साधा माणूस

जग आणि जगातली माणसंही जशी आहेत तशीच त्याला प्रिय होती – जे आपल्यातल्या अनेकांना जमत नाही. त्याच्या आशा-आकांक्षा माफक आणि गरजा मोजक्या होत्या. मात्र, एक गोष्ट त्याच्यात विलक्षण होती.
Friends
Friendssakal

हा लेख तुम्ही वाचू नका! हा कुण्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दलचा किंवा महत्त्वाच्या घटनांबद्दलचा लेख नाही. प्रेरणादायी विचार किंवा जगात कसं वावरावं याचं मार्गदर्शन यात मिळणार नाही. मुळात हा लिहिलाच कशाला, असा प्रश्न तुम्हाला पडण्याची दाट शक्यता आहे.

तरीदेखील हा लेख वाचायचाच असेल तर आधीच बजावून ठेवतो : एका साध्या माणसाची ही साधी गोष्ट आहे. असा ‘आम आदमी’, ज्याला तुम्ही चुकून कुठल्या पार्टीत भेटलात तर पाचच मिनिटांत विसरून जाल. या नायकानं काळाच्या पटलावर कसलीही छाप उमटवली नाही; त्याचा जगाच्या घडामोडींवर काही प्रभाव पडला नाही. आणि, तरीही तो जन्मजात सज्जन माणूस होता. जसा आहे तसा खूश होता.

जग आणि जगातली माणसंही जशी आहेत तशीच त्याला प्रिय होती – जे आपल्यातल्या अनेकांना जमत नाही. त्याच्या आशा-आकांक्षा माफक आणि गरजा मोजक्या होत्या. मात्र, एक गोष्ट त्याच्यात विलक्षण होती – समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या तो कामी यायचा. मीही त्यापैकी एक होतो. ही वस्तुस्थिती आहे.

साठ वर्षांपूर्वी होस्टेलवर सोबती म्हणून आम्ही भेटलो. तेव्हापासून शेवटपर्यंत तो एक सच्चा आणि अढळ मित्र राहिला. मीच मैत्री निभावण्यात कमी पडलो. यशाची शिडी चढायला लागलो तसं लक्ष इतरांकडे वळलं. कितीही मुलामा चढवला तरी पितळ शेवटी पितळच असतं हे कळलं तेव्हा उशीर झाला होता. सुरुवातीच्या काळात तो एका केमिकल कॉम्प्लेक्समध्ये छोटीशी लॉरी-सेवा चालवायचा.

तेव्हा घेतलेल्या विषारी धुराच्या झुरक्यांनी त्याची फुफ्फुसं निकामी झाली होती. आपल्या आजाराबद्दल तो फारसा बोलायचा नाही. चौकशी केली तरी गांभीर्यानं घ्यायचा नाही. वाट्याला आलेला भोग त्यानं शांतपणे भोगला आणि एके दिवशी चुपचाप निघून गेला. त्याची तब्येत झपाट्यानं ढासळत असल्याचं बाळनं मला सांगितलं.

स्वतःला दोष देत मी त्याला फोन केला : “अरुण, मी बोलतोय”

" कसे आहात, दादा?" तो म्हणाला.

आवाज क्षीण आणि निर्जीव वाटत होता. त्याच क्षणी मला कळून चुकलं की, तो फार दिवस जगणार नाही.

“वेळ मिळाला तर येऊन जा. गप्पा मारून फार दिवस झाले,” तो म्हणाला.

“प्रश्नच नाही,” मी म्हणालो : “अगदी ताबडतोब”.

पण मला चांगलं ठाऊक होतं की, पूर्वीसारखंच मी ऐनवेळी जायचं टाळणार. मीनाला - माझी सेक्रेटरी - काहीतरी पटेल असं कारण सांगायला लावणार. अरुणच्याही ते लक्षात येणार आणि तरीही त्यावर तो काहीतरी विनोद करणार : “मीनाताई, साहेबांना सांगा की, वसूनं केलेलं सुक्कं आणि रस्सा आता मला एकट्यालाच खावा लागणार!”

काही झालं तरी पुढच्या वेळी नक्की जायचं असं म्हणून मी मनाची समजूत घालायचो. या वेळची गोष्ट वेगळी होती. अचानक त्याचा आवाज ऐकल्यानं आजवर घडलेल्या चुकांची झालेली जाणीव आणि पश्चात्तापाच्या ओझ्याखाली मी दबून गेलो. वाटलं, तिथल्या तिथंच त्याला सांगावं : “मित्रा, झाल्या गोष्टीबद्दल मी दिलगीर आहे, माफ कर. तू मला आदर्श मानत होतास; पण मानवतेच्या दृष्टीनं तू श्रेष्ठ आहेस.” पण गेला क्षण हातून निसटला आणि हे सगळं सांगण्याच्या आधीच तो, मित्र म्हणून अपयशी ठरल्याच्या गुन्ह्यातून मला मुक्त करण्यापूर्वीच, निघून गेला.

फोन खाली ठेवत असतानाच त्याच्या आठवणी एलिएटच्या शब्दांसोबत मनातल्या मनात उफाळून आल्या :

पावलांचे आवाज घुमताहेत आठवणीत आपण न चाललेल्या रस्त्यावर कधीच न उघडलेल्या दरवाजाच्या दिशेनं गुलाबाच्या बागेत…

पहिली भेट : गोखले कॉलेजचं होस्टेल...१९६३. होस्टेल लाईफ...सगेसोबती...जुगाई येळवणचं जंगल आणि उसाचे मळे...गजापूरचं तारांकित आकाश - डोक्यावर छत असावं तसं...त्याच्या घरामागं खळाळणारा ओढा आणि येणारा सुक्क्या-तांबड्याचा खमंग वास...जंगलातली भटकंती... शिकार...झुणका-भाकरीची झणझणीत चव...सोबत बुक्कीनं फोडलेला कांदा...त्याची खटारा ‘बँटम मोटर सायकल’ आणि हेडलाइट नसताना रात्रीच्या वेळी आंबाघाटातून चाळीस मैलांची रपेट...‘गोखले पुरस्कार’ मिळाल्यावर त्यानं मारलेल्या मिठीतली प्रेमाची ऊब...मुंबईला ताईकडे एकत्र काढलेले दिवस...

मी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं कळताच त्याच्या डोळ्यांतला अभिमान आणि आनंदाश्रू... पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी – नागपूरला – त्याचं सोबत येणं आणि तिथं सेटल होण्यासाठी मदत करणं...नोकरीचा सुरुवातीचा काळ...त्यातले दबाव आणि मग नकळतपणे हळूहळू आमचं विलग होणं...मुंबईतली त्याची सुरुवातीची धडपड आणि नंतर ‘नवी मुंबई क्लब’चा प्रतिष्ठित सचिव म्हणून त्याचा झालेला उदय...आणि, आता तो सगळ्यातून मुक्त! मी खजील...

आठवणी नेमक्या काय असतात? त्या बनतात कशापासून? नोकरीतले महत्त्वाचे प्रसंग, थोरा-मोठ्यांच्या भेटी-गाठी, त्या त्या वेळी महत्त्वाची वाटणारी कामगिरी हे सगळं कधीच धूसर झालेलं असताना नेमक्या याच आठवणी अजूनही ताज्या आणि ठसठशीत कशा? शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा होता; पण मला विज्ञान शाखेत घालण्यात आलं.

मी माझ्या परीनं विरोध केला; पण उपयोग झाला नाही. तासांना दांड्या मारू लागलो आणि वर्षाच्या शेवटी नापास झालो. त्या धक्क्यातून सावरल्यावर घरच्यांनी माझी रवानगी कोल्हापूरला केली आणि ‘कला’ शाखा घेण्याची परवानगी दिली...अपेक्षित प्रगती करून दाखवण्याची तंबी देऊन.

अशा काहीशा ‘काळ्या’ पार्श्वभूमीवर आमची मैत्री झाली. गोखले कॉलेज होस्टेलवर – शहराबाहेर असलेल्या एका लहान आणि पडक्या इमारतीत. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी तिथं यायचे. तेव्हा कोल्हापूर म्हणजे राजेशाही भूतकाळातून हळूहळू बाहेर पडू लागलेलं छोटंसं शहर होतं.

त्याचा दृष्टिकोन इतिहासातून आलेला, मानसिकता सरंजामशाहीची आणि वातावरण ग्रामीण, मराठा आणि पुराणमतवादी. छत्रपती शाहूमहाराजांच्या दूरदर्शी आणि प्रेरणादायी प्रयत्नांमुळे शिक्षणाच्या आणि शेतीच्या आधुनिक पद्धतींचा वापर सुरू झाला होता. तरी कोल्हापूरला अजून बराच पल्ला गाठायचा होता.

अरुणचे वडील - ''बापू'' - स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले आणि कडव्या विचारांचे. तरुणांनी कसं वागावं याबाबतीत त्यांचे मापदंड काहीसे जुनाट. वडिलांच्या विचारांनुसार वागण्याचा अरुणनं खूप प्रयत्न केला; पण जमलं नाही . त्यामुळे त्यांच्या संतापाचा तो धनी झाला. त्यातच आम्हा दोघांतल्या संवादाचा परिणाम म्हणून त्याला वाटू लागलं की, चिकित्सा न करता जगणं हे तर्कसंगत वर्तनाच्या विरुद्ध आहे. यातून झालेल्या संघर्षाचा त्रास पुढची अनेक वर्षं त्यानं भोगला.

माझं इंग्लिशचं ज्ञान, वेगवेगळ्या विषयांतली समज, संवाद साधण्याची आणि सर्वांच्यात सहजतेनं मिसळण्याची क्षमता...दुसऱ्या शब्दांत, माझा जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे तो दिपून गेला होता. या गोष्टी उथळ आहेत हे त्याला समजावून सांगण्याचे मी खूप प्रयत्न केले; पण व्यर्थ. त्याची ग्रामीण पार्श्वभूमी आणि अशक्य वाटणाऱ्या यशाच्या आकर्षणामुळे त्याच्यातला आत्मविश्वासाचा अभाव अधिकच गहिरा झाला. माझी स्थिती फारशी वेगळी नव्हती.

इकडे मी मोठ्या बापाच्या गर्द सावलीत वाढत होतो आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत होतो; परंतु वस्तुस्थिती अशी होती की, मी जे काही करेन त्यात त्यांच्या दृष्टीनं कमीच पडायचो. प्रतिक्रिया म्हणून, संयमाची नव्हे तर; बंडखोरीची भावना माझ्यात बळावली. दुसरी अडचण म्हणजे माझी जन्मभाषा, स्थानिक इतिहास, संस्कृती आणि सोबत्यांची मानसिकता या सगळ्या गोष्टींबद्दलचं माझं अज्ञान. या दोन्ही गोष्टींमुळे मला परकं वाटायचं. फार परकं.

आज मागं वळून पाहताना वाटतं की, आम्हा दोघांच्या अंतर्मनातली भीती, आव्हानांची जाणीव, काही तरी मोठं करून दाखवण्याची ऊर्मी आणि आपण जे आहोत आणि आपल्याला जे बनायचंय या दोहोंत खूप अंतर असल्याची जाण...या सगळ्यांमुळे आम्ही जवळ आलो. माझा त्याला फारसा उपयोग झाला असेल असं वाटत नाही; पण, त्यानं मात्र मला मार्ग दाखवला – कोल्हापूरातल्या उच्चभ्रू समाजातून जाणारा नव्हे तर, सर्वसामान्यांच्या घरात आणि हृदयात जाणारा.

मी एका वेगळ्या जगातून आलोय हे होस्टेलच्या सोबत्यांना ठाऊक होतं; पण मोठ्या मनानं त्यांनी मला आपलं मानलं. भाषेची अडचण होती; पण अरुण म्हणाला : “मराठी शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मराठीतच बोलणं – चूक असो, बरोबर असो.'

मी कचरायचो... पण अरुण म्हणायचा : “इंग्लिशमध्ये बोलताना आमचीही गत सारखीच होते हे लक्षात येत नाही का?” काहीजण - किंवा कदाचित सगळेच - तुझ्या मराठीला हसतील; परंतु तू किती सच्चा आहेस हे एकदा त्यांना कळलं की, अंगावर ब्लेझर आणि टाय असला तरी ते तुला स्वीकारतील. आणि, तसंच झालं.

एका मित्रानं पहिल्यांदा घरी बोलावलं तेव्हा अरुणनं बजावलं : “उद्या खरी परीक्षा आहे. पाहुणा आहेस, असं वाटू देऊ नकोस. बिनधास्त मिसळ आणि एकरूप होऊन जा. नाहीतर कायमच परका राहशील. शिकवणीची सुरुवातच सकाळचे विधी ''उघड्यावर'' उरकण्यापासून झाली. मी घाबरलो होतो. तो मात्र बेफिकीर.

“उठा दादा”, तो म्हणाला : “इथं बेड टी वगैरे काही नाही. हे घ्या टमरेल; भरा पाणी आणि जगातल्या सर्वात ऐसपैस वॉशरूममध्ये चला. मजा येईल.”

आणि खरंच मस्त वाटलं!! नंतर नदीत आंघोळ करण्याच्या बाबतही तसंच. तसा मी पोहण्यात कच्चा; पण वाहत्या पाण्याचं तंत्र कळल्यावर निर्जंतुक स्विमिंग पूलमध्ये पोहण्यापेक्षा – ज्याची मला सवय होती – हा अनुभव मला खूपच छान वाटला. जेवण हेसुद्धा एक आव्हान होतं – खास करून तिखट...पण एकदा त्याची सवय झाल्यावर झणझणीत सुक्कं आणि तवंगाशिवाय रस्सा ओरपणं शक्यच नव्हतं. आजही.

अरुणचा सल्ला एकच होता : ''तुझं शिक्षण कुठंही झालेलं असेल किंवा तुझे वडील कुणी का असतील... तू या मातीतला आहेस, हे विसरू नकोस.'' इथले लोक म्हणजे तू आणि तू म्हणजेच इथले लोक. या शिक्षणाचा परिणाम म्हणून माझ्यात नकळत जसजसा बदल होऊ लागला तसतसा मी स्वतःला सावरू आणि ओळखू लागलो.

कालांतरानं, ज्या ज्या घरात मला बोलावलं गेलं ते प्रत्येक घर माझं झालं. अडथळे नाहीसे झाले. धुरानं भरलेल्या स्वयंपाकघरात जाऊन मी आयाबायांत मिसळू लागलो... हास्यविनोद करू लागलो...मळ्यात बसून पुरुषमंडळीसोबत माझ्या ‘आंतरराष्ट्रीय मराठी’तून शेतीवर आणि राजकारणावर गप्पा मारू लागलो आणि लहान मुलांच्या संगतीत त्यांच्याइतकाच लहान होऊन गेलो...ठिकाणं बदलली, घरातली अंतर्गत सजावटही.

कुठं जोतिबाचे फोटो, कुठे येशूचे, तर कुठं कुराणातल्या ओळी, तर कुठं चिखलमातीच्या खोल्या, तर कुठं सिमेंट-विटांच्या. कुठं गोरगरिबांची, वंचितांची वस्ती, तर कुठं धनदांडग्यांची... पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान – विशाल आणि खुलं मन. याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला.

जसजसा परिपक्व होत गेलो तसतसं जाणवलं की, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू–वंचित, मराठा-मुस्लिम, ब्राह्मण- अब्राह्मण ही तटबंदी म्हणजे पूर्वी कधीतरी विशिष्ट सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केली गेलेली रचना आहे; परंतु स्वतंत्र राष्ट्र म्हणून नवी ओळख प्राप्त करू लागलेल्या भारतामध्ये ती कालबाह्य झालेली आहे. असल्या कृत्रिम सीमारेषा सर्वसमावेशक राष्ट्रीय ‘व्हिजन’साठी अडथळा आहेत. म्हणून, ‘मनुष्य’ होण्यासाठी आणि माणुसकी जपण्यासाठी स्वतःशीच लढाई लढावी लागेल. हा अरुणचा वारसा. आज तो नाही.

मैत्री काय असते हे समजावून सांगणं खूप कठीण. ठरवून, हेतुपूर्वक आत्मसात करावी अशी ही गोष्ट नाही; परंतु तिचा अर्थ किंवा महत्त्व समजून घेण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही काहीच शिकला नाहीत असं समजा. आतली ऊर्जा क्षीण होण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते.

माझ्यातली चेतना मालवली जाण्यापूर्वी ती पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी अरुण माझ्या आयुष्यात होता, याबद्दल मी मी कृतज्ञ आहे. याचा अर्थ, आमच्या मैत्रीत चढ-उतार आलेच नाहीत, असं समजू नका. ती कुंठित झाली आहे की काय असं वाटावं असाही काळ कधी कधी आला.

बाह्य परिस्थितीमुळे आमच्यात संघर्ष झाले आणि आम्हाला वाटलं की, आम्ही एकमेकांपासून लांब जात आहोत...पण तसं नव्हतं. आम्ही वेगळे झालो नव्हतो; वेगवेगळे वाढत होतो. त्याहून दुसरं काही शक्य नव्हतं. कारण, प्रदीर्घ काळ आम्ही एकत्र वाढलो होतो – एकमेकांच्या सोबतीनं. आमची मुळं सदैव एकमेकांत गुंतलेली होती.

‘अरे बाप रे! किती वेळ वाया गेला...!’

स्वतःशीच तुम्ही म्हणाल. तसं झालंही असेल कदाचित्; पण हे मुळात तुमच्यासाठी लिहिलंच नव्हतं! मी हे लिहिलं; कारण, माझं अंतःकरण, त्यातले उमाळे हे सगळं लिहिण्यासाठी मला भाग पाडत होते. म्हणत होते : खूप उशीर व्हायच्या आधी, एका सामान्य व्यक्तीचं खासगी ऋण तू व्यक्त करायला हवंस... – अगदी जाहीरपणे!

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com