डाव्या-उडाव्या विचारांची उत्कंठा वाढवणारी जुगलबंदी!

नाटक : चर्चा तर होणारच
रंगभूमी
रंगभूमीsakal

डाव्या आणि उजव्या विचारांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यात श्रेष्ठ कोण, यासाठी स्पर्धा लढवली गेल्याचे नाटक म्हणजे ‘चर्चा तर होणारच’. दोन कार्यकर्ते आणि तिसरा परीक्षक अशा तिघांच्या अभिनयाने रंगलेले नाटक विचारवाही संघर्षासह उत्कंठा वाढवणाऱ्या कथासूत्रात रसिकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.

रंगनील व वेद प्रॉडक्शन्सचे अलीकडेच रंगभूमीवर आलेले हेमंत एदलाबादकर लिखित आणि दिग्दर्शित ‘चर्चा तर होणारच!’ हे नाटक नाट्यरसिकांना वैचारिक चर्चेची मेजवानी देणारे आहे. ‘प्रपोजल’ नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग एकत्र केल्यानंतर एका मोठ्या ब्रेकनंतर अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या दोघांत वैचारिक जुगलबंदी घडवून ‘तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो’च्या भूमिकेत क्षितिज झारापकर यांनी यथोचित सोबत दिली आहे.

पडदा उघडतो तेव्हा एक गृहस्थ फोनवर बोलत असतो. बंगल्याचे वर्णन करत जुजबी ओळख करून देतो. कुणाची तरी प्रतीक्षा करत थांबला असतानाच सत्यशील (आस्ताद काळे) प्रवेश करतो. त्याचे स्वागत करतानाच तो गृहस्थ स्वत:ची दिग्विजय देशपांडे अशी ओळख करून देतो. थोड्या वेळातच मृणाल (अदिती सारंगधर) त्या बंगल्यात पोहचते. या दोघांनाही देशपांडे यांनीच या बंगल्यावर बोलावलेले असते.

समाजसेवेसाठी एका अमेरिकन एनजीओचा पुरस्कार द्यायचा आहे; पण या दोन कार्यकत्यांपैकी एकालाच. त्यांच्यापैकी श्रेष्ठ कोण, हे दोघांनाही सिद्ध करून दाखवायची स्पर्धा सुरू होते. कारण त्या स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या माहितीवरून दोघांचेही काम तोडीस तोड आहे.

त्यामुळे एकाची निवड करण्यासाठी वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेऊन दोघांपैकी पुरस्कार कुणाला द्यायला हे त्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून देशपांडे ठरवणार असतो. या स्पर्धेच्या काही अटी आणि शर्ती सांगितल्यानंतर ही वैचारिक जुगलबंदी रंगत जाते. कथानक वळणे घेत आश्चर्यचकित करते.

मृणाल ही डाव्या चळवळीतील वेश्यांच्या मुलांचा सांभाळ करणारी कार्यकर्ती. ती वंचित महिलांच्या हक्कासाठी लढते. सत्यशील उजव्या विचारसरणीत काम करणारा कार्यकर्ता. त्याची प्रिंटिग प्रेस आहे.

त्यात तो धार्मिक पुस्तके छापून चळवळीत काम करतो. हे दोघेही कार्यकर्ते रंजल्या-गांजल्यांच्या मदतीला धावून जाणारे आणि प्रत्यक्ष आंदोलन करून लढणारे. आपापली विचारधारा रेटून एकमेकांची उणीदुणी काढत हे चर्चानाट्य घडवण्यासाठी देशपांडेची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज झारापकरने आपले कसब अधोरेखित केले आहे.

चर्चानाट्य असले, तरी त्यातील संवादातून, देशपांडेला येणाऱ्या फोनकॉलवरून ही स्पर्धा कोण जिकणार, या उत्सुकतेने नाट्यावकाश समृद्ध झाला आहे. त्यासाठी अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांनी त्यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे. वैचारिक, भावनिक, राजकीय विचारधारेच्या जुगलबंदीचा आलेख टप्प्याटप्प्याने वर गेला आहे.

अदिती आणि आस्तादच्या अनुभवी अभिनय सामर्थ्याचा रंगप्रयोग पुन्हा एकदा आखीवरेखीव झाला आहे. रंगनील व वेद प्रॉडक्शन निर्मित, आर्या व्हिजन प्रस्तुत ‘चर्चा तर होणारच’ या नाटकासाठी राहुल रानडे (संगीत), अमोघ फडके (प्रकाशयोजना), संदेश बेंद्रे (नेपथ्य) आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा महत्त्वाची ठरली आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या निर्मात्यांना कोरोनानंतर ठप्प झालेल्या नाट्य व्यवसायासाठी ‘चर्चा तर होणारच’ बूस्टर डोस ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com