गुंतवणुकीचं "सोनं' (डॉ. वीरेंद्र ताटके)

डॉ. वीरेंद्र ताटके tatakevv@yahoo.com
रविवार, 8 एप्रिल 2018

गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायची असेल, तर प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गोल्ड फंड किंवा गोल्ड ईटीएफ यांच्यामार्फत गुंतवणूक करणं योग्य ठरतं. "पेपर गोल्ड' या नावानं ओळखली जाणारी ही गुंतवणूक नेमकी असते कशी, ती कशा प्रकारे करायची याबाबत माहिती.

गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायची असेल, तर प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गोल्ड फंड किंवा गोल्ड ईटीएफ यांच्यामार्फत गुंतवणूक करणं योग्य ठरतं. "पेपर गोल्ड' या नावानं ओळखली जाणारी ही गुंतवणूक नेमकी असते कशी, ती कशा प्रकारे करायची याबाबत माहिती.

भारतामध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळं; तसंच सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली गेल्यामुळं सर्वसामान्य भारतीयांसाठी सोन्याचं आकर्षण कायम राहिलं आहे. सोन्याचा साठा मर्यादित आहे आणि आपल्या गरजेनुसार त्याचा पुरवठा वाढवता येत नसल्यामुळं; तसंच दागिने करण्याशिवाय गुंतवणूक पर्याय आणि औद्योगिक क्षेत्रातल्या वाढता वापरामुळंसुद्धा सोन्याचं महत्त्व टिकून आहे.

थोडक्‍यात, सोन्याचं लाभ-जोखीम गुणोत्तर (कमी जोखीम आणि फायद्याची शक्‍यता अधिक) आकर्षक असल्यामुळं आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये दीर्घकाळासाठी करत राहणं योग्य ठरू शकतं. गेल्या काही वर्षांत सोन्यातल्या गुंतवणुकीनं निराशाजनक परतावा दिला असल्यानं गुंतवणूकदारांचं त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसत असलं, तरी आपल्या गुंतवणुकीतला काही हिस्सा सोन्यात शांतपणे आणि नियमितपणे करू इच्छिणारे अनेक गुंतवणूकदार आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्यापेक्षा इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात सोनं खरेदी करण्याचा पर्याय अधिक सोपा, सुटसुटीत आणि पारदर्शक आहे. अशी गुंतवणूक गोल्ड ईटीएफ (एक्‍सेंज ट्रेडेड फंड) आणि गोल्ड सेव्हिंग्ज फंडाद्वारे करता येते.
वरवर पाहता गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड सेव्हिंग्ज फंड हे दोन्ही पर्याय एकसारखे दिसत असले, तरी त्यामध्ये मूलभूत फरक आहे. ज्याप्रमाणं शेअर बाजारात एखादा गुंतवणूकदार शेअरची खरेदी-विक्री करतो, त्याप्रमाणं गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोन्याची खरेदी-विक्री करता येते. अर्थातच त्यासाठी डिमॅट खात्याची आवश्‍यकता असते. एकाच वेळी कमीत कमी एक ग्रॅम सोन्याची खरेदी-विक्री करणं आवश्‍यक असतं. आपण खरेदी केलेलं सोने आपल्या डिमॅट खात्यात पूर्णपणे सुरक्षित साठवलं जातं. याउलट गोल्ड सेव्हिंग्ज फंडांचं व्यवस्थापन म्युच्युअल फंड करत असतात आणि त्यांची गुंतवणूक प्रामुख्यानं गोल्ड ईटीएफमध्ये असते. गोल्ड फंडातल्या गुंतवणुकीसाठी डिमॅट खात्याची आवश्‍यक नसते. ज्या गुंतवणूकदाराला दरमहा ठराविक रक्कम सोन्यात गुंतवायची आहे, त्याला गोल्ड सेव्हिंग्ज फंडांत सेव्हिंग्ज सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी ) सुरू करता येते. याद्वारे, दर महिन्यामध्ये ठराविक तारखेला ठराविक रकमेची सोन्याची खरेदी होऊन युनिट्‌स आपल्या म्युच्युअल फंड खात्यात जमा होत राहतात. गोल्ड सेव्हिंग्ज फंडात एकरकमी गुंतवणूक करायची असेल, तर साधारणतः किमान पाच हजार रुपये आवश्‍यक असतात, तर एसआयपी दरमहा साधारणतः किमान पाचशे रुपयांपासून सुरू करता येते.

थोडक्‍यात, जो गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी वेळ देऊ शकतो आणि ज्याला सोन्यात "ट्रेडिंग' करायचं आहे, त्यानं गोल्ड ईटीएफची निवड करावी. मात्र, ज्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीनं सोन्यात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची आहे, त्यानं गोल्ड सेव्हिंग्ज फंडाची निवड करावी.

गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड सेव्हिंग्ज फंडातल्या एकूण गुंतवणुकीएवढ्या रकमेचं सोनं खरेदी करून ठेवणं संबंधित संस्थांवर बंधनकारक असतं, त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याच्या या फंडातल्या गुंतवणुकीविषयी निर्धास्त राहू शकतो. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यावेळी अशा फंडांत गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष सोनं न मिळता त्याच्या गुंतवणुकीचं स्टेटमेंट मिळतं. त्यामुळं या प्रकारच्या गुंतवणुकीला "पेपर गोल्ड' असंदेखील म्हणतात. आपल्याला ज्यावेळी प्रत्यक्ष सोन्याची किंवा पैशाची आवश्‍यकता असते, त्यावेळी फंडातल्या गुंतवणुकीची विक्री करून आपण बाजारभावाप्रमाणं रक्कम घेऊ शकतो किंवा त्या रकमेतून आपल्याला हवं तिथून सोनं खरेदी करू शकतो.

गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड सेव्हिंग्ज फंडात गुंतवणूक करण्याचं निश्‍चित झाल्यावर बाजारातल्या उपलब्ध अनेक फंडांपैकी कोणता फंड निवडावा, असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराला पडू शकतो. कारण सोन्याचा बाजारभाव एकच असेल, तर कोणत्याही फंडात गुंतवणूक केली, तर एकसारखाच परतावा मिळेल, असा समज होऊ शकतो. हा समज थोडाफार खरा असला, तरी ज्या फंडाचे व्यवस्थापन खर्च कमी आहेत, असा फंड इतर फंडांच्या तुलनेत सरस ठरतो.

हुशार गुंतवणूकदार आपली एकूण गुंतवणूक वेगवेगळ्या पर्यायांत विभागून ठेवतो. एखादी गुंतवणूक सद्यःस्थितीत चांगला परतावा देत नसेल, तरीही असा गुंतवणूकदार त्या गुंतवणुकीतली मूळ ताकद लक्षात घेऊन त्यातली गुंतवणूक सुरू ठेवतो. याच विचारानं आपल्या गुंतवणुकीत गोल्ड फंडाचा समावेश करणं चाणाक्षपणाचं ठरतं.

Web Title: dr virendra tatake write mutual funds article in saptarang