एक अविस्मरणीय हॅट् ट्रिक

भारतीय संघ अत्यंत आनंदी आणि सैलावलेल्या मूडमध्ये होता. एक ‘प्रॅक्टिस मॅच’ म्हणून तो याकडे बघत होता. हँपशायरनंसुद्धा त्यांचा सर्वश्रेष्ठ संघ उतरवला नव्हता.
Kevan james
Kevan jamesSakal

जागतिक कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलँड हा अंतिम सामना १८ जूनपासून हँपशायरच्या रोझ बाऊलला होणार आहे. त्यानिमित्तानं एक जुनी आठवण वर आली. त्या वेळी रोझ बाऊल नव्हतं. दुसरं मैदान होतं. त्या मॅचमध्ये मी जे पाहिलं ते मी आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं आणि पुन्हा आयुष्यात पाहीन असं मला वाटत नाही.

असं नेमकं काय घडलं होतं? ही आठवण आहे १९९६ च्या इंग्लिशदौऱ्याची. त्या काळात भारतीय संघ कौंटी संघांबरोबरसुद्धा सामने खेळत असे. त्यानुसार हा सामना होता हँपशायरविरुद्ध.

भारतीय संघ अत्यंत आनंदी आणि सैलावलेल्या मूडमध्ये होता. एक ‘प्रॅक्टिस मॅच’ म्हणून तो याकडे बघत होता. हँपशायरनंसुद्धा त्यांचा सर्वश्रेष्ठ संघ उतरवला नव्हता. आम्ही प्रेस बॉक्समध्ये बसलोच नव्हतो. मी होतो, माझ्याबरोबर माझा पत्रकारमित्र विजय लोकापल्ली होता. आम्ही भारतीय संघाबरोबर त्यांच्या तंबूच्या बाहेरच्या लॉनवर बसलो आणि गप्पा सुरू होत्या. हँपशायरनं टॉस जिंकला आणि भारताला बॅटिंग दिली. का दिली? कुणाला कळलंच नाही; पण अक्षरश: धावांचा सेल असल्याप्रमाणे आघाडीच्या जोडीतल्या राठोड आणि जडेजा यांनी धावा लुटायला सुरुवात केली. धावसंख्या बिनबाद १८० च्या पुढं गेल्यावर केविन जेम्स नावाच्या गोलंदाजाच्या हातात हँपशायरच्या कर्णधारानं चेंडू ठेवला.

‘हा गोलंदाज कोण?’ हा साधा प्रश्नही त्या वेळी कुणी कुणाला विचारला नाही. तो डावरा आहे आणि मध्यमगतीनं चेंडू टाकतोय यापेक्षा जास्त माहिती त्याच्याबद्दल आम्हाला नव्हती. कदाचित ती खेळाडूंनासुद्धा नसावी. कारण गप्पा, धमाल सुरूच होती. भारतीय संघाची धावसंख्या १९२ वर पोहोचल्यावर जडेजा परत आला. त्यानंतर २०७ वर त्यानं राठोडला बाद केलं. जडेजा आणि राठोड दोघांची शतकं हुकली. यष्टिरक्षक अँपनं लेग स्टंपबाहेरचा चेंडू घेऊन त्याला यष्टिचीत केलं. धावा फुकट असोत, स्वस्त किंवा महाग असोत, शतक हे शेवटी शतक असतं. तिसऱ्या क्रमांकावर गांगुली गेला होता. तो तिथं होता आणि मग चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आला. आणि पुढचा फलंदाज संजय मांजरेकर असल्यामुळे तो आमच्यातून उठून साहजिकच आत पॅड बांधायला गेला.

सचिन फलंदाजीला गेला की इतर ठिकाणी लक्ष द्यावंसं वाटत नाही. सचिनसाठी जेम्सनं चक्क शॉर्ट लेग आणला, तेव्हा मी किंचित हसलो. सचिनसाठी शॉर्ट लेग? कौंटी मॅचमध्ये चक्क दबाव? पण ते दात इतक्या लवकर घशात जातील असं वाटलं नव्हतं. सचिन थोडा बेफिकिरीनं पुढं खेळला आणि शॉर्ट लेगवरच्या लॅनीच्या हातात सचिननं चेंडू सोपवला. त्या क्षणी आपण काहीतरी वेगळं पाहतोय याची जाणीव झाली. त्या क्षणी असं जाणवलं की, हा गोलंदाज चक्क हॅट् ट्रिकवर आहे. मग हा कोण, याची चौकशी सुरू केली.

घाईघाईनं प्रत्येकानं त्याचं नाव विचारलं. त्याचं नाव शोधेपर्यंत त्याची हॅट् ट्रिक झालीसुद्धा होती. त्याच्या सवंगड्यांनी त्याला मिठ्यासुद्धा मारल्या होत्या आणि आम्ही राहुल द्रविडला त्याच्या गोलंदाजीवर शून्यावर पायचीत होऊन परत येताना पाहत होतो.

हॅट् ट्रिक ही रोज घडणारी गोष्ट नसते. त्यामुळे मैदानावर अचानक उत्साहाची लहर आली. मांजरेकर पॅव्हेलियनमधून इतक्या उशिरा बाहेर पडला की हँपशायरच्या खेळाडूंनी अपील केलं असतं तर पंचांना त्याला टाईम्‍ड् आऊट द्यावं लागलं असतं. कारण, त्याला तयार होण्यासाठी वेळच मिळाला नव्हता. आमच्या त्या तंबूतली धमाल अचानक थांबली आणि कुंबळे आणि सलील अंकोला पॅड बांधायला चक्क आत धावले. अकरावा हिरवानी मला गमतीनं म्हणाला : ‘‘मीही जाऊन पॅड बांधतो.’’ बाहेर थट्टा-मस्करी करत असलेला संदीप पाटीलही ड्रेसिंग रूममध्ये गेला. हा गोलंदाज कोण, याची तर माहिती काढलीच पाहिजे ना. कारण, त्यानं नुकतीच एक हॅट् ट्रिक घेतली होती. कुणीतरी कळवलं की त्याचं नाव केविन जेम्स आहे. आणि ते नाव डोक्यात येऊन स्थिरावायच्या आत मांजरेकर परत येत होता. दुसऱ्या स्लिपच्या हातात त्यानं झेल सोपवला होता. चार चेंडूंत चार बळी. डोळ्यांनी पाहूनही मन मानायला तयार नव्हतं.

आम्ही केविन जेम्सचा इतिहास पाहण्यासाठी प्रेस बॉक्समध्ये गेलो. कळलेला इतिहास चक्रावून टाकणारा होता. केविन जेम्स ३५ वर्षांचा होता. १९८० ते ८४ मिडलसेक्ससाठी खेळला; पण तिथं तो घरचा कधीच झाला नाही. तिथून तो नशीब काढायला १९८५ मध्ये हँपशायरला आला; पण हँपशायरसाठीही त्याचं तोपर्यंतचं योगदान होतं दोन शतकं. त्यानं चेंडूची करामत क्वचित दाखवली होती. त्याच्या हातात कर्णधाराला चेंडू का द्यावा लागला, हे आम्हाला कळलंच नाही. कधी कधी अनपेक्षित डावपेच भव्य यश देऊन जातं. मग कळलं की चार चेंडूंत चार बळी घेणारा तो ३१ वा खेळाडू आहे. विजय लोकपल्लीनं ‘विस्डन’ चाळत मला सांगितलं. कारण, त्या वेळी इंटरनेट, गुगल असले प्रकार अर्थातच नव्हते. त्यामुळे रेकॉर्ड-बुक्स चाळावी लागत. इतक्यात सौरभ गांगुलीचा एक स्वेअर ड्राईव्ह सरळ पॉईंटच्या हातात जाताना दिसला. जेम्सच्या नव्या षटकाचा तो दुसरा चेंडू होता. जेम्सच्या दुर्दैवानं आणि सौरभच्या सुदैवानं तो झेल सुटला. जर झेल सुटला नसता तर त्याच्या दहा चेंडूंतला तो पाचवा बळी ठरला असता.

गोलंदाजीतला त्याचा चमत्कार इथंच थांबला. त्याच्यानंतर सौरभ गांगुलीनं एक चमत्कारसदृश असं नाबाद शतक ठोकलं. त्याला कुंबळेनं साथ दिली. मला आजही आठवतंय, त्या दुपारी गांगुलीचं शतक पाहताना आम्ही किती तरी वेळा ‘भिसून भालो’ असं ओरडलो असू. ‘भिसून भालो’ म्हणजे भयंकर सुंदर. हा बंगाली शब्द आहे.

त्या दिवशी जेम्स अर्थातच आम्हा पत्रकारांना भेटला. त्याचे पाय घट्ट जमिनीवर होते. त्यानं त्याच्या गोलंदाजीबद्दल जे सांगितलं ते ऐकून हसावं की रडावं हे आम्हाला कळलं नाही. तो म्हणाला : ‘‘एकापाठोपाठ एक असे तीन सरळ चेंडूसुद्धा मी कधी टाकू शकलेलो नाहीये, तर हॅट् ट्रिकचा प्रश्नच उद्भवत नाही! ती हॅट् ट्रिक मला कशी मिळाली ते मला माहीत नाही. ती देवाची देणगी आहे. त्या हॅट् ट्रिकमधल्या एका विकेटचं क्रेडिट मला द्यायचं असेल तर द्या. ती म्हणजे सचिन तेंडुलकरची विकेट. त्याच्यासाठी मी तो शॉर्ट लेग आणला. इतरांनी मला विकेट्स दिल्या.’’

ती मॅच त्याच्यासाठी अविस्मरणीय मॅच असावी. कारण, त्याचा चमत्कार तिथंच संपला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं भारताविरुद्ध शतकही ठोकलं. शतक आणि पाच विकेट्स हे त्यानं एकाच सामन्यात मिळवलं. जेम्सचं नाव त्यानंतर आम्ही कधीही ऐकलं नाही; पण जेव्हा जेव्हा मी साउथहँप्टनला जातो तेव्हा तेव्हा मला तो कुणाहीपेक्षा जास्त आठवतो. कारण, एक अविस्मरणीय स्पेल मी माझ्या डोळ्यांनी पहिला होता.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com