कलांना, कलावंतांना प्रतिष्ठा मिळावी | Artists | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Famous
कलांना, कलावंतांना प्रतिष्ठा मिळावी

कलांना, कलावंतांना प्रतिष्ठा मिळावी

- डॉ. विश्वनाथ शिंदे saptrang@esakal.com

महाराष्ट्रास शाहिरी वाङमयांची समृद्ध व प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. शाहिरी कलेचे अनेक टप्पे आहेत. त्याचा पहिला टप्पा भेदिक ‘कलगी-तुरा’चा असून भेदिक कलगी-तुरा ही शाहिरी कला ही सहाशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. कलगी-तुरा इतकीच प्राचीनता गोंधळ या कलेची आहे. याशिवाय नंतरच्या काळात प्रामुख्याने गोंधळ, भारूड, वासुदेव, तमाशा असे अनेक कालाप्रकार निर्माण झाले. या सर्व लोककलांचा प्रकार आणि बाज वेगळा आहे. असे असले तरी सर्व कलांचा मुख्य उद्देश मनोरंजन करणे, धार्मिक समाराधन करणे आणि प्रबोधन करणे हा आहे.

शाहिरी कला आणि कलावंत एका दुष्टचक्रात अडकले आहेत. या कलेला कलावंतांनी नवीन वळण दिले पाहिजे, कलेचा कलाकारांनी अनेक अंगांनी विचार केला पाहिजे. शाहिरी परंपरा टिकली पाहिजे असे म्हणणाऱ्यांनी, समाजाने आणि शासनाने कला आणि कलाकारांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे.

कलगीतुरा परंपरेचा उल्लेख महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रातील लीळेत आला असून या कलेस डफगाणे असे संबोधले आहे. कलगीतुरा या कलाप्रकाराचे स्वरूप आध्यात्मिक होते, आणि त्यातून अध्यात्म आणि तत्त्वज्ञान विशद करून सांगितले जाई. शाहिरी कलेचे पोवाडा आणि लावणी हे दोन प्रमुख घटक आहेत, त्यांचा जन्म कलगी- तुरा व गोंधळ परंपरेतून झाला आहे. तमाशा हा देखील याच परंपरेचा भाग असून तमाशाचा उगम मात्र पेशवे काळात झालेला दिसतो.

पोवाड्याची परंपरा

पोवाडा जन्माला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. या काळातील तीन पोवाडे उपलब्ध आहेत. अगीनदास किंवा अज्ञानदास आणि तुळशीदास हे दोघे शाहीर या काळात पोवाडे गात. दोघेही गोंधळी समाजाचे होते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातील पोवाडे उपलब्ध नाहीत. पेशवेकालीन पोवाडे उपलब्ध आहेत, त्यांची संख्या दीडशे आहे. या पोवाड्यांचे य. न. केळकर तसेच शाळिग्राम व अकवर्थ यांनी संकलन केले असून त्यातील अनेक पोवाडे सातारा येथील गोंधळ्याकडे उपलब्ध झाले. लावणी व पोवाडा या एकाच छंदातील रचना आहेत. सुरुवातीच्या काळात भेदिक कलगीतुरा होता. त्यामधून लावणीचा विकास झाला. या लावण्यांचे प्रारंभिक स्वरूप व विषय आध्यात्मिक होते. पुढे त्यात लौकिक जीवनाचे वर्णन येत गेले, लावणी पेशवे काळात शृंगारिक झाली. पोवाडे प्रामुख्याने ऐतिहासिक विषयावर बेतलेले असत. युद्ध, तत्कालीन राज्यकर्त्यांचा पराक्रम, राजधानीचे वर्णन, दुष्काळ आदी विषय असत. या ऐतिहासिक पोवाड्यात आख्यायिकांचा आधार घेतला जाई, त्यात अद्‍भुतता, अतिशयोक्ती होती, रूढीपरंपरा, अंधविश्वास यावर भर दिला जाई. पेशवे काळातील पोवाडे याचप्रकारचे होते. शाहीर होनाजी, रामजोशी, अनंत फंदी, परशुराम, सगनभाऊ, प्रभाकर आदी शाहिरांनी अनेक पोवाडे रचले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक पोवाडे रचलेले आहेत.

महात्मा फुले आणि पोवाडा

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेल्या पोवाडा माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या पोवाड्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अधिक अचूकपणे आणि नेमकेपणाने मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी कुळवाडीभूषण संबोधले. ‘गोब्राह्मणप्रतिपालक,’ ‘क्षत्रियकुलवतंस’ अशी खोटी बिरूदे आधीच्या शाहिरांनी लावलेली होती, ती महात्मा फुले नाकारतात.

शिवाजी राजांना ते कुळवाड्यांचे भूषण म्हणतात, कुणब्यांचा राजा संबोधतात. ही महात्मा फुले यांची दृष्टी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. त्यांचा पोवाडा अनेक कारणांसाठी खूप महत्त्वाचा आणि मार्गदर्शक वाटतो. त्यांच्या पोवाड्यातून विचारसरणीचे प्रतिबिंब दिसते, बहुजन समाजाचा खरा इतिहास त्यातून प्रतिबिंबित होतो. तो इतिहास बळीराजापासून सुरू होतो. बाणासूर, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद यांची परंपरा महात्मा फुलेंनी सांगितली. खंडोबा, ज्योतिबा हे ऐतिहासिक वीर पुरुष होते असे फुले सांगतात आणि याच परंपरेतील छत्रपती शिवाजी महाराज होते असेही त्यांनी पोवाड्यात स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वडील आणि आजोळ (राजमाता जिजामाता) या दोन्हींकडून शौर्याचा वारसा लाभलेला असताना दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु कसे होतील? ‘मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा’ असा प्रश्न फुले उपस्थित करत. ‘दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते’, याचे त्यांनी स्पष्टपणे खंडण केले आहे. शाहिरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण केले होते, तेही महात्मा फुले टाळतात, घोरपडीची दंतकथा नाकारतात. महात्मा फुलेंची दृष्टी अतिशय व्यापक होती. त्यांनी पोवाड्यात अफजलखानाचा उल्लेख वाघ असा केला आणि त्या वाघाला ठार मारणारा राजा किती थोर असेल हे श्रोत्यांना पटवून दिले आहे.

महात्मा फुले यांनी अनेक दंतकथांना चपखलपणे उत्तर दिले आहे. त्यामुळे अनेक अर्थांनी त्यांचा पोवाडा मला महत्त्वाचा वाटतो. ही महात्मा फुले यांची विचारसरणी अनेक शाहिरांनी स्वीकारली नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक शाहिरांच्या पोवाड्यात दंतकथा आणि आख्यायिका यावर आधारलेला चुकीचा इतिहास आलेला आहे.

स्वातंत्र लढ्यात शाहिरांचे योगदान

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आणि गोवामुक्ती संग्रामातील शाहिरांचे योगदान मोलाचे आहे.या आंदोलनात अनेक शाहिरांनी समाजप्रबोधनाचे, समाज जागृतीचे काम केले. यामध्ये पांडुरंग खाडिलकर, अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, अमर शेख यांचे योगदान मोठे आहे. त्यानंतरच्या शाहिरांचे या संदर्भातील कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. आत्माराम पाटील, किसन हिंगे, कुंडलिक फरांदे, इंदुजी पवार, विठ्ठल उमप, पिराजीराव सरनाईक, बाबासाहेब देशमुख, शाहीर योगेश, ग. दि. माडगुळकर, वसंत बापट, शाहीर साबळे, नारायण सुर्वे, कृष्णराव साबळे अशी नावे आहेत. त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले, जनसामान्यामधील देशभक्तीची जाणीव आणि त्यांच्या अंगातील वीरत्वाची भावना जागी केली. समाजातील अनिष्ट रूढी, अधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे काम शाहिरांनी केले.

पारंपरिक तमाशाच्या अनुकरणातून या आधीच्या काळात महात्मा फुले यांच्या अनुयायांनी सत्यशोधक जलसे सुरू केले. कृष्णराव भालेकरांनी १८७२मध्ये पुण्यात मुठा नदीकाठी रोकडोबा मंदिरासमोर अज्ञानराव भोळे देशमुख, सत्यनारायण पुराणिक हे वग केले. उत्तर काळात उदयाला आलेल्या सत्यशोधक जलशांचे उगमस्थान भालेकरांच्या या वगात आहे. भीमराव महामुनी, रामचंद्र घाडगे, लाल डगलेवाले, आनंदस्वामी असे शेकडो जलसेवाले महात्मा फुले यांचा विचार आणि कार्य या माध्यमातून सांगत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या पाईकांनी आपल्या समाज बांधवांना डॉ. आंबेकरांचा विचार समजून सांगण्यासाठी संगीत जलसे काढले. ‘‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’’ असे गाणारे वामनदादा कर्डक, भीमराव कर्डक, भाऊराव पाटोळे असे अनेक जलसाकार होते. राष्ट्रजागृतीसाठी निघालेले राष्ट्रसेवादलाचे तमाशे आले, त्यात पु. ल. देशपांडे, निळू फुले, दादा कोंडके, वसंत बापट, स्मिता पाटील यांचा सहभाग होता. राजकीय जागृतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेली कलापथके, पक्षीय प्रचार करणारी कलापथके ही सारी शाहिरी कलेची नवी रूपे होती. त्यांचे कार्य त्या काळाच्या चौकटीत अत्यंत मोलाचे होते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात शाहिरी कलेचे विषय बदलले. विषयात विविधता आली. सामाजिक विषयांवर पोवाडे रचायला सुरूवात झाली. यामध्ये अंधश्रद्धा, हुंडाबळी, अस्पृश्यता निवारण बेटी बचाव, बेटी पढाव यावर रचना केल्या गेल्या. पुढील काळात भ्रष्टाचार, वनीकरण, शासकीय योजनांवर पोवाडे रचले गेले. शाहीरी रचनेतील सहजता, उत्स्फूर्तता क्षीण झाली. शाहीर परिस्थितीपुढे हतबल झाला, कोरोनाने पुरता नागवला गेला आहे.

कलेला प्रतिष्ठा आवश्यक

थोर परंपरा असलेली शाहिरी कला कुणी आणि का टिकवून ठेवण्याची? प्रश्न अवघड आहे. आपल्या सर्व कला जातींशी जोडलेल्या आहेत, विशिष्ट जातींच्या कला श्रेष्ठ आणि बाकीच्या हीन अशी समाजाची दृष्टी आहे. त्यामुळे लोककलावंतांना हीन लेखले गेले, प्रसंगापुरता त्यांचा गौरव केला जातो, वेळ गेली की तो अस्पृश्य असतो. कला आणि ती सादर करणाऱ्या कलावंतांना जोपर्यंत अप्रतिष्ठित मानले जाईल तो पावेतो कला आणि कलावंत यांना चांगले दिवस येणार नाहीत. तमाशात रात्री राजा असणारा माणूस सकाळी भिकारी असतो. ही वस्तुस्थिती आहे. राज्यात सध्या साधारणपणे अडीशचेच्या आसपास शाहीर आहेत. ते त्यांच्या पद्धतीने हा कलेची सेवा करत आहेत. काही जणांना कला सादर करण्यासाठी आवश्यक असलेली साधने घेण्यासाठी शासकीय अनुदान मिळते. पूर्वीच्या काळी राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्हीही होते. आता त्याची वाणवा आहे. अनेक शाहिरांची व्यवसायावर निष्ठा आहे. परंतु त्यांना पोटासाठी काहीतरी करणे भाग पडते. म्हणून ते ही कला जपत आहेत पण त्यांना जोपर्यंत सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा दिली जात नाही तोपर्यंत कलेला उर्जित अवस्था प्राप्त होणे शक्य नाही. या कलेला नवे रूप, वळण द्यावे लागेल. यासाठी योग्य उद्देशाने काम करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर ही कला भविष्यकाळात पडद्याआड जाण्यास उशीर लागणार नाही.

(लेखक ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘महात्मा फुले अध्यासन केंद्रा’चे प्रमुख आहेत.)

(शब्दांकन : आशिष तागडे)

loading image
go to top