सर आप ही झुकता है... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jack gibson and shrinivas hari dixit

एखादा लेख वाचकांच्या मनाला का भिडावा हे, दोन ठरावीक व्यक्तींनीच एकमेकांच्या प्रेमात का पडावं, इतकं गूढ आहे! खरं तर, कोणताही लेखक प्रत्येक लेखात आपला पूर्ण जीव ओततो.

सर आप ही झुकता है...

एखादा लेख वाचकांच्या मनाला का भिडावा हे, दोन ठरावीक व्यक्तींनीच एकमेकांच्या प्रेमात का पडावं, इतकं गूढ आहे! खरं तर, कोणताही लेखक प्रत्येक लेखात आपला पूर्ण जीव ओततो. असं असताना एखाद्या लेखाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि दुसऱ्याला का मिळत नाही हा गोंधळात टाकणारा विषय आहे.

‘अखेरचा इंग्रज’ हा लेख लिहिला तेव्हा त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची मला कल्पना नव्हती. असो. पण सगळ्या प्रतिक्रियांमधून दोन गोष्टी समोर आल्या : एक तर त्या लेखामुळे जॅक यांच्याविषयीची उत्सुकता जितकी चाळवली गेली तितकी ती शमली नाही आणि म्हणून मी या लेखाचा उत्तरार्ध लिहावा, अशी सूचना अनेकांनी केली, म्हणून हा लेखनप्रपंच.

हा ‘अखेरचा इंग्रज’ या लेखाचा उत्तरार्ध आहेच; पण त्याहून अधिकही काही या लेखात आहे. या लेखातील मुख्य पात्रे आहेत जॅक गिब्सन आणि श्रीनिवास हरी दीक्षित हे दोन थोर शिक्षक, ज्यांनी मला घडवलं आणि माझ्यावर अपार प्रेम केलं.

मेयो कॉलेज, वार्षिक क्रीडादिवस. खेळ पाहण्यासाठी आलेले आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी पॅव्हिलियन भरून गेलं होतं. शंभर आणि दोनशे मीटर धावणं, तसंच भालाफेक या स्पर्धांमध्ये मी पहिला आलो होतो. आता मला चारशे मीटरची स्पर्धा जिंकायची होती; कारण, तिन्ही स्पर्धा जिंकणं ही मोठी कामगिरी मानली जात असे. ‘वॉर्म अप्’ करण्यासाठी मी जॅकेट काढत होतो तेवढ्यात माझ्या पाठीवर कुणी तरी थाप दिली. मागं वळून पाहतो तर, जॅक.

‘यशवंत, आज तू ‘फॉर्म’मध्ये दिसतोयस. चारशे मीटर जिंकशील असं वाटतं तुला?’’

‘हो, सर,’ मी म्हणालो.

‘ठीक आहे,’ असं म्हणून ते वळले, पुन्हा थांबले आणि स्वतःशीच पुटपुटले : ‘सगळ्या स्पर्धा जिंकायची गरज आहे का?’

‘काय, सर?’ मी विचारलं.

‘काही नाही, तुला नाही कळायचं!’

‘काय नाही कळायचं, सर?'

‘बाळा, सगळ्या स्पर्धा आपणच जिंकल्या पाहिजेत हे अनिवार्य आहे का? विजयाचे खरे मानकरी नुसती पदकं गोळा करत सुटत नाहीत. त्यांचा आपल्या क्षमतेवर विश्वास असतो. आपण विजयाचे खरे मानकरी आहोत याची अंतर्मनात जाणीव असते म्हणून ते जाणूनबुजून दुसऱ्या स्पर्धकांना संधी देतात. त्यातच त्यांचा खरा विजय असतो. पण जाऊ दे...’

शाळेच्या रेकॉर्डनुसार ती स्पर्धा मी हरलो. शेवटच्या टप्प्यावर मुद्दाम वेग कमी केला की इतरांपेक्षा जास्त वेगानं धावण्याइतकी शक्ती माझ्यात नव्हती हे मला आजपर्यंत कळलेलं नाही; पण एवढं निश्चित की, स्पर्धा हरण्यात मला आनंद झाला होता. अजूनही तो टिकून आहे.

जॅक माझे हीरो होते, तर श्रीनिवास हरी दीक्षित हे आयकॉन. मी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात असताना दीक्षितगुरुजी आम्हाला तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान शिकवायचे. कित्येक वर्षापूर्वी जॅक यांनी मैदानावर जो संदेश दिला होता तोच दीक्षितगुरुजींनी आपल्या पद्धतीनं मी ‘नाबार्ड’चा अध्यक्ष झाल्यावर शिकवला. आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो...आई-वडिलांइतकीच; किंबहुना जास्तच; माया त्यांनी माझ्यावर केली. चहा घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या...

‘देशपातळीवरच्या एका मोठ्या संस्थेचा अध्यक्ष झाल्यावर कसं वाटतंय?’ त्यांनी विचारलं.

‘छान, सर,’ मी उद्गारलो.

‘कशा अर्थानं?’

‘म्हणजे, मला जे करायचं आहे ते करायची मला आता मोकळीक मिळेल. कुणाची कटकट राहणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासाची ध्येयधोरणं मला आखता येतील. माझ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मी काही पावलं उचलू शकेन. आणि मी...’ पुढं बोलता बोलता मी थांबलो. कारण दीक्षितगुरुजी माझं बोलणं ऐकायचं सोडून खिडकीकडे पाहत होते. स्वतःच्याच विचारात मग्न होते. काही वेळानं त्यांनी एक उसासा टाकला आणि माझ्याकडे वळून ते म्हणाले :

‘तुला आठवतंय यशवंत, एकदा तू सॉक्रेटिसच्या संदर्भात एक शंका घेऊन माझ्याकडे आला होतास...‘अपरीक्षित जीवन जगण्याजोगं नसतं’ या विधानाचा अर्थ तुला तेव्हा समजून घ्यायचा होता. ‘ते कळण्याइतकी समज तुला अजून आलेली नाही,’ असं मी तेव्हा म्हणालो होतो. आता ती वेळ आली आहे. हे बघ, ‘परीक्षित जीवन’ कसं असतं याविषयी विद्वानांत एकमत झालेलं नाही; पण एक गोष्ट खरी: ‘आपण का जगतो?’ हे माणसाला जोवर कळत नाही तोवर ते ‘अपरीक्षित जीवन’ होय.

आजूबाजूला पाहिलंस तर तुला दिसेल की, पुष्कळसे लोक अन्न-वस्त्र-निवारा अशा गोष्टींतच गुंतलेले असतात, मश्गुल असतात. त्याच्यापलीकडे काही आयुष्य असतं, असा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. आपण का जगतो, कशासाठी जगतो, आपलं ध्येय काय आणि आपलं वागणं काय याची उत्तरं शोधण्यासाठी ते कधीच विचार करत नाहीत. आत्मपरीक्षण केलं तर त्यांना समजेल की, वरवरच्या भपक्याच्या आत त्यांचे अहम् दडलेले आहेत. लांब कशाला, आता तुझंच बघ ना...तुझ्या नव्या जबाबदारीचं वर्णन करताना तू किती ‘मी, मी’ करत होतास. तू ‘नाबार्डचा प्रमुख’ आहेस यशवंत, तू ‘नाबार्ड’ नव्हेस! तुझ्या कर्तबगारीवर हे पद तुला मिळालंय यात शंका नाही; पण जर का कायम टिकणारं काही काम करायचं असेल तर तू तुझ्यातला ‘मी’ पुसून टाक. सगळ्यांना सोबत घे. आपापल्या कुवतीनुसार योगदान देण्यासाठी प्रत्येकाला प्रेरित कर, संधी दे. लक्षात ठेव की, सामूहिक प्रयत्नांना पाठबळ देण्यातच खरं नेतृत्व सामावलेलं असतं. तुझ्यासारख्या व्यक्तींनी सतत दक्ष राहिलं पाहिजे. कौतुकाला किंवा खुशामतीला आपण बळी पडतो आहोत किंवा केलेल्या कामाचं श्रेय आपल्याकडेच घेतो आहोत असं जेव्हा वाटेल तेव्हा थांबायला हवं...’’ दीक्षित गुरुजींचं वाक्य जॅक यांनीच पूर्ण केलं, ‘‘म्हणून आधीच तुला बजावलं होतं की, प्रत्येक शर्यत स्वतःच जिंकायची नसते, इतरांना जिंकू देण्यातही आपली जीत असते, अनुयायी नव्हे तर नेते घडवणं म्हणजे जीत...’

कसंय, काही लोकांचा प्रभाव तुमच्यावर इतका खोलवर पडलेला असतो की, तुम्ही जे काही मोलाचं कार्य करता त्यात त्यांचं प्रतिबिंब उमटतच जातं. जॅक आणि दीक्षितगुरुजी माझ्या आयुष्यात आले. माझे मार्गदशर्क झाले. नंतर त्यांच्याशी रोजचा संपर्क राहिला नाही. तरीदेखील ते माझे मार्गदर्शकच राहिले. अगदी आजही. जेव्हा कधी कठीण परिस्थिती उद्भवते तेव्हा मी विचार करतो की, जॅक किंवा दीक्षितगुरुजी असते तर काय म्हणाले असते? बहुतेक वेळेला मला त्यांच्याकडून उत्तर आपोआप मिळतं. प्रत्येक वेळी मला त्याचं अनुसरण करता येतं, असं नाही; पण मी प्रयत्न नक्की करतो.

अगदी महत्त्वाच्या प्रसंगी ते दोघं एकाच सुरात बोलतात. असाच एक प्रसंग. रिझर्व्ह बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर एक दुर्दैवी प्रसंग घडल्यानंतर मी नोकरी सोडण्याच्या विचारात होतो. घडलेली घटना महत्त्वाची नाही; महत्त्वाचं हे आहे की, माझी बाजू योग्य असताना - निदान माझ्या समजुतीप्रमाणे - मी नोकरी सोडायला निघालो होतो. तसं घडलं असतं तर पुढं मी ‘नाबार्ड’चा अध्यक्ष झालो नसतो. ‘नोकरी सोडून घरी जाणार,’ असं मी दीक्षितगुरुजींना कळवलं. त्यांनी अवघ्या एका ओळीचा संदेश मला पाठवला. तर्ककठोर आणि मितभाषी असणाऱ्या दीक्षितगुरुजींनी इतकंच लिहिलं : ‘यशवंत, तुझी बाजू योग्य असेल तर स्वतःला इतकंच विचार की, तू निवडत असलेला मार्ग ‘योद्ध्याचा मार्ग’ आहे का?’

मी थांबलो. पुढं सगळं काही ठीक झालं.

मेयो कॉलेजमध्ये बॉक्सिंगच्या रिंगणातही असंच घडलं होतं. इंटरहाऊस बॉक्सिंग स्पर्धेत एका विशिष्ट वजनगटातून खेळण्यासाठी आमच्या बाजूचं कुणीच नव्हतं. त्यामुळे माझ्या हाऊसला न खेळताच हार मानावी लागणार होती. माझी क्षमता ओळखून ‘वरच्या वजनगटातल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळशील का?’ असं मला हाऊस मास्टरनी विचारलं. माझा प्रतिस्पर्धी स्कूल बॉक्सिंगचा कप्तान असल्यामुळे मी नकार देण्याच्या बेतात होतो, तेवढ्यात हाऊस मास्टरनी ‘रजपूत हे मराठ्यांपेक्षा अधिक शूर असतात,’ असं म्हणून मला डिवचलं. मी पेटलो.

संध्याकाळी बॉक्सिंगच्या रिंगणात आपापल्या कोपऱ्यात उभं राहून आम्ही खेळण्यासाठी सज्ज झालो. पंचांनी घोषणा केली, ‘उजव्या बाजूला रेड जॅकेटमध्ये समीर भूयान आणि डाव्या बाजूला ब्लू जॅकेटातला यशवंत थोरात.’ हस्तांदोलन झालं. शिटी वाजली. पंच बाजूला सरले.

मी चांगला बॉक्सर होतो; पण समीरची आणि माझी बरोबरी होऊ शकत नव्हती. तो दमदार आणि वेगवान बॉक्सर होता. डावपेचात उत्कृष्ट. पहिल्या फेरीत आमचा सामना तसा बरोबरीचा होता. दुसऱ्या फेरीला त्याचा जोर वाढला आणि फेरी संपेस्तोवर मी बेदम मार खाल्ला. तिसऱ्या फेरीत वेग मंदावून त्यानं मला बेसावध केलं आणि एक जोराचा गुद्दा माझ्या जबड्यावर दिला. मी खाली कोसळलो. पंचांनी गणती सुरू केली. एक...दोन...तीन...चार...तसंच पडून राहावं असं मला वाटत होतं. तरी उठलो. इतक्यात स्वतः पंच असलेले जॅक उठले. त्यांनी मुष्टियुद्ध थांबवलं. रिंगणाच्या कडेला येऊन मला म्हणाले : ‘यशवंत, तुझ्या हाऊससाठी तू वजनगटाच्या बाहेर जाऊन खेळलास. अशा परिस्थितीत पराभवाची लाज बाळगायचं काहीच कारण नाही.’ मात्र, मराठ्यांचं नाव, माझा अहंकार की मूर्खपणा यातलं नेमकं काय माहीत नाही; पण ‘हो’ म्हणायचं असतानादेखील मी बोलून गेलो, ‘ही फेरी मी पूर्ण करीन, सर!’

‘ठीक आहे..’ ते म्हणाले. शेवटच्या फेरीत समीरनं मला धू धू धुतलं. मी पुनःपुन्हा कॅनव्हासवर पडलो-उठलो-पडलो- उठलो. खूप मार खाल्ला; पण हार-माघार नाही.

शेवटी, फेरी संपली. निकाल तर स्पष्टच होता. तरी पंचमंडळी आपापसात काहीतरी गंभीर चर्चा करत होती. मग जॅक रिंगणात आले. त्यांनी दोघांना जवळ बोलावलं. दोघांचेही हात आपल्या हातात घेतले. समीरचा हात वर करून म्हणाले : ‘दोघंही चांगलं खेळले. समीर जिंकला.’

टाळ्यांचा कडकडाट. तो शांत झाल्यावर ते म्हणाले : ‘या वर्षापासून एक खास बक्षीस द्यायचं पंचांनी ठरवलं आहे. हे बक्षीस विजेत्यासाठी नसून धाडसी आणि उमद्या पराभूतासाठी आहे.’

त्यांनी माझा हात वर केला.

आयुष्याच्या सामन्यात कधी कधी हरणाराच जिंकून जातो!

जॅक आणि दीक्षित गुरुजी हे दोघंही उत्कृष्ट शिक्षक होते; पण तसे तर पुष्कळजण असतात. मात्र, ते शिक्षक आणि माणूस म्हणूनही थोर होते; याचं कारण, त्यांच्यातील जन्मजात आणि अस्सल मानवता. त्यांच्यातल्या वेगळेपणाची ती खूण होती. विद्यार्थ्यांच्या असंख्य पिढ्या त्यामुळेच त्यांच्याशी जोडल्या गेल्या.

ऐंशीच्या दशकात एका प्रतिष्ठेच्या प्रशिक्षणासाठी रिझर्व्ह बँकेनं मला इंग्लंडला पाठवलं. राष्ट्रसंघाच्या सर्व देशांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते. प्रशिक्षण व्यवस्थित चाललेलं असताना एका दुपारी अचानक फोन आला - ‘यशवंत, मी जॅक बोलतोय. इथं मी माझ्या बहिणीकडे राहतोय. उद्या सायंकाळी बरोबर सात वाजता जेवायला ये. पोहोचायला तास लागेल. त्या बेतानं नीघ.’

दुर्दैव म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी घोषणा झाली की, ब्रिटनच्या अर्थखात्याचे चान्सलर (आपल्याकडील अर्थमंत्र्यांच्या समकक्ष) आम्हाला उद्देशून सायंकाळी पाच वाजता भाषण करणार आहेत...जॅक यांच्या घरी मला वेळेत पोहोचायचं होतं...तेव्हा, चान्सलरनी निदान सहा वाजेपर्यंत भाषण आटोपावं, अशी मी प्रार्थना करू लागलो. पावणेसहा वाजत आले तरी चान्सलरसाहेबांचं अर्धसुद्धा भाषण संपलेलं नव्हतं. सहा वाजता मला घाम फुटला. सहा वाजून दहा मिनिटांनी मी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर लॉर्ड ली पेम्बर्टन यांना एक चिट्ठी पाठवली: ‘सर, माझ्या जुन्या प्राचार्यांनी मला आज घरी जेवायला बोलावलं आहे. वेळेवर पोहोचण्यासाठी मला ताबडतोब निघावं लागेल. मी जाणतो की, अशी विनंती करणं चुकीचं आहे, त्याबद्दल मी चान्सलरसाहेबांच्या रागाला एकवेळ तोंड देऊ शकेन; पण माझ्या प्राचार्यांच्या रागाला नव्हे!’

लॉर्ड पेम्बर्टन यांच्यापर्यंत ती चिट्ठी पोहोचलेली मी पाहत होतो. त्यांनी ती वाचली आणि थेट चान्सलरसाहेबांकडे दिली. मी हबकलो. भाषण करता करता त्यांनीसुद्धा ती वाचली आणि विचारलं : ‘कुणी विनंती केलीय ही?’

मी कसाबसा उठून म्हणालो : ‘सर, मी थोरात. मी केली आहे विनंती...मी भारतातून आलोय.’

क्षणभर त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं आणि हसून म्हणाले : ‘राजकारणी लोकांनी प्राचार्यांना कधी ताटकळत ठेवू नये. पळा. तुमच्या जागी मी असतो तरी हेच केलं असतं. प्राचार्यांना माझा नमस्कार सांगा.’

नंतर बऱ्याच वर्षांनी असाच एक प्रसंग पुन्हा घडला. रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात मी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत मीटिंगमध्ये होतो. आपल्याकडील आर्थिकदृष्ट्या वाईट स्थितीत असलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँकांना तांत्रिक आणि आर्थिक साह्य कसं देता येईल यावर चर्चा चाललेली होती. जागतिक बँकेकडून घालण्यात आलेल्या अटी आम्हाला मान्य होण्यासारख्या नव्हत्या आणि त्यांची मदत तर आम्हाला हवी होती. वातावरण तणावपूर्ण होतं. त्यातच, ‘गावाकडून कुणीतरी तुम्हाला भेटायला आलंय,’ असं मला सेक्रेटरीनं सांगितलं. मी पूर्ण व्यग्र होतो आणि माझं चित्तही थाऱ्यावर नव्हतं. ‘काही तरी कारण सांगून त्यांची बोळवण करा,’ असं मी सेक्रेटरीला सांगितलं.

‘ठीक आहे, सर,’ असं म्हणून सेक्रेटरी दरवाजापाशी गेली. इतक्यात आतून काहीतरी मला जाणवलं.

‘कोण आलंय, काही कल्पना?’ मी विचारलं.

‘सर, दीक्षित म्हणून कुणीतरी आहेत,’ सेक्रेटरी उत्तरली. अचानक काळ थबकला.

‘त्यांना ताबडतोब आत घेऊन ये,’ मी म्हटलं.

दीक्षितगुरुजी आत येताच मी उठलो, जवळ गेलो आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला.

गुरुजी बावरून गेले. माझ्या दालनात बसलेले परदेशी पाहुणे पाहून कसेबसे चार शब्द बोलले आणि ‘नंतर भेटू,’ असं म्हणून बाहेर पडले.

ते दृश्य पाहून जागतिक बँकेची मंडळी बुचकळ्यात पडली होती. त्याच्या टीमच्या प्रमुखांनी मला विचारलं : ‘कोण होते ते?’

गुरुजी कोण होते, त्यांना मी साष्टांग नमस्कार का केला, हे समजून सांगणं मला शक्य नव्हतं.

‘तुम्हाला उर्दू कळतं का?’ मी टीम-प्रमुखांना विचारलं.

ते म्हणाले : ‘मला कळत नाही; पण माझे सहकारी शकील यांना कळतं.’

डॉक्टर शकील यांना संबोधून मी म्हणालो : ‘या ओळी तुमच्या साहेबांना इंग्लिशमध्ये समजावून सांगा.’

जाहिद, तुझे आदाब-ए-मुहब्बत नही मालूम

सर आप ही झुकता है, झुकाया नही जाता।

हे ज्ञानवंता, (विद्वान असूनही) तुला भक्तीचा आणि प्रेमाचा रिवाज अजून समजलेला नाही...

(देवासमोर आणि देवमाणसासमोर) मान आपोआप झुकते...ती झुकवावी लागत नाही!

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

Web Title: Dr Yashwant Thorat Jack Gibson And Shrinivas Hari Dixit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top