एका झेलानं...

एक सुटलेला झेल बऱ्याचदा क्रिकेटमध्ये मनावर कायमचा व्रण उमटवतो किंवा इतिहास बदलून टाकतो. ऐन मोक्याच्या वेळी घेतलेल्या झेलानंसुद्धा इतिहास बदलला आहे.
Hasan Ali
Hasan AliSakal

त्या रात्री पाकिस्तानच्या हसन अलीच्या मनात काय काय चाललं असेल...! त्याच्या ठिकाणी स्वतःला कल्पून मी त्याबाबतचा विचारही करू शकत नाही.

ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीनं जिंकली त्याचा मला आनंद झाला; पण हसन अलीबद्दल प्रचंड सहानुभूती वाटली. त्यानं मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल त्याची कारकीर्द संपुष्टात आणेल की नाही याची मला कल्पना नाही; पण त्या रात्री त्याच्या देशाची सगळी समाजमाध्यमं त्याच्यावर फक्त आग ओकत होती.

एक सुटलेला झेल बऱ्याचदा क्रिकेटमध्ये मनावर कायमचा व्रण उमटवतो किंवा इतिहास बदलून टाकतो. ऐन मोक्याच्या वेळी घेतलेल्या झेलानंसुद्धा इतिहास बदलला आहे.

हसननं जेव्हा झेल सोडला तेव्हा ऑस्ट्रेलियाला २० धावा १० चेंडूंत करायच्या होत्या. एक कबूल की, या वेळी वेड (आडनाव) शहाणपण पांघरून खेळत होतं. तो बाद झाला असता. नवीन फलंदाजाला येऊन थेट शाहीन आफ्रिदीवर हल्ला करणं कदाचित जमलंही नसतं; पण अलीकडे टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये १० चेंडूंमध्ये २० धावा ही फार कठीण गोष्ट नाहीए...पण तरीही, हसन अलीनं वर्ल्ड कप सोडला, अशीच आख्ख्या पाकिस्तानची भावना होती.

माझ्या डोळ्यांसमोर चटकन् १९९९ च्या वर्ल्ड कपमधली ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मॅच उभी राहिली. गिब्सनं असाच स्टीव्ह वॉचा झेल सोडला आणि स्टीव्ह वॉनं म्हटलंसुद्धा, ‘तू वर्ल्ड कप सोडलायस.’ आणि नेमकं तेच घडलं.

डोळसपणे क्रिकेट पाहिलेल्या आणि ऐकलेल्या माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत...ज्या वेळी मला असं जाणवलंय की, एका सोडलेल्या किंवा घेतलेल्या झेलानं कारकीर्दी संपल्यात किंवा वर्ल्ड कप जिंकलेत.

‘कॅचेस् विन मॅचेस्’ ही म्हण मी आयुष्यभर खरी ठरताना पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा आजचा दर्जा हा फारच वर गेलाय. आज खऱ्या अर्थानं ‘रक्षणा’ची भावना क्षेत्ररक्षकांमध्ये दिसते. माझ्या लहानपणी भारत-पाकिस्तान संघाचा खेळ पाहताना, चेंडू फक्त ‘अडवला’ जातोय, हीच भावना होती. चेंडू त्वरित यष्टिरक्षकाकडे चोख पोचवला पाहिजे ही भावना तितकीशी दृढ नव्हती. त्या वेळी चेंडू टेलिग्रामच्या वेगानं यष्टिरक्षकाकडे जायचा, आता एसएमएससारखा जातो.

सुटलेले झेल मनावर कायमचा व्रण कसा उमटवतात आणि करिअर कसं संपतं याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे, १९६० च्या भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकेतलं! मुंबईतल्या पहिल्याच कसोटीची गोष्ट. हनीफ महंमद हा पाकिस्तानचा त्या वेळचा महान फलंदाज होता. मॅचच्या पाचव्या षटकात रमाकांत देसाईच्या गोलंदाजीवर तो १२ वर असताना यष्टिरक्षक नाना जोशीनं झेल सोडला आणि त्यानंतर त्यानं १६० धावा केल्या. ती संपूर्ण सीरिज ड्रॉ झाली. त्या वेळी विजय हजारे यांच्यासारख्या भारताच्या महान फलंदाजानं लिहिलं होतं : If ever a catch marred or made a series it was this one. याच नाना जोशीनं त्याच मॅचमध्ये रमाकांत देसाईबरोबर ९ व्या विकेट्ससाठी १४९ धावांची भागीदारी केली. त्यानं ५२ नाबाद धावा केल्या. रमाकांत देसाईनं ८५ धावा केल्या होत्या आणि हा भारतीय विक्रम अजून अबाधित आहे, तरीसुद्धा हनीफ महंमदचा झेल सोडल्यामुळे तो पुन्हा आयुष्यात कसोटी सामना खेळलाच नाही.

एक व्रण किरण मोरेच्या हृदयावरही असावा. १९९० ची गोष्ट. भारत विरुद्ध इंग्लंडची ‘लॉर्ड्‌स’वरची मॅच. इंग्लंडचा आघाडीचा फलदांज ग्रॅहम गूच ३३ वर होता आणि किरणकडे अत्यंत सोपा झेल आला. किरणच्या हातून तो सुटला. त्यानंतर ग्रॅहम गूचनं ३३३ धावा केल्या आणि ती कसोटी इंग्लडनं जिंकली.

मात्र, ज्यांच्यामुळे इतिहास बदलला असेही काही झेल आहेत. असे तीन झेल मला माहीत आहेत, ज्यांच्यामुळे भारतीय क्रिकेट बदललं असं मी मानतो. त्यातला पहिला होता १९७१ मध्ये ‘ओव्हल’वर एकनाथ सोलकरनं घेतलेला ॲलन नॉटचा झेल.

इंग्लडच्या दुसऱ्या डावात टणटणीत खेळपट्टीवर चंद्रशेखर चमत्कार घडवत होता आणि त्याच वेळी ॲलन नॉट बॅटिंगला आला. ॲलन नॉट हा त्या मालिकेमध्ये इंग्लंडचा ‘संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा दरवाजा’ होता. या डावातही तो जर खेळला असता तर ही मॅच जिंकणं भारताला कठीण होणार होतं. तरुण सोलकरनं त्या वेळी एक अतिशय सुंदर असा ‘मानसिक डाव’ खेळला. त्यानं ॲलन नॉटची एक सवय न्याहाळून ठेवली होती. ॲलन नॉट आपला गार्ड स्टम्प्सच्या बेलनं घ्यायचा...बेलनं गार्ड घेतल्यावर आपल्या धावा होतात, अशी त्याची अंधश्रद्धा होती. सोलकरनं काय केलं...? तर त्यानं कॅप्टन अजित वाडेकरला विचारलं की, ‘हा (ॲलन नॉट) असं असं का करतो? मी बेल्स काढून खिशात ठेवू का?’

वाडेकर सोलकरला म्हणाला : ‘‘हां, ठेव ना. काही हरकत नाही.’’

सोलकरनं बेल्स काढून ठेवल्या. ॲलन नॉट बॅटिंगला आला. स्टम्प्सवर बेल्स नसल्याचं त्याला आढळलं. तो गोंधळला. खरं तर त्यानं पंचांना त्याविषयी विचारायला हवं होतं. त्यानं घाईघाईत बॅटनं आपला गार्ड घेतला. त्यानंतर सोलकरनं बेल्स स्टम्‍प्सवर ठेवून दिल्या. ‘आपली श्रद्धा भंगली,’ अशी भावना ॲलन नॉटच्या मनात कुठं तरी आली असावी.

सोलकरनं ठरवलं की, हीच वेळ आहे घाला घालायची! क्षेत्ररक्षणासाठी नेहमी ज्या पोझिशनवर तो उभा राहायचा त्याच्यापेक्षा किंचित जरा पुढं सोलकर उभा राहिला. व्यंकटराघवननं बॉल टाकला, ॲलन नॉटनं बचाव केला. त्या वेळी सोलकरनं अक्षरश: झेप मारून जमिनीलगत कॅच घेतला. खरं तर तो कॅच नव्हताच. त्यानं डिफेन्सिव्ह शॉट आपल्या पंज्यांमध्ये पकडला होता. गवताच्या उंचीपेक्षा किंचित् वर त्या बॉलनं डोकं काढलं होतं. मुंबईच्या भाषेत त्यानं ‘चतुर’ पकडला. तो झेल घेतल्यामुळे ॲलन नॉट लवकर बाद झाला.

इंग्लंडचा संघ १०१ धावांत गारद झाला आणि तो सामना भारतानं चार विकेट्स राखून जिंकला.

इंग्लंडमध्ये भारतानं मिळवलेला तो पहिला विजय होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट हे पहिल्यांदा जागतिक स्तरावर आलं, म्हणून मला हा झेल इतिहासाचं सोनेरी पान लिहिणारा वाटतो.

दुसरा ऐतिहासिक झेल होता कपिल देवचा. १९८३ च्या वर्ल्ड कपमधला.

सन १९८३ च्या वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघाला वन डेच्या स्तरावर फारसं कुणी मानतही नव्हतं.

त्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताला १८३ धावांत वेस्ट इंडीजनं अक्षरश: गुंडाळून टाकलं. आणि वेस्ट इंडीजची बॅटिंग काय? ग्रीनिज होता, व्हिव्हियन रिचर्ड्‌स होता, क्लाइव्ह लॉईड होता. १८३ धावा गाठणं म्हणजे घोडदौडसुद्धा नव्हे, तर बागेतल्या पाच फेऱ्या वाटत होत्या; पण संधूच्या पहिल्याच बॉलवर ग्रिनीज बाद झाला आणि रिचर्ड्‌स खेळायला आला. तो अशा स्टाईलनं खेळत होता की भारतीय गोलंदाजी ‘किस चिडिया का नाम है.’

त्याची बॅटिंग पाहून सुनील गावसकर संदीप पाटीलला म्हणाला, ‘हा बहुदा आपल्याला शॉपिंगसाठी वेळ देणार.’ त्यानं मदनलालवर प्रखर हल्ला केला; पण त्या हल्ल्यात तो वाहवत गेला. त्याचा जो झेल वरती उडला तो सोपा नव्हता. म्हणजे मला त्या वेळीही जाणवलं होतं आणि आजही जाणवतंय की, कपिल कसा त्या बॉलच्या खाली आला हे कळलंच नाही. भारताचं नशीब की, जिथं झेल उडाला तिथं जवळ कपिल होता. आपला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक! आणि तसा फार जवळही नव्हता. दबावाखाली कपिलनं हा असामान्य झेल घेतला. ती मॅच फिरली.

वासू परांजपे मला नेहमी म्हणायचा : ‘त्या मॅचचे हायलाईट पाहताना अजूनही भीती वाटते! तो झेल सुटणार तर नाही...म्हणजे वर्ल्ड कप गेला.’

सन १९८३ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदललं. लगेच पुढचा वर्ल्ड कप भारतात आला आणि भारतात वन डे क्रिकेट मोठ्या प्रमाणात फुलायला लागलं. वन डे क्रिकेट फुलल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये आणि भारतीय क्रिकेटपटूंकडे प्रचंड प्रमाणात पैसा आला.

तिसरा झेल २००७ चा. तो एक काळ्या अंधारातला दैवी प्रकाश होता असं मला वाटतं. कारण, २००७ ला वेस्ट इंडीजमध्ये भारतीय संघाची ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये नाचक्की झाली. भारतीय क्रिकेटपटूंवर आख्खा भारत चिडला. दगडफेक, प्रेतयात्रा...जेवढं वाईट शक्य असतं ते अनुभवायला मिळालं.

सन २००७ च्या पहिल्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी महेंद्रसिंह धोनी हा कर्णधार झाला. त्यानं भारतीय टी-ट्वेन्टीचं नशीबच बदलून टाकलं. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये जोगिंदर शर्माच्या हातात शेवटची ओव्हर येईल आणि त्या शेवटच्या ओव्हरमधला शेवटच्या बॉलवर रॅम्प शॉट खेळावं असं मिसबा उल्‌ हकला वाटेल...झेल उडेल आणि झेलच्या खाली उभा असेल श्रीसंत...आणि श्रीसंत तो झेल घेईल असं तेव्हा कुणाच्या स्वप्नातही आलं नसतं!

तेव्हा त्यांनी भारतासाठी टी-ट्वेन्टीच्या रूपानं दुसरा वर्ल्ड कप जिंकलेला होता. आज जोगिंदरचा विसर पडलेला आहे. श्रीसंत कुठं आहे देव जाणे...पण त्यानंतर आख्ख भारतीय क्रिकेट बदललं. टी-ट्वेन्टीचं एक वेगळं वारं भारतात वाहायला लागलं. त्या वाऱ्याचं वादळात रूपांतर झालं. आयपीएल आल्यावर. आता भारतीय क्रिकेटचं सगळं स्वरूपच बदलून गेलं आहे. भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंनी श्रीमंतीची व्याख्या बदलली. भारतीय संघ हा जागतिक क्रिकेटमधली एक प्रमुख शक्ती झाला. एवढी मोठी शक्ती की जिनं डोळे वटारले की आयसीसीलाही घाम फुटतो, आयसीसीला भारतीय क्रिकेटचे पाय चेपावे लागतात. इंग्लड, ऑस्ट्रेलिया हे मांडलिक राजे आहेत. इतर संघ पोटार्थी. म्हणूनच मी म्हणतो, जर हा झेल हसन अलीनं घेतला असता आणि जर पाकिस्तान जिंकला असता तर, कुणी सांगावं, त्यांनी वर्ल्ड कपही जिंकला असता आणि ज्या दयनीय परिस्थितीत सध्या पाकिस्तान आहे ती परिस्थिती बदलली असती, पाकिस्तान क्रिकेटला आणि क्रिकेटपटूंना प्रचंड फायदा झाला असता. पण ते नियतीच्या मनात नव्हतं.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com