अखेरचा ‘इंग्रज’

गेले दोन महिने आमच्या घराचं नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळं सगळंच विस्कळीत झालंय...रोजचं रुटीन, महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रं वगैरे सगळं.
अखेरचा ‘इंग्रज’
Summary

गेले दोन महिने आमच्या घराचं नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळं सगळंच विस्कळीत झालंय...रोजचं रुटीन, महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रं वगैरे सगळं.

गेले दोन महिने आमच्या घराचं नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळं सगळंच विस्कळीत झालंय...रोजचं रुटीन, महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रं वगैरे सगळं. या गोंधळात प्राप्तिकराशी संबंधित कागद शोधत असताना धुळीनं माखलेली एक ‘फाईल’ हाती लागली. ‘मेयो + जॅक गिब्सन’ असं तिच्यावर लिहिलेलं होतं. आंतरदेशीय पत्रं आणि साध्या पोस्टकार्डांचा गठ्ठा होता त्या फायलीत. दहा वर्षांचा असल्यापासून मी अजमेरच्या ‘मेयो’ कॉलेजात शिकायला होतो. होस्टेलमध्ये राहायचो. तेव्हापासून गिब्सन यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याशी केलेला सगळा पत्रव्यवहार त्या गठ्ठ्यात होता.                         

जॅक इंग्रज होते. शाळकरी वयापासून ते माझे ‘आयकॉन’ होते आणि अखेरपर्यंत ते तसेच राहिले; पण वाढत्या वयाबरोबरच जशी समज वाढत गेली तसं इंग्रजांविषयी किंवा आपल्या देशातील त्यांच्या राजवटीविषयी चांगले उद्गार काढणं मला जड जाऊ लागलं. मूठभर इंग्रजांनी कोट्यवधी भारतीयांवर तीनशे वर्षं राज्य करावं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. बऱ्याच वर्गमित्रांना माझा हा दृष्टिकोन रुचत नव्हता; कारण, खानदानी घरात जन्मल्यामुळे ते वर्गमित्र ‘गव्हाळ कातडीचे; पण गोऱ्या मानसिकतेचे साहेब’ झाले होते. आपल्या देशाला इंग्रजांनी निष्कारण लुटलं ही गोष्ट ते मान्यच करत नव्हते.  

साधारणपणे तीन प्रकारचे इंग्रज आपल्या मायभूमीत आले. पहिल्या प्रकारात बहुतेकजण सैनिक, पोलिस आणि खलाशी होते. स्वतःच्या देशात चांगली नोकरी मिळणार नाही म्हटल्यावर छोटे-मोठे सरकारी अधिकारी म्हणून ते इकडे आले. हे लोक कोत्या विचारांचे आणि संकुचित मानसिकतेचे होते. भारतातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार होता...इथलं वातावरण, इथली घाण, इथले डास वगैरे सर्व. भारतीय माणसांबद्दल तर त्यांच्या मनात विशेष द्वेष होता.

दुसऱ्या प्रकारातले इंग्रज वरच्या वर्गातले होते. इकडच्या सैन्यात आणि नागरी सेवांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी. त्यातले बहुतेक जण सुशिक्षित; पण अलिप्त, आत्मसंतुष्ट आणि गर्विष्ठ होते. आपल्या नोकरीमुळे त्यांना अगदी ऐशोआरामात जगता येत होतं. बंगला, नोकर-चाकर, शिकार, घोडेस्वारी, नशापान, नाचगाणं अशी त्यांची मौज होती. आर्मी मेस किंवा फक्त गोऱ्यांसाठीच्या ‘क्लब’मध्ये ते भारतीय लोकांपासून अंतर ठेवून राहत असत.

भारतात आलेल्या इंग्रजांचा एक तिसरा वर्गदेखील होता. हे लोक एक तर स्वतःहून किंवा योगायोगानं भारतात आले होते. त्यांना भारताविषयी प्रेम होतं. वंशावर आधारलेल्या विचारसरणीपासून ते लांब होते. स्थानिक लोकांशी त्यांनी मैत्री केली आणि इंग्लंडला परत गेल्यावरदेखील ती निभावली.

‘राज्य’ करण्याच्या हेतूनं नव्हे तर, इंग्लंडचे सामान्य नागरिक म्हणून ते आले होते. इंग्लंड ही त्यांची जन्मभूमी होती; पण भारत ही त्यांची कर्मभूमी झाली. आपल्या नोकरीच्या आणि कर्तव्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी या देशाची सेवा केली. देशाच्या फाळणीचा कधीही भरून न येणारा घाव केला जाऊनही इंग्रजांबद्दल थोडीफार सद्भावना भारतीयांच्या मनात शिल्लक राहिली असेल तर ती या तिसऱ्या प्रकारच्या गोऱ्या लोकांमुळे. जॅक गिब्सन हे त्यांच्यापैकीच एक होते.

ते माझ्या वडिलांचे मित्र होते, तर माझे शिक्षक आणि प्राचार्य. सन १९३७ मध्ये ते भारतात आले आणि डेहराडूनला ‘डून स्कूल’मध्ये ‘हौस-मास्टर’ म्हणून रुजू झाले. सन १९५३ पर्यंत ते तिथं राहिले. दरम्यान, जानेवारी १९४९ मध्ये त्यांची नेमणूक डेहराडूनमधील ‘सैन्य दल अकादमी-आंतरसेवा केंद्रा’चे पहिले प्राचार्य म्हणून झाली. आताच्या ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’चं ते पूर्वरूप होतं.

‘डून’ मधल्या कार्यकाळानंतर अजमेरच्या ‘मेयो कॉलेज’चे ते प्राचार्य झाले. सन १८७५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था देशातल्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित शिक्षणसंस्थापैकी एक होती. तिथंच त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. संस्थेत दाखल झालेला मी ‘नवा गडी’ होतो. पुढच्या काळात माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव पडणार आहे याची मला जराही कल्पना नव्हती.

जॅक हे हाडाचे शिक्षक आणि हेडमास्तर होते. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या अनेक पिढ्यांवर त्यांचा खोलवर प्रभाव पडला. त्यांचा करिष्मा, निःपक्षपातीपणा, नेतृत्वगुण, मूल्यनिष्ठा आणि सगळ्यांमध्ये संक्रमित होणारा त्यांचा ध्यास...असं ते आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व होतं. ते जे शिकवत किंवा करत त्या सगळ्यांतून त्यांचे हे गुण दिसून येत. मग भूगोल आणि इंग्लिश यांसारखे विषय वर्गात शिकवणं असो किंवा वर्गाबाहेरील उपक्रम - बॉक्सिंग, दांडपट्टा, क्रॉस कंट्री धावण्याची स्पर्धा किंवा हिमालयाची चढाई वगैरे असो.

फाईलवरची धूळ झटकताना काही फोटो खाली पडले. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचे जॅक...जयपूरच्या दरबार हॉलमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा सन्मान स्वीकारतानाचे जॅक...त्यांचेच विद्यार्थी असणाऱ्या संरक्षण खात्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबरचे जॅक...असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. संपूर्ण वर्गाला उत्साहित आणि प्रेरित करणारे जॅक...पर्वतावर ‘ट्रेकिंग’ करताना गाणं गुणगुणारे जॅक...ट्रकचालकांकडे पाहून हात हलवत जीप चालवणारे जॅक...चहाची आणि ‘पाईप’ची हुक्की येताच मध्येच वाटेत थांबून ‘ब्रेक’ घेणारे जॅक...सायकलिंग करणारे, ‘कॅम्प’ टाकून राहणारे, मासे पकडणारे जॅक...‘रॉक क्लायम्बिंग’साठी चांगलं ठिकाण शोधावं म्हणून अजमेरच्या सभोवतीचे सगळे डोंगर पायाखाली घालणारे जॅक...नाटकाची तालीम घेणारे जॅक... गंगा नदीत बिनधास्त ‘राफ्टिंग’ करणारे जॅक...‘मनानं आणि दृष्टीनं खरे ‘भारतीय व्हा’ ’ असं आम्हाला सांगणारे जॅक...‘राष्ट्रीय क्रीडा अकादमी’ स्थापन करावी म्हणून थेट पंडित नेहरूंना पत्र लिहिणारे जॅक... वंचितांविषयीच्या आणि गोरगरिबांविषयीच्या जबाबदारीची जाणीव श्रीमंतांच्या मुलांना करून देणारे जॅक...मला बॉक्सिंगचं प्रशिक्षण देणारे जॅक...चिडलेल्या पालकांना मोहित करून सोडणारे जॅक...आणि नव्यानं दाखल होणाऱ्या मुलांशी कमालीच्या संयमानं वागणारे जॅक...

‘शिस्त लागावी’ म्हणून मला एकदा त्यांच्यासमोर हजर केलेलं होतं; कारण, मी आणि इतर चार ‘आगाऊ’ पोरांनी आदल्या रात्री गुपचूपपणे होस्टेलच्या बाहेर सटकून तंदुरी चिकन आणि मटण कटलेटवर यथेच्छ ताव मारला होता. परत आल्यावर बाकीच्यांनी कंपाउंडच्या भिंतीवरून आत कशीबशी उडी मारली. मला जमलं नाही आणि मी नेमका चौकीदाराच्या हातात सापडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राचार्यांच्या दालनात मला हजर केलं गेलं.

‘यशवंत, उगीच वेळ वाया नको जायला. बाकी कोण कोण होतं, मला सांग,’ प्राचार्य म्हणाले.

शक्य तेवढी नजरेला नजर भिडवत मी उद्गारलो : ‘मी एकटाच होतो, सर!’

‘हे बघ, बाळा. मला त्यांची नावं माहीत आहेत; पण तू स्वतःहून सांगितलीस तर तुझी सुटका होईल. नाही तर, फटके. शिवाय घरी जावं लागेल. विचार करून नीट उत्तर दे.’’

‘मी एकटाच होतो, सर.’

‘ठीक आहे मग. खाली वाक.’

असं म्हणत त्यांनी बांबूचे मोजून सहा फटके मला दिले. शिक्षा देऊन झाल्यावर ते खुर्चीत बसले. माझे दोन्ही हात आपल्या हातात घेत ते म्हणाले : ‘‘शाब्बास. चांगलं केलंस. स्वतःला वाचवण्यासाठी इतरांची नावं पुढं केली असतीस तर तुझी शाळेतून नक्की हकालपट्टी केली असती मी; पण तू तसं केलं नाहीस. याचा मला आनंद आणि अभिमानही आहे. यातून कायमचा धडा घे. आयुष्यात जर कधी चुकीचं घडलं तर त्याचं खापर इतरांवर फोडू नकोस. स्वतःवर जबाबदारी घे. ठीकंय, नीघ आता.’’

‘काय माणूस होता तो!’ फिके पडलेले ते फोटो खाली ठेवत मी मनाशी म्हणालो.

तेवढ्यात पुस्तकाच्या फाडलेल्या पानाकडे माझं लक्ष गेलं...‘अरे देवा! हे कशाला ठेवलंय मी?’

...गणितात मी कच्चा होतो आणि विज्ञानात तर एकदम ढ. ‘लायब्ररी’च्या तासाला एका घटकचाचणीची तयारी करत होतो, तेव्हा माझ्या उपयोगाची माहिती असणारं एक पुस्तक माझ्या हाती लागलं; पण त्यावर ठळकपणे लिहिलं होतं ‘नॉट टू बी बॉरोड’. अर्थात्, ते बाहेर नेणं शक्य नव्हतं आणि तिथं बसून ते वाचणं माझ्या जिवावर आलं होतं. मी ‘सोपा’ उपाय काढला - पुस्तकाची हवी असलेली पानं हळूच फाडली, पॅँटच्या आत कोंबली आणि तिथून धूम ठोकली.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यावर जॅकसाहेब उभे राहिले, घसा खाकरून म्हणाले : ‘‘लायब्ररीतल्या एका महागड्या पुस्तकाची चार पानं फाडून कुणी तरी गायब केली आहेत. कोण आहे तो?’’

संपूर्ण शांतता.

‘पुस्तकाची पानं फाडली ही वेगळी गोष्ट. तसं करण्यामागं काही तरी कारणं असू शकतील; पण ज्यानं कुणी ती फाडली आहेत त्याच्यात, आपली चूक मान्य करण्याचं नैतिक धैर्य नसेल तर याचा अर्थ एकच होतो - माझ्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यात मी कमी पडलो,’ सरांचे ते शब्द म्हणजे माझ्या गालफडावर दिलेली सणसणीत चपराक होती. त्यामुळं पुढं काय वाढून ठेवलंय याचा विचार करायच्या आधीच माझा हात वरती गेला.

‘सर, मीच ती पानं फाडली.’

सरांनी डोळे रोखून माझ्याकडं पाहिलं आणि मला जवळ बोलावलं. जवळ जाताच त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि सगळ्या मुलांना उद्देशून म्हणाले : ‘आपली चूक कबूल करण्याचं धैर्य आज यशवंतनं दाखवलंय. एका पुस्तकाची पानं फाडली गेली हे महत्त्वाचं नाही; तर एका लहान मुलानं भीतीचा सामना केला आणि तिच्यावर मात केली हे महत्त्वाचं आहे. पुस्तक फाडल्याबद्दलची, ते विद्रूप केल्याबद्दलची शिक्षा म्हणून त्यानं मेहनतीनं अभ्यास करून येत्या परीक्षेत पहिल्या तिघांत स्थान मिळवावं आणि खरं बोलल्याचं बक्षीस म्हणून उद्या संध्याकाळी माझ्या घरी जेवायला यावं.’

तो आख्खा दिवस मला रडू आवरलं नाही.

सहजपणे मी ती फाईल चाळली. माझं खेळांतलं प्रावीण्य दर्शवणारी अनेक प्रमाणपत्रं तिच्यात नीट तारीखवार लावलेली होती. सगळ्यांत वरती होतं क्रिकेटमधल्या सहभागाचं प्रमाणपत्र. मी काही असामान्य क्रिकेटपटू नव्हतो; पण टीमच्या उपयोगी पडेन असा होतो. एका शनिवारी नेट प्रॅक्टिस चालली होती. बॉलरनं कमी पल्ल्याचा बॉल टाकला. उसळून तो माझ्याकडे येताच बॅट तिरकी पकडून मी तो लेगसाईडला ठोकला. जॅक माझा खेळ पाहत आहेत हे मला माहीत नव्हतं. पुढचा बॉल यायच्या आधी त्यांनी मला खुणेनं बोलावलं.

जवळ जाताच ते म्हणाले : ‘‘आता तू जो गावठी टोला लगावलास, त्यामुळं तुला सामन्याच्या वेळेस धावा मिळतील; पण क्रिकेट म्हणजे नुसत्या धावा काढणं नव्हे. क्रिकेट म्हणजे स्ट्रेट बॅटनं, योग्य पद्धतीनं धावा मिळवणं.’’

मी वळणार इतक्यात त्यांनी बजावलं : ‘‘आयुष्यातदेखील हेच तत्त्व लागू होतं, यशवंत. समोर कसलंही प्रलोभन असो. थेट आणि प्रामाणिकपणेच त्याचा सामना करायचा. कधी विसरू नकोस. समजलं?’’

मला नव्हतं समजलं. ते नेमकं काय सांगत होते ते माझ्या डोक्यात शिरायला खूप वर्षं जावी लागली. तो एकच धडा गिरवण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न करत आलोय.

त्यांचं भारतावरचं प्रेम सुंदर रीतींनी प्रकट व्हायचं. भाषा, साहित्य आणि सामाजिक शास्त्रांत मला चांगली गती होती. त्या काळी संस्कृत शिकणं ही काही विशेष गोष्ट मानली जात नव्हती. तरीदेखील ती शिकण्याकडे ज्यांचा कल होता त्यांच्यासाठी त्यांनी एक ‘शास्त्री’ नेमला. कधी कधी त्या वर्गात ते बसायचे आणि तास संपल्यावर आम्हाला म्हणायचे : ‘‘कुणी कितीही थट्टा केली तरी तिकडे लक्ष देऊ नका. हिंदी ही भारताची भाषा आहे आणि संस्कृत ही देवांची. लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. बाकीची मुलं इंग्लिश बोलतात ते ठीक आहे; पण तुम्ही इंग्लिशसह हिंदी आणि संस्कृतही बोलू शकाल, ही मोठी गोष्ट आहे.’’

जॅक खऱ्या अर्थानं एक ‘इंग्लिश सज्जन’ होते : साधे, सरळ, निष्कपट. कडक शिस्तीचे; पण तितकेच समंजस. जितके कठोर, तितकेच प्रेमळ. आपल्या देशाशी आणि संस्कृतीशी इमान राखणारे; पण भारतावर आणि भारतीयत्वावर निखळ प्रेम करणारे.

सन १९३७ ला ते भारतात आले आणि ४७ वर्षं राहिले. दोन जगांच्या निमुळत्या टोकावर ते जगले. दोन्ही जगांमधल्या सर्वोत्तम गोष्टींचा सुंदर मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला भारत एक ‘नवा देश’ म्हणून उदयाला आल्यानंतर, तरुण पिढ्यांतलं नेतृत्व घडवण्याचं काम त्यांनी अखंडपणे केलं. या देशाची सेवा ते अखंडपणे करत राहिले. त्यांच्या असामान्य कार्याचा गौरव जसा त्यांच्या मातृभूमीनं केला तसाच कर्मभूमीनंही केला. इंग्लंडकडून ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ आणि भारतातर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवले गेलेले ते ‘अखेरचा ‘इंग्रज’ ’ ठरले.

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com