esakal | अर्जुना, मी तुझा आभारी आहे!
sakal

बोलून बातमी शोधा

Arjuna Rantunga

अर्जुना, मी तुझा आभारी आहे!

sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

अर्जुना रणतुंगा याला मी मित्र म्हणू शकतो. तो माझा आवडता कर्णधार होता. अलीकडच्या काळातला पहिला ‘कॅप्टन कूल’. श्रीलंका क्रिकेट संघाला शिखरावर घेऊन जाणारा कर्णधार. वेळप्रसंगी आपल्या संघातल्या खेळाडूंच्या मागं पहाडासारखा उभा राहणारा कर्णधार. ऑस्ट्रेलियात मुरलीधरनला ‘चकर’ ठरवण्यात आलं तेव्हा त्यानं ऑस्ट्रेलियाला अंगावर घेतलं.

‘तुम्ही आम्हाला काय संस्कृती शिकवता? तुमची संस्कृती दरोडेखोरांची,’ असं बोलायलाही त्यानं कमी केलं नाही.

सौरव गांगुलीनं ‘लॉर्डस्’वर शर्ट फिरवला, त्यानंतर इंग्लंडमध्ये एका पार्टीत अर्जुना मला भेटला.

मला म्हणाला : ‘‘गांगुलीचं गोऱ्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर देणं मला फार आवडलं.’’

असा हा माझा मित्र परवा म्हणाला : ‘भारतानं आपला दुय्यम संघ श्रीलंकेत पाठवून आमचा अपमान केला आहे. बोर्डानं तो स्वीकारला कसा?’’

मला आनंद झाला. नागाच्या शेपटीवर अर्जुनाचा पाय पडणं हा शुभशकुन आहे! हा नाग आता श्रीलंकेला डसणार. तो हे भारतीय संघाला हिणवण्यासाठी बोलला नसावा. त्याचे त्याच्या बोर्डाबरोबरचे हिशेब चुकते करायला बोलला असावा.

त्याला स्वतःला कल्पना नाही का, की त्यांचा स्वतःचा संघ सर्वोत्तम असला तरी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘क’ दर्जाचा आहे? दुसरं म्हणजे, स्वतः अर्जुनाकडे एके काळी भारताच्या या धवनच्या संघासारखाच संघ होता. सन १९९३ मध्ये त्यांच्या गुरुसिंघेनं ‘हा आमचा विनोद कांबळी’ अशी माझी जयसूर्याशी ओळख करून दिलेली आठवते. बघता बघता तो किती मोठा झाला. अशाच संघातून त्यानं विश्वविजयी संघ तयार केला होता.

हा संघसुद्धा भारताचा सर्वोत्तम संघ नाही हे आपल्यालाही ठाऊक आहे; पण या संघातल्या मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. काहींचं झुंजुमुंजु झालंय. काही कोवळी किरणं आहेत. काही माध्यान्हीकडे झेपावतायत. काहींनी माध्यान्ह ओलांडलेली आहे; पण महत्त्वाचं म्हणजे, ही सूर्याची किरणं आहेत. कुठल्या दिव्याची नाहीत. काही खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय अनुभव कमी आहे; पण आयपीएल ही जवळजवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. तिथले हे सितारे आहेत. माणूस डिवचला गेला की, पाण्यात खाली दाबल्या गेलेल्या लाकडाच्या तुकड्याप्रमाणे वर उसळतो. सुरुवातीच्या काळात सुनील गावसकरनं कपिलदेवला जाणून-बुजून डिवचलं होतं. तो त्याच्या गुणवत्तेशी बेइमानी करत होता. गावसकरनं कपिलच्या इगोची वात पेटवली. ताबडतोब त्यातून अनारासारखी परफॉर्मन्सची फुलं पडली. त्यानं पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला, मग इंग्लंडच्या मालिकेत बोथमला बाजूला सारून सिरीजचं ॲवॉर्ड मिळवलं. विश्वचषक जिंकला...वगैरे, वगैरे.

सन १९७९ च्या इंग्लडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिलीप वेंगसरकरलासुद्धा असंच डिवचलं गेलं होतं, आणि ते डिवचलं होतं विजय मांजरेकर यांनी. क्रिकेटच्या तंत्राबद्दलच्या त्यांच्या ज्ञानाबद्दल जगात आदर होता. त्यांची वचनं म्हणजे पोथी, असं मानलं जायचं. लोकं त्या वचनांवर अक्षरश: डोकं टेकवायचे. विचार करा, वेंगसरकरची काय अवस्था झाली असेल? पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर ‘लॉर्डस्’ला त्यानं दुसऱ्या डावात शतक ठोकलं आणि त्याच्यानंतर त्यानं लागोपाठ आणखी दोन शतकं ‘लॉर्डस्’ला ठोकली. म्हणजे सन १९७९, मग १९८२ आणि मग पुन्हा १९८६ मध्ये. आणि एवढंच नव्हे तर, त्याचबरोबर त्यानं ‘लीड्स’ला नंतर शतक ठोकलं; किंबहुना इंग्लंडच्या प्रत्येक दौऱ्यात वेंगसरकरनं अप्रतिम फलंदाजी केली. त्याचं तंत्र त्या वातावरणाशी ॲडजस्ट करू शकतं हे त्यानं दाखवून दिलं.

ही अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो...की कुणीतरी काहीतरी बोललं आणि त्यामुळे मोठा परफॉर्मन्स झाला. आणखी दोन उदाहरणं देतो. वेस्ट इंडीजची. सन १९६० मध्ये जेव्हा सर गारफील्ड सोबर्स ऑस्ट्रेलियात गेला, त्या वेळी तो सरावसामन्यात दोनदा रिची बेनोच्या गोलंदाजीवर बाद झाला. एकदा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला आणि त्या वेळी आख्ख्या ऑस्ट्रेलियानं ‘गारफील्ड सोबर्स हा रिची बेनोचा बकरा आहे,’ असं जाहीर करून टाकलं आणि ही गोष्ट सोबर्सला साहजिकच मुंगळे डसावेत तशी डसली. यावर त्याची प्रतिक्रिया काय झाली? तो घाबरला? अजिबात नाही. त्यानं तिथल्या तिथं ठरवून टाकलं की, या सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा आणि पहिल्या कसोटीत ज्या वेळी तो बॅटिंगसाठी वाट पाहत बसला होता, त्या वेळी अक्षरश: त्याची चुळबुळ सुरू होती. त्याची चुळबुळ पाहून सर डॉन ब्रॅडमन त्याच्याजवळ गेले. डॉन ब्रॅडमन त्याला म्हणाले : ‘मुला, मला खात्री आहे की तू तिथं जाऊन बदला घेणार आहेस. उगाच अधीरा, उतावळा होऊ नकोस. तुझी वेळ येईलच आणि त्या वेळी तुझ्या बॅटचं पाणी दाखव.’

आणि सोबर्सनं ते दाखवलं. त्या काळी इनिंगचा हिशेब हा मिनिटांत असायचा. सोबर्सनं १२५ मिनिटांत आपलं शतक ठोकलं, इतका प्रचंड हल्ला त्यानं बेनोवर केला. बेनो स्वतःही तो हल्ला पाहून दिङ्मूढ झाला. तुम्ही जर त्या मॅचची क्लिप पाहिलीत यू-ट्यूबवर, तर तुमच्या लक्षात येईल की, काही फटक्यांना बेनोनंसुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली आहे.

आणि सगळ्यात मोठं डिवचलं जाण्याचं आणि डिवचलं जाऊन परफॉर्मन्स देण्याचं उदाहरण अर्थातच सन १९७६ मधलं वेस्ट इंडीजचंच आहे. ज्या वेळी इंग्लंडचे कर्णधार टोनी ग्रेग यांनी I will make them grovel असं म्हटलं तेव्हाचं. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, ‘मी त्यांना गुडघे टेकायला (grovel) लावेन, गुडघ्यावर चालायला लावेन.’ जसं एखाद्या गुलामाला पूर्वी चालवलं जाई तसं.

म्हणजे थोडक्यात, तुम्ही आमचे गुलाम आहात, हे सांगण्याचा प्रयत्न टोनी ग्रेग यांनी केला होता आणि ही गोष्ट वेस्ट इंडीज संघाला साहजिकच लागली; पण ती सगळ्यात जास्त झोंबली ती व्हिव्हियन रिचर्डस् आणि मायकेल होल्डिंग यांना. होल्डिंगनं त्याच्या आयुष्यातली सगळ्यात वेगवान गोलंदाजी ही इंग्लडविरुद्ध टाकली आणि रिचर्ड्सनं त्या मालिकेत केवळ चारच कसोटींत ८०० पेक्षा अधिक धावा केल्या. कसोटीत तर तो ‘मॅन ऑफ द सिरीज’ झालाच; पण तो वन डेचासुद्धा ‘मॅन ऑफ द सिरीज’ झाला.

म्हणजे वेस्ट इंडीजच्या संघानंच इंग्लिश गोलंदाजीला आणि इंग्लिश संघाला अक्षरश: गुडघ्यावर चालायला लावलं. त्याला अप्रत्यक्षरीत्या का होईना ‘गुलाम’ म्हटलं गेल्यानं कुठं तरी ज्वालामुखी जागा झाला आणि त्यानं त्या कसोटीमालिकेत-वन डेत इंग्लिश क्रिकेट बेचिराख केलं! आणि, आपलं ऑस्ट्रेलियातील उदाहरण तर ताजंच आहे. बाळ गोपाळनं ती विजयाची हंडी फोडली.

अर्जुना जे बोलला ते भारतीय संघानं सकारात्मकरीत्या घेतलंय. भारतीय संघाचा तिकडचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा खरा एका अर्थानं ‘चाणक्य’च आहे. त्यानं स्वतःच्या करिअरमध्ये अनेक वेळा आपल्या शेंडीला गाठ मारली आणि पराक्रमानं ती गाठ सोडवलीसुद्धा. तो आता हे जे नवे ‘चंद्रगुप्त मौर्य’ तयार करतोय ते योग्य उत्तर श्रीलंकेच्या संघाला देतील. महत्त्वाकांक्षी कोवळ्या डोळ्यात जास्त मोठी स्वप्न असतात. तृप्त डोळ्यात ती तेवढी नसतात. अर्जुनासुद्धा विसरला नसेल की, लेग स्पिनर शेन वॉर्न त्याच्याबद्दल काय बोलला होता? आणि मग शेन वॉर्नला अर्जुनानं काय उत्तर दिलं होतं ते...अगदी थेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातसुद्धा!

अर्जुनाच्या मनात हाच चांगुलपणा होता का?

पण त्याच्या बोर्डाला सुनावता सुनावता, त्यानं भारतीय खेळाडूंचं भलं मात्र नक्की केलंय!

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

loading image