सदाबहार... १९८३!

सन १९८३ मध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यावर तयार झालेला चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. ‘८३’.
1983 world cup
1983 world cupSakal
Summary

सन १९८३ मध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यावर तयार झालेला चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. ‘८३’.

सन १९८३ मध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यावर तयार झालेला चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. ‘८३’.

चित्रपटाद्वारे त्या गोड, सुखद, सोनेरी आठवणी पुन्हा जागवल्या जातील. खरं तर माझ्या मनात त्या सदैव जाग्याच आहेत, त्यामुळे त्या पुन्हा जाग्या होण्याचा माझ्यापुरता तरी प्रश्नच नाही. त्या आठवणींचं झाड सदाफुलीप्रमाणे नेहमीच फुललेलं असतं.

कारण, त्या वेळी मी तिथं होतो.

माझा तो पहिलाच परदेशदौरा. मी आदल्या वर्षी दिल्लीत एशियाड स्पर्धा कव्हर केल्या होत्या. इंजिनिअरिंग सांभाळत त्या वेळी मी क्रीडालेखनात रांगत होतो. पाळण्यातून थेट इंग्लंडला जाईन ही कल्पनाही मला नव्हती; पण ‘क्रीडांगण,’ ‘लोकप्रभा’ या दोन नियतकालिकांनी पंख दिले आणि मी उडून थेट ‘हिथ्रो’वर पोहोचलो. पहिल्या गोष्टी माणूस सहसा विसरत नाही. तो माझा पहिलाच विमानप्रवास होता. तोही अशा शहराकडे की, ज्या शहराबद्दलचं आकर्षण मी अनेक वेळा तिथं जाऊनही कमी झालेलं नाही. ते शहर म्हणजे अर्थातच लंडन.

मी तिथं पोहोचलो तेव्हा भारताची एक मॅच होऊन गेली होती. तीत काय झालं मला कल्पना नव्हती. हिथ्रो विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन ऑफिसरनं मला नेहमीचे प्रश्न विचारले आणि मग विचारलं, ‘‘हा वर्ल्ड कप कोण जिंकेल असं तुला वाटतं?’’

मी म्हटलं : ‘‘वेस्ट इंडीज किंवा इंग्लंड.’’

त्या ऑफिसरला स्टॅम्प मारण्यासाठी किंचित खूश करण्याचा तो प्रयत्न होता. तो हसला जोरात आणि म्हणाला, You are underestimating your team. You have humbled the world champions yesterday. तेव्हा कळलं की भारतानं वेस्ट इंडीजला पहिल्या मॅचमध्ये हरवलंय, आणि तिथल्या तिथं मी रोमांचित झालो!

पण तो ऑफिसर सोडून आणखी एक जण असा होता, ज्याला वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच वाटलं होतं की, भारत काहीतरी गडबड करू शकतो, आणि म्हणूनच तो म्हणून गेला होता, India is a dark horse. तो होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार किम ह्यूज.

तिथं गेल्यानंतर एका ब्रिटिश पत्रकारानं लिहिलेलंही मी वाचलं. त्यानं असं म्हटलं होतं, ‘गेल्या वर्षी इंग्लिश संघाला भारतामध्ये भारताच्या वन डेतल्या बदललेल्या आणि थोड्याशा आक्रमक ॲप्रोचचा प्रत्यय आला. त्यांचा नवा कर्णधार कपिलदेव तर एकहाती सामना फिरवू शकतो; पण सध्या मात्र त्यांनी त्यांचा जुना इतिहास थोडाफार बदलण्याच्या पलीकडे जास्त काही महत्त्वाकांक्षा बाळगू नये.’

त्यानंतर भारतानं झिम्बाब्वेला ५ विकेट्सनं हरवलं आणि त्याच झिम्बाब्वेनं चक्क ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यामुळे ‘ब’ गटात भारतीय संघ थेट टॉपला जाऊन बसला.

आम्ही सर्व भारतीय पुन्हा रोमांचित झालो. मात्र, पुढच्याच मॅचनं आम्हाला जमिनीवर आणलं. कारण, ऑस्ट्रेलियानं ३२१ धावा केल्या आणि तो पाठलाग भारताला जमला नाही; पण त्या मॅचमध्ये मी एक अविश्वसनीय दृश्य पाहिलं. साक्षात डेनिस लिली ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. त्याला संघातून चक्क वगळलं होतं. मग आपली पुढची मॅच होती वेस्ट इंडीजबरोबर आणि तिथंही मी आणखी एक दृश्य पाहिलं. तेही तितकंच अविश्वसनीय होतं. भारतीय संघ खेळत होता आणि सुनील गावसकर ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध चक्क गावसकरला वगळलं होतं.

मला आठवतंय की, प्रेस बॉक्समध्ये अँटिगाचा एक पत्रकार होता. त्यानं मला विचारलं, ‘तुम्ही गावसकरला कसं काय वगळलं?’

एक भारतीय पत्रकार पुढं आला आणि तो त्याला म्हणाला, ‘गावसकर हा बायकॉटसारखा आहे. त्याचा वन डेमध्ये फारसा उपयोग नाही.’

तो अँटिगन पुन्हा उसळला आणि म्हणाला, ‘गावसकरची तुलना तुम्ही बायकॉटशी करता? अजिबात करू नका. गावसकरकडे बायकॉटपेक्षा किती तरी प्रचंड फटके आहेत.’

भारतीय पत्रकारापेक्षा गावसकरचा जास्त अभिमान वेस्ट इंडीजच्या पत्रकाराला असल्याचं दिसलं. ती मॅच भारतानं गमावली; पण ती मॅच मी दोन गोष्टींसाठी विसरू शकणार नाही. एक, विव्हियन रिचर्डस् याचं शतक मी पाहिलं आणि तृप्त झालो. सर नेव्हिल कार्डस् हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच असली की प्रार्थना करत ‘व्हिक्टर ट्रंपरचं शतक होऊ दे; पण मॅच इंग्लंडनं जिंकू दे.’ माझीही त्या दिवशी प्रार्थना अशीच होती...‘रिचर्डस् याचं शतक होऊ दे; पण भारत जिंकू दे.’

ही प्रार्थना अर्धीच पूर्ण झाली. रिचर्ड्सचं शतक झालं; पण...

आणखी एक गोष्ट, त्या मॅचमधला माल्कम मार्शलचा स्पेल मी कधीही विसरणार नाही. तो आग ओकत होता. मला वाटतं, त्याच मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगनं दिलीप वेंगसरकर जखमी झाला होता. ती मॅच आपण हरलो आणि भारतीय संघ पुन्हा जमिनीवर आला.

आणि मग ती टर्नब्रिज वेल्सची झिम्बाब्वेविरुद्धची मॅच. तिथं कपिलनं दाखवून दिलं की, तो एकहाती मॅच फिरवू शकतो. ती मॅच पाहणं हा तोपर्यंत माझ्या आयुष्यातला क्रिकेटमधला सुदैवाचा उच्चांक होता. तिथं मला असं वाटलं की, या भारतीय संघाकडे काहीतरी अद्भुत करायची ताकद आहे आणि पुढच्या मॅचमध्ये ते सिद्ध झालं.

पुढची मॅच होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध. त्या मॅचमध्ये भारतानं २४७ धावा केल्या. ज्या संघानं आधीच्या मॅचमध्ये ३२१ धावा केल्या होत्या, त्याला २४७ चा पाठलाग कठीण नव्हता; पण बिन्नी, मदनलाल आणि संधू यांनी त्यांच्या फलंदाजीचं अक्षरश: दिवाळं काढलं. या तिघांसारखे गोलंदाज ऑस्ट्रेलियात अनेक आढळतील. कदाचित, हे तिघंही गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात बसलेसुद्धा नसते; पण त्यांनी ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग एक धक्के दिले आणि १२८ धावांमध्ये आख्खा ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. मदनलालनं चार, बिन्नीनं चार आणि संधूनं दोन बळी घेतले आणि तरीही काही जिभा वळवळतच राहिल्या. टेड डेक्स्टर म्हणाला होता, ‘भारत-ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारत जिंकला तर बरं होईल. कारण, इंग्लंडला भारताला हरवणं सर्वात सोपं जाईल.’

त्यांनतर मॅच होती इंग्लंडविरुद्ध. सुदैवानं डेव्हिड गाॅवर या माझ्या लाडक्या इंग्लिश फलंदाजाचे पाय मात्र जमिनीवर होते. तो म्हणाला होता, ‘कपिलदेव हा आजचा जगातला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि इंग्लंडची जी विजयी आगेकूच सुरू आहे तीत तो अडथळा निर्माण करू शकतो. मला झिम्बाब्वेविरुद्धचा त्याचा डाव पाहायला आवडलं असतं. सुनील गावसकरची आम्हाला काळजी वाटते. तो अजून फॉर्मात नाहीय; पण तो सगळं मागचं उट्टं इंग्लंडविरुद्ध काढू शकतो.’

आणि त्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सगळ्यांचे दात भारतीय संघानं घशात घातले. इंग्लंडची मॅच संपवताना संदीप पाटीलनं बॉब विलिसला लागोपाठ चार चौकार मारले. आदल्याच वर्षी त्यानं इंग्लंडमध्ये विलिसच्या एका षटकात सहा चौकार ठोकले होते. संदीप पाटील पॅव्हेलियनमध्ये आला आणि आपल्या सवंगड्यांना म्हणाला, ‘अरे, मला वाटलं हा सुधारला असेल रे; पण अजून सुधारलेला नाहीये.’

आणि मग भारतीय संघ चक्क अंतिम सामन्यात पोहोचला; पण अंतिम सामन्यात होता वेस्ट इंडीजचा संघ! लॉईड, रिचर्डस्, ग्रीनिज, हेन्स, मार्शल, गार्नर...सगळेच एकापेक्षा एक. खरं सांगायचं तर तिथपर्यंत पोहोचणं हेच भारतासाठी दैवी होतं. त्याच्यावर कळस चढवला जाईल असं वाटलंही नव्हतं. आणि विशेषतः १८३ धावांमध्ये भारतीय संघ संपल्यानंतर तर मुळीच वाटलं नव्हतं; पण त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं.

बलविंदरसिंग संधूनं टाकलेल्या आउटस्विंगनं इनस्विंगचं रूप घेतलं आणि तो चेंडू ग्रीनिजचा ऑफ स्टंप घेऊन गेला. रिचर्डस् यानं मॅच संपवण्याची घाई असल्याप्रमाणे येऊन आक्रमण केलं आणि एक अतिशय कठीण झेल कपिलदेवनं घेतला. त्यानंतर क्लाइव्ह लॉईड बॅटिंग करायला लंगडतच आला. त्या वेळी जाणवलं की भारतीय संघ जिंकू शकतो. कारण, ज्या पद्धतीनं लॉईड बॅटिंगला आला, तेव्हा लक्षात आलं की हा फिट नाहीये, फटके मारताना त्याचे पाय चेंडू जवळ पोहोचणार नाहीत. अपेक्षेनुसार लॉईडची विकेट काढली गेली. मला आठवतंय, मला संदीपनं सांगितलं होतं, ‘रिचर्डस् बॅटिंग करत असताना त्याला सुनील म्हणाला होता की, ‘अरे, बहुतेक हा आपल्याला शॉपिंगसाठी वेळ देईल.’ ’

त्यानं शॉपिंगसाठी नुसता वेळच नाही दिला, तर एक अतिशय अमूल्य असं शॉपिंग भारतीय संघानं केलं. भारतीय संघानं चक्क विश्वचषक जिंकला.

इथून जाताना, हा वन डेमध्ये कसाबसा मॅट्रिक पास झालाय असं वाटणाऱ्या विद्यार्थ्याचा चक्क ऑक्सफर्डमध्ये पहिला क्रमांक यावा, तसं भारतीय संघाचं त्या महिनाभरात घडलं. भारतीय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले होते ते ‘लॉर्डस्’च्या समोरच होतं. तिथं पोहोचायला भारतीय खेळाडूंना रात्र झाली. रवी शास्त्रीनं सांगितलेलं मला आजही आठवतंय. तो म्हणाला होता ‘खेळाडूंच्या अंगावरच्या कपड्यांची अगदी तऱ्हा झाली होती.’ इतका आनंद, इतका जल्लोष केला गेला होता.

या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नशीब बदललं. आज आपण जे आयपीएल पाहतोय, आज जो आपण क्रिकेटमधला पैसा पाहतोय त्याचं बीज या विजयानंतर रुजलं आणि त्याचं फळांनी लगडलेलं झाड आज आपण पाहतोय.

त्यानंतर माझंही आयुष्य बदललं. आम्ही ‘षटकार’ नियतकालिक काढलं आणि काही वर्षं ते तुफान चाललं. इंजिनिअरिंग सांभाळत मी पत्रकारितेत उडी घेतली. सन २०११ मध्ये भारतीय संघानं पुन्हा वर्ल्ड कप जिंकलेला मी पाहिलं.

पण १९८३ ची गोष्ट वेगळीच होती.

या लेखाबरोबर माझ्या या सदराची आता सांगता होत आहे. ‘सकाळ’चे खूप खूप आभार आणि तुम्हा वाचकांचेसुद्धा. तुम्ही फोन करून, तसंच सोशल मीडियावर जो प्रतिसाद दिलात तो १९८३ च्या विश्र्वचषकाच्या आठवणीप्रमाणेच मनात टवटवीत राहणार आहे.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com