जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ है?

तिच्या हातातला मोबाईल खाली पडला आणि त्याबरोबरच मुलीविषयी तिनं जपलेल्या साऱ्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नंही कोसळली.
Hindi
HindiSakal
Summary

तिच्या हातातला मोबाईल खाली पडला आणि त्याबरोबरच मुलीविषयी तिनं जपलेल्या साऱ्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नंही कोसळली.

तिच्या हातातला मोबाईल खाली पडला आणि त्याबरोबरच मुलीविषयी तिनं जपलेल्या साऱ्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नंही कोसळली. मोबाईल सहज चाळत असताना तिचं मन सुन्न होऊन गेलं होतं. छातीत धडकी भरली होती आणि पायातलं अवसान गळून ते ‘जेली’सारखे झाले होते. तोल सावरू न शकल्यानं ती जमिनीवर कोसळली. पडत असताना ‘किचन आवरायचंय’ असा अतर्क्य विचार तिच्या मनात आला. थोड्या वेळानं तिनं मोबाईल उचलला आणि ती पुन्हा मेसेज पाहू लागली. तिची समजूत होती की, आधी जे दिसलं तो भ्रम असेल किंवा मनाचा खेळ असेल; पण ते मेसेज अजून जसेच्या तसे होते. जणू तिची थट्टा करत होते ते...

ती मेसेज जसजसे बघत गेली तसतशी कहाणी उलगडत गेली...पोरीच्या मनात निर्माण झालेली अनावर ओढ, छुप्या गाठी-भेटी, न शमलेली शरीरवासना आणि भविष्यातल्या भेटींची वचनं असं सगळं त्या अनेक मेसेजमधून तिला उलगडत गेलं. मेसेज अदृश्य व्हावेत अशी तिची मनोमन इच्छा होती; पण ते तिच्या पापण्यांना चिकटून राहिले.

ते मेसेज आरतीला, म्हणजे तिच्या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीला, आलेले होते. आणि पाठवणारा होता पन्नाशी गाठलेला तिचा शिक्षक - ज्याला ‘गुरुजी’ म्हणून आख्खं गाव आदरानं संबोधायचं. किमान वर्षभरापासून तरी दोघांत संबंध निर्माण झाले असणार हे स्पष्ट होतं. सुरुवातीचे मेसेज साधे-सरळ होते. तिचं कौतुक करणारे...ती मनानं चांगली आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती ‘रँकर’ होऊ शकते वगैरे... नंतर, तिचं हसणं किती गोड आहे, तिच्या सुंदर देहाला शाळेचा ड्रेस शोभत नाही वगैरे...त्यानंतर - शाळा सुटल्यावर विशेष कोचिंगसाठी थांबलीस तर तुझा फायदा होईल, असं सुचवणारे. आणि, एका महिन्यानंतर त्यांतली भाषा अधिक सलगी दाखवणारी, संबंध घट्ट झाल्याचे संकेत देणारी आणि पुनःपुन्हा भेटण्याची दोघांना ओढ लागल्याचं सुचवणारी होती. आणि त्यानंतर...त्यांच्यात वाढत चाललेल्या शरीरसंबंधांचे सगळे तपशील उघड करणारी...

शॉवर बंद झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिला ठाऊक होतं, काही मिनिटांत ताज्या फुलासारखी लेक हसत बाहेर येईल. मग नेहमीप्रमाणेच नाष्टा करेल, बाबांशी गप्पा मारेल, खेळेल, शाळेचं दप्तर, जेवणाचा डबा घेईल, ‘शाळेत सोड’ म्हणून मोठ्या भावाला सतावेल आणि हात हलवत सहज निघून जाईल. मूलच ते – सुंदर, चुणचुणीत आणि चांगली खेळाडू. तिच्याकडे पाहून शिक्षकाशी तिचे संबंध असतील यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही.

आरती वॉशरूममधून बाहेर यायच्या आत तिनं स्वतःला कसंबसं सावरलं आणि ती व्हरांड्यात गेली. नवरा पेपर वाचत बसला होता. त्यानं वर बघितलं आणि काहीतरी गडबड असल्याचं जाणवून ‘काय झालं?’ म्हणून विचारलं. तिनं त्याच्या हातात फोन दिला आणि मेसेज वाचायला सांगितलं. तो वाचू लागला तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले - सुरुवातीला उत्सुकता, मग अविश्वास आणि मग अचानक त्याचे ओठ घट्ट आवळले गेले. रागानं बेफाम होत त्यानं आत धाव घेतली आणि आरतीचे केस धरून तो तिला फरफटत बाहेर घेऊन आला. ती कोसळली. डोळ्यात डोळे घालून त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्याचीच लाडकी लेक - जिला त्यानं कधीच कशाला नाही म्हटलं नव्हतं, जिच्याबद्दल त्याच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना हेवा वाटायचा, जी आयएएस होणारी गावातली पहिली मुलगी ठरेल असं बोललं जात होतं...अचानक त्याच्या तळपायाची आग त्याच्या मस्तकात गेली आणि पुढचा अर्धा तास त्यानं काय केलं, देव जाणे...पण आई नसती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

रागाच्या तिरीमिरीतच तिला खेचत तो शाळेत गेला. ते तिघं - वडील, आई आणि मुलगी - चकित झालेल्या प्रिन्सिपलबाईंच्या खोलीत घुसले. त्यांच्यावर त्यानं आरोपांचा भडिमार केला आणि मोबाईलमधले मेसेज दाखवले. प्रिन्सिपलबाई हबकून गेल्या. हकीकत ऐकून आणि प्रत्यक्ष पुरावे पाहिल्यावर आपलाच घात झाला असल्याची त्यांची भावना झाली - आपल्याच एका ‘आदरणीय’ शिक्षक-सहकाऱ्याकडून आणि आरतीकडूनही. कारण, शाळेची ‘हेड गर्ल’ म्हणून तिचं नाव आदल्या दिवशीच्याच बैठकीत त्यांनी मंजूर केलं होतं. आरतीच्या वडिलांना शांत करण्याचे त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण व्यर्थ. दोन मागण्यांवर ते अडून बसले - ‘एक तर त्या शिक्षकाची ताबडतोब हकालपट्टी करा, नाहीतर मी त्याला बघून घेतो.’ शाळेच्या आवारात गंभीर परिस्थिती निर्माण होईल या भीतीनं प्रिन्सिपलबाई स्टाफरूममध्ये गेल्या, त्या शिक्षकाला त्यांनी बोलावून घेतलं आणि ‘ताबडतोब चालते व्हा’ असं सुनावलं.

‘‘त्याला तुम्ही डिसमिस केलं की नाही?’’ प्रिन्सिपलबाई परत येताच त्यांना वडिलांनी विचारलं.

‘‘मला मॅनेजमेंटशी बोलावं लागेल,’’ असं काहीसं गुळमुळीत उत्तर बाईंनी दिलं. ते भडकले : ‘‘वेळकाढूपणा कशासाठी? आत्ताच्या आता कारवाई झाली पाहिजे.’’

शेवटी मंडळी संस्थेच्या सीईओच्या - माझ्या मित्राच्या - ऑफिसकडे निघाली. घडलेली हकीकत तिथं पुन्हा सांगितली गेली आणि संबंधित शिक्षकाच्या बडतर्फीची मागणी करण्यात आली. सीईओ राजेश हा पालकांपेक्षा जास्त भडकला आणि त्यानं थेट पोलिस स्टेशनला फोन लावला. उत्तर आलं : ‘अपराध गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. रीतसर तक्रार द्या. त्वरित कारवाई होईल.’ एका सामाजिक गुन्हेगाराला सरळ करण्याच्या इराद्यानं राजेशनं ‘सगळा घटनाक्रम व्यवस्थित रेकॉर्ड करा,’ असं पालकांना सांगितलं; परंतु अचानक वाऱ्याची दिशा बदलल्याचं त्याच्या लक्षात आलं.

एका मिनिटापूर्वी गुन्हेगाराचा जीव घेण्याची भाषा करणारे वडील आता द्विधा मनःस्थितीत दिसत होते. पती-पत्नी आपापसांत काहीतरी कुजबुजले आणि ‘घडल्या प्रसंगावर विचार करायला थोडा वेळ द्या’ म्हणाले.

‘‘अवश्य’’ राजेशनं उत्तर दिलं. काही वेळानं तो परत आला तेव्हा त्या कुटुंबाची मानसिकता पार बदलून गेली होती. कोपऱ्यात थांबवून ठेवलेली मुलगी आता ‘शांत’ वाटत होती. शिक्षकाला तत्काळ बडतर्फ करण्याची आणि त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारे वडील नरमले होते आणि

‘या शाळेतून त्याची दुसरीकडे बदली करा’ एवढंच आता त्यांचं म्हणणं होतं. आरतीच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव कळण्यापलीकडचे होते. राजेशचा स्वतःच्याच डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता.

‘‘अहो, पण मुलीचं नुकसान झालंय त्याचं काय?’’ त्यानं विचारलं.

‘‘गैरसमज झाला होता; तिचा बालिशपणा आणि आमचा उतावीळपणा. बाकी काही नाही,’’ ते म्हणाले.

‘‘आणि प्रकरणाचा पुरावा असणारे ते मेसेज?’’ तो पुन्हा म्हणाला.

‘‘कोणते मेसेज? हे बघा’’ त्याच्या हातात मोबाईल देत आई म्हणाली.

मोबाईल एकदम ‘साफ’ होता. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला तो आक्षेपार्ह पुरावा नाहीसा झाल्याचं पाहून राजेश चाट पडला.

प्रकरण तिथल्या तिथंच मिटवण्याचा उद्योग झाला असल्याचं त्याच्या लक्षात आलं. गोष्ट बाहेर फुटली तर गावात आपली अब्रू जाईल, आपल्याला वाळीत टाकलं जाईल आणि नंतर कोणतंही चांगलं घराणं आपल्या मुलीला सून करून घेणार नाही हे आई-वडिलांच्या ध्यानात आलं असावं. त्यामुळे सत्याच्या पाठीशी उभं राहून त्या शिक्षकाला वठणीवर आणण्याऐवजी त्यांनी सपशेल माघार घेतली होती आणि कातडीबचाऊ धोरण स्वीकारून प्रकरण तिथल्या तिथंच संपवलं होतं.

राजेश मात्र कणखर बाण्याचा होता. असल्या शिक्षकाला आपल्या संस्थेत न ठेवण्याचा निर्धार करून त्यानं बडतर्फीचे आदेश दिले; परंतु ‘रीतसर तक्रारीअभावी आणि पुराव्याअभावी तडकाफडकी कारवाई करता येणार नाही,’ असं त्याच्या कार्यालयानं त्याला सांगितलं. कारण, संबंधित शिक्षक हा अनुदानित पदावरचा (ग्रॅन्टेबल पोस्ट) असल्यानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या नियमांचं पालन करणं भाग होतं.

‘‘याचा अर्थ, तो शिक्षक मोकाट सुटणार आणि नंतरच्या काळातही अजून कुणाला तरी बरबाद करणार,’’ राजेश म्हणाला.

‘‘शिक्षेच्या ठिकाणी त्याची बदली करता येईल,’’

त्याला उत्तर मिळालं.

ती मुलगी, तिचे आई-वडील आणि सबंध समाजानं त्या दिवशी आपल्यावर सहजपणे मात केली असं राजेशला वाटलं असल्याचं त्यानं मला सांगितलं.

सगळा खेळच खलास. एकंदरीत व्यवस्थेवरचाच त्याचा विश्वास उडाला आणि आपण हरल्याची त्याची भावना झाली.

खरं तर ही कहाणी इथंच संपवावी अशी माझी इच्छा होती. तुम्हाला कदाचित् त्या पालकांच्या वागण्याची चीड आली असती. कारण, त्या शिक्षकाला वठणीवर आणायचं सोडून त्यांनी सत्याकडे डोळेझाक केली किंवा आपल्या असहाय्य ‘व्यवस्थे’चा तुम्हाला राग आला असता, जी साक्षीपुरावे नष्ट झाले म्हणून घडणाऱ्या अन्यायाची फक्त मूक साक्षीदार बनते. मात्र, काही काळानंतर नवीन बातम्यांनी तुमचं लक्ष वेधून घेतलं असतं; पण मला तसं होऊ द्यायचं नाहीय; कारण, असं शांत होणं एक दिवस खूप महागात पडेल. आरती हे एकच उदाहरण नाही. भारतातील ४४४ दशलक्ष किशोरवयीन मुलांना असलेल्या संभाव्य धोक्याचं ती प्रतीक आहे. तुमची-माझी मुलंही यात आलीच. आणि, म्हणून जोपर्यंत आपण सर्वजण अशा प्रकरणाच्या बाबतीत पुरेसे संवेदनशील होत नाही तोपर्यंत आपण जागे होणार नाही, उठणार नाही आणि कृती करणार नाही.

हा आरसा आहे, पाहा :

जगाचा विचार करता अंदाजे ७.९ टक्के मुलांना आणि १९.७ टक्के मुलींना वयाची अठरा वर्षं पूर्ण होण्याच्या आधीच लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं. आणि, आपल्या भारताचं काय? आपल्या देशाच्या ‘महिला आणि बालविकास मंत्रालया’च्या एका अभ्यासात, १३ भारतीय राज्यांमधील १२५,००० मुलांची मुलाखत घेण्यात आली. त्यातून असं उघड झालं की, त्यातल्या ५३ टक्के किशोरवयीन मुला-मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला सामोरं जावं लागलं, ज्यात ५० टक्के लैंगिक अत्याचाराचा सामावेश होता. या अभ्यासातून असंही दिसलं की, बहुतेक वेळा गैरवर्तन करणारे लोक मुलांच्या ओळखीतले तर होतेच; पण मुख्य म्हणजे, ते त्यांच्या विश्वासातले आणि त्यांना आदरस्थानी होते. काहीतरी आमिष दाखवून या प्रतिष्ठित लोकांनी मुलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. खरं तर, हा अभ्यास एका दशकापेक्षा जास्त जुना आहे. त्यानंतरच्या स्थितीत मूलभूत सुधारणा झाली असेल अशी आशा ठेवता आली असती; परंतु तसं घडलेलं नाही.

या सामाजिक समस्येकडे सरकार नुसतं पाहत राहिलंय असं नाही. सन २०१२ ला ‘लैंगिक अपराधांपासून बालसंरक्षण अधिनियम (POCSO)’ हा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार, अठरा वर्षांखालील प्रत्येकास ‘मूल’ मानलेलं आहे आणि त्याच्याशी केलेला लैंगिक गैरव्यवहार किंवा अत्याचार हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूदही आहे. यात असंही आहे की, एखाद्या मुलाच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा संशय आला तर पोलिसांकडे तक्रार करणं संबंधित नागरिकांचं कायदेशीर कर्तव्य आहे. ते पार पाडलं नाही तर तुरुंगवासदेखील घडू शकतो.

मात्र, शेवटी कायदा कायद्याच्या ठिकाणी आणि वास्तव दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती असते. दोहोंमधलं अंतर वाढतच चाललेलं आहे ही चिंतेची बाब आहे. अलीकडे शाळांमधल्या लैंगिक शोषण प्रतिबंधक तरतुदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी भारतातील २०० शहरांतल्या १,६३५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. ज्याची भीती होती नेमकी तीच गोष्ट या सर्वेक्षणातून पुढं आली : बहुतेक शाळांमध्ये बाललैंगिक शोषणाचा सामना करण्यासाठी कसलीही व्यवस्था नाही. तिथं शिकणाऱ्या मुला-मुलींना POCSO कायद्याबद्दल साधी माहितीदेखील दिली जात नाही, लैंगिक शोषणासंबंधी कार्यशाळा घेऊन जागरूकता निर्माण केली जात नाही किंवा प्रत्यक्ष घडणारी ताजी प्रकरणं हाताळण्यासाठी लैंगिक छळप्रतिबंधक समित्याही स्थापन केल्या गेलेल्या नाहीत.

आणखी एक गोष्ट म्हणजे, चुकीच्या नैतिकतेची कल्पना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे, हे आपण मान्य करायची वेळ आता आलेली आहे. लैंगिक छळाचा सामना करण्याच्या पद्धती मुलांना समजावून सांगण्याऐवजी आपल्या समाजातील मोठ्या गटाला आजही असं वाटतं की, लैंगिकतेबद्दल बोलल्यानं किशोरवयीन मुलांची मनं भ्रष्ट होतील. मात्र, सत्य हे आहे की, वस्तुस्थितीला सामोरं जाण्याऐवजी आपण तिच्याबद्दल नुसती चर्चा करतो, कृती नाही.

बाललैंगिक छळ रोखण्यासाठी उपाययोजना तर अनेक सुचवल्या जातात: अत्याचारापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान मुलांना दिलं पाहिजे, असं वारंवार सागितलं जातं. त्यांना स्वसंरक्षणाची कौशल्यं शिकवली गेली पाहिजेत, असंही सगळेच जण म्हणतात. शिक्षकांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी नीट तपासली जावी आणि कोणत्याही परिस्थितीत बाल-अत्याचार हा खपवून घेण्याचा विषय नाही अशी परिपत्रकं निघतात...अशा कितीतरी गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणावर होतच असते. या विषयावरच्या विविध कार्यशाळा, चर्चासत्रं आणि परिषदा घेतल्या जातात. लोकही त्यांना हजेरी लावतात, चहापान करतात आणि घरी जातात. यातल्या किती गोष्टी प्रभावी ठरल्या? एक समाज म्हणून आपण हा प्रश्न विचारलाच पाहिजे.

ता. क.

शाळेतील त्या घटनेचा राजेशवर सखोल परिणाम झाला. आपण व्यवस्था बदलू शकत नाही आणि तिच्यासह नीट राहूही शकत नाही हे ओळखून त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो आपल्या गावी निघून गेला. एका वर्षानंतर आपल्या तीन वर्गमित्रांसह त्यानं ‘उम्मीद’ नावाची शाळा सुरू केली. त्यानं असं करण्यामागची कारणं शोधत असताना मला नोबेलविजेते प्रोफेसर मोहंमद युनूस यांचे उद्गार आठवले. एकदा मला ते म्हणाले होते : ‘‘डॉ. थोरात, मी ग्रामीण बँक का सुरू केली हे माहितीय? कारण, तत्कालीन व्यवस्थेत तारणाच्या शाश्वतीशिवाय गरिबांना कर्ज मिळण्याची कोणतीही आशा नव्हती हे माझ्या ध्यानात आलं.’’ कदाचित्, तशाच प्रकारे राजेशलाही कळून चुकलं असावं की, जोवर आपण निराळ्या वातावरणाची शाळा सुरू करत नाही तोवर आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही. त्यानं खूप विचार केला आणि एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की, या कामात यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, अशा परिस्थितीला बळी पडलेल्या मुला-मुलींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढं येणं.

ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे ते धैर्यानं आणि निश्चयानं उभे राहिले तरच आणि त्याबद्दल मोकळेपणानं बोलू लागले तरच समाजमानसात शरमेची भावना निर्माण होईल आणि त्यातून सामूहिक कृती करणं त्याला भाग पडेल. यातून ‘उम्मीद सखी’ हा स्वयंसेवकांचा गट स्थापन झाला. यात लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुलं-मुली आणि त्यांचे पालक सहभागी झाले आणि खेड्यापाड्यात जाऊन त्यांचे अनुभव सांगू लागले. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. कारण, त्यांना जे सांगायचं होतं ते ऐकण्याची लोकांची मानसिकता नव्हती; पण हळूहळू एका लहानशा ओघळाचं रूपांतर ओढ्यात झालं आणि नंतर त्याची नदी झाली.

हे खरंय की प्रत्येक समाज - आणि प्रत्येक व्यक्तीसुद्धा - अशा गोष्टी लपवून ठेवतो, ज्या उघडकीस आणण्याचं त्याचं धाडस नसतं; पण सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर जेव्हा न घाबरता, न लाजता आपण स्वतःला आरशात पाहण्याची क्षमता प्राप्त करून घेतो तेव्हाच आपली प्रगती होते.

मी एक आशावादी माणूस आहे. मला असं वाटतं की, ज्याप्रमाणे अज्ञात सैनिक नियंत्रणरेषेवर गस्त घालतो म्हणून आपण इकडे शांतपणे झोपतो, त्याचप्रमाणे आपली मुलंही त्यांच्या सुरक्षेसाठी त्या एका आदर्शवादी तरुणावर विसंबून राहतील, ज्यानं पीडित मुलांना आशेचा किरण दाखवणारी एक सामाजिक चळवळ निर्माण केली, जिचा जन्मच मुळी निराशेतून झाला होता.

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com