
आदिल रशीदनं रोहितला गुगलीवर बाद केल्यावर शिवाजी पार्कच्या माझ्या मित्राचा फोन आला.
‘‘तू यांचं ‘मोठे फलंदाज’ म्हणून कौतुक करतोस. यांना त्या रशीदचा गुगली कळत नाही. सुभ्यानं यांना चार ओव्हरसुद्धा खेळू दिलं नसतं. सुभ्याला खेळताना यांचं ‘ढूँढो ढूँढो रे सजना’ झालं असतं.’’
सुभ्या म्हणजे सुभाष गुप्ते. आमची आणि त्याआधीची शिवाजी पार्कची पिढी त्याला प्रेमानं सुभ्या म्हणायची. ‘ढूँढो ढूँढो रे सजना’ या गाण्याचा उपयोग सुभ्याचा किंवा चंद्रशेखरचा चेंडू शोधणाऱ्या फलंदाजांसाठी इतक्या वेळा केला गेलाय की काही विचारू नका.
आजच्या पिढीतल्या फलंदाजांना गुगली नीट ओळखता येत नाही ही वस्तुस्थिती आहे; पण त्यामुळे विराट कोहलीच्या . महानतेला फार मोठं गालबोट लागतं असं मला वाटत नाही.
सन १९५३ मध्ये वेस्टी इंडीजमध्ये वॉलकॉटसारखा महान फलदांज ड्रेसिंग रूममध्ये येऊन म्हणाला होता : ‘गुप्ते काय टाकतोय तेच मला कळत नाही. मी फक्त देवाचं नाव घेऊन त्याला पुढं खेळतोय.’
सर गारफील्ड सोबर्सनं माझ्याकडे एकदा कबुली दिली होती की : ‘मला सुभाष गुप्तेचा गुगली कधीही कळला नाही; पण मी टप्प्यावर खेळायचो.’ पण टप्प्यावर खेळून त्यानं १९५८ मध्ये तीन शतकं ठोकली होती. कारण मूलतः सोबर्स हा देवलोकातला फलंदाज होता. बॅकफूटवर खेळताना त्याच्याकडे इतका वेळ असायचा की तो फटका तो अगदी आरामात खेळायचा.
माझं आणि चंदू बोर्डेंचं परवा या गोष्टीवर बोलणं झालं. त्या वेळी मला जाणवलेल्या दोन गोष्टी त्यांनाही जाणवल्या. एक म्हणजे, आजचे फलदांज फिरकी गोलंदाजी खेळताना गोलंदाजांच्या हाताकडे पाहून, चेंडू कुठं वळणार याचा अंदाज घेत नाहीत. आणि दुसरं म्हणजे, त्यांना दर्जेदार लेग स्पिनरचा सराव मिळत नाही. टी-ट्वेन्टीमध्ये काही वेगात गुगली, लेग स्पिन टाकणारे गोलंदाज खेळतात; पण अफगाणिस्तानचा रशीद सोडला तर वरच्या दर्जाचा कुणीही नाही. सध्या फिरकी गोलंदाज जगामध्ये अल्पसंख्याक आहेत. एक फायदा जो आजच्या खेळाडूंना मिळतो तो पूर्वी मिळत नव्हता. आता कॉम्प्युटर एखाद्या गोलंदाजीची इतकी चिरफाड करतो की तो गुगली टाकताना नेमकं काय करतो हे चुटकीसरशी शोधता येतं; पण थिअरी पक्की असली तरी प्रॅक्टिकलमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतातच असं नाही.
आदिल रशीद हा फार मोठा लेग स्पिनर आहे असंही नाही. पूर्वीच्या काळात भारतात लेगस्पिनरची एक मोठी परंपरा होती. सी. एस. नायडू, सदू शिंदे, सुभाष गुप्ते, त्याचा भाऊ बाळू गुप्ते, व्ही. व्ही. कुमार, चंदू बोर्डे, चंद्रशेखर, शिवरामकृष्णन, नरेंद्र हिरवानी, अनिल कुंबळे इत्यादी इत्यादी. रणजी स्तरावरही अनेकजण होते. त्या वेळी गुगली चटकन् ओळखला की ‘टेलिग्राम आला’असं म्हणत! त्या काळी फोन फक्त श्रीमंतांकडे असत. टेलिग्राम म्हणजे तार. हा निरोप पोचवायचा सर्वात वेगवान मार्ग होता. त्यामुळे गुगली चटकन् कळणं याला ‘टेलिग्राम’ म्हणत. असत. आजच्या युगात ई-मेल किंवा एसएमएस असं म्हणता येईल. त्या काळात गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटल्यावर चेंडू ओळखण्याची सवय म्हणा किंवा कला म्हणा फलंदाजांना होती. मला आठवतंय की, मी एका माजी पण मोठ्या फलंदाजाबरोबर मॅच बघत बसलो होतो आणि एक लेगस्पिनर चेंडू टाकत होता. तो फलंदाज गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटला की गुगली असेल तर ‘गुगल’ असं ओरडायचा. एका मोसमात मुंबईमध्ये ज. ना. कोरे नावाच्या एका लेगस्पिनरनं धमाल उडवली. विजय मांजरेकरांनी त्याला न्याहाळलं. ते त्याच्याबरोबर खेळले आणि जाहीर केलं, ‘त्याचा पार्श्वभाग कुठल्या बाजूला वळतो ते पाहा...त्यावरून चेंडू कुठल्या दिशेला जाणार हे कळेल.’ स्वतः ज. ना. कोरेनं हा किस्सा मला सांगितला.
हनुमंत सिंग म्हणत, ‘सुभाष गुप्तेकडे दोन गुगली होते. एक तो दाखवायचा आणि एक फसवा होता.’
चंदू बोर्डे मला परवा सांगत होते, ‘सुभाषचा गुगली काही वेळेला यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेलाही कळायचा नाही आणि तरीही ताम्हाणेनं सुभाषला केलेलं यष्टिरक्षण पाहून एकदा वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर लियरी कॉन्स्टन्टाईन त्याला म्हणाले होते, You seem to read gupte like a book. आधी वन डे आणि मग वेस्ट इंडीज संघानं वेगवान गोलंदाजीवर मिळवलेले विजय यामुळे जगभर वेगवान गोलंदाजीवर भर दिला गेला. जगात प्रत्येक संघाकडे जास्तीत जास्त वेगवान गोलंदाज असायच आणि दर्जेदार स्पिनर्स कमी कमी होते गेले. अब्दुल कादिर, शेन वॉर्न, कुंबळे यांनी पुन्हा एकदा या कलेचं पुनरुज्जीवन केलं. सचिन तेंडुलकरच्या पिढीपर्यंत मोठे फलंदाज लेगस्पिनर्सना कौशल्यानं खेळत असत. वॉर्नची गोलंदाजी सचिन, नवज्योतसिंग सिद्धू, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी फोडून टाकली. वॉर्न हा गुगलीपेक्षा त्याच्या स्ट्रेट थ्रू किंवा स्लिपर्ससाठी जास्त फेमस होता; पण सचिननं अगदी कोवळ्या वयातसुद्धा अब्दुल कादिरला आरामात षटकार ठोकले होते. त्याचा गुगली बरोबर ओळखून. पुढं चेन्नईला शिवरामकृष्णनच्या विरोधात सराव करून मग वॉर्नवर हल्ला चढवला. मला असं वाटतं की, कोहलीलाही तशाच प्रकारच्या सरावाची गरज आहे. जे आहेत त्यातले काही लेगस्पिनर्स बोलवावेत आणि त्यांच्यावर सराव करावा. ज्या माणसानं पाठीवरचं अँडरसनचं भूत प्रयत्नानं उतरवलं, त्याच्यासाठी हे भूत फारसं मोठं आहे, असं मला वाटत नाही.
मात्र, त्याचबरोबर ही जी लेगस्पिनची कला आहे ती किमान भारतात तरी मरता कामा नये. इथं लेगस्पिनर तयार झाले पाहिजेत आणि ते जर तयार व्हायचे असतील तर रणजी ट्रॉफीचं महत्त्व वाढलं पाहिजे. कारण, पाच दिवसांच्या मॅचमध्ये चांगला लेगस्पिनर मिळू शकतो आणि मग तो स्वतःला वन डेमध्ये अॅडजस्ट करू शकतो.
जाता जाता एक चटका लावणारा किस्सा आठवला. आमचा बाळू गुप्ते मृत्युशयेवर शेवटच्या घटक मोजत होता. मला वहिनी म्हणाल्या की, ‘त्या शेवटच्या काही घटकांमध्ये तो जवळपास शुद्धीतच नव्हता; पण गोलंदाजीची करताना जशी ॲक्शन करावी तशी ॲक्शन त्याचे हात करत होते.’ त्यानं मृत्यूला गुगली टाकण्याचा प्रयत्न केला असेल; पण मृत्यू हा असा एकमेव फलंदाज आहे की जो गुगलीवर विकेट देत नाही.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.