
पूर्वीच्या काळी लग्नसमारंभात शास्त्रीय गाणं आयोजित केलं जात असे. केसरबाई, मा. कृष्णराव, वझेबुवा, नथ्थनखाँ, फैय्याझ खाँ अशी थोरा-मोठ्यांची गाणी लग्न, मुंज, बारसं अशा वेळी आयोजित करणं हे प्रतिष्ठितपणाचं लक्षण समजलं जाई.
आग्रा : रंगीलं घराणं
- डॉ. विकास कशाळकर vikaskashalkar@gmail.com
पूर्वीच्या काळी लग्नसमारंभात शास्त्रीय गाणं आयोजित केलं जात असे. केसरबाई, मा. कृष्णराव, वझेबुवा, नथ्थनखाँ, फैय्याझ खाँ अशी थोरा-मोठ्यांची गाणी लग्न, मुंज, बारसं अशा वेळी आयोजित करणं हे प्रतिष्ठितपणाचं लक्षण समजलं जाई. मात्र, या अशा कार्यक्रमांत आग्रा घराण्याच्या गायकांना क्वचितच संधी मिळायची. याचं कारण, त्यांचे सुरांचे लगाव! हे लगाव इतके गहिरे आणि असरदार असत की, ते ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी यायचं. त्यामुळे काही लोक मंगलदायी आणि आनंददायी समारंभात या घराण्याच्या गायकांना गायला बोलावत नसत. एकंदरीत, हे गाणं इतर गाण्यापेक्षा असरदार होतं हे निश्चित.
आग्रा घराण्याचं गायन विविध पैलूंनी युक्त आहे. बेगडी सौंदर्यापेक्षा स्वरांच्या नैसर्गिक सौंदर्याला या घराण्यात अधिक महत्त्व आहे. धृपदाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली ही गायकी बंदिशींच्या बोलांचा भाव, तालाचं नैसर्गिक सौंदर्य, लयीच्या विविध नक्षी, गमक-मिंडींचे स्वरबंध आणि रागरूपदर्शन अशा विविध घटकांतून फुलत जाते.
गायक स्वर-शब्दांचे सुंदर झोके बनवतो आणि श्रोते त्या हिंदोळ्यावर झुलतात.
श्रोत्यांना देहभान हरपायला लावणारी ही गायकी त्यांना नोम्-तोम्च्या नौकेत बसवून स्वरसागराच्या तळाचं दर्शन घडवते. मंद्र सप्तकातला सुराचा साज रसिकांना मोहित करतो. मंद्रातली नोम्-तोम् ऐकून रागाच्या विशालतेची जाणीव करून देतानाच, सात स्वरांतल्या विस्तीर्णतेचं प्रगल्भ दर्शन ही गायकी घडवते. उस्ताद फैय्याज खाँ यांनी एकदा जवळजवळ पावणेदोन तास मारवा रागाची नोम्-तोम् करून दाखवली होती. ओडव अंगाच्या या रागात इतकी विविधता असू शकते हे पाहून गानरसिक विस्मयचकित झाले होते. नवतेचा स्पर्श असलेल्या या गायकीत स्वर-लयीचं नर्तन असतं. अनिबद्ध आणि निबद्ध गायनाचा संयोग व समयोग या गायकीत आहे. नोम्-तोम्ची लय जसजशी वाढत जाते तसतशी उत्सुकता वाढत जाते. खेंच, मिंडसुराची एकतानता यातून हे गायन स्वरमयतेतून नादमयतेकडे जातं. एकाच सुरावरील लययुक्त ठहराव श्रोत्यांना देहभान विसरायला लावतो.
धृपदगायक हाजी सुजान यांच्यापासून सुरू झालेली ही गायकी घग्गे खुदाबक्ष यांच्यामुळे ख्यालगायनात आली असं समजलं जातं. उस्ताद नथ्थन पीरबक्ष यांनी आपल्या विमुक्त विस्तारपद्धतीला हळूहळू सुनियोजित आकृतिबंध दिला. विशुद्ध रागविचार, मांडणीतील सहजता, आलाप, तानांची योग्य मांडणी, चुस्त बंदिश व उपज अंगाचा विस्तार या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ---ग्वाल्हेर--- गायकीला लोकमान्यता मिळाली. त्या वेळी आग्र्याला धृपदगायकी गाणारे घग्गे खुदाबक्ष हे गायक होते, त्यांच्या घोगऱ्या आवाजामुळे श्रोत्यांना त्यांचं गाणं आवडत नसे. ते नथ्थन पीरबक्ष यांच्याकडे गाण्याची तालीम घ्यायला आले. त्यांनी ही गायकी आत्मसात केली. त्यावर कठोर मेहनत घेऊन गाण्यात नावीन्य व आकर्षकता आणली.
मनुष्य सौंदर्यवान नसला तरी चालतो (कारण, ते त्याच्या हातात नाही); पण तो गुणवान असायला हवा, हाच विचार घग्गे खुदाबक्ष यांच्या गायकीत होता. आवाज चांगला नसला तरी रागमांडणीत सौंदर्य, विविधता, कल्पकता, सूचकता आणि आकर्षकता असली तर ते गाणं श्रोत्यांना भावतं. त्यांच्या ढाल्या सुरातल्या (खर्जस्वरात) गायनानं आनंदलहरींचे तरंग उमटायचे, तर भारदस्त आवाजातून मेघगर्जना जाणवायची, मुखड्याच्या तिहाईतून कल्पकतेचा अनुभव मिळायचा आणि लयात्मक बोलबांटमधून अश्र्वपदपथदर्शन व्हायचं.
घग्गे खुदाबक्ष यांच्याकडून ही गायकी त्यांचे पुत्र गुलाम अब्बास आणि त्यांचे नातू फैय्याज खाँ यांच्याकडे आली. प्रत्येकानं त्यात विचारांची भर घालून ही गायकी समृद्ध केली. यात आग्रा घराण्याचं नाव लोकप्रिय करण्याचं श्रेय उस्ताद फैय्याज खाँ यांना द्यायला हवं. ते आपल्या गायकीला ‘रंगीलं घराणं’ असं म्हणायचे. त्यांच्या गाण्यातला लडिवाळपणा अतिशय हवाहवासा वाटायचा. ठुमरी, धमार, होरी, दादरा, कजरी, टप्पा या सर्व प्रकारांवर प्रभुत्व असलेले फैय्याज खाँ हे स्वरांवर प्रेम करणारे गायक होते, म्हणून त्यांनी ‘प्रेमपिया’ या नावानं सुंदर सुंदर बंदिशी रचल्या. सदारंग यांनी रचलेल्या बंदिशी कदाचित त्यांच्या गायकीला योग्य नसाव्यात म्हणून आग्रा घराण्यातील प्रत्येक गायकानं बंदिशी रचल्या आहेत.
प्राणपिया, सजनपिया, रसपिया, गुणिदास, रसदास, सुजनदास अशा नावांनी रचलेल्या बंदिशींमध्ये रागांचं विशुद्ध रूप आढळतं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी ‘प्राणपिया’ म्हणजे उस्ताद विलायत हुसेन यांच्याकडे ‘सीनाबसीना’ तालीम घेतली. या गुरू-शिष्याच्या प्रेमातून अनेक सुंदर बंदिशींचा जन्म तर झालाच; पण जगन्नाथबुवांनी आग्रा गायकीला लावण्याचा साज चढवला. त्याला मोहकता देऊन ती गायकी आपल्या शिष्यांना शिकवली. ती आधुनिक काळात लोकप्रिय करण्याचे श्रेय जितेंद्र अभिषेकी यांना द्यायला हवं. काही लोक ‘ही पुरुषी गायकी आहे, ती स्त्रियांच्या आवाजात शोभून दिसत नाही,’ असा आक्षेप या गायकीवर घेतात; परंतु अनेक गायिका आग्रा घराण्याची गायकी उत्तम रीतीनं सादर करतात, त्यावरून वरील विधान चुकीचं आहे असं वाटतं.
(सदराचे लेखक संगीताचे अभ्यासक आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)