जेव्हा फुलालाही गुदगुल्या होत...

ज्या खेळाडूची किंचित मैत्रीसुद्धा मिरवावी असा तो खेळाडू होता. सज्जन, सद्गुणी, सव्यसाची, सहृदयी अशी 'स'ची सर्व विशेषणं चपखल बसावी असा तो माणूस होता.
Nandu Natekar
Nandu NatekarSakal
Updated on

चार वर्षांपूर्वी मी पुण्यात नंदू नाटेकर यांना त्यांच्या घरी भेटलो, तेव्हा ती त्यांची शेवटची भेट असेल, असं वाटलं नव्हतं. काही महिने आधी त्यांचा सत्कार मी सावरकर स्मारकात आयोजित केला होता. त्या वेळी त्यांना दिलेलं स्मरणचिन्ह त्यांनी बेडरूममध्ये ठेवलेलं दाखवलं. खूप गप्पा झाल्या. पुण्यात आल्यावर पुन्हा भेटायचं वचन देऊन मी परतलो. पण... माझ्या हातून वचन पाळलं गेलं नाही आणि त्यामुळं आज मी हळहळतो आहे.

ज्या खेळाडूची किंचित मैत्रीसुद्धा मिरवावी असा तो खेळाडू होता. सज्जन, सद्गुणी, सव्यसाची, सहृदयी अशी 'स''ची सर्व विशेषणं चपखल बसावी असा तो माणूस होता. बॅडमिंटनपटू म्हणून मी त्यांना एकदाच पाहिलंय. कोवळा होतो मी तेव्हा त्यांची कला जोखण्यात; पण मला आठवतंय, त्यांच्या चपळ हालचाली, नेटच्या एका कोपऱ्यातून समोरच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडलेलं ते फूल, घामाघूम झालेला प्रतिस्पर्धी आणि नंदूच्या चेहेऱ्यावर पसरलेलं मंद स्मित. "मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे," असं त्या प्रतिस्पर्ध्याला वाटलं असेल.

मग मी स्वतः बॅडमिंटन खेळायला लागलो. स्पर्धात्मक नाही; पण आनंद लुटण्याइतकं. मग अभ्यास वाढला. १९८२ च्या एशियाडमध्ये, मी बॅडमिंटन खेळाचा प्रचंड आनंद घेतला. ती चॅम्पियन लीम स्वे किंगची मुलाखत, मग काही बॅडमिंटन खेळाडूंबरोबर चर्चा, ह्यामुळं बॅडमिंटनमधल्या महान खेळाडूंची ओळख झाली. खेळत होतो त्यामुळं बारकावे समजले. मित्रवर्य शिरीष नाडकर्णी यांचे लेख ह्यातून खास करून नाटेकर डोळ्यांसमोर उभे राहिले.

त्या वेळी बॅडमिंटन खेळावर फार लिहून येत नसे. आणि त्यानंतर मला उमगलं, की नाटेकर हे बॅडमिंटन कलेचं दुसरं नाव होतं. त्यांची एकेरीची सर्व्हिस समोरच्या कोर्टच्या टोकाला जायची आणि मग फूल झाडावरून पडावं तसं पडायचं, तीन-चार इंच हद्दीच्या आत. त्यांची दुहेरीची सर्व्हिस, नेटला फुंकर मारून जायची. पण हजारे-बोर्डेंचा कव्हर ड्राइव्ह, सुनील-सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, तसा त्यांचा बॅकहॅन्ड, त्यावर कविता लिहून जावी असा.

त्यांचं मनगट अझरप्रमाणे, कसंही वळायचं; आणि त्यांचा ड्रॉप शॉट ही भानामती होती. काहीवेळा नेट आणि फूल ह्यांत केसाचं अंतर असायचं, इतकी अचूकता होती. त्यांचा स्मॅश जोरकस नव्हता; पण शिरीष नाडकर्णी म्हणतो त्याप्रमाणे, ते तो समोरच्या खेळाडूच्या कमरेच्या किंवा खेळणाऱ्याच्या हाताच्या काखेजवळ मारत, तिथून तो परतवणं कठीण जाई.

त्यांचा स्टॅमिना कमी होता, शारीरिक क्षमतेकडं त्यांनी फार लक्ष दिलं नाही, नाहीतर कुणी माईचा लाल त्यांना जगात हरवू शकला नसता. जास्त रॅली झाल्या की ते दमत, तरीही ते एकेकाळी जगात चौथ्या क्रमांकावर होते. त्यांचा बचाव इतका चांगला होता, की हॅन्सेनसारख्या खेळाडूचा स्मॅश ते लीलया परतवत. हॅन्सेनचा स्मॅश इतका गोळी असायचा, की त्याला ''हॅमर हॅन्सन'' म्हणत. आजच्या काळाच्या तुलनेत तेव्हा रॅकेट जड होत्या. पतौडी कुणाच्याही बॅटनं खेळत असे, तसं ते कुणाच्याही रॅकेटनं खेळत.

गुणवत्ता ही एखाद्या स्थळाची मिरास नसते, नाहीतर अज्ञात चिखलगावामध्ये लोकमान्य जन्माला आले नसते, किंवा गदिमा शेटफळेसारख्या सांगली जिल्ह्यातल्या गावात. नाटेकरही सांगलीचे. १६ व्या वर्षी बॅडमिंटनमध्ये करिअर करायला मुंबईत आले आणि बघता बघता त्यांनी मलेशियात पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून जगाच्या नकाशावर भारतीय बॅडमिंटनला नेऊन ठेवलं. त्या वेळी बॅडमिंटन असोसिएशनकडं नंदूला इंग्लंडला स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवायला पैसे नव्हते, त्यांनी चक्क नाटेकर फंड उभा केला. क्रीडारसिकांना आव्हान केलं. त्यांनी खिशात हात घातले आणि नाटेकर लंडनला गेले. नियती कधी कधी फार सुंदर खेळ खेळते. लहानपणी, क्रिकेट खेळाडू सोडून माझे इतर दोन लाडके खेळाडू म्हणजे रामनाथन कृष्णन आणि नाटेकर.

मला खूप उशिरा कळलं, की दोघे १९५२ साली ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामन्यात एकमेकांशी झुंजले. नाटेकर हरले. त्यांनी फार मनाला लावून घेतलं. त्यांनी टेनिस सोडलं, बॅडमिंटन आपलं क्षेत्र मानलं. नियतीनं दोन खेळांतले दोन चॅम्पियन्स भारताला दिले. दोघांच्याही रॅकेटचा स्पर्श चेंडू आणि फुलाला गुदगुल्या करण्याइतका मुलायम! आणि दोनच असे खेळाडू, की त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलांना अर्जुन अवॉर्ड मिळालं. मी आणि माझे दोन लाडके खेळाडू अजित वाडेकर आणि नंदू नाटेकर यांच्यात एकच गोष्ट कॉमन होती; आम्ही तिघंही रुईया कॉलेजचे. रुईया कॉलेजची क्रीडासंस्कृती वैभवशाली केली आधी नंदू नाटेकरांनी आणि मग अजितनं.

२००२ या वर्षांतली गोष्ट असेल, दूरदर्शनसाठी अजित वाडेकरला क्रीडापटू पुरस्कार देण्यासाठी खेळाडू निवडायचा होता. अजितनं सहज मला विचारलं, "कुणाला देऊ?" मी म्हटलं, "क्रिकेटपटूला नेहमी मिळतात, या वर्षी तुझ्या मित्राला, नंदू नाटेकर यांना दे." वाडेकर त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये म्हणाला, "हो रे, माझ्या लक्षातच आलं नाही." आणि त्याने ते नाटेकरांना दिलं. नंदूबरोबर ओळख वाढल्यानंतर त्याच्यातला सुसंस्कृत माणूस मला आवडायला लागला. त्यांच्या ''मौज''नं काढलेल्या आत्मचरित्रात त्यांचा चौफेर संचार मी अनुभवला होता. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते आकंठ बुडाले होते... मी नाटेकर साहेबवरून नंदूवर कधी आलो, हे मलाच कळलं नाही. त्याचं संगीतावरचं प्रेम, सहित्यामधली रुची, यामुळं मला तो फक्त बॅडमिंटनमधला देव वाटला नाही, त्याची चौफेर रसिकता भावली. मला कळेना बॅडमिंटन त्याला अधिक जवळचं, की संगीत? त्याला बॅडमिंटन हिरो प्यारे, की लता आणि भीमसेन - कुमार? तो गाणं शिकला आणि गायचा उत्तम. फक्त शास्त्रीय नाही, तर जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा त्याचा व्यासंग खूप मोठा होता. त्याच्या सत्काराचा एक कार्यक्रम मी आयोजित केला होता, त्यात बॅडमिंटन कमी आणि संगीत जास्त होतं. तो स्वतः गायला. त्यादिवशी त्याची तब्येत बरी नव्हती. तो पुण्याहून आला तेव्हा त्याच्या नाडीचे ठोके जलद पडत होते. त्याच्या प्रेमानं तिथं डॉ. अनंत जोशी आले होते. कितीतरी वेळ ते त्याची नाडी हातात घेऊन होते. आम्ही सर्व काळजीत होतो. संगीताचा कार्यक्रम सुरू झाला, संगीत कानावर पडलं आणि चमत्कार झाला. तो व्ही.आय.पी. रूममधून उठला आणि स्टेजवर येऊन संगीताच्या मैफलीत बसला, माझ्याशी गप्पा मारल्या आणि मग स्वतःही गायला. ती संध्याकाळ मी कधीही विसरणार नाही.

मी देव पाहिला नाही; पण थोडी देवमाणसं माझ्या आयुष्यात येऊन गेली, त्यांत नंदू एक होता. माणसाचं रूप घेऊन देवलोकातून पृथ्वीवर आला. भारतात बॅडमिंटन रुजवलं, पुढच्या पिढीसाठी, रस्ता तयार केला, तो हमरस्ता झालेला पहिला, तुम्हा-आम्हाला आनंद वाटला, आणि परवा देवलोकात निघून गेला.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार -लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com