शहाणपण उशिरा सुचलेलं

अखेर आयपीएल पुढं ढकलली गेली. ‘रद्द’ऐवजी ‘सस्पेंडेड’ हा शब्द वापरला की ‘जोर का धक्का धीरे से लगे’ याचा अर्थ कळतो.
Biobubble
BiobubbleSakal

अखेर आयपीएल पुढं ढकलली गेली. ‘रद्द’ऐवजी ‘सस्पेंडेड’ हा शब्द वापरला की ‘जोर का धक्का धीरे से लगे’ याचा अर्थ कळतो. आठवड्यापूर्वीच जाणवायला लागलं होतं, की या वर्षीच्या आयपीएलच्या बंगल्याच्या विटा हळूहळू आता पडायला लागलेल्या आहेत...सर्वात प्रथम तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल सोडून गेले. त्याच्या आधी आपला अश्विन गेला होता. अश्विननं एक वैयक्तिक कारण सांगितलं आणि त्याचं कारण खरंच गंभीर होतं. ऑस्ट्रेलियाच्या अँड्रू टायनं मात्र जाताना पुढच्या परिणामांचा अजिबात विचार न करता थेट सांगितलं, ‘बाहेर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही. व्हेंटिलेटर्स नाहीत आणि मालक या आयपीएलवर कशाला एवढे पैसे खर्च करतात?’

ठणकावून त्यानं सांगितलं खरं; पण नंतर तो हेही म्हणाला होता की, ‘...आयपीएल सुरू राहिली पाहिजे.’ म्हणजे जखम करून वरती एक फुंकर त्यानं जाता जाता मारली. याच्या मागोमाग आणखी दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल सोडली आणि ते निघून गेले.

मग कमिन्सनं खिशात हात घातला. त्यानं ती रक्कम आधी, ‘पीएम केअर’ला देणार, म्हणून सांगितलं होतं. नंतर त्यानं ती ‘ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस’ला द्यायची असं ठरवलं. अर्थात्, त्यानं देण्याचा मार्ग बदलला असला तरी त्यानं खिशात हात पहिल्यांदा घातला ही गोष्ट महत्त्वाची आहे. भारतात पैसे येणं महत्त्वाचं आहे. मग ते या फंडातून येवोत किंवा त्या फंडातून. त्याचा परिणाम असा झाला की इतरांनीही मग खिशात हात घातला.

खेळाडू जरी सुरक्षित बबलमध्ये असले तरी त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय हे टेलिव्हिजनवर दिसत होतं. बाहेरच्या जगात ऑक्सिजनअभावी मंद होत चाललेला कोविडग्रस्तांचा श्वास त्यांना ऐकू येत होता. त्यांच्या नातेवाइकांनी फोडलेले टाहोसुद्धा त्यांना ऐकू येत होते. जगण्यासाठी चाललेली धडपड. हॉस्पिटल, कॉट मिळवण्यासाठी, व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी चाललेली धडपड. या सगळ्या गोष्टी ते पाहत होते. त्यामुळे त्यांचं मन तर व्यथित झालंच होतं; पण ते थोडे घाबरलेलेसुद्धा होते आणि त्यातच बबल भेदून व्हायरस आत शिरला.

मग आयपीएल गव्हर्निंग बॉडीची धावपळ झाली. मग विचार असा झाला की ‘चला, ही आयपीएल मुंबईला घेऊन जाऊ या.’ याचं कारण असं की, एक तर मुंबईत तीन मैदानं आहेत. मुंबईमध्ये हॉटेलच्या सुविधा मिळवणं आणि त्या बबलची देखरेख करणं हेसुद्धा इतर कुठल्याही शहरांपेक्षा जास्त सोपं आहे. अगदीच गरज पडली तर पुण्यालासुद्धा मुंबईहून खेळायला जाता येतं आणि ते मैदानसुद्धा घेता येतं आणि पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा हॉटेल्समध्ये सोय करता येते; पण चार चार ठिकाणी आयपीएल खेळण्याचा जो प्रयत्न होता आणि शेवटी अंतिम सामना गुजरातमध्ये. तो प्रयत्न अंगाशी यायला लागला. एकंदरीत आठ संघ आहेत आणि त्यांना जागा बदलण्यासाठी प्रवास करावा लागतो आणि या प्रवासात तो बबल भेदला जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कोलकत्याच्या खेळाडूंना हॉस्पिटलमध्ये एमआरआय किंवा स्कॅनसाठी घेऊन गेले होते, तिथंही त्यांना त्रास झाला असण्याची शक्यता आहे; पण सुरुवातीला जसं वाटलं होतं की, हे एकाच टीमच्या बाबतीत मर्यादित राहील. मात्र, तसं झालं नाही आणि मग असं लक्षात आलं की, चार चार टीम्समधले खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि मग एक शहाणपणाचा निर्णय बीसीसीआयनं घेतला.

आयपीएल पुढं ढकलण्याचा. हे थोडं उशिरा सुचलेलं असं शहाणपण होतं.

सहा महिन्यांपूर्वी ही स्पर्धा आखातात यशस्वीपणे भरवण्यात आली होती; पण तिथल्या सुविधा वेगळ्या आहेत. दुबई, अबूधाबी आणि शारजा ही शहरं फक्त तास-दीड तासाच्या बसप्रवासानं जोडलेली आहेत. त्या वेळी बाहेर कोरोनानं उच्छाद मांडलेला नव्हता आणि तिथल्या सुविधा बघता तिथं बबल टिकवणं जास्त सोपं होतं.

भारतात इंग्लडच्या मालिकेच्या वेळी दोनच संघ होते, त्यामुळे तो बबल टिकवणं सोपं गेलं आणि बाहेर कोरोनाची धुगधुगी होती. वणवा पेटला नव्हता. या वेळी तो पेटला होता आणि हाताबाहेर गेला होता. त्यामुळे कुठून तरी कोरोनाचा ‘चंचुप्रवेश’ झाला आणि बघता बघता तो ‘मुसळप्रवेश’ ठरला. बीसीसीआयनं धोका ओळखला आणि आयपीएलवर पडदा टाकला व मध्यंतर जाहीर केलं.

मध्यंतर कधी संपणार कुणास ठाऊक!

बीसीसीआयनं जर हट्टानं आयपीएल पुढं रेटलं असतं आणि काही अघटित घडलं असतं तर बीसीसीआयची जगभर अब्रू गेली असती. सहा महिन्यांनी टी-२० विश्वचषक आहे. त्यावर आयसीसीची मालकी असली तरी भारतात भरवण्याची जबाबदारी ही बीसीसीआयचीच असते. आयसीसी ही पैशासाठी बीसीसीआयवर कितीही अवलंबून असली तरीसुद्धा आयसीसीला, अपयशाच्या पार्श्वभूमीवर ती भारताला देताना खूप विचार करावा लागला असता. सहा महिन्यांत परिस्थिती पूर्णपणे बदलेल असंही नाही. हा वणवा कमी होऊ शकतो, वणव्याच्या ठिणग्या होऊ शकतात; पण तरीसुद्धा कोरोना निघून जाईल असं चित्र आज या क्षणी तरी दिसत नाहीये. अर्थात्, बीसीसीआयनं आखाताचा पर्याय डोळ्यासमोर ठेवलेलाच आहे; पण तोपर्यंत परिस्थिती सुधारेल, अशी आपण आशा करू या.

तरीही अजून अनेक प्रश्न आहेत.

म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू घरी कसे जाणार? त्यांच्या पंतप्रधानांनी तर चक्क धमकी दिलेली आहे की, १४ दिवस भारतात राहून येणाऱ्याला थेट गुन्हेगार ठरवण्यात येईल आणि त्याला पाच वर्षं कैद किंवा ५० हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येईल. खरं तर ही शिक्षा खूपच कठोर आहे. इंग्लडनंही आपले दरवाजे भारतातून येणाऱ्या मंडळींसाठी बंद केलेले आहेत आणि इंग्लड आणि न्यूझीलंड यांची मालिका तर आता सुरू होणार आहे. काही इंग्लंडचे खेळाडू आणि न्यूझीलंडचे खेळाडू भारतात तर होते, त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा तिथं जाणं आता अडचणीचं आहे.

दुसरी गोष्ट अशी आहे की, प्रश्न पैशाचा आहे. कारण, आतापर्यंत फक्त २९ सामने झालेले आहेत आणि ३१ सामने बाकी आहेत. आयपीएलला मुख्यतः पैसा कुठून मिळतो? तर तो स्पॉन्सर्स आणि टीव्हीप्रसारणाच्या हक्कातून मिळतो. ते जे पैसे मिळतात ते पैसे ५०- ५० टक्के हे मालक आणि बोर्डामध्ये वाटले जातात. आता तीच रक्कम अर्धी होण्याची शक्यता आहे आणि हा तोटा खूप मोठा आहे.

एक साधं गणित मी तुम्हाला सांगतो...स्पॉन्सर्स जाऊ दे; पण प्रसारणाचे जे हक्क आहेत यातून साधारण ५४.४ कोटी रुपये हे प्रत्येक मॅचसाठी मिळत असतात. याचा अर्थ उरलेल्या मॅचेसचे साधारणतः १६०० कोटी झाले. ते मालक आणि बोर्डात जर वाटले गेले तर ८०० कोटींचा फरक हा बोर्डाला आणि मालकाला पडेल. मग मालकांकडे पैसे नाही आले, म्हटल्यावर ते खेळाडूंना पैसे देणार का? त्यांच्या कोचला पैसे देणार का? हासुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे हा जो तोटा आहे, तो खालपर्यंत झिरपत जाणार आहे आणि सुरुवातीचा जो खर्च असतो, जी गुंतवणूक असते ती यांनी यापूर्वी करूनच ठेवलेली आहे, त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या ही गोष्ट धक्कादायक ठरू शकते. कदाचित म्हणून असेल, त्यांनी आयपीएल रद्द केलेली नाहीये, तर ती पुढं ढकललेली आहे. या वर्षाअखेरपर्यंत जर त्यांना कुठं संधी मिळाली तर ती खेळवण्याचा प्रयत्न होईल; पण ती संधी मिळू शकेल का? इंग्लंडमध्ये भारताची सिरीज सुरू आहे, त्याच्यानंतर टी-२० वर्ल्डकप सुरू होतोय.

आंतरराष्ट्रीय कॅलेंडर तसं भरलेलं असतं. पण आयपीएलसाठी ‘जागा’ शोधायचा प्रयत्न होईल.आयपीएल याक्षणी तरी पुढं ढकललं गेलं आहे. पैशाचं नुकसान तर होणारच आहे; पण अब्रूही गेली असती, जर पुढं खेळाडूंना काही अपाय झाला असता तर. तो जो त्रास होता तो या गेलेल्या पैशापेक्षा जास्त अधिक, जास्त मोठा आणि जास्त दारुण असता. आणि म्हणूनच, उशिरा सुचलेलं हे शहाणपण वाईट नाहीये. हे आधीच सुचलं असतं तर फार बरं झालं असतं.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com