ब्लॅक & व्हाईट

द्वारकानाथ संझगिरी (dsanzgiri@hotmail.com)
Sunday, 17 January 2021

पैसे फेकले की कुठलाही माणूस गुलाम होतो असा गोऱ्यांचा अनुभव! कारण,शेवटी त्याच्या पोटात भूक असते,म्हणून त्यांनी वेस्ट इंडीज्‌च्या काही आणि श्रीलंकेच्याही खेळाडूंना चक्क पैसे फेकून आफ्रिकेत खेळायला नेलं

जग कितीही उदारमतवादी झालेलं वाटत असलं तरी वर्णद्वेष संपलेला नाही. वर्णद्वेषाच्या निखाऱ्यावर काही काळ राख जमते, मग कुणीतरी फुंकर मारतं आणि निखारे फुलतात. 
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका आफ्रिकी-अमेरिकी नागरिकाला पकडलं आणि असं जखडलं की तो प्राण गमावून बसला. 

परवा सिडनीत काही प्रेक्षकांनी भारतीय क्रिकेटपटूवर वर्णद्वेषी टीका-टिपण्णी केली. 

पहिल्या घटनेच्या वेळी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज्‌ कसोटी सामना सुरू होता. त्या वेळी दोन्ही संघांनी, बळी गेलेल्या अमेरिकी कृष्णवर्णीय नागरिकाला अधिकृतपणे श्रद्धांजली वाहिली. 

सिडनीच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, आयसीसी, भारतीय क्रिकेट बोर्ड असा सर्वांनी एकमुखानं घटनेचा धिक्कार केला. 

या अशा श्रद्धांजल्या, धिक्कार हे कागदावर आदर्शवादी वाटतात; पण गोऱ्यांच्या मनातली वर्णद्वेषाची शेवटची भिंत पडलीय असं मला मुळीच वाटत नाही. भिंती वाढत नसतील; पण वेगानं कोसळतही नाहीत. महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आदींनी त्या पाडण्यासाठी ‘भगीरथप्रयत्न’ केले...आजच्या पिढीला या गोष्टींची कितपत कल्पना आहे. देव जाणे!

हेही वाचा : स्टीव्ह वॉला गांगुलीनं चक्क शेपूट म्हटलं होतं

क्रिकेटमध्ये वर्णद्वेष राज्य करायचा! वेस्ट इंडिज्‌चा पहिला काळा कर्णधार होता सर फ्रॅंक वॉरेल. त्यापूर्वी त्यांचा प्रत्येक कर्णधार हा गोरा असायचा. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि इंग्लंडशी खेळायचा. कारण, त्या काळात त्यांच्याकडे फक्त गोरे खेळाडू होते. 

सन १९७१ मध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी त्यांच्या संघात बेसिल डी’ऑलिव्हेराची निवड केली. तो सावळा खेळाडू होता. दक्षिण आफ्रिकेनं त्याला त्यांच्या देशात घ्यायला नकार दिला, त्यामुळे दौरा रद्द झाला. तिथूनच क्रिकेटचं जग एकवटलं आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार टाकला. या बहिष्काराचं प्रत्युत्तर म्हणून काही वर्णद्वेषी इंग्लिश खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचे खासगी दौरे केले.  

पैसे फेकले की कुठलाही माणूस गुलाम होतो असा गोऱ्यांचा अनुभव! कारण, शेवटी त्याच्या पोटात भूक असते, म्हणून त्यांनी वेस्ट इंडीज्‌च्या काही आणि श्रीलंकेच्याही खेळाडूंना चक्क पैसे फेकून आफ्रिकेत खेळायला नेलं. मात्र, वेस्ट इंडीज्‌च्या काही खेळाडूंनी ही गुलामी स्वीकारली नाही. त्यातल्या दोघांना मी नेहमी सॅल्यूट ठोकतो. एक मायकेल होल्डिंग आणि दुसरा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स. 

सन १९७६ मध्ये वेस्ट इंडीज्‌चा संघ इंग्लंडला गेला तेव्हा टोनी ग्रेगनं एक वल्गना केली होती : ‘आम्ही त्यांना गुडघ्यावर आणि हातावर चालायला लावू.’ तो म्हणाला होता : I intend to make them grovel. काही इंग्लिश खेळाडूंचं मत होतं की त्या grovel शब्दामागं वर्णद्वेषाच्या भावना नव्हत्या. ‘आपण विजेता होणार,’ असा आव आणण्याचा तो प्रयत्न होता. लॉईडला ते वर्णद्वेषी वाटलं नाही; पण रिचर्ड्‌सनं तो अर्थ शब्दकोशात पाहिला आणि तो कापरासारखा पेटला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

होल्डिंग म्हणाला : ‘‘ग्रेगच्या त्या भाषेनं आम्ही जास्त जिद्दी झालो.’’ 

किंबहुना टोनी ग्रेगच्या वडिलांनी मुलाला फोन करून विचारलं : ‘‘तुला या grovel शब्दाचा अर्थ कळलाय ना? की न कळताच तो शब्द तू वापरलास?’’ 

त्यानंतर होल्डिंगनं बॉलचा वापर बॉम्बसारखा केला आणि रिचर्ड्‌सचीही बॅट तोफ झाली. 

त्या मालिकेत रिचर्ड्‌सनं ८१२ धावा ठोकल्या आणि होल्डिंगनं २८ बळी घेतले. 

व्हिव रिचर्ड्‌स हे एक वेगळंच रसायन होतं. अँटिगाच्या इतिहासात २५० वर्षांपूर्वी किंग फोर्ड नावाच्या एका गुलामानं गुलामगिरीचे साखळदंड तोडण्याचा प्रयत्न केला होता. तो फसला. तो फासावर गेला. तो ज्या तुरुंगात होता त्या तुरुंगाच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यात रिचर्ड्‌सचं बालपण गेलं. त्याचे वडीलसुद्धा या तुरुंगातच नोकरीला होते. किंगच्या आत्म्यानं रिचर्ड्‌सचं शरीर धारण केलं होतं असं मला नेहमी वाटतं! तो वृत्तीनंसुद्धा सशस्त्र क्रांतिकारकच आहे. गोऱ्या संघाविरुद्ध त्याची फलंदाजी हा सशस्त्र क्रांतीचा लढाच होता. फक्त त्यानं शस्त्र केलं ते बॅटला. तो आणि इयान बॉथम हे सॉमरसेट काउंटीसाठी एकत्र खेळत. दोघंही तसे जवळचे मित्र. या बॉथमला दक्षिण आफ्रिकेनं अक्षरश: तिथं येण्यासाठी पृथ्वी देऊ केली होती! पण बॉथम तिथं गेला नाही. तो असं म्हणाला : ‘मी जर दक्षिण आफ्रिकेला गेलो तर मी आयुष्यात कधी व्हिव रिचर्ड्‌सच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.’ 

व्हिव रिचर्ड्‌स तर सगळ्यात कडवट खेळाडू होता. काळ बदलत गेला...नेल्सन मंडेला २७ वर्षांनंतर कैदेतून बाहेर आले आणि दक्षिण आफ्रिकेत क्रांती झाली. त्या वेळेला भारतीय संघसुद्धा दक्षिण आफ्रिकेत गेला; पण रिचर्ड्‌स गेला नाही. का नाही गेला? तर त्याचं म्हणणं होतं : ‘जोपर्यंत दक्षिण आफ्रिकेत काळ्यांचं राज्य येत नाही आणि नेल्सन मंडेला अध्यक्ष होत नाहीत तोपर्यंत मी तिथं पाऊल नाही ठेवणार.’ आणि नेल्सन मंडेला अध्यक्ष झाल्यानंतरच तो तिथं गेला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता वर्णद्वेषाचे अनेक कायदे झालेले आहेत. आयसीसीतर्फे चौकशी होते. त्यांच्यावर केसेस होतात; पण शेवटी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, कायदा हा पूर्ण उपाय नाही. तसं असतं तर ज्यानं खून केला आहे त्या माणसाला फासावर लटकवल्यानंतर पुन्हा खून झालेच नसते.  वर्णद्वेष हा मनात असतो. त्या भिंती पडणं आवश्यक असतं आणि आजही असं दिसतंय, की या भिंती वाढल्या नसतील; पण त्या पूर्णपणे पडलेल्याही नक्कीच नाहीयेत. 

अजूनही गोऱ्यांच्या मनात काळ्यांबद्दल काळंबेरं आहेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dwarkanath sanzgiri writes article about racism