जे देखे रवी...

‘सात अजुबे इस दुनियामे आठवी अपनी जोडी" असं कालपरवा पर्यंत रवी शास्त्री आणि विराट कोहली गात होते. आता ती जोडी फुटली.
Ravi Shastri
Ravi ShastriSakal

‘सात अजुबे इस दुनियामे आठवी अपनी जोडी" असं कालपरवा पर्यंत रवी शास्त्री आणि विराट कोहली गात होते. आता ती जोडी फुटली. सध्या अनेक तर्कवितर्क वर्तवले जातायत की नेमक काय झालं? दोघंही बोर्डाच्या मनातून उतरले. विराटने एका फॉरमॅटच नेतृत्व सोडलं. दुसरं बहुदा सोडावं लागेल. रवीने टी २० विश्व करंडक शेवटचा असं जाहीर केलं. अनेकांनी निःश्वास सोडला. मला रवीने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला अस वाटलं.

मला माझ्या करिअरची नीट आखणी कधी करता आली नाही. रस्ते फुटत गेले आणि मी चालत राहिलो. पुढचं ठिकाण ठाऊक नव्हतं.

त्यामुळे मला दोघांचा ह्याबाबतीत हेवा वाटतो. एक दिलीप कुमार दुसरा रवी शास्त्री.! दिलीप कुमारला देविका राणीने सिनेमाची ऑफर दिली तेंव्हा, त्याने साधा एकही सिनेमा पाहिला नव्हता. मिळणारे पैसे पाहून त्याने ठरवलं इथेच करिअर करायची.त्याला उमगलं की त्याची उर्दू, त्याचा आवाज, चांगला आहे. चेहरा बोलका आहे. त्याने त्याचा वापर केला. टॉपवर गेला आणि हिरो असेपर्यंत टॉप वर राहिला. बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, आणि समर्पिता, हे त्याचे जवळचे मित्र होते.

रवी शास्त्रीच्या करिअरची आखणी अशीच कौतुकास्पद होती. त्याचेही अत्यंत जवळचे मित्र, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास. दिलीप कुमारला अभिनयाची देणगी होती. रवीची गुणवत्ता फार मोठी नव्हती. माझा एक क्रिकेटपटू मित्र म्हणतो, " त्याच्याकडे स्मॉल स्केल कंपनीचं भांडवल होतं.त्याने त्या भांडवलात मल्टी नॅशनल कंपनी उभी केली."

स्वतःच्या मर्यादा माहीत असणं हा फार मोठा गुण असतो. रवीला त्या नेहमी ठाऊक होत्या. ‘षटकार’ पाक्षिकाच्या दिवसात तो मला म्हणाला होता." अरे, पाटीलका, ४० पर्सेंट टॅलेंट मेरे पास होता, तो मैं ग्रेट प्लेअर बनता. " खरंय. रवीकडे, सलीम दुराणीची गुणवत्ता असती तर तो सोबर्स झाला असता. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर त्याने आखणी करून योग्य रस्ता शोधला. पुढचं स्टेशन त्याला ठाऊक होत. वयाच्या १९व्या वर्षी तो न्यूझीलंडविरुद्ध तिथे खेळला. एक खेळाडू जायबंदी झाला म्हणून तो न्यूझीलंडला गेला. नशिबाचा पाहिला दरवाजा आपोआप उघडला. माझ्या एका मित्राने आदल्या आठवड्यात त्याच्या विरुद्ध ७० - ८० धावा ठोकल्या होत्या. तो बातमी ऐकून वेडा झाला. पण तो एकदा आत गेल्यानंतर निवृत्तीनंतर कसोटीत, ३८३३ धावा,१५१ बळी, तब्बल ११ शतकं, वनडेत ३१०८ धावा, १०९ बळी असा ऐवज घेऊन बाहेर पडला.

वाटेत येणाऱ्या प्रत्येक संधीची त्याने शिडी केली. आव्हानाला तो डगमगला नाही. किंबहुना प्रत्येक आव्हान पांढरा घोडा मानून त्यावर मांड ठोकली. पहिल्या कसोटीत १९८१ मध्ये तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला गेला. पुढे त्याच वर्षी इंग्लंड विरूध्द वानखेडेवर त्याला सुनील गावस्करने तिसरा क्रमांक दिला. त्याने फायदा उठवला.१९८२ मध्ये इंग्लंड विरूध्द इंग्लंडमध्ये ओव्हलवर त्याला थेट आघाडीवर पाठवलं गेलं. मी सांगतो त्याने ती संधी मानली.तो गेला छाती पुढे काढून. ६६ धावा त्याने केल्या. त्यानंतर १० पासून एक पर्यंत प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी केली. गोलंदाज म्हणून प्राथमिक निवड झालेल्या फलंदाजाची ही कामगिरी आहे.

बरं आव्हान छोटं नव्हतं. त्या त्या देशात जाऊन तो त्या कालखंडातील उत्कृष्ट गोलंदाजी खेळला. क्रिकेटच्या इतिहासातली ती सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजी होती. नावं तर पहा, इम्रान, सरफराज, मार्शल, हेडली, अंब्रोज, गार्नर, होल्डिंग, बोथम्, विलीस, मॅकडरमॉट, असे किती तरी.! उत्कृष्ठ तंत्र, जबरदस्त आत्मविश्वास, आणि वेगवान चेंडूचं भय नसणं ह्या तीन गोष्टीच्या जोरावर उसळते चेंडू तो लिलया सोडायचा, चेंडूच्या रेषेतून हळूच बाहेर पडत.! कधीतरी चेंडू अंगावर घ्यायचीही निधडी छाती त्याच्याकडे होती.

वेगवान गोलंदाजी विरूध्द त्याच्याकडे फार फटके नव्हते. त्याचा तो सुनीलने फेमस केलेला चपाती शॉट. ( चपाती परततात तसा तो फ्लीक मारायचा). आणि लाँग ऑन ते स्क्वेअर लेग मध्ये सरळ बॅटने मारलेले फटाके हे त्याच भांडवल. मी उंबराचं फुल पाहिलंय पण त्याने मारलेली सणसणीत स्क्वेअर कट मी पाहिलेली नाही. त्याच्या कव्हर ड्राईव्ह बद्दल आमचा मुंबईचा गोलंदाज प्रसाद देसाई म्हणतो, " तो एक नंबरच्या बस सारखा होता. ती बस माहिमवरून सुटली की दोन तासाने इलेक्ट्रिक हाऊसला पोहचते. तसा तो कव्हर ड्राईव्ह सीमापार जायचा हळू रमतगमत."

फिरकी गोलंदाज खेळताना काहीवेळा तो त्यांना वरतून फेकायचा. त्याने तिलक राजला, एका षटकात, सहा षटकार ठोकले तेंव्हा वानखेडे स्टेडियम मधली मूठभर माणसं सूर्य कुठे मावळतो आहे हे पहायला विसरले नाहीत. त्यांना वाटलं सूर्य डुबायला पूर्व दिशेला निघालाय. ती ताकद त्याच्याकडे होती. पण महत्वाचं आहे, इतक्या बंधनातून इतक्या धावा त्याने साधल्या. आयफेल टॉवरने हेवा करावा असा तो वेगवान गोलंदाजीच्या वादळात ताठ मानेने उभा राहायचा. त्याच्या फलंदाजीत सौंदर्यापेक्षा शास्वतता जास्त होती. तो डावखुरा फिरकी गोलंदाज होता. पण चेंडू फारसा वळवायचा नाही. तो चेंडू रोल करायचा. पण उंचीमुळे चेंडूला बाऊन्स होता आणि फलंदाजाला फसवायचं डोकं होतं. विव्ह रिचर्ड्सची विकेट त्याने वारंवार घेतलेली मला आठवते. तो गोलंदाजी टाकून आला की त्याला त्याच्या गोलंदाजीचं पृथःकरण पाठ असायचं.

वनडेची अस्सल गुणवत्ता त्याच्याकडे नव्हती. पण झाला ना यशस्वी वनडे खेळाडू ? १९८५मध्ये त्याने ऑस्ट्रेलियात जिंकलेली ऑडी त्यावेळी अनेकांच्या असुयेचा भाग होती. त्याने मला ऑडीतून घेऊन जाताना सांगितलं होत," मी जिंकण्यासाठी प्लॅनिंग केलं. प्रत्येक मॅचमध्ये एक अर्धशतक आणि दोन बळी हे माझं टार्गेट होतं." ते अर्धशतक करायला त्याने ४० षटकं सुध्दा घेतली. ह्याला आपण स्वार्थ म्हणू शकतो. पण जिंकलो आपण ती ट्रॉफी ! कधी कधी स्वार्थ जिंकून देतो.

तो कर्णधार म्हणून खूप मोठा झाला असता. त्याला एका कसोटीसाठी नेतृत्व मिळालं. वेस्ट इंडीज विरूध्द कसोटी त्याने जिंकली. हिरवाणीने त्यात १६ बळी घेतले. मुंबईचा हुशार क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी म्हणतो, " मी २२ कर्णधारांच्या हाताखाली खेळलो. पण सर्वोत्कृष्ट रवीच. तो तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून आत्मविश्वास द्यायचा.एकदा महाराष्ट्र विरूध्द नेहरू स्टेडियमवर आम्ही ३२५ ला ५ वगैरे होतो. टी ला मला तो म्हणाला तू आपल्याला ५०० च्या पुढे घेऊन जाणार आहेस. मला वाटलं ४०० , म्हणून मी म्हटलं ४०० पर्यंत न्यायचा प्रयत्न करतो. तो म्हणाला नाही, ५००.! तुझ्यात ती कुवत आहे". त्यानंतर नव्या चेंडूवर दोन बळी पटकन पडले. पण रवीचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी १४६ धावांची खेळी केली. मुंबईला ५०० च्या पुढे नेलं. मुंबई जिंकली"

प्रसाद देसाई म्हणतो, " एका मॅचमध्ये त्याने हातात बॉल देऊन म्हटलं. "गुड मॉर्निंग. तुझे गुड इव्हिनिग तक बॉलिंग डालनी है".मी म्हटलं," मै ३५ ओव्हर्स डालुंगा तो ५ विकेट्स मिलेंगे." तो लगेच म्हणाला" मुझे ये कॉन्फिडन्स अच्छा लगता है"

गुढग्याचे दुखणं वाढून तो फक्त ३१ वर्षाचा असताना निवृत्त झाला. त्या आधी, " रवी शास्त्री हाय हाय", "रवी शास्त्री अमर रहे" घोषणा वानखेडेवर दिल्या गेल्या होत्या. पण शर्टावरची धूळ झटकून टाकावी तशी तो टीका झटकायचा. अजूनही झटकतो.

पण पुढचा रस्ता डोळ्यासमोर होता - समालोचन.

त्याची वाणी चांगली आहे.एखादी गोष्ट तो सुंदर सांगू शकतो. मी एक एकनाथ सोलकरवर कार्यक्रम केला होता. त्यात गावस्कर, वाडेकर, वासू, विश्वनाथ, चंद्रशेखर वगैरे होते. आणि रवी होता. तो सुनीलच्या तोडीचं बोलला. स्पष्ट, ह्रदयाएव्हढंच डोक्यातून.

त्याने नवा रस्ता खणला. आधी भारतीय क्रिकेटचा डायरेक्टर, मग प्रशिक्षक. हे सुध्दा अचानक घडलं नाही. त्याने कुठे जायचं ते स्टेशन ठरवलं आणि तो तिथे पोहचला. उत्तम आखणी केली. विराटला आपलंसं केलं. कुंबळेचा काटा काढला. त्याला जिंकणारा घोडा फार लवकर कळतो. त्याला आक्रमक, उद्घट खेळाडू आवडतात. त्याचं आणि विराटचं चांगलं जमलं. दोघांवर अनेकांनी काही बाबतीत टीका केली. मी पण केली. रवीसाठी टीका हे टॉनिक आहे. मला प्रसाद देसाई सांगत होता ," एकदा चांगली बॅटिंग करताना रवी म्हणाला, '' यार मझा नही आ रही है. स्टँड मे जाकर रवी शास्त्री हाय हाय कर ना. खुन्नस आयेगा तो बॅटिंग अच्छी होगी"

रवी असा आहे. तो कोच म्हणून एखाद्याला पूर्ण पटणार नाही, पण तो यशस्वी झाला नाही असं त्याचा कठोर टीकाकार म्हणणार नाही. नव्या खेळाडूंना हाताळण्यात त्याचा हातखंडा आहे. तो टी २० विश्वचषकानंतर कोचिंग सोडणार. पण पुढचा रस्ता त्याने नक्की पाहिला असेल. त्याच्या डोळ्यासमोर असेल. तो रस्ता पार्लमेंट मधून तर जात नाही ना?

रवी साठी काहीही शक्य आहे.

"जे न देखे रवी ते देखे कवी, "असं म्हणतात. हा रवी पाहतो त्याची कवी सुध्धा कल्पना करू शकतं नाही..

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com