोबर त्यांनी विविध घराण्यांच्या गायकीचा अभ्यास करून त्यातलं जे शोभेल तेच आपल्या गायकीत आणलं. त्यातून त्यांनी किराणा गायकी समृद्ध केली.
मंद्रातील स्वरांचा गाज, तार सप्तकात कृत्रिम आवाजाचा साज आणि दीर्घ स्वरोच्चारातील आस यांचं सुंदर रसायन त्यांच्या गाण्यात आहे. आकारापेक्षा इकारात तारषड्जाचा टोकदारपणा, तीन सप्तकांत लीलया फिरणारा आवाज यामुळे किराणा घराणं सर्वसामान्यांमध्ये त्यांनी लोकप्रिय केलं. ते नेहमी एक कानमंत्र देत, ‘स्वतःचं गाणं गवयाला प्रथम आवडलं पाहिजे, तरच ते इतरांना आवडेल आणि लोकांना आवडतं म्हणून मी अमुक गातो, यापेक्षा मला आवडतं ते श्रोत्यांना आवडेल असं गावं.’
डॉ. प्रभा अत्रे यांनी किराणा गायकीला नवा अर्थ दिला. बंदिशीतल्या शब्दरूपी पक्ष्यांना सुरांचे नाजूक पंख दिले. आलापीच्या घरट्यात विसावलेल्या रागांना सरगमचं आकाश खुलं करून दिलं. दुर्बोध बंदिशींवर काव्यप्रतिभेचं लेणं गोंदलं. सरळ सरळ सम गाठणाऱ्या बंदिशींना वेगवेगळी वळणं देऊन विविध तालांच्या चंदेरी चौकटी चढवल्या. तंत-अंगाच्या या गायकीला शब्दभावांच्या चौकटीतून विरह-शृंगाराची दालनं उघडी केली. परिणामतः आज मितीला किराणा हे अतिशय लोकप्रिय घराणं म्हणून मान्यता पावलं त्याचं श्रेय या सर्जकांनाच द्यायला हवं.
(सदराचे लेखक संगीताचे अभ्यासक आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)
Web Title: Dr Vikas Kashalkar Writes Actor Song Music Movie Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..