मैदानावरचं पेंटिंग!

एक हिरा उचलून जर इंग्लंडच्या ‘क्राऊन ज्वेल्स’ या म्युझियममध्ये ठेवायचा असेल तर मी ठेवेन १९९० चं ‘लॉर्डस्’चं महंमद अझरुद्दीनचं शतक.
Mohammad Azharuddin
Mohammad AzharuddinSakal

इंग्लंडमध्ये मी अनेक भारतीय फलंदाजांची शतकं पहिली. ती मला माझ्यापुढं कुणीतरी फेकलेल्या विविध हिऱ्यांसारखी वाटतात. प्रत्येक हिरा हा विविध कारणांसाठी अनमोल; पण त्यातला एक हिरा उचलून जर इंग्लंडच्या ‘क्राऊन ज्वेल्स’ या म्युझियममध्ये ठेवायचा असेल तर मी ठेवेन १९९० चं ‘लॉर्डस्’चं महंमद अझरुद्दीनचं शतक.

फलंदाजीच्या नजाकतीचं ते नयनरम्य प्रदर्शन होतं. बूच काढलेल्या बाटलीतून वर फसफसणाऱ्या शाम्पेनसारखे त्याचे ते मुलायम फटके त्याच्या बॅटमधून फसफसून वर येत होते. अझरच्या शतकाप्रीत्यर्थ मी संध्याकाळी ‘लॉर्डस्’च्या पबमध्ये शाम्पेन घेत असताना एका सुरकुतलेल्या हातातल्या ग्लासानं माझ्या ग्लासाला हात भिडवला. मी वळून पाहिलं. एक अत्यंत वृद्ध अशी गोरी इंग्लिश व्यक्ती होती. टाय लावलेली. सूट घातलेली. आणि डोळ्यांत थोडंसं पाणी आलेलं.

ग्लास भिडवल्यानंतर ती व्यक्ती मला म्हणाली : ‘‘आज मी रणजितसिंह पुन्हा पाहिला.’’

रणजितसिंह म्हणजे रणजी. म्हणजे ज्या नावानं रणजी स्पर्धा आहे ती. तो रणजी, जो एकेकाळी इंग्लंडसाठी खेळायचा आणि इंग्लंडच्या प्रेक्षकांना त्याच्या नजाकतीबद्दल तो प्यारा होता. एका गोऱ्या इंग्लिश क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यात काळ्या अझरसाठी आनंदाश्रू होते.

या खेळीची पार्श्वभूमी वैशिष्ट्यपूर्ण होती. अझर भारतीय संघाचा नवखा कर्णधार होता आणि बेदी होता कोच-कम-मॅनेजर. बेदीचं काय बिनसलं होतं, मला काही आठवत नाही आता; पण बेदीनं ‘भारतीय संघ हा अरबी समुद्रात नेऊन बुडवावा,’ असं एक अतिशय तुफान विधान केलं होतं. त्यानंतर असं घडलं की अझरनं ‘लॉर्डस्’ला टॉस जिंकला आणि त्यानं इंग्लंडला फलंदाजी दिली. स्वतःच्या पायावर मारून घेतलेली ती गोळी होती. कारण, इंग्लडनं ४ बाद ६५३ धावा उभ्या केल्या. किरण मोरेनं गूच ३३ वर असताना दिलेलं जीवदान महागात पडलं. गूचनं ३३३ धावा केल्या आणि अर्थातच त्यामुळे अझरच्या निर्णयावर टीकेची झोड उठली; पण अझरच्या चुकीचं प्रायश्चित्त इतकं सुंदर, कलात्मक आणि नयनरम्य असेल असं वाटलं नव्हतं. उन्हानं उजळलेला तो शनिवार फक्त अझरचा होता आणि ‘लॉर्डस्’ झालं होतं, फटक्यांची आर्ट गॅलरी...! एक कलावंत मैदानाच्या कॅनव्हासवर अप्रतिम चित्र रेखाटत होता.

अझरनं ८७ चेंडूंत शतक ठोकलं. तो १२१ धावांवर दुसऱ्या दिवशी बाद झाला तेव्हा त्यानं १२१ धावा या १११ चेंडूंत केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट १०९.८ होता आणि त्यानं २२ चौकार ठोकले होते. छे! ‘ठोकले होते’ हा शब्दच चुकला. ते त्यानं रेखाटले होते. कुंचल्याप्रमाणे अत्यंत कमी वजनाच्या बॅटनं.

हेमिंग्ज् यानं त्याला १२१ धावांवर वळणाऱ्या ऑफ ब्रेकवर बोल्ड केलं. तो ऑफ ब्रेक त्यानं कव्हरमधून मारण्याचा प्रयत्न केला, तो फसला. तेव्हा हेमिंग्ज् याच्या एका डोळ्यात नक्कीच एक दुःखाश्रू असावा. कारण, आर्ट गॅलरीच्या बाहेर जायचं एक्झिट गेट इतक्या लवकर यावं असं त्यालासुद्धा वाटलं नसेल.

त्या कसोटीत गूचनं पहिल्या इनिंगमध्ये त्रिशतकी (३३३) खेळीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एक शतक (१२३) ठोकलं. लॅम्बनं १३९ धावा ठोकल्या. रॉबिन स्मिथनं १०० धावा ठोकल्या. रवी शास्त्रीनं १०० धावा केल्या; पण या सर्व शतकांच्या आठवणी कधीच पुसून गेलेल्या आहेत. मनाच्या भिंतीवर एकच पोर्ट्रेट लटकतंय.अझरच्या त्या शतकाचं!

तो फलंदाजीला आला तेव्हा भारतीय धावसंख्या ३ बाद १९१ वगैरे होती. वेगवान लुईसनं त्याच्या मधल्या यष्टीचा वेध घेऊन चेंडू टाकला. अझरनं टाचा उंचावल्या आणि बॅक फूटवर त्याला ढकललं. जगाला वाटलं की अझर बचावात्मक खेळतोय; पण चेंडूला ती त्याच्या मनगटातून आलेली छुपी ताकद जाणवली होती. वेडापिसा होऊन तो चेंडू मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातावर तुरी देऊन थेट समोरच्या जाहिरातीच्या बोर्डावर कधी आपटला हे कळलंच नाही. त्यानंतर त्याचं मनगट हे मायकल जॅक्सनच्या शरीरापेक्षा लवचिक वाटायला लागलं. ते ठरवायचं चेंडूनं कुठं जायचं, अगदी शेवटच्या क्षणी, गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना हतबुद्ध करत! सुईत दोरा ओवावा तसा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चक्क ओवला जायचा. मला त्याचे काही फटके आजही आठवतात.

डेवेन माल्कमनं टाकलेल्या अचूक टप्प्याच्या किंचित अलीकडे पडलेल्या चेंडूवर अझर बॅकफूटवर गेला आणि त्यानं तो स्ट्रेट ड्राईव्ह मारला. जवळपास तसाच चेंडू त्यानं नंतर स्वेअर लेगमधून पाठवला. तिसरा किंचित आखूड टप्प्याचा मिळाल्यावर त्यानं जी स्वेअर कट मारली त्यानं बॉलच्या डोक्याला झिणझिण्या आल्या असाव्यात. स्वेअर कट किंवा एखादा त्यानं मारलेला हूक पाहून त्याच्या फटक्यातल्या मोठ्या ताकदीची जाणीव व्हायची. एरवी, फक्त बॅटचा चेंडूशी हळुवार रोमान्स चालायचा. प्रेक्षकांना आणि गोलंदाजांना तो रोमान्स गुदगुल्या करणारा होता.

अझर उंच असल्यामुळे तो ज्या वेळी फटका खेळतो त्या वेळी त्याचं शरीर सुंदर आकार घेतं. किंचित बाळसं धरलेली पांढरी वेताची छडी वाकावी तसं त्याचं शरीर वाकायचं. अझरची ग्रिप पाहिली की त्याचं ऑनच्या फटक्यावरचं प्रेम का आहे हे आपल्याला कळतं. त्यातही तो ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू ऑनला, मिड विकेटला आणि स्वेअरला अगदी आरामात फ्लिक करतो; पण त्या दिवशी त्यानं ऑफच्या चेंडूवर जे काही कव्हर ड्राईव्हज् मारलेत ना ते कव्हर ड्राईव्हज् पाहताना उगाचच अझरला ‘ऑन साईडचा प्लेअर’ म्हटलं गेलं असं वाटलं. म्हणजे, त्यानं एकामागून एक सुंदर कव्हर ड्राईव्हज् मारले आणि ते कव्हर ड्राईव्हज् कुठल्याही इतर फलंदाजाच्या कव्हर ड्राईव्हएवढेच प्रेक्षणीय होते. उलट, त्याचा एक फ्लिक स्वेअर लेगला जायच्या ऐवजी स्लिपमधून गेला, त्याच्या फलंदाजीतला मला आठवणारा तो एकमेव कुरूप फटका. त्याला जीवदान म्हणता येणार नाही; पण तरीसुद्धा अझर बचावला असं म्हणता येईल.

प्रेस बॉक्समध्ये त्या वेळी जॉन वुडकॉक हा तिथल्या ‘टाइम्स’ला लिहिणारा एक बुजुर्ग पत्रकार होता. तो ब्रॅडमन पाहिलेला माणूस होता. त्यानं दुसऱ्या दिवशी जे काही लिहिलं ते शब्द मला आजही आठवताहेत. त्यानं इंग्लिश फलंदाजांना सांगितलं की, ‘अरे बाबांनो, अझरची फलंदाजी डोळे भरून पाहा; पण त्याच्या शैलीची नक्कल करू नका. इंग्लिश रक्ताला त्याची सवय नाही.’

माझ्या आयुष्यातला तो एक सुंदर जुलै महिना होता. त्या जुलै महिन्यात मला असं जाणवलं, की माणसाच्या हातात कला असेल तर सामान्य गोष्टीतून काय काय साध्य होऊ शकतं! मायकेलॅंजेलोच्या हातांनी छिन्नीनं दगडामध्ये तयार केलेली शिल्प मी पाहिली. ब्रश आणि रंग हातात घेऊन लिओनार्डो द विंचीनं तयार केलेली मोनालिसा मी पाहिली. आणि इथं हा एक मैदानावरचा कलावंत एका लाकडाच्या फळकुटानं फलंदाजी कलात्मकतेच्या अगदी वरच्या स्तरावर घेऊन जात होता. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहेत.

माझ्यासारख्या सामान्य माणसाला अशा अलौकिक गोष्टी पाहायला मिळणं याहून दुसरं भाग्य ते काय!

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com