esakal | चिरंजीव भव

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar
चिरंजीव भव
sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

‘चोवीस तारखेला सचिनवर काहीतरी लिही. त्याचा वाढदिवस असतो ना?’

किमान डझनभर मंडळींनी मला हा सल्ला दिला. स्वतःच्या मुलाचा, भावाचा, तीर्थरूपांचा वाढदिवस त्यांना चटकन सांगता येत नाही.

सचिनच्या गल्लीतल्या, शाळेतल्या, राष्ट्रीय क्रिकेटमधल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या आणि वर अलीकडच्या प्रौढांच्या क्रिकेटमधल्या धावा एकत्र केल्या तर जो आकडा येईल त्यापेक्षा जास्त ओळी मी सचिनवर लिहिल्या आहेत. आणखी काय लिहिणार?

डॉन ब्रॅडमन, गारफील्ड सोबर्सप्रमाणे सचिन तेंडुलकरचं गारूड कधी कमी होईल असं वाटत नाही.

चार क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट बदललं असल्याचं पत्रकार म्हणून मी माझ्या कारकीर्दीत पाहिलं आहे.

एक, अजित वाडेकर. त्यानं परदेशी कसं जिंकायचं ते शिकवलं.

दुसरा, सुनील गावसकर. त्यानं जगातली सर्वात प्रलयंकारी वेगवान गोलंदाजी खेळताना, जगाला जे प्रात्यक्षिक दाखवलं त्यापलीकडे जाऊन जगातला कुठलाही कोच काही सांगू शकत नाही. भारतीय क्रिकेटमधून त्यानं वेगवान गोलंदाजीची भीती कमी केली.

तिसरा, कपिलदेव. त्यानं भारतीय मुलांना वेगवान गोलंदाज व्हायचं स्वप्न दिलं. तोपर्यंत वेगवान गोलंदाज हे भारतीय संघातील पेईंग गेस्ट असत. आज आपल्या भूमीत वेगवान गोलंदाजीचा वृक्ष जो फोफावला आहे त्याचं रोपटं कपिलनं लावलं होतं.

आणि अर्थात् चौथा, सचिन. ‘आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप नसतो,’ हे त्यानं दाखवून दिलं. भारतीय फलंदाजीची त्यानं वृत्ती बदलली. वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, रोहित शर्मा, विराट कोहली आणि आता रिषभ पंत ही त्या बदललेल्या वृत्तीची अपत्यं आहेत. त्यानं मुलांना, त्यांच्या आई-वडिलांना एक वेगळा करिअर-ऑप्शन दिला. त्यात आयपीएलची भर पडली. त्यामुळे गुणवत्ता असलेली अतिसामान्य कुटुंबातील मुलं आज कोट्यधीश झाली.

महान फलंदाज अनेक झाले; पण सर्वच जण काही रोल मॉडेल झाले नाहीत. ब्रायन लारालासुद्धा वाटलं की आपला मुलगा सचिन तेंडुलकरसारखा असावा.

अर्थात्, त्यामुळे क्रिकेटमधल्या काही वादग्रस्त गोष्टींबद्दल त्यानं भाष्य केलं नाही. निवडसमितीच्या चुकीच्या निर्णयाला त्यानं आव्हान दिलं नाही; पण मला वाटतं, तो त्याचा स्वभाव नसावा. एका लाकडी फळकुटाच्या साह्यानं सचिन नावाच्या कुरळ्या केसांच्या एका गोऱ्यापान मुलानं साहित्याच्या सहवासात रमणारं तेंडुलकर हे आडनाव सातासमुद्रापार नेलं; पण या नावात एवढी सांस्कृतिक ताकद होती की, एवढ्या मोठ्या प्रवासात त्यानं कधी हेलकावा खाल्ला नाही.

मागं वळून पाहताना दोन गोष्टी माझ्या मनाला लागतात.

त्याचं यश पाहायला गोंधळेकर पंच हवे होते. शाळेच्या दुसऱ्या वर्षात सचिन ५० धावांची एक खेळी खेळला. त्यात १२ चौकार होते. संध्याकाळी त्या पंचांनी आचरेकर सरांना सांगितलं :‘‘तुमचा हा मुलगा कसोटी खेळेल.’’

आचरेकर सर म्हणाले : ‘‘ या स्तरावर मी अनेकांना असं खेळलेलं पाहिलंय. ते नाही खेळले कसोटी.’’

गोंधळेकर म्हणाले :‘‘हा वेगळा आहे.’’

दुर्दैवानं त्याचं वेगळेपण दिसेपर्यंत गोंधळेकर जगात राहिले नाहीत.

दुसरे, सचिनचे वडील. सचिन महानतेच्या पायऱ्या चढत असताना रमेश तेंडुलकर यांनी पाहिलं; पण सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेलं पाहिलं नाही. लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनीया बाबा गेला’ या गाण्यात शेवटी त्या म्हणतात :

सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरूनीच ते बघतात

कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा, एकच वेळा सचिनच्या भावना यापेक्षा वेगळ्या नसतील.

असो.

वय माणसाचं वाढतं, कर्तृत्वाचं नाही. ते चिरंजीव असतं.

काही गोष्टींना वय नसतं.

ते लतादीदींच्या गाण्याला नाही आणि मोझार्टच्या संगीतालासुद्धा.

ते मधुबालाच्या सौंदर्याला नाही आणि सावित्रीच्या पातिव्रत्यालाही.

ते रामायण-महाभारताला नाही आणि संत तुकाराममहाराजांच्या गाथेलाही नाही.

ते बुद्ध-गांधीजींच्या मानवतावादाला नाही आणि पन्नादाई, बाजीप्रभू किंवा भगतसिंग यांच्या त्यागालाही नाही.

ते मीरेच्या कृष्णावरच्या अलौकिक प्रेमाला नाही आणि कृष्ण-राधेच्या खट्याळ प्रेमालाही नाही.

या गोष्टी आपण वयात मोजत नाही.

त्या पिढ्यान्‌पिढ्यांना गारूड घालत असतात.

कुठलीही गोष्ट चिरंजीव व्हायला एक काळ जावा लागतो.

तरीही मी आज लिहितोय.

वय काही गोष्टींना नसतं.

ते सचिन तेंडुलकरच्या बॅकफूटवर मारलेल्या कव्हर ड्राईव्हला नाही आणि अर्जुनाच्या बाणाप्रमाणे सरळ जाणाऱ्या स्ट्रेट ड्राईव्हलाही नाही. ते दोन्ही हातांनी त्यानं फुलाप्रमाणे सर्वत्र उधळलेल्या फटक्यांना नाही. ते सचिनच्या फलंदाजीच्या कलेला नाही आणि तंत्रालाही नाही.

ते आकाशात राहून जमिनीवर घट्ट पायानं उभं राहण्याच्या त्याच्या नम्रतेला नाही.

आणि मैदानाला मंदिर मानून त्याचं पावित्र्य जपणाऱ्या मनाला नाही.

हे सर्व चिरंजीव होणारच आहे.

क्रिकेट हा खेळ असेपर्यंत तरीही सवयीनं कॅलेंडर फडफडेल. वर्ष जाईल, पुन्हा २४ एप्रिल येईल....

आपण म्हणू, सचिन ४९ वर्षांचा झाला.

हे थांबेल असं नाही.

कारण आपल्या सर्वांना वाटतं, अजून त्याचं एक ‘वयाचं शतक’ शिल्लक आहे.

वयाची शंभरी पूर्ण करून त्यानं त्याच्या आयुष्यातलं १०१ वं शतक ठोकावं असं सगळ्यांना मनापासून वाटतं.

म्हणून तर त्यानं दरवर्षी घेतलेल्या वयाच्या प्रत्येक धावेचं आपण स्वागत करतो.

मध्यंतरी सचिन कोविडमधून गेला. मी त्याच्याशी अधूनमधून व्हॉट्स ॲपवर बोललो.

त्याला म्हटलं : ‘‘एकटेपण किती भयानक असेल ना?’’

तो म्हणाला : ‘‘२१ दिवस एकटा होतो.’’

जो हजारोंच्या टाळ्यांमध्ये वाढलाय त्याला एकटेपण भयानक वाटणारच.

पण कर्तृत्वाच्या आसमंतात तो एकटाच असावा, ध्रुवताऱ्याप्रमाणे.

माझ्या आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं सचिनला अनेकानेक शुभेच्छा...चिरंजीव भव.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)