
ईस्ट इंडिया कंपनीनं मूळ शासकाकडून भाड्यानं घेतलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या पट्टीवर ‘सेंट जॉर्ज फोर्ट’चं बांधकाम सुरू केलं तेव्हा, म्हणजे ता. एक मार्च १६४० रोजी, मद्रासच्या (चेन्नई) उपनगराचा जन्म झाला.
शहर, देवी, योद्धा आणि एक सामान्य माणूस
ईस्ट इंडिया कंपनीनं मूळ शासकाकडून भाड्यानं घेतलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या पट्टीवर ‘सेंट जॉर्ज फोर्ट’चं बांधकाम सुरू केलं तेव्हा, म्हणजे ता. एक मार्च १६४० रोजी, मद्रासच्या (चेन्नई) उपनगराचा जन्म झाला. किल्ल्याच्या आतला भाग ‘व्हाइट टाऊन’ म्हणून आणि सभोवतीच्या भारतीयांची वस्ती ‘ब्लॅक टाऊन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘ब्लॅक टाऊन’निवासी लोकांनी - हे मुख्यतः तेलगू आणि बहुसंख्य तमिळ होते - किल्ल्याच्या बांधकामात मदत केली. आत राहणाऱ्या गोऱ्या साहेबांच्या गरजा भागवल्या आणि किल्ल्याच्या आतल्या व्यापाऱ्यांना मालाचा पुरवठा केला. सध्याचे चेन्नईच्या आजूबाजूचे भाग - ट्रिप्लिकेन आणि तेनामपेट - हे तेव्हा छोटी खेडी होती. ब्रिटिशांनी ती नंतर ताब्यात घेतली. वाणिज्य-व्यवहाराच्या निमित्तानं श्रीमंत व्यापारी मंडळी तिथल्या अरुंद गल्ली-बोळांतून व्यवसायाच्या संधी निर्माण करू लागली तशी ‘ब्लॅक टाऊन’ची झपाट्यानं वाढ झाली. सन १९११ मध्ये त्याला ‘जॉर्ज टाऊन’ हे नाव दिलं गेलं आणि अगदी स्वातंत्र्यानंतरही ते दक्षिण भारतातील व्यावसायिक उलाढालींचं केंद्र राहिलं.
आम्ही या शहराच्या आयुष्याच्या ३४० व्या वर्षी, ईशान्येकडचा कार्यकाळ पूर्ण करून इथं आलो. जॉर्ज टाऊनमधील एका इमारतीत DICGC च्या स्थानिक कार्यालयाचा प्रभारी म्हणून मी रुजू झालो आणि उषाला राजाजी सलाईवरील RBI च्या ‘पॉश’ इमारतीत पोस्टिंग मिळालं. जॉर्ज टाऊनमधील ‘गरीब चुलतभाऊ’ असलेल्या इमारतीत डौल आणि बडेजाव नव्हता; पण ती कमतरता जुन्या काळातल्या आकर्षकपणानं भरून काढली होती; बंगालच्या उपसागराचं दृश्य दिसत नव्हतं; पण व्यापार आणि इतिहास या माझ्या आवडत्या विषयांची तिथं वानवा नव्हती.
आजच्या कामाच्या दडपणाच्या तुलनेत तेव्हा मोकळेपणा होता. ऑफिसचा भार होता; पण डोईजड व्हावा असा नव्हता. कर्मचारी कुशल होते, अधिकारी सहकार्य करणारे होते, जेवणाची सुटी घळघळीत होती आणि आजूबाजूचा परिसर पाहण्याची ओढ जबरदस्त होती.
माझ्यासारखा एक आधुनिक मराठा चेन्नईत दाखल होण्याच्या बरोबर ३०३ वर्षांपूर्वी, छत्रपती शिवाजीमहाराज हे रायगडहून ‘दक्षिणदिग्विजया’साठी ‘कर्नाटकमोहिमे’वर निघाले होते. त्यांचा पहिला मुक्काम हैदराबादला होता. तिथं कुतुबशहानं त्यांचं स्वागत केलं आणि आगामी ‘कर्नाटकमोहिमे’त लढण्यासाठी मराठा सैन्यासोबत आपली ‘शाही तुकडी’ पाठवण्याचा संमती-करार केला. रणनीतियुक्त आणि धोरणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून ही मोहीम खूप यशस्वी ठरली. फारसा रक्तपात न होता कोरोमंडल किनाऱ्यावरचा महत्त्वाचा प्रदेश ताब्यात आला. वर्षाच्या अखेरपर्यंत आदिलशाही कर्नाटकच्या किनारी प्रदेशातून चाल करत आघाडीवरच्या तुकडीनं जिंजीचा प्रसिद्ध किल्ला ताब्यात घेतला, तर मुख्य सैन्यानं मद्रासपासून अवघ्या ८० मैलांवर असलेल्या वेल्लोरपर्यंत मजल मारली. परिणामी, छत्रपती शिवाजीमहाराज हळूहळू पण निर्धारपूर्वक, ब्रिटिशांची पूर्व किनाऱ्यावरील पकड मजबूत करणाऱ्या सेंट जॉर्ज किल्ल्याच्या जवळ पोहोचले होते - इतके की, तिथून तो किल्ला त्यांच्या हल्ल्याच्या टप्प्यात आला होता.
दुपारच्या जेवणाच्या सुटीत मी ऑफिसमधून हळूच बाहेर पडायचो आणि जॉर्ज टाऊनच्या रस्त्यांवरून फिरत राहायचो- वेगानं वाढत असलेल्या आधुनिक इमारती आणि व्यापारीकेंद्रात हरवून गेलेल्या ऐतिहासिक खुणा शोधत. वाटतं तितकं माझं फिरणं सोपं नसायचं.
त्या काळात रिझर्व्ह बँक पुराणमतवादी संस्था होती आणि अधिकाऱ्यांनी अतिशय गांभीर्यानं आणि संयमानं वागणं अपेक्षित होतं. मात्र, मळलेल्या वाटेपासून भटकण्याची प्रवृत्ती जन्मजात असल्यामुळं शोधाची आणि साहसाची माझी ओढ मी आवरू शकत नव्हतो.
कॉर्पोरेशनचे प्रभारी अधिकारी रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी जॉर्ज टाऊनच्या गल्ली-बोळांत ‘गायब’ होतात हे कुणाला कळलं असतं तर अनेक विचित्र प्रश्नांना मला तोंड द्यावं लागलं असतं, याचीदेखील मला कल्पना होती; पण शोध घेण्याचं आणि अनोखा अनुभव घेण्याचं माझं वेड मोठं होतं. परिणामी, काळजी आणि सावधगिरी बाळगत, मी मोहाला बळी पडलो आणि जॉर्ज टाऊननं माझं खुलेपणानं स्वागत केलं.
कधी कधी ट्रकच्या लांबच लांब रांगा ओलांडत मला पुढं जावं लागायचं. लोड भरण्यासाठी नंबर लागून पुढच्या प्रवासाला निघेपर्यंत आलेली ड्रायव्हर-क्लीनरमंडळी तिथं गप्पागोष्टी करत बसलेली असायची. इतर वेळी मी वाड्यांचा आणि पडझड झालेल्या घरांचा शोध घेत फिरत असे. आज पडझड झालेली असली तरी कधीकाळी वैभवानं आणि अभिमानानं उभे असल्याची कहाणी त्या इमारती सांगू पाहायच्या; पण माझं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे फुलांची घाऊक बाजारपेठ. एक ऐसपैस जागा, जिथं फुलांचे डोंगर - मल्ली आणि कनकाम्बरम्, गुलाब आणि कमळ - लोकांना आपल्या रंगानं आणि सुगंधानं आकर्षित करत असत. जॉर्ज टाऊनमधून चालणं हा एक अविश्वसनीय अनुभव असायचा. लागून लागून असलेल्या बाजारपेठांमध्ये पैसे आणि माणसं, चिल्लर आणि व्यापार, सामर्थ्य आणि चैतन्य या बाबी एकमेकींत मिसळून गेलेल्या होत्या. हवेत जिवंतपणा होता. विक्रेते गिऱ्हाइकांना हाका मारत, खरेदी करणारे वाटाघाटी करत, शेवटी व्यवहार होत आणि पैसे या हातातून त्या हातात चपळाईनं जात. कृतिशील अर्थशास्त्राचा हा एक धडाच होता.
‘एखादी व्यक्ती आपल्या इच्छेनं मंदिरात जात नाही, तिला तसं ‘बोलावणं’ येतं,’ असं म्हणतात. त्या काळी ऐतिहासिक वास्तू- विशेषत: मंदिरं आणि त्यांची रचना - यांत मला खूप रस होता. एकदा ‘थंबू चेट्टी’ रस्त्यावरून चालत असताना बारीक नक्षीकाम असलेल्या गोपुरानं माझं लक्ष वेधलं गेलं. मी मंदिरात शिरलो तसा देवीच्या मोहात आणि एका न सुटलेल्या ऐतिहासिक कोड्यात अडकलो. हे मंदिर देवी कामाक्षीचं होतं आणि ते न सुटलेलं कोडं होतं छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधातलं. मंदिराचा इतिहास मिथकात हरवून गेला आहे. असं म्हटलं जातं की, या देवीचं मूळ वास्तव्य समुद्रकिनारी होतं; परंतु जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं किल्ला बांधायला सुरुवात केली आणि त्यांच्या गोदामांसाठी आणि व्यावसायिक केंद्रांसाठी आसपासच्या वसाहती घेतल्या, तेव्हा मंदिराच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला. कथा अशी आहे की, सन १६३९ मध्ये ब्रिटिश व्यापाऱ्यांनी स्थानिक विश्वकर्मा समुदायाला जॉर्ज टाऊनच्या आत योग्य त्या ठिकाणी मंदिर हलवण्याची विनंती केली. ती मान्य झाली आणि एका कुशल कारागिराच्या मार्गदर्शनात मंदिर सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आलं.
कोणत्या तरी किमयेमुळे मी त्या मंदिराकडे खेचला गेलो. माझं रोज दुपारी जेवणाच्या वेळी गायब होणं सुरूच राहिलं; पण रस्त्यावर फिरायला किंवा बाजारपेठेतली रहदारी न्याहाळण्यासाठी नव्हे तर ‘तिच्या’ सहवासासाठी. कधी तिच्या छायेत बसण्यासाठी, तर कधी तिथल्या कोपऱ्यात बसून शांतपणे ध्यान करण्यासाठी. वर्षभर असं सुरू राहिलं.
भक्तांच्या गर्दीत एक अनामिक म्हणून स्वतःच्या मर्जीनुसार काही करत असल्याचा मला आनंद होता- निदान माझी तरी तशी समजूत होती; पण ती चुकीची ठरली. एक माणूस कित्येक दिवस त्याच ठिकाणी शांत बसतो किंवा ध्यान करतो हे तिथल्या श्रद्धाळू पुजाऱ्यानं पाहिलं आणि ‘तुम्ही कोण?’ म्हणून विचारलं. पुढं आम्ही मित्र झालो. ‘श्रीविद्ये’त आम्हाला दोघांनाही रस असल्याचं काही काळानंतर लक्षात आलं. ते प्रकांडपंडित होते आणि त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. एका शनिवारी नेहमीच्या कोपऱ्यात दुसरं कुणीतरी बसलेलं दिसल्यामुळे मी दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसलो. आश्चर्य म्हणजे, तिथं समोरच्या भिंतीवर छत्रपती शिवाजीमहाराजांचं पूर्णाकृती चित्र होतं. त्याखाली लिहिलेलं होतं: ‘तीन ऑक्टोबर १६७७ रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांनी या मंदिराला भेट दिली आणि श्रीकालिकंबलची पूजा केली.’ ‘मद्रास मराठा असोसिएशन’नं हे चित्र लावलेलं दिसत असलं तरी, छत्रपती शिवाजीमहाराजांनी खरंच या मंदिराला भेट दिली होती की नाही याविषयी मला उत्सुकता लागून राहिली.
संध्याकाळी घरी आल्यावर मी शोध घेतला. मद्रास शहराला त्याच्या स्थापनेच्या अडतिसाव्या वर्षी एका फार मोठ्या आव्हानाला समोरं जावं लागलं होतं - ते आव्हान होतं छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संभाव्य आक्रमणाचं. सन १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या जे. टी. व्हीलर यांच्या ‘मद्रास इन द ओल्डन टाइम्स’ या पुस्तकात मद्रासवरील धोक्याचे तपशील दिलेले आढळतात. व्हीलर सांगतात त्यानुसार, ‘सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी सुरतेवर दुसऱ्यांदा छापा टाकला आणि ते शहर लुटलं; पण कौन्सिलचे सदस्य असलेल्या स्ट्रेनशॅम मास्टर याच्या प्रतिकारामुळे ब्रिटिशांची सुरक्षा ते भेदू शकले नाहीत. याचं बक्षीस म्हणून मास्टर याला १६७७ मध्ये मद्रासचं गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्याला जो पहिला प्रश्न हाताळावा लागला तो छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भेटीचा.’
छत्रपती शिवाजीमहाराजांना सुरतच्या दिवसांपासून ओळखत असल्यानं मास्टर यानं शहराची सुरक्षा बळकट करण्याचे आदेश दिले. शहराजवळ आल्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांनी इतरांबरोबर काही ब्रिटिश अभियंत्यांना पाठवण्याची मागणी केली. ती नम्रपणे नाकारली गेली. आपल्या नम्र पण ठाम नकारामुळं छत्रपती शिवाजीमहाराज दुखावले जातील आणि आपल्या शहराची सुरक्षा धोक्यात येईल, अशी कौन्सिलला भीती वाटत होती.
या भीतीपोटी कौन्सिलनं तयारी सुरू केली; परंतु तसं काही झालं नाही. छत्रपती शिवाजीमहाराज पुढं निघून गेले. व्हीलर यांच्या नोंदीनुसार, छत्रपती शिवाजीमहाराज बाहेरून पुढं गेले; पण प्रश्न हा आहे की, महाराज खरंच मद्रासच्या बाजूनं पुढं गेले असतील? इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराज मंदिरात गेल्याचं सांगण्यात येतं त्याच दिवशी, म्हणजे ता. तीन ऑक्टोबर १६७७ रोजी फोर्ट सेंट जॉर्जच्या प्रशासकांनी लंडनला पाठवलेल्या अहवालात म्हटलं की, छत्रपती शिवाजीमहाराजांनी केलेली अभियंत्यांची मागणी नाकारण्याचं कारण हे होतं की, त्यामुळे त्यांचं सामर्थ्य वाढलं असतं आणि स्थानिक शक्ती नाराज झाल्या असत्या. हे धाडसी पाऊल होतं. कारण, छत्रपती शिवाजीमहाराज हे नऊ मैलांच्या अंतरावर तळ ठोकून असल्यानं मद्रासमधील ब्रिटिशांना त्यांच्यापासून गंभीर धोका होता. संभाव्य हल्ला रोखण्यासाठी सेंट जॉर्ज किल्ला आणखी मजबूत करण्यात आला होता.
स्थानिक परंपरेचा भर यावर आहे की, छत्रपती शिवाजीमहाराज हे भवानीदेवीचे भक्त होते आणि देवीच्या या मंदिरात प्रार्थना करण्याची त्यांना इच्छा होणं हे पूर्णपणे त्यांच्या स्वभावाला धरूनच होतं. त्यामुळेच कुणाला थांग लागू न देता ते मद्रास शहरात आले आणि त्यांनी देवीची पूजा केली. यात तथ्य असेलही; पण इतिहास म्हणजे कल्पनाविलास नव्हे आणि इतिहासकारांना तथ्यात्मक पुराव्याच्या पुढं जाता येत नाही, म्हणून सबळ पुराव्याअभावी व्हीलर यांच्या निष्कर्षाशी आपण सहमत व्हायला हवं की ‘ छत्रपती शिवाजीमहाराज हे मद्रासच्या बाहेरून गेले; पण आत गेले नाहीत.’
मोहिमेदरम्यान आणि विशेषतः श्रीशैलम् इथं छत्रपती शिवाजीमहाराजांची जी मनःस्थिती होती तिची सविस्तर नोंद करण्यात आलेली आहे. राजवस्त्रांच्या आतले छत्रपती शिवाजीमहाराज हे मनानं वैराग्यपूर्ण होते. दिग्विजयाच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंश लष्करी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी जरी सज्ज होता, तर दुसरा अंश मिळणाऱ्या विजयाकडे अलिप्तपणे पाहत असावा.
निश्चित काही सांगता येत नसलं तरी, मी असं मानतो की, ता. तीन ऑक्टोबर १६७७ च्या रात्री योद्ध्याच्या वेशातला एक तपस्वी आणि राजाच्या वेशातला एक साधू जॉर्ज टाऊनच्या रस्त्यावरून देवीच्या मंदिरात आला असावा आणि काही काळासाठी तिच्याशी एकरूप झाला असावा.
राहिला प्रश्न माझा... माझ्याबाबतीत सांगायचं तर, देवी गर्दीपासून दूर, नीरव शांततेकडे जाणाऱ्या दीर्घ प्रवासाला मला घेऊन गेली. अस्तित्वाच्या मर्यादा भेदून केवळ एकांतातच पडू शकतील असे प्रश्न विचारायला तिनं मला भाग पाडलं आणि ते झाल्यावर, ‘ती’ कोण आहे आणि या सृष्टीच्या निर्मितीमागचा उद्देश काय, असं तिनं मला विचारलं. मी अडखळताच प्रगाढ शांततेत तिनं मला त्याचं उत्तर शोधायला सांगितलं. आणि त्यानंतर खूप वर्षांनी त्याचं साधं-सोपं उत्तर मला सापडलं :
सर्व रूपमयी देवी सर्वं देवी मयं जगत।
अतोहम् विश्वरूपां तां नमामि परमेश्वरीम्।।
(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)
(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)
raghunathkadakane@gmail.com