एबीडी : आधुनिक फलंदाजीचं विद्यापीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Batting
एबीडी : आधुनिक फलंदाजीचं विद्यापीठ

एबीडी : आधुनिक फलंदाजीचं विद्यापीठ

ए. बी. डीव्हिलिअर्सचं (एबीडी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणं म्हणजे फलंदाजीच्या ‘क्रीएटिव्हिटी’च्या एका मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरूनं निवृत्त होणं. त्या विद्यापीठानं फलंदाजीचं स्वरूप पूर्ण पालटलं. अनेक विद्यार्थी तयार केले. परवा टी-२० च्या वर्ल्ड कपमध्ये मॅथ्यू वेडच्या फटक्यांनी आपल्याला जे वेड लावलं तो वेड एबीडीच्याच ऑनलाईन विद्यापीठात शिकला होता.

उद्या पुजारा जर एखाद् दुसरा फटका असा खेळला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण, ते फटके आता फलंदाजीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत. पूर्वी ‘समोरच्या व्हीमध्ये खेळा,’ असं क्रिकेटचे मास्तर सांगत. काही फलंदाज मागच्या व्हीमध्ये खेळले की आम्ही त्यांची टिंगल करत असू; पण एबीडीनं सर्व व्ही एकत्र करून फलंदाजी ३६० अंशाच्या कोनातून फिरते, सुंदर दिसते, श्वास रोखायला लावते आणि तरीही शाश्वत असते हे दाखवलं.

आपल्या रणजीनं पहिल्यांदा लेग ग्लान्स मारला तेव्हा गोरं इंग्लंड दिग्मूढ झालं होतं. त्यांना हा फटका ‘इंडियन रोप ट्रिक’सारखा वाटला होता. चक्क एक जादू!

नंतर बराच काळ फलंदाजी ही हॉब्ज्, हटन, मर्चंट, हजारे, गावसकर यांच्या तंत्रशुद्ध मार्गानं गेली. ऑफचा चेंडू ऑफला मारणं, ऑनचा ऑनला मारणं ही फलंदाजांची नैतिक घडी त्या काळात बदलली नाही. वेस्ट इंडीजचे फलंदाज तेवढे परग्रहावरून आले आहेत असं वाटत असे. इंग्लिश फलंदाजांनी तेव्हा शुद्ध तुपातली फलंदाजी करायची हे जवळपास ठरून गेलं होतं. एखादा डेनिस कॉम्टन सोडा. कलात्मकता आणि इम्प्रोवायजेशन हे हळूहळू भारतीय फलंदाजांनी दाखवलं. मुश्ताक अली, विश्वनाथ, अझरुद्दीननं दाखवलं. चेंडूकडे न बघता विश्वनाथ कट मारू शकायचा. अगदी अलीकडे त्यानं तशा मारलेल्या कटची क्लिप सर्वत्र फिरतेय. चेंडू यष्टिरक्षकाच्या जवळपास ग्लोव्हज् मध्ये गेलाय असं वाटत असताना त्याचा कट यष्टिरक्षकाला गुंगारा देऊन कधी सीमापार जायचा हे कुणाला कळायचंच नाही. अझर हा ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगकडे आरामात पिटाळायचा. कधी कधी, त्याची फलंदाजी बघताना असं वाटायचं की, त्याच्या मनगटाला बॉलबेअरिंग बसवलंय की काय! ते कसंही फिरायचं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीमध्ये बदल हा व्हिव्हियन रिचर्डस् यानं घडवून आणला. सन १९७९ मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये ‘लॉर्डस्’वर हेंड्रिक्स या अत्यंत अचूक गोलंदाजानं सवयीनुसार चेंडू मधल्या यष्टीवर ठेवला होता; पण रिचर्डस् ऑफला सरकला आणि त्यानं तिथून चेंडू जो मारला तो थेट स्क्वेअर लेगच्या सीमापार प्रेक्षकात जाऊन पडला. सन १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये थॉम्सनला ऑनला सरकून रिचर्डस् यानं एक्स्ट्रॉ कव्हरवरून मारलेले काही ड्राईव्हज् मी पाहिले. त्या वेळेला तीसुद्धा भानामतीच वाटली होती!

वन डेमुळे मग क्रिकेट थोडं बदलत गेलं. मग रिव्हर्स स्वीप आला. मग सनथ् जयसूर्या पुढं सरसावत पॉईंट्सच्या डोक्यावरून षटकार ठोकायला लागला. धावा वेगात करण्याच्या गरजेतून हे फटके शोधले गेले; पण एबीडीनं तर आख्खा भाताच अशा नवीन फटक्यांचा तयार केला. एबीडी हा या सगळ्यांमधला याबाबतीतला सम्राट आहे.

मला नेहमी वाटतं की, रिचर्डस् जर आजच्या काळात खेळला असता तर जे एबीडी करतो ते त्यानं केलं असतं. दुर्दैवानं त्याला टी-२० च्या मॅचेस, आयपीएल खेळायला मिळालं नाही. त्यामुळे सम्राटपद हे आता एबीडीकडेच राहतं.

हे सगळं घडलं. कारण, हेल्मेट आलं. हेल्मेट नसतं तर कुणी स्वतःचा जीव धोक्यात घातला नसता. एबीडीचं मोठेपण मात्र वेगळं आहे. त्याचं फलंदाजीचं मूलभूत तंत्र हे अतिशय उत्कृष्ट आहे. त्यानं मूलभूत तंत्राचे नियम न तोडता इम्प्रोवायजेशन केलं. म्हणजे नेमकं काय केलं?

तर ज्या वेळी तो फटका इम्प्रोवाईज् करत असतो त्या वेळी त्याचं जे डोकं असतं ते एकदम स्थिर असतं. तो फटका मारण्याच्या पर्फेक्ट पोजिशनमध्ये येतो. त्याचे डोळे स्थिर असतात आणि तो चेंडू शेवटपर्यंत आपल्या बॅटवर येताना पाहतो. हे सगळ्या फलंदाजांना जमतंच असं नाही. हे फक्त महान फलंदाजांना जमतं आणि त्यामुळेच त्यांचे शॉट्स उत्तम बसतात.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं टायमिंग.

आता क्रिकेटमध्ये टायमिंग ही एक अशी गोष्ट आहे की, जिची व्याख्या नीट करता येत नाही; पण ते जाणवतं. म्हणजे रोहित शर्माचा कव्हर ड्राईव्ह जेव्हा गवताच्या अंगावर सर्र्कन काटा आणतो आणि बघता बघता चेंडू सीमापार जाऊन धडकतो, तेव्हा आपण पट्कन म्हणतो, ‘काय टायमिंग आहे!’

हे कलात्मक, सौंदर्यशाली फलंदाजीचं टायमिंग झालं. एबीडीचं जे टायमिंग आहे ते असं आहे की, बऱ्याच वेळा ती ट्रिक फोटोग्राफी वाटते. कारण, मुळातच इम्प्रोवायजेशन करून फटक्याच्या योग्य पोजिशनमध्ये येणं हेच एक वेगळं कौशल्य आहे आणि तेव्हा ते टायमिंग जुळवणं हे त्याच्या पुढचं कौशल्य आहे. त्यामुळे सिनेमातल्या रजनीकांतची ट्रिक सत्यात उतरावी तसं एबीडीची बॅटिंग पाहताना आणि ज्या वेळी तो फटके इम्प्रोवाईज् करत असतो तेव्हा वाटतं.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सगळ्या गोष्टी तो दबावाखाली करतो. तो त्या अशा वेळेला करतो की ज्या वेळी संघाचा प्राण हा त्याच्या विकेटमध्ये दडलेला असतो. त्यानं एकदा डेल स्टेनवर आयपीएलमध्ये केलेला हल्ला मला आजही आठवतोय. माय गॉड! जगातला एक सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि त्याच्यासमोर जगातला अशा स्थितीतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. हे एकमेकांच्या समोर ठाकलेले होते. दोघांनाही आपापल्या संघासाठी मॅच जिंकायची होती. एबीडीनं त्या वेळी जे फटके मारले, जे इम्प्रोवाईज् केलं ते किंवा तसंच काही पुन्हा जर पाहायला मिळालं तर जन्म सार्थकी लागला असं मी म्हणेन.

एबीडीनं काही आयपीएल सामन्यांत केलेल्या त्याच्या इनिंग्जनं मी थक्क झालेलो आहे. मला एक मॅच आठवतेय. सन २०१२ मध्ये आरसीबीला शेवटच्या षटकात २१ धावा ‘पुणे वॉरिअर्स’ विरुद्ध हव्या होत्या. कठीण वाटत होतं. एबीडीनं दोन षटकार चढवले, एक बाउंड्री मारली आणि एकदम इक्वेशन सोपं करून टाकलं. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. मुख्य म्हणजे, ते इम्प्रोवायझेशन करताना लेग स्टम्पवर गार्ड घेऊन एक गुडघा खाली टेकून तो ऑनला जे फटके मारायचा ना ते सगळंच रोमहर्षक असायचं. म्हणजे यष्टिरक्षकापासून ते मिडविकेट, मिड ऑनपर्यंत तो फटका कुठंही मारू शकायचा. त्या क्षणी तो त्या जागेचा राजा असायचा.

अशा फलंदाजीच्या इम्प्रोवायजेशनमुळे गोलंदाजसुद्धा स्तिमित होत असत आणि तेही नवीन नवीन चेंडू शोधून काढत. मग तो नकल बॉल असेल, स्लो यॉर्कर असेल, स्लो बाउन्सर असेल, वाईड यॉर्कर असेल... या सगळ्या क्लृप्त्या या फलंदाजीतल्या इम्प्रोवायझेशननंतर आलेल्या आहेत. कारण, गोलंदाजांनासुद्धा मानानं जगायचं असतं!

एबीडीचं मोठेपण यात आहे की, ज्यांनी क्रिकेटचे तिन्ही प्रकार गाजवले अशी जी काही मूठभर मंडळी आहेत मग तो सचिन असेल, पाँटिंग असेल, जयसूर्या असेल, विराट असेल अशा खेळाडूंबरोबर एबीडी मानानं बसतो.

मला पर्थची कसोटी इनिंग आठवते. पर्थ म्हणजे जगातली सगळ्यात वेगवान खेळपट्टी. एबीडीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६९ धावा केल्या होत्या आणि समोर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज कोण होते? तर जॉन्सन आणि मिचेल स्टार्क. उत्तम बाउन्स, उत्तम यॉर्कर, उत्तम वेग...! त्यांच्याविरुद्ध त्यानं जवळपास चेंडूला १ या गतीनं टेस्ट मॅचमध्ये १७९ धावा केल्या होत्या. आणि त्या विकेटवर त्या धावा या संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा सहानं अधिक होत्या. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट.

त्याची कसोटी सरासरी ही ५० आहे. आणि जर गरज पडली तर हॉब्स-हटनच्या कोचिंग म्यॅन्युअलनुसार तो आरामात बॅटिंग करू शकायचा. मॅच वाचवण्यासाठी तो फलंदाजी करू शकायचा आणि जिंकण्यासाठी तर त्याचा जन्मच होता.

एबीडीनं खरं तर फलंदाजीचं एक वेगळं पुस्तक लिहिलं असं मी म्हणेन. एकदा नवीन राग शोधल्यानंतर कुमार गंधर्वांना विचारण्यात आलं, ‘‘तुम्ही हा राग कसा शोधला?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, हा राग तिथंच होता. मला तो फक्त दिसला.’’

मला असं वाटतं की, एबीडीच्या फटाक्यांबाबतही असंच म्हणता येईल. ते फटके तिथंच होते. ते त्याला फक्त दिसले!

टी-२०क्रिकेट हे सिनेमातल्या तीन मिनिटांच्या गाण्यासारखं असतं; पण या तीन मिनिटांतसुद्धा काही मंडळी - जी महान असतात ती - वेगवेगळ्या करामती करून दाखवू शकतात. म्हणजे समजा लता असेल, आशा असेल किंवा नूरजहाँ असेल तर त्या काही चांगल्या जागा घेऊ शकतात, हरकती घेत...आलाप घेत... मुरक्या घेत. हे त्यांना जमतं. हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. एबीडीच्या बाबतीत तसंच आहे. एबीडी जी फलंदाजी करतो, जे इम्प्रोवाईज् फटके मारतो या फलंदाजीच्या ताना, मुरक्या आणि आलाप आहेत. ते प्रत्येकाला त्याच कौशल्यानं जमतील असं नाही. अशा प्रकारच्या फटक्यांच्या बाबतीत एबीडीचा जो सक्सेस-रेट आहे तो खूप मोठा होता. त्याचं टेस्टमधलं अॅव्हरेज ५० आहे. वन डेमधलं अॅव्हरेज ५३ आहे. इंटरनॅशनल टी-२० चं अॅव्हरेज २७-२८ असेल; पण आयपीएलचं त्याचं अॅव्हरेज हे ३९ आहे. आणि आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक-रेट हा गेलपेक्षासुद्धा जास्त आहे. गेलचा विध्वंस जाणवतो; पण एबीडीचा विध्वंस जाणवत नाही. तो स्तब्ध करतो. आपण काहीतरी अद्भुत पाहतोय असं त्याची बॅटिंग पाहताना वाटतं.

तो किती मोठा होता, काय होता यात मला जायचं नाही. तो इतरांच्या तुलनेत किती मोठा आहे अशी तुलनाही करायची नाही. मात्र, एक गोष्ट सांगावीशी वाटते. विजय मांजरेकरांची मुलाखत घ्यायला मी त्यांच्या शेवटच्या काळात गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, ‘तू किती महान बॅट्समन बघितलेस?’ त्यावर मी माझ्या परीनं काही नावं सांगितली. गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, सुनील गावसकर, बायकॉट, व्हिव्हियन रिचर्डस्...सगळी त्या वेळची मंडळी होती. ते हसले आणि म्हणाले, ‘तू पीटर मे पाहिलास?’ मी म्हटलं ‘नाही.’

ते म्हणाले, ‘‘तू जर पीटर मे पाहिला नसशील ना तर तू बॅटिंग पाहिलेली नाहीस!’’

...तर, उद्या जर मलाही कुणी असाच प्रश्न विचारला, तर मी एवढंच सांगीन, ‘जर तुम्ही ए. बी. डीव्हिलिअर्स पाहिला नसेल तर तुम्ही आधुनिक फलंदाजी पाहिलेली नाही!’

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Web Title: Dwarkanath Sanzgiri Writes Abd University Of Modern Batting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..