आडवाटेचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडवाटेचा प्रवास
आडवाटेचा प्रवास

आडवाटेचा प्रवास

साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, व्यक्तिगत अनुभव, सरकारी धोरणांची अंमलबजावणी, राजकीय घडामोडी अशा विविध विषयांवर ‘मनापासून’ भाष्य करणारं हे पाक्षिक सदर.

आज समाजाची अवस्था अशी झाली आहे की, एखाद्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याविषयी बोलायला जावं तर स्वतःचंच हसं व्हायचं. मात्र ‘तो’ तसा होता...एक निष्ठावान अधिकारी. ही गोष्ट पचनी पडायला मलाही थोडा वेळ लागला. जसजशी आमची ओळख वाढत गेली तसतसं माझ्या लक्षात आलं की, व्यवहार, आदर्शवाद आणि आपल्या कामाबाबतचा सार्थ अभिमान या सगळ्याचा सुंदर मेळ त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

एकदा क्लबमध्ये जेवताना नक्षलग्रस्त भागातील त्याच्या कार्यकाळाविषयी बोलणं निघालं. सात-आठ वर्षांपूर्वी त्याची त्या भागात नियुक्ती झाली होती. नक्षलवाद ही स्वार्थी लोकांनी चालवलेली आणि शोषण करणारी चळवळ आहे, असा त्या वेळी त्याचा समज होता; पण काळाच्या ओघात त्याच्या लक्षात आलं की, सुरुवातीचा आदर्शवाद कमी झाला असला तरी अजूनही ध्येयनिष्ठ नेतृत्व तिच्यात कुठं तरी शिल्लक आहे.

अचानक त्यानं मला विचारलं :‘‘तुमचा कधी नक्षलवाद्यांशी संबंध आला होता का?’’

काळ तिथंच थबकला.

‘ती’!

कॉलेजात असताना ‘ती’ भेटली होती. उंचीनं कमी, सावळी, डोळ्यांवर चष्मा. अंगावर खादीची चुरगळलेली सलवार-कमीज आणि खांद्याला शांतिनिकेतन स्टाईलची कापडी पिशवी. उर्दू शेरो-शायरी ही आमची समान आवड, तसंच डाव्या विचारसरणीच्या व्याख्यानांना आम्ही जायचो आणि निषेधाच्या मोर्चांत सहभागी व्हायचो. नंतर योगायोगानं मला समजलं की, ती एका गर्भश्रीमंत घरातली होती; पण गरीब दिसण्यासाठी इतक्या टोकाला तिनं का जावं याचं कोडं मला कधी उलगडलं नाही. तिच्याशी ‘सूत’ जुळवण्याची केलेली माझी खटपट वाया गेली. मैत्री आणि आदर मात्र टिकला. कॉलेजनंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. मी नोकरीला लागलो. ती मात्र कुठं तरी गायब झाली.

सन १९८१ मध्ये ऐज्वाल विमानतळावर आमच्याच ‘गँग’मधला एक मित्र भेटला. संध्याकाळी गप्पांच्या ओघात तिचा विषय निघाला.

‘अरे, ती कुठं असते हल्ली? तुला काही माहीत आहे काय?’’ मी विचारलं.

तो म्हणाला : ‘‘दिल्लीतल्या झोपडपट्टीत ती काही काळ काम करत होती. नंतर असं ऐकलं की, ती नक्षलवादी चळवळीत गेली आणि तिथं वरच्या स्थानी पोहोचली. कुणीतरी असंही सांगितलं की, एका चकमकीच्या वेळी पोलिसांनी तिला पकडलं; पण तुरुंगात नेत असताना, लघुशंकेचं निमित्त करून, ती वाटेत उतरली आणि जवळच्या जंगलात पसार झाली. तिच्या गायब होण्याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. नंतर मात्र तिच्याबद्दल नेमकं काहीच कळलं नाही...’

जेवण झालं आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढं बऱ्याच वर्षांनंतर नागालँडमधील एका ग्रामीण शाळेच्या उद्घाटनासाठी मला जावं लागलं. प्रवास छान झाला, शाळेचा परिसर सुंदर होता, मुलं हसरी आणि आनंदी होती. सगळं नीट पार पडलं; पण कार्यक्रम आटोपून मंचावरून खाली उतरत असताना पाय घसरला आणि मी पडलो. उठता येईना. कारण, पाय मुरगळला होता. ‘रामकृष्ण मिशन’चं प्राथमिक उपचारकेंद्र दोनेक मैलांवर असल्याचं समजलं. तिकडं मला नेण्यात आलं. ड्यूटीवर असणाऱ्या ‘सिस्टर’नं पाय दाबून बघितला आणि ताबडतोब प्लॅस्टर घातलं. परतताना ‘मिशन’साठी काही देणगी देण्याची इच्छा मी व्यक्त केली. सिस्टरनं रामकृष्ण परमहंस यांच्या फोटोसमोरील दानपेटीकडे बोट दाखवलं. पेटीत दान टाकून मी गाडीकडे निघालो.

इतक्यात मागून कुणी तरी नावानं हाक मारली. वळून पाहतो तर एक मध्यमवयीन बाई. डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्टेथोस्कोप.

‘‘काय पाहिजे आपल्याला?’’ मी विचारलं.

‘‘काही नाही,’’ असं म्हणत त्या सहजपणे हसल्या.

काळ पुन्हा एकदा थबकला.

‘ती’!

होय, ही ‘ती’च होती! तिच्या निवासाकडे आम्ही निघालो. एक साधीसुधी खोली. बरीचशी रिकामी; पण टापटीप. एका कोपऱ्यात स्टोव्ह आणि मोजकी भांडी. बाजूला एक साधा पलंग, लाकडी टेबल आणि दोन खुर्च्या. आम्ही बसलो. ‘‘अरे बाप रे बाप... तू इथं!’’ मी उद्गारलो.

‘डोंट बी सिली, यशवंत! हू एल्स कॅन आय बी?’’

‘तसं नाही पण...अगं, तुला पाहून मला धक्का बसला. इतकी वर्षं होतीस कुठं तू?’’

‘या प्रश्नाची मी वाटच पाहत होते. तुला काय करायचंय ते जाणून घेऊन? आता तुझं जग वेगळं आणि माझं वेगळं. तुझं जग तू निवडलंस आणि प्रचलित निकषांनुसार तू बऱ्यापैकी यशस्वी झालेला दिसतोस; पण तेव्हाचा ‘तू’ मला आठवतोस...उत्साही, ध्येयवेडा. आताचा ‘तू’ मात्र ‘त्या’ प्रतिमेत बसत नाहीस...’’

मी काहीच बोललो नाही.

‘यशवंत, तू समाधानी आहेस ना?’’ माझ्याकडे नजर रोखून तिनं मला विचारलं.

मी नजर झुकवली आणि हळूच म्हटलं :‘‘तुलाही मी हाच प्रश्न विचारू शकतो.’’

‘मी मात्र समाधानी आहे,’’ ती म्हणाली.

‘खरं का?’’ मी पुन्हा विचारलं.

‘खरं-खोटं असं काही नसतं, यशवंत. ज्याला आपण ‘सत्य’ म्हणतो तो केवळ एक ‘दृष्टिकोन’ असतो. बाकी काही नाही. एखाद्या चित्राकडे पाहणं वेगळं आणि स्वतः त्या चित्राचा भाग होणं वेगळं. मी सध्या जे करतेय आणि तेव्हा जे करायची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्य तेच आहे. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचण्याची साधनं बदललीत, इतकंच.’

‘तुला नेमकं काय म्हणायचं आहे?’’ मी विचारलं : ‘‘सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देणं आणि रुग्णांची सेवा करणं हे दोन्ही सारखंच आहे का?’ ‘त्याकडे तू कसं पाहतोस यावर ते ठरेल,’ ती म्हणाली : ‘वर्ग आणि जात यांवर आधारलेली विषमता म्हणजे समाजाला झालेला रोग आहे, त्याला आयुर्वेदिक औषध काही कामाचं नाही, डॉक्टरची सुरीच फिरवायला पाहिजे.’ ‘काहीतरीच बोलू नकोस,’ मी म्हणालो.

‘१९६७ ते १९७५ या काळात नक्षलचळवळ जोमात असताना जवळपास दहा हजारजण मरण पावले. त्याचं समर्थन करतेस का तू? आणि आजकाल माओवादी संघटनांकडून लोकांचे जीव घेतले जात आहेत, ते योग्य आहे, असं म्हणायचं आहे का तुला?’

‘हे बघ, मित्रा...समाजाची प्रगती ही नेहमी सरळ रेषेत होत नसते,’ ती म्हणाली.

‘ते खरंय,’ मी म्हटलं : ‘पण सामाजिक परिवर्तन हे मुख्यतः शांततेच्या मार्गानंच होतं, बंड आणि नाश करून नव्हे. बरं ते जाऊ दे. तुझाच मार्ग योग्य आहे असं ठरवण्याचा अधिकार तुला कुणी दिला? कॉलेजात असताना तुझा हेवा वाटायचा. कारण, स्वतःच्या विचारांनुसार पुढं जाण्याची हिंमत तुझ्यात होती; परंतु हिंसेची बाजू घेऊन तू मला निराश केलंस.’

‘बरं. ते जाऊ दे माझं एक काम करशील?’ तिनं विचारलं.

‘नक्कीच,’ मी म्हणालो.

पलंगाखालची एक जुनाट सुटकेस तिनं बाहेर काढली आणि तिच्यातली एक छोटी, गंजलेली डबी माझ्या हातावर ठेवली.

‘या डबीत थोड्या बिया आहेत. नक्षलबाडीला जाऊन या बिया तिथं पेरशील का?’’

थोडा वेळ शांतता पसरली.

मग ती पुन्हा म्हणाली :‘‘तुला ती ‘काबील’ची नज़्म आठवतेय?’’

चराग-ए-बज़्म-ए सितम है, हमारा हाल ना पूछ

जले थे शाम से पहले, बुझेंगे सहर के बाद...

(माझी ख्याली-खुशाली विचारू नकोस. मी एक असा दिवा आहे, जो अंधारात प्रकाश देण्यासाठी जळतो. सायंकाळ होण्यापूर्वी तो तेवू लागला आहे आणि सकाळ होताच तो मालवेल.]

क्षणार्धात सगळा भूतकाळ मनात दाटून आला. उत्तरादाखल एकही ठेका न चुकवता मी बोलून गेलो :

वही जुबान, वही बातें, मगर है कितना फर्क

तुम्हारे नाम से पहले, तुम्हारे नाम के बाद!

(तू तीच आहेस, तुझी भाषाही तीच आहे; पण आता अर्थ किती वेगळा...तेव्हा तुला नाव होतं अन् आता तू अनाम आहेस...!)

‘‘बहुत खूब!’’ दिलखुलास दाद देत ती म्हणाली : ‘‘कदाचित, आपली भेट पुन्हा होणार नाही. गुड बाय. बस्, माझी आठवण राहू दे.’’

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :politicalPhilosophy
loading image
go to top