काँग्रेस भारतीय की ब्रिटीश ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Yashwant Thorat writes is Congress Indian or British politics

‘राजीव गांधी ट्रस्ट’शी संबंध असल्याने १४ ऑक्टोबरला मी राहुल गांधींना लिहिलं, ‘हरकत नसेल तर मला आणि ‘ट्रस्ट’च्या टीमला तुमच्यासोबत दोन दिवस चालायचं आहे.’ पाच मिनिटांनी उत्तर आलं, ‘नक्की.’

काँग्रेस भारतीय की ब्रिटीश ?

‘राजीव गांधी ट्रस्ट’शी संबंध असल्याने १४ ऑक्टोबरला मी राहुल गांधींना लिहिलं, ‘हरकत नसेल तर मला आणि ‘ट्रस्ट’च्या टीमला तुमच्यासोबत दोन दिवस चालायचं आहे.’ पाच मिनिटांनी उत्तर आलं, ‘नक्की.’ तो संदेश मी का पाठवला माहीत नाही. मला चालायला आवडतं एवढं खरं; पण राजकीय कारणासाठी नाही. कदाचित जी मूल्यं मी १९५० मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी - जेव्हा भारताच्या लोकांनी स्वतःला राज्यघटना अर्पण केली - स्वीकारली होती, त्यांच्या रक्षणासाठी असेल.

त्या तारखेच्या ९३ वर्षे आधी - १८५७ मध्ये - भारत इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता आणि १८८५ मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चा जन्म झाला. त्या ‘बंडा’तून ब्रिटिशांना मिळालेला धडा असा होता : ‘राज’ टिकवायचं असेल तर स्वातंत्र्यलढ्यात एकजुटीने भाग घेणाऱ्या हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडणं हाच एकमेव मार्ग आहे; आणि भारतीयांसाठीचा धडा होता : स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे; पण सर्वांनी एक होऊन संघटित लढा देणं हाच एकमेव उपाय आहे.

या पार्श्वभूमीवर ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चा जन्म झाला. परंतु ब्रिटिशकालीन भारताचा राजकीय इतिहास जाणून घेणाऱ्यांसमोर एक समस्या आहे : एक समज असा आहे की, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ - अर्थात, अखिल भारतीय स्तरावर संघटित झालेला पहिला राजकीय पक्ष - हा ब्रिटिश राजवटीतील तत्कालीन परिस्थितीचा परिणाम होता. परंतु दुसरा एक गट ‘सेफ्टी-व्हॉल्व्ह’ सिद्धांताच्या आधारे असं सांगतो की, काँग्रेसचा जन्म ब्रिटिशांच्याच कारस्थानाचा भाग होता. भारतीय लोकांकडून १८५७ च्या ‘बंडा’सारखा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून केलेली ती युक्ती होती. या वादाने प्रकाशापेक्षा उष्णताच जास्त निर्माण केली. सत्यापर्यंत जायचं झालं तर त्याचे राजकीय पदर तपासण्यापूर्वी ती राजकीय चळवळ - आणि संघटना - कोणत्या परिस्थितीमुळे निर्माण झाली, हे समजून घेतलं पाहिजे.

१८५७ च्या राष्ट्रीय उठावापासून ते १८८५ मध्ये काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचा काळ वसाहतवादी राजवटीच्या इतिहासातील सर्वात काळा टप्पा होता. त्या सुमारास भारतीयांमध्ये - विशेषतः परदेशी शिकून आलेल्या भारतीयांमध्ये - वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे मोठा असंतोष निर्माण झाला होता. जीवघेणा दुष्काळ आणि त्यात होरपळलेल्या जनतेची थट्टा करणारी ब्रिटिश सरकारची धोरणं, यासारखी कारणं त्यामागे होती.

१८६० आणि १८७० च्या दशकांत भारताने अनेक दुष्काळ पाहिले. परिणामी, देशाच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. १८६० च्या दुष्काळामुळे कॉलरा आणि देवी यांसारखे रोग पसरून ओरिसाच्या एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लोकांचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक निराधार झाले. शेतफाळ्याच्या वाढत्या ओझ्यामुळे भारतीय उपखंड कंगाल झाला आणि या बिकट परिस्थितीला तोंड देता देता शेतकरी कर्जबाजारी झाले. १८८० मध्ये भारताला भेट देणारे ब्रिटिश अधिकारी विल्फ्रेड स्कॉवेन यांनी म्हटलं की, ‘‘शेतीवर ओढवलेल्या संकटासाठी वाढीव शेतसारा, नव्या विहिरींवरचा कर आणि मिठावर लावलेला अमाप कर यामुळे शेती हा तोट्यातला धंदा झाला.’’

भरीत भर म्हणजे निर्दयी वसाहतवादी कायद्यांमुळे राज्यकर्ते आणि जनता यांच्यातील दरी रुंदावली. उदाहरणार्थ, १८७८ ला ‘व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट’ करून भारतीय वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा लादली गेली. स्थानिक वृत्तपत्रं भारतातील ब्रिटिश राजवटीला धोकादायक ठरणारी राजद्रोहाची तत्त्वं पसरवत असल्याचं कारण पुढे केलं गेलं. दुसरं उदाहरण म्हणजे १८८३ चं ‘इल्बर्ट बिल’. भारतीय न्यायाधीशांना काळ्या गुन्हेगारांच्या बरोबरीने गोऱ्या गुन्हेगारांवर खटला चालवण्याचा अधिकार देण्यासाठी ते बिल मांडलं गेलं होतं. परंतु त्यामुळे गोरे लोक खवळले. आपण जन्माने श्रेष्ठ आहोत, अशी त्यांची भावना असल्याने आपल्यापेक्षा खालच्या न्यायाधीशांकडून -

म्हणजे भारतीयांकडून - त्यांच्यावर खटला चालवला जावा, ही कल्पना त्यांना सहन झाली नाही. त्या बिलाच्या विरोधात त्यांनी तीव्र आंदोलन केलं आणि ते मागे घेण्यात आलं. वसाहती सरकारच्या या तथाकथित ‘निःपक्षपातीपणा’बद्दल भारतीयांच्या मनात संताप उसळला आणि त्यांचा भ्रमनिरास झाला.

पात्र असणाऱ्या भारतीयांना प्रशासनातील वरची पदं दिली जातील, असं वचन राणी व्हिक्टोरियाने १८५८ च्या घोषणेत दिलेलं असूनही उघडपणे वांशिक भेदभाव चाललेला होता. परिणामी, पोटाची भूक भागवण्यासाठी फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी पराधीन जनता अशी भारतीयांची गत झाली होती. अशा सगळ्या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून १८८० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीयांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यांना कळून चुकलं होतं की, ‘संघटित प्रयत्नांशिवाय’ काही साध्य होणार नाही. पण, कोणतीही राजकीय कृती करायची तर त्यासाठी एक व्यापक मंच असला पाहिजे, अशी सामूहिक जाणीव पहिल्यांदाच निर्माण झाली होती. वैयक्तिक प्रयत्न करून - ते कितीही भारी असले तरी - त्यातून काही हाती लागणार नव्हतं; आणि त्यातूनच काँग्रेसची स्थापना झाली. भारतातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करणारा तो पहिला संघटित आणि राष्ट्रव्यापी राजकीय पक्ष होता.

असं असूनदेखील काही इतिहासकारांना वाटतं की, वसाहती सरकारला स्थानिक लोकांमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाची जाणीव होती आणि त्याच्या परिणामांचीही भीती होती. त्यांचा युक्तिवाद असा की भारतीयांमधील वाढत्या असंतोषामुळे १८५७ सारखं बंड पुन्हा होईल याची ब्रिटिश अधिकाऱ्यांना चाहूल लागली होती. ते संकट टाळण्याचा त्यांनी योजलेला उपाय म्हणजेच ‘राष्ट्रीय काँग्रेस पक्षा’ची स्थापना. या मताच्या समर्थनासाठी ते दाखवून देतात की, काँग्रेसचे संस्थापक अॅलन ऑक्टेव्ह ह्यूम (१८२९-१९१२) हे भारतीय नागरी सेवेतील माजी अधिकारी होते. ज्युडिथ ब्राऊन म्हणतात त्याप्रमाणे - ‘‘ पक्ष प्रत्यक्षात येण्यासाठी ह्यूम यांनी स्वतः खूप मदत केली.’’ असाही आरोप केला जातो की, १८८२ पर्यंत सेवेत असलेल्या ह्यूम यांच्या हाती पोलिस खात्यातील गुप्त अहवालाचे सात खंड लागले आणि त्यातून भारतीयांच्या मनातला राग आणि तो व्यक्त करण्यासाठी संघटितपणे चाललेल्या त्यांच्या छुप्या कारवायांचा त्यांना अंदाज आला. बंड होणार हे लक्षात घेऊन त्यांनी सिमल्याला व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्याशी संपर्क साधला. त्या भेटीत ह्यूमनी सल्ला दिला : ‘‘या संकटाचा सामना करण्याचा मार्ग म्हणजे, अखिल भारतीय पातळीवरचा एक राजकीय पक्ष स्थापन करणे, जो एक ‘सेफ्टी-व्हॉल्व्ह’ म्हणून काम करेल आणि भारतीयांच्या असंतोषाला सुरक्षित वाट करून देईल. परिणामी, हिंसक मार्गाचा वापर न करता शांततेने आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी सुशिक्षित भारतीयांना पक्षाचा उपयोग होईल.’’ ह्यूमना वाटलं की, आपल्याच कृत्यांमुळे घडू लागलेल्या गुप्त षड्‍यंत्रांपासून सुशिक्षित भारतीयांचं लक्ष वळवण्यासाठी असा मंच असणं योग्य ठरेल.

इतिहासकार अक्षय देसाई म्हणतात, ‘‘ह्यूमचा असा विश्वास होता की, या मंचाचा प्रभावीपणे वापर करून भारतातील ब्रिटिश धोरणांबाबत सुशिक्षित भारतीयांचे विचार आणि प्रतिक्रियांबद्दल माहिती गोळा करण्याचं कामदेखील वसाहती सरकारला करता येईल.’’ इतर जाणकारांच्या मते ‘काँग्रेस’ ब्रिटिशप्रणीत होती याचा सर्वोत्तम पुरावा म्हणजे तिच्या संस्थापकांनी भारतासाठी स्वराज्याची कधीही मागणी केली नाही. पण, हा युक्तिवाद दुबळा वाटतो, कारण काँग्रेसच्या स्थापनेवेळची मुख्य उद्दिष्टं साम्राज्यवादविरोधी नव्हती. मेहरोत्रा म्हणतात त्याप्रमाणे, ‘विधान परिषदांचा विस्तार, सार्वजनिक सेवांत अधिक सुशिक्षित भारतीयांचा समावेश, कार्यकारी आणि न्यायिक कार्यांचं अलगीकरण, लष्करी खर्चातील कपात, लष्करातील भारतीयांना उच्चपदं मिळणे अशाच मागण्या होत्या.’

या वादावर पडदा टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यापक दृष्टीने परिस्थितीकडे पाहणे. काँग्रेसचा जन्म हा भारताच्या राष्ट्र उभारणीच्या दिशेने पहिल्या देशव्यापी प्रयत्नाची सुरुवात होती, हे आधी समजून घेतलं पाहिजे. ब्रिटिश सरकारकडून घटनात्मक सुधारणा करून घेण्याच्या एकमेव उद्देशाने निर्माण झालेली देशातील वरच्या वर्गातील लोकांची संघटना म्हणून काँग्रेसची सुरुवात झाली. पण नंतर ह्यूम, डब्लू. सी. बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तैयबजी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता आणि इतर संस्थापकांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे तिचा आकार आणि बळ वाढलं. देशव्यापी चळवळ उभी करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि साधनसामग्रीच्या दृष्टीने त्यांनी देशाला तयार केलं. परंतु त्यांना एकत्र आणण्यासाठी ह्यूमनेच ठोस पाऊल उचललं हेदेखील खरं आहे. सत्य हे आहे की, कोणीही भारतीय माणूस ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ स्थापन करू शकला नसता; आणि अशी संघटना सुरू करण्यासाठी जर एखादा भारतीय पुढे आला असता, तर इंग्रज अधिकाऱ्यांनी मुळात ती अस्तित्वातच येऊ दिली नसती. जर एक प्रतिष्ठित माजी अधिकारी काँग्रेसचा संस्थापक नसता, तर तेव्हाच्या राजकीय घडामोडींविषयी इतकं अविश्वासाचं वातावरण होतं की, ते आंदोलन चिरडून टाकण्याचा मार्ग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शोधलाच असता.

असंही असू शकतं की, काँग्रेसच्या स्थापनेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्धच्या वाढत्या असंतोषाला सुरक्षित वाट - सेफ्टी व्हॉल्व्ह – करून देण्याचा ‘वैयक्तिक कार्यक्रम’ ह्यूमने पूर्ण केला. परंतु हे पूर्ण सत्य नाही. एक ‘सुरक्षित झडप’ किंवा ‘अंतर्गत माहिती मिळवण्याचा मार्ग’ म्हणून ह्यूमला काँग्रेसचा वापर करायचा होता हे गृहीत धरूनदेखील, तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी ब्रिटिशांच्या मनातील संशयाच्या किंवा रागाच्या विद्युत धक्क्यापासून चळवळीला वाचवण्यासाठी एखाद्या धातूसारखा त्याचा खुबीने वापर करून घेतला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गंमत म्हणजे, शेवटी विजय भारतीयांचाच झाला. कारण त्याच काँग्रेसने सबंध राष्ट्राला आपल्या कवेत घेतलं आणि भारताच्या निःशस्त्र आणि पराधीन प्रजेला, पृथ्वीवरील सर्वांत बलाढ्य राष्ट्राला गुढघे टेकायला भाग पाडण्याइतपत ताकदवान बनवलं.