गुंतवणुकीचा 'सामना' (डॉ. वीरेंद्र ताटके)

डॉ. वीरेंद्र ताटके
Sunday, 16 June 2019

सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर.

सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर.

क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय झालं आहे. आत्तापर्यंतचे सामने बघितले, तर लक्षात येतं, की जो संघ योग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी यांचा सुरेख मेळ घालतो, तो सामना जिंकत आहे. थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर क्रिकेट सामने आणि गुंतवणूक यांच्यामध्येसुद्धा बरचसं साम्य असल्याचं लक्षात येतं. या क्रिकेटच्या सामन्यांमधून गुंतवणुकीचे अगदी मूलभूत नियमसुद्धा शिकता येतात. एकदा हे नियम जिंकले, की "परताव्याची ट्रॉफी' आपल्या हातात येणारच. क्रिकेटचे नियम गुंतवणुकीला कसे लागू होऊ शकतात ते पाहूयात.

व्यूहरचनांत फरक ठेवा
ज्याप्रमाणं क्रिकेट खेळाडू कसोटी सामना आणि एकदिवसीय सामना यांसाठी वेगवेगळ्या व्यूहरचना अवलंबतो, त्याप्रमाणं गुंतवणकदारानं दीघकालीन गुंतवणूक आणि अल्पकालीन गुंतवणूक यासाठी वेगवेगळं नियोजन केलं पाहिजे. एका प्रकारची व्यूहरचना दुसरीकडं चालणार नाही. यातच गफलत झाली, तर त्याचा परिणाम गुंतवणूकरूपी कारकिर्दीवर होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकारात "खेळायचं' आहे हे ठरवून घ्या आणि त्यानुसार व्यूहरचना आखा. एका प्रकारची व्यूहरचना दुसरीकडं चालणार नाही.

समतोल साधा
ज्याप्रमाणं प्रत्येक संघात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांचा योग्य समतोल असतो, त्याचप्रमाणं गुंतवणूकदाररूपी कर्णधारानं त्याचा गुंतवणूकरूपी संघ निवडताना वेगवेगळ्या पर्यायांचा समतोल साधला पाहिजे. यालाच गुंतवणुकीच्या तांत्रिक भाषेत "ऍसेट अलोकेशन' म्हणतात. ते जर नीट झालं, तरच गुंतवणूकरूपी सामना जिंकण्याची संधी वाढते. संघात फक्त गोलंदाजांची किंवा फलंदाजांची संख्या जास्त असेल, किंवा त्यांचाच प्रभाव असेल, तर ते योग्य होणार नाही, तसं आपल्या पोर्टफोलिओच्या संघातसुद्धा फक्त शेअरची किंवा सोन्याची गुंतवणूक जास्त असणं योग्य होणार नाही. संघातल्या खेळाडूंप्रमाणंच आपल्या गुंतवणुकीमध्येसुद्धा शेअर्स, म्युच्युअल फंड, सोनं या सगळ्यांचा योग्य समन्वय आणि समतोल हवा.

स्वसंरक्षण महत्त्वाचं
ज्याप्रमाणं फलंदाज फलंदाजीला येण्यापूर्वी हेल्मेट, पॅड इत्यादी स्वसंरक्षणाच्या गोष्टी वापरतो, त्याचप्रमाणं प्रत्येक गुंतवणूकदारानं विमा, मेडिक्‍लेम यांचं संरक्षण सर्वप्रथम घेतलं पाहिजे. अशी सुरक्षितता न घेता थेट गुंतवणकरूपी सामना खेळायला सुरवात करणं जोखीमयुक्त असतं हे त्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. क्रिकेटमध्ये हेल्मेट जसं आवश्‍यकच, तसा गुंतवणूकदाराला मेडिक्‍लेमही हवा अशा पद्धतीनं विचार केला पाहिजे.

सुरवातीची सुरक्षितता
ज्याप्रमाणं फलंदाजीला सुरवात केल्यानंतर पहिल्या काही षटकांमध्ये धावांचा वेग किती आहे यापेक्षा विकेट पडणार नाही याची काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणं गुंतवणूक सुरू करताना प्रथम सुरक्षित पर्यायांची निवड करावी. या कालावधीत आपल्याला परतावा किती मिळत आहे, याचा फारसा विचार करू नये. जोखीमयुक्त गुंतवणुकीनंच आपली फलंदाजी सुरू केल्यास थोड्याशा चुकीनंदेखील आपली विकेट पडू शकते, हे लक्षात ठेवावं. तरुणांनी गुंतवणूक सुरू करताना थेट शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करण्याच्या ऐवजी समजा म्युच्युअल फंडांमधल्या गुंतवणुकीनं सुरवात केली आणि हळूहळू "रन्स' वाढवत नेल्या, तर त्यामुळं आत्मविश्‍वास वाढेल आणि मोठी खेळी खेळता येईल.

संधी पाहून जोखीम
मैदानात जम बसल्यानंतर फलंदाज थोडी जोखीम घेऊन खराब चेंडूवर आक्रमक फटके मारतो, त्याचप्रमाणं गुंतवणूक सुरळीत सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदाररूपी फलंदाजानं योग्य संधी पाहून जोखीम घेतली पाहिजे. अजिबात जोखीम न घेणारा फलंदाज फार मोठी धावसंख्या उभारू शकत नाही, अगदी तसंच गुंतवणूकदारानं अजिबात जोखीम घेतली नाही, तर आकर्षक परतावा मिळणं अवघड होतं. "कॅलक्‍युलेटेड रिस्क' अनेकदा उपयोगी पडत असते. उदाहरणार्थ, काही कारणामुळं चांगल्या कंपन्यांच्या शेअरचे भाव अचानक पडले असले, तर ही कदाचित चांगली संधी असू शकते. योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन असे शेअर दीर्घकालीन उद्दिष्टं ठेवून विकत घेतले, तर भविष्यात ते वाढल्यावर परतावा चांगला मिळू शकतो

विशिष्ट उद्दिष्ट ठेवणं महत्त्वाचं
फलंदाजी करणारा प्रत्येक संघ धावांचं ठराविक उद्दिष्ट ठेवून फलंदाजी करत असतो आणि त्यानुसारच संघातले फलंदाज आवश्‍यक तेवढीच जोखीम घेऊन स्वतःची जबाबदारी पार पाडतात. त्याचप्रमाणं गुंतवणूक सुरू करतानाच आपलं अंतिम उद्दिष्ट ठरवलं, तर वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण किती जोखीम घायची हे ठरवता येतं. विशिष्ट उद्दिष्ट ठेवणं हे गुंतवणुकीत नेहमीच महत्त्वाचं असतं. हे उद्दिष्ट ठरवताना वय, जबाबदाऱ्या, उत्पन्न अशा अनेक गोष्टींचा विचार मात्र करायला हवा. त्यासाठी चांगल्या तज्ज्ञाचा सल्ला नेहमीच उपयोगी पडू शकतो. इथंही क्रिकेटच्या प्रशिक्षकाचं उदाहरण लक्षात घ्यायला हरकत नाही.

शॉर्टकट्‌स नकोत
चोरट्या धावा काढणं फलंदाजाला महागात पडू शकतं हे आपण अनेकदा क्रिकेट सामन्यांत पाहतो. गुंतवणुकीच्या सामन्यातदेखील असा शॉर्टकट आपल्याला महागात पडू शकतो आणि आपण धावबाद होऊ शकतो. आपल्याला अनेकदा कल्पनेच्या पलीकडचा परतावा देणाऱ्या जाहिराती दिसतात, प्रलोभनं येतात. काही कंपन्या खूप व्याज देण्याचं आमिष दाखवतात, तर काही कंपन्या विनाअट पाहिजे तितकं कर्ज द्यायला तयार होतात. हे असे मोह टाळायलाच हवेत. एखादा चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्यावर दुष्परिणाम करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचाही थोडा अभ्यास करायला हरकत नाही.

विरोधी संघावर लक्ष
गुंतवणूकरूपी क्रिकेट सामन्यात आपला विरोधी संघ म्हणजे महागाईचा दर! आपल्या एकूण गुंतवणुकीवरचा सरासरी परतावा महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल, तरच आपण हा सामना जिंकू शकतो, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं महागाई कशामुळं, कधी वाढू शकते हे लक्षात घेऊन त्यानुसार व्यूहरचना ठेवायला हवी. परताव्याचा केवळ दर पाहून उपयोग होत नाही, तर तो परतावा महागाई दराला "धोबीपछाड' घालणारा असला पाहिजे.

नियमांची अंमलबजावणी
क्रिकेटच्या सामन्यात नियम न पाळणाऱ्या खेळाडूवर कारवाई होऊ शकते, त्याचप्रमाणं गुंतवणुकीतून होणाऱ्या फायद्यावर नियमांनुसार कर न भरणाऱ्या गुंतवणूकदारावर कारवाई होऊ शकते. त्यामुळं गुंतवणूक, परतावा, उत्पन्न या गोष्टी जितक्‍या महत्त्वाच्या तितकेच कर, विवरणपत्रं वगैरे नियमांच्या चौकटीही प्रत्येकानं पाळायलाच हव्यात. तुम्ही कितीही चांगले खेळाडू असलात, तरी एखादा नियम न पाळल्यामुळं होणारी शिक्षा संपूर्ण करिअरवर डाग बनू शकते, तसंच एखादा आर्थिक नियम न पाळल्याचा फटका गुंतवणूकदाराला बसू शकतो. त्यामुळं या बाबतीतही पर्टिक्‍युलर असलं पाहिजे.

प्रत्येक सामना वेगळा
सर्वांत महत्त्वाची लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे क्रिकेटचा प्रत्येक सामना हा वेगळा असतो, प्रत्येक दिवस वेगळा असतो. आधीच्या सामन्यातला पराजित संघ नंतरच्या सामन्यात विजेता होऊ शकतो आणि जो खेळाडू खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तो परिपक्व समजला जातो. गुंतवणुकीच्या सामन्यातदेखील प्रत्येक वेळी फायदाच होईल अशी अवास्तव अपेक्षा न ठेवणारा गुंतवणूकदार अधिक यशस्वी होतो. काही वेळा परिस्थितीच अशी असते, की आपण केलेल्या गुंतवणुकीवरचा परतावा निगेटिव्ह होतो. अशा वेळी निराश न होता, आलेल्या अनुभवातून शहाणं होत वेगळं धोरण राबवणं किंवा पुढचा निर्णय घेताना जास्त विचार करणं हे गुंतवणूकदारांनी करायलाच पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr virendra tatake write business investment article in saptarang