म्युच्युअल फंड म्हणजे काय? (डॉ. वीरेंद्र ताटके)

डॉ. वीरेंद्र ताटके tatakevv@yahoo.com
रविवार, 7 जानेवारी 2018

चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, अनेक क्‍लिष्ट गोष्टी कळत नाहीत, ही मूळ समस्या असते. म्युच्युअल फंडांपासून कमोडिटीसारख्या अनेक गोष्टींची प्राथमिक माहिती देणारं हे साप्ताहिक सदर.

चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, अनेक क्‍लिष्ट गोष्टी कळत नाहीत, ही मूळ समस्या असते. म्युच्युअल फंडांपासून कमोडिटीसारख्या अनेक गोष्टींची प्राथमिक माहिती देणारं हे साप्ताहिक सदर.

शेअर बाजारात आणि संबंधित पर्यायात गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड! ‘म्युच्युअल फंड’ या नावावरूनच कळू शकतं, की  गुंतवणुकीच्या समान उद्देशानं एकत्र आलेल्या लोकांनी केलेली ही गुंतवणूक असते. अशा गुंतवणूकदारांकडून रक्कम घेऊन ती योग्य त्या पर्यायात गुंतवण्याचा अधिकार फक्त मान्यताप्राप्त संस्थांना असतो आणि अशा संस्थांवर नियंत्रण ठेवणारी एक सर्वोच्च संस्थादेखील असते. आपल्या देशात अशा मान्यताप्राप्त  संस्था आहेत ज्यांना ‘ॲसेट मॅनेजमेंट कंपनी’ असं संबोधलं जातं आणि ‘सिक्‍युरिटीज अँड एक्‍सेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) ही संस्था या सर्व ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. याशिवाय असोसिएशन्स ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (अँफी) ही संस्थादेखील सेबीच्या नियंत्रणाखाली ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना मार्गदर्शन करत असते.

स्वतःचं बॅंक खातं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असलेला कोणताही सर्वसामान्य मनुष्य ‘नो युअर कस्टमर’ म्हणजे ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकतो. ज्यांच्याकडं डिमॅट खाते आहे, ते गुंतवणूकदार ऑनलाइन गुंतवणूक करू शकतात. इतर गुंतवणूकदार ऑफलाइन गुंतवणूक करू शकतात. दोन्ही पर्यायांत होणारे फायदे समान असतात. ही गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेऊ शकतो किंवा थेट म्युच्युअल कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन गुंतवणूक करू शकतो.छोट्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडांतली गुंतवणूक अगदी छोट्या रकमेपासून करता येते. एकरकमी पाच हजार रुपये भरून ही गुंतवणूक सुरू करता येते. तसंच दर महिना किमान पाचशे रुपये गुंतवून गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारा नियमितपणे गुंतणूक सुरू करू शकतो. यासाठी प्रत्येक वेळी बॅंकेत किंवा म्युच्युअल फंड कार्यालयात जावं लागत नाही, तर बॅंक खात्यातून आपण नमूद केलेली रक्कम परस्पर म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. प्रत्येक गुंतवणुकीचा एक स्वतंत्र खाते क्रमांक (फोलिओ नंबर) असतो आणि त्यातल्या गुंतवणुकीचा तपशील असलेलं स्टेटमेंट गुंतवणूकदाराला त्याच्या पत्त्यावर किंवा ईमेलनं मिळतं. आपण केलेल्या गुंतवणुकीची विक्री करणंदेखील अत्यंत सोपं आहे. आपली गुंतवणूक डिमॅट खात्यातून झाली असेल, तर त्याची विक्रीदेखील ऑनलाइन करता येते. आपली गुंतवणूक ऑफलाइन झाली असेल, तर संबंधित फोलिओ नंबरच्या स्टेटमेंटवर स्वाक्षरी करून ते म्युच्युअल फंड कार्यालय किंवा सल्लागार यांच्याकडे विक्रीसाठी जमा करावं लागतं. विक्री करून मिळालेली रक्कम आपल्याच बॅंक खात्यात कामकाजाच्या आठ दिवसांत जमा होते. आपलं स्टेटमेंट हरवलं, तरी नवीन स्टेटमेंट मिळतं आणि त्यावर आपला बॅंक खाते क्रमांक असल्यामुळं त्याचा कोणीही दुरुपयोग करू शकत नाही.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मुख्य फायदे
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वांत मोठा फायदा म्हणजे अगदी छोट्या रकमेद्वारे ते शेअर बाजार आणि संबंधित गुंतवणुकीत सहभाग घेऊ शकतात. कोणताही म्युच्युअल फंड हा त्याची गुंतवणूक एकाच कंपनीच्या शेअरमध्ये न करता अनेक शेअरमध्ये विभागून करतो, शिवाय शेअर बाजाराचा कल पाहून काही रक्कम सुरक्षित पर्यायांमध्येदेखील गुंतवली जाते. यामुळं गुंतवणुकीतली जोखीम तुलनेनं कमी होते. याशिवाय सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करून, ती जोखीम आणखी कमी करता येते. म्युच्युअल फंडाच्या काही योजना त्यांची संपूर्ण रक्कम सुरक्षित पर्यायांमध्येच गुंतवतात. कमी जोखीम घेऊ इच्छिणारे गुंतवणूकदार अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यासुद्धा काही योजना असतात. म्युच्युअल फंडांतल्या गुंतवणुकीसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क घेतलं जात नाही. तसंच एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या इक्विटी फंडांच्या योजनेतल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या फायद्यावर प्राप्तिकर आकारला जात नाही.

घ्यायची काळजी
गुंतवणूकदारांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे सर्वच म्युच्युअल फंडांतली गुंतवणूक ही कमीअधिक प्रमाणात जोखीमयुक्त असते . योग्य फंडाची निवड करून आणि दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करून ही जोखीम कमी करता येते. यासाठी आपल्याकडची जी रक्कम कमीत कमी पाच वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी आपण गुंतवू शकतो, अशीच रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवावी. तसंच आपल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनात म्युच्युअल फंडांतल्या ‘सिस्टिमॅटिक इन्हवेस्टमेंट प्लॅन’, ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’, ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन’ यांसारख्या सुविधांचा योग्य उपयोग केल्यास त्यातील अधिकाधिक फायदे मिळू शकतात. याशिवाय आवश्‍यक वाटल्यास तज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्यावा. असं केल्यानं म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी प्रत्येक गुंतवणूकदार म्हणू शकेल ‘म्युच्युअल फंड  सही है.’

Web Title: dr virendra tatake write mutual funds article in saptarang