ते असे होते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S.P.P. Thorat and Yashwant Thorat

मी जन्मलो तेव्हा ते एक्केचाळीस वर्षांचे होते. वयात इतकं अंतर असल्यामुळे आमच्यात मैत्री निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. ते एका वेगळ्या काळात आणि वातावरणात वाढलेले होते.

ते असे होते!

‘अच्छा, तुम्ही ‘त्यांचे’ चिरंजीव!’

हे वाक्य मी गेली पंचाहत्तर वर्षं ऐकत आलोय. मोठ्ठं यश मिळवलेले, आदर्श ठरलेले, नैतिक आधारस्तंभ बनलेले किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर, लोकोत्तर व्यक्तिमत्त्व लाभलेले स्त्री-पुरुष जर आपले आई-वडील असतील तर त्यांची आपल्याशी तुलना ही होतच असते. अशा माणसांच्या मुला-बाळांना तुलनेचं ओझं मानगुटीवर ठेवूनच जगावं लागतं. माझं ओझं मात्र मी आनंदानं वागवत आलोय. ते असामान्य बाप होते म्हणून नव्हे; त्यांनी जगात नाव कमावलं म्हणूनही नव्हे, तर ते वास्तव जीवनात एक उत्तम माणूस होते म्हणून.

मी जन्मलो तेव्हा ते एक्केचाळीस वर्षांचे होते. वयात इतकं अंतर असल्यामुळे आमच्यात मैत्री निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. ते एका वेगळ्या काळात आणि वातावरणात वाढलेले होते. त्यांची जीवनमूल्यं त्यांच्या काळातली होती.

स्वतंत्र भारताच्या लष्करात ते ‘शिपाई’ होते, त्यांच्या कामाचा व्याप दांडगा होता, म्हणून आम्ही दोन निराळ्या जगांत वावरत होतो असं कुणाला वाटलं असेल तर ते चुकीचं आहे. मी जेमतेम आठ वर्षांचा असताना त्यांनी मला छऱ्याची बंदूक भेट दिली.

‘हॅपी बर्थडे!’ ते म्हणाले.

माझा आनंद गगनात मावत नव्हता; पण ‘थँक यू!’ हा एकच शब्द कंठातून बाहेर पडला.

‘हे बघ भैया, बंदूक हाती येणं ही गमतीची गोष्ट नाही,’ तेम्हणाले : ‘आता तू मोठा झालास हा याचा अर्थ आहे. लक्षात ठेव, कुणाला मारण्यासाठी हत्यारं बाळगायची नसतात; दुबळ्या आणि निराधार लोकांच्या रक्षणासाठी ती असतात.’

नंतर जातीनं लक्ष घालून त्यांनी आमच्या घराच्या मागच्या भागात नेमबाजीसाठीची भिंत बांधून घेतली. माझ्याकडून कसून सराव करून घेतला. इतका की, तीस यार्डांवर ठेवलेल्या सिगारेटचे दोन तुकडे मी हातातल्या बंदुकीनं करू लागलो. मात्र, कामाचा भार त्यांच्यावर एवढा होता की त्यांच्या-माझ्यामध्ये तो एक अडथळा बनला, त्यामुळेच त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी मनात साठवायला शिकलो. ते क्षण माझ्यासाठीची सर्वोत्तम भेट आहेत. अगदी आजही. महागड्या भेटवस्तू देणं आणि सुटीपुरती दंगा-मस्ती करणं कुठं आणि आपल्या मुलांसोबत संस्कारशील पद्धतीनं उत्तम वेळ घालवणं कुठं! दुसऱ्याची सर पहिल्याला येणारच नाही.

ते असे होते.

ते कमी बोलायचे. कृतीतून शिकवायचे. निवृत्तीच्या आदल्या दिवशी ते भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाचे सेनापती होते. मोठा नोकरवर्ग आणि लष्करी वाहनांचा ताफा त्यांच्या दिमतीला होता...आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तर, ते शांतपणे आपले बूट पॉलिश करत होते. ते दृश्य पाहून मला रडू कोसळलं.

‘सोडा ते. मी करतो,’ मी भरल्या आवाजात म्हणालो.

प्रश्नार्थक नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं : ‘का बरं?’

‘कारण, ते तुम्ही करावं असं मला नाही वाटत,’ मी म्हणालो.

‘बाळा, बस इथं. ऐक. स्वतःचे बूट स्वतः पॉलिश करताना लाजायचं काहीच कारण नाही. आपण जर मर्जी सांभाळण्यासाठी इतरांचे बूट पॉलिश करत असू तर तेव्हा लाज वाटली पाहिजे मात्र.’

ते असे होते.

लहानपणी मला अंधाऱ्या आणि रिकाम्या खोल्यांची भीती वाटायची. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते मला हसले नाहीत. मला त्यांनी काठी आणायला सांगितली आणि आईला उद्देशून म्हणाले : ‘‘लीला, आज मी आणि यशवंत घराच्या सगळ्या खोल्या धुंडाळणार आहोत. ती भीती कुठं लपून बसलीय ते आम्हाला बघायचंय. ती सापडली की तुझा मुलगा तिला चांगलं बदडून, हाकलून लावणार आहे. घराची खोली नि खोली आम्ही पालथी घातली. ती भीती सापडली नाही आणि माझ्या मनातूनही ती गायब झाली. पुढं मला कळून चुकलं की भीती वेगवेगळ्या रूपांत आपल्या आयुष्यात येतच असते. तेव्हा तिच्यापासून आपण जितकं दूर पळतो तितकी ती वाढते. थेट भिडलो तरच तिच्यावर मात करता येते.

मला हेही समजलं की, आयुष्यात सगळं काही ठरल्यागत नसतं. अनपेक्षित आणि अचानकपणे जे वाट्याला येतं त्याला धीरानं आणि संयमानं तोंड देता आलं पाहिजे. हे त्यांनी शिकवलं नाही; पण मी शिकलो.

ते असे होते.

आपली पत आणि प्रतिष्ठा जन्मानं मिळत नाही; ती स्वकष्टानं कमावावी लागते, हे आम्हा भावंडांच्या मनावर त्यांनी सतत बिंबवलं. एका रविवारी आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. गाडी पार्क करता करता त्यांनी माझ्या हातात काही पैसे दिले आणि सांगितलं : ‘एक स्टॉलचं आणि दोन बाल्कनीची तिकिटं काढ.’

‘स्टॉलमध्ये कोण बसणार?’ मी विचारलं.

‘तू!’ एकाच शब्दात त्यांनी सांगितलं.

मी नकार दिला. तेव्हा त्यांनी मला गाडीच्या मागच्या सीटवर शांतपणे बसवलं आणि बजावलं :‘‘भैया, तू जनरल थोरात नाहीस; त्यांचा मुलगा आहेस. जेव्हा स्वतः काहीतरी करून दाखवशील तेव्हा आख्खं थेटर भाड्यानं घे आणि एकटा बसून पिक्चर बघ. तोपर्यंत स्टॉलमध्ये बस.’

ते असे होते.

तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा बाल्कनीत बसलो, पहिल्यांदा फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास केला आणि पहिल्यांदा महागड्या हॉटेलात गेलो ते रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागून पगार हातात पडल्यावरच! ही कहाणी इथंच संपत नाही. रिटायर झाल्यावर मी एका कॉलेजात शिकवत असे तेव्हाची गोष्ट. एका मुलीनं मला चिडक्या-रडक्या सुरात सांगितलं की तिचे आई-बाबा फार क्रूर आहेत. कारण, ते तिला आठवड्याला फक्त तीन हजार रुपयेच पॉकेट मनी देतात!!

मी तिला एका जागी बसवलं आणि माझी गोष्ट सांगितली; पण काही परिणाम झाल्याचं दिसलं नाही. नंतर खूप वर्षांनी तिचं पत्र आलं. त्यात तिनं लिहिलं की, ‘थोरातांचा सल्ला’ ती आता आपल्या लहान मुलाच्या बाबतीत अवलंबतेय!

ते असे होते.

पेपरमधल्या एका अलीकडच्या लेखात त्यांचं वर्णन ‘जवानांचा जनरल’ असं करण्यात आलंय. कारण, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेल्या सामान्य लोकांविषयी त्यांच्या मनात विलक्षण कळकळ होती. ही गोष्ट माझ्या ध्यानात आली तेव्हा मी रिझर्व्ह बँकेचा एक तरुण अधिकारी होतो...पाचोऱ्यामधल्या एका सहकारी बँकेची तपासणी करण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. तपसणी चालू असताना मी माझ्या सहायकाला रेल्वेचं ‘रिटर्न’ तिकीट काढायला पाठवलं. तो स्वभावानं जरा तापट होता. बुकिंग शिल्लक नाही म्हटल्यावर त्यानं दबाव टाकायला सुरुवात केली : ‘ध्यानात ठेवा, आमचे थोरातसाहेब, आरबीआयचे मोठे अधिकारी आहेत!’ त्याच्या धमकीचा स्टेशनमास्तरांवर काहीही परिणाम झाला नाही. ते म्हणाले : ‘तुमच्या थोरातसाहेबांना मला भेटायला सांगा.’ मी गेलो.

खोलीत शिरताच ते उद्गारले : ‘‘जनरल थोरातांशी आपला काय संबंध?’

‘माझे वडील.’

यावर स्टेशनमास्तर म्हणाले : ‘ते तुमचे वडील असल्यानं नियम मोडून मी तुम्हाला रिटर्न तिकीट देईन; पण तुम्ही आरबीआयचे अधिकारी आहात म्हणून नव्हे. त्याला वेगळंच कारण आहे... सन १९५१ ची गोष्ट. तेव्हा मी नागपूर स्टेशनला साधा कारकून होतो. कोरियामधल्या कामगिरीवरून परतलेले जनरल थोरात तमाम भारतीयांचे ‘हीरो’ झाले होते. ते नागपूरमार्गे कोल्हापूरला जाणार आहेत, अशी बातमी कानावर आली. त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा सन्मान म्हणून आख्खं मंत्रिमंडळ नागपूर स्टेशनवर स्वागतासाठी येणार होतं. ठरल्यानुसार ट्रेन आली. तुमचे वडील खाली उतरले. त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं. ट्रेन निघण्याची वेळ झाली. शिट्टी वाजू लागली. तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी बातचीत करत होते. आम्ही आपली साधी माणसं. एका कोपऱ्यात उभे होतो; पण मुख्यमंत्र्यांचा तातडीनं निरोप घेऊन ते आमच्याजवळ आले. आमच्यातल्या प्रत्येकाशी बोलले आणि आमचे आभार मानून मगच गाडीत चढले. त्या वेळी जी माणुसकी जनरल थोरातांनी दाखवली तिचा आदर म्हणून हे ‘रिटर्न गिफ्ट’ मी तुम्हाला देतोय.’

ते असे होते.

आरबीआयमध्ये रुजू व्हायच्या वेळेला त्यांनी मला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले : ‘नोकरीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा असायला हवा हे मी तुला सांगणार नाही; पण माझं तत्त्व सांगतो. आर्मी हा माझ्यासाठी केवळ करिअरचा मार्ग नव्हता. तो जीवन जगण्याचा मार्ग होता आणि तसाच तो आजवर राहिलाय.’’

मला वाटतं, हीच त्यांची खरी ओळख होती. कारण, त्यांनी नुसता लष्करी गणवेश धारण केलेला नव्हता; लष्कराचा गाभा आत्मसात केलेला होता. त्यांच्यासाठी शिपाई म्हणजे ताठ मिश्या, चालण्यातला दिमाख आणि वरवरचा चकचकीतपणा नव्हता, तर शिपाई म्हणजे प्रामाणिकपणा, कणखरपणा, सरळपणा आणि हाताखालच्या लोकांबद्दलचा कळवळा होता. सचोटी आणि थेटपणाच्या त्यांनी नुसत्या गप्पा मारल्या नाहीत. तसे ते प्रत्यक्षात जगले. शाळेत शिकत असताना मी सुटीला घरी आलो होतो. रविवारी वडिलांबरोबर लष्कराच्या ओपन थिएटरमध्ये पिक्चर पाहत होतो, तेव्हा NEFA च्या मुद्द्यावरून त्यांच्यात आणि तत्कालीन संरक्षणमंत्र्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते.

इतक्यात त्यांचा सहायक वडिलांच्या जवळ आला आणि म्हणाला : ‘सर, संरक्षणमंत्रिमहोदयांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला जायचं आहे का?’

‘काय म्हणालास?’ वडिलांनी विचारलं : ‘त्यांनी मला बोलावलंय का?’

‘नाही,’’ सहायक म्हणाला.

तेव्हा शेजारच्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवून वडील म्हणाले : ‘‘मग बस इथं आणि पिक्चर एन्जॉय कर!’’

ते असे होते.

वडील रिटायर झाले. तेव्हा नव्यानंच स्थापन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं अध्यक्षपद भूषवण्याची विनंती त्यांना शासनानं केली. त्यांनी ती स्वीकारली आणि आयुष्यभर जपलेली सारी मूल्यं तिथं रुजवण्याचा प्रयत्न केला. असाच एकदा मी पाचोऱ्याला ट्रेननं जात होतो. माझ्या समोरच्या सीटवर कुणीतरी सरकारी अधिकारी बसले होते. प्रवासात आमची ओळख झाली.

‘‘जनरल थोरातांशी आपला काही संबंध?’ त्यांनी विचारलं : ‘आहे. मी त्यांचा मुलगा.’’

तेव्हा त्यांनी मला हा किस्सा सांगितला : ‘तुमच्या वडिलांनीच माझी निवड केली. काय सांगू, मुलाखतीसाठी मी आत गेलो आणि भीतीनं माझी बोबडीच वळली. मुलाखत घेणाऱ्या समितीनं मला स्थिरस्थावर करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण सारंच व्यर्थ. आता आपलं काही खरं नाही असं मला वाटून गेलं.

नेमकं तेव्हा तुमचे वडील खुर्चीतून उठले आणि म्हणाले : ‘कम ऑन, यंग मॅन! चल, आपण एक फेरफटका मारून येऊ.’

नेमकं काय घडतंय ते मला कळत नव्हतं. मी चुपचाप त्यांच्या मागं गेलो.

‘नर्व्हस वाटतंय ना?’ मी फक्त मान डोलावली.

फ्लोरा फाउंटन इथल्या आयोगाच्या कार्यालयापासून ते रीगल सिनेमापर्यंत आम्ही फेरी मारली. परत आलो. मला जाणवलं की, मी एकदम रिलॅक्स झालोय. येताना वाटेत मी त्यांना म्हणालो होतो, ‘माझे वडील गावचे साधे पुजारी आहेत. ही जागा ‘इतर’ प्रवर्गातली आहे ना?’ त्यावर ‘बघू,’ इतकच ते म्हणाले.

पुन्हा मुलाखत सुरू झाली...निकाल आल्यावर बघतो तर निवड झालेल्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर माझं नावं! त्या जागी तुमचे वडील नसते तर माझी निवड झाली नसती.’

‘चुकीचं बोलताय तुम्ही,’ मी म्हणालो : ‘तुमची जितकी पात्रता होती तितकंच तुम्हाला मिळालं. कमी नाही की जास्त नाही.’

ते असे होते.

कोल्हापूरचा रहिवासी म्हणून त्यांना या शहराचा आणि इथल्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा प्रचंड अभिमान होता. एकदा त्यांच्याबरोबर फिरायला चाललो असताना सर्किट हाऊसच्या बाहेर कलेक्टर भेटले. एकमेकांना नमस्कार वगैरे झाल्यावर कलेक्टरनी सांगितलं की, ते कुण्या मंत्रिमहोदयांच्या भेटीसाठी थांबलेत.

‘छान. चालू द्या तुमचं,’ असं म्हणून वडील पुढं निघाले. आम्ही फिरून परत आलो तरी कलेक्टरसाहेब तिथंच उभे. वडिलांनी विचारायच्या आधीच ते म्हणाले : ‘अजून मंत्रिमहोदयांनी मला आत बोलावलेलं नाहीय!’

माझे वडील उत्तरले : ‘ठीक आहे. ‘मी माझ्या ऑफिसात बसलो आहे,’ असा निरोप पीएकडे द्या. साहेब मोकळे झाल्यावर मला फोन करावा...मी ताबडतोब येतो, असं त्यांना सांगा. इथं असं रस्त्यावर कशाला अवघडून उभे राहताय.’

कलेक्टरनी मान डोलावली खरी; पण त्यांनी तसं केलं असेल असं मला वाटत नाही. आता काळ किती बदललाय हे जनरलसाहेबांना ते कोणत्या शब्दांत सांगणार? आणि जरी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर त्यांना ते कळलं असतं असं मला वाटत नाही.

ते असे होते.

आज ते नाहीत; पण त्यांनी रुजवलेली मूल्य तशीत आहेत.

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

टॅग्स :saptarang