हेमंतकुमार, बर्मनदा आणि देव आनंद

बर्मनदा आधी एखाद्या गायकाच्या आवाजाचा टेलिफोनवर अंदाज घेत आणि मग रिहर्सलमध्ये ऐकत आणि खात्री पटली की रेकॉर्ड करत.
Hemantkumar, Sachindev Barman and Dev Anand
Hemantkumar, Sachindev Barman and Dev AnandSakal

वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी आपल्याला काही गायक आवडत असतात. उदाहरणार्थ : तलत महमूद, शमशाद बेगम...आणि हेमंतकुमार.

‘एखादा योगी देवळात भजन करतोय असं हेमंतकुमार यांचं गाणं ऐकल्यानंतर वाटतं,’ असं साक्षात् लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. संगीतकार सलील चौधरी तर लता मंगेशकर यांच्याही पुढं दोन पावलं गेले होते. ते म्हणतात : ‘देव जर गायिला असता तर तो हेमंतकुमारसारखा गायला असता!’ पण एका ‘देवा’नं हिंदी सिनेमातल्या दुसऱ्या देवाला हेमंतकुमार यांचा आवाज दिला आणि हेमंतकुमार बंगालीतून हिंदीत आले.

त्यांना हिंदीत आणणारा ‘देव’ होता - सचिनदेव बर्मन...अर्थात बर्मनदा. आणि, ज्या ‘देवा’ला हेमंतकुमार यांचा आवाज दिला गेला तो ‘देव’ होता - देव आनंद. ‘सजा’ या सिनेमातील एक गाणं, खरं तर द्वंद्वगीत, संध्या मुखर्जीबरोबर गाण्यासाठी हेमंतकुमार यांना बर्मनदांनी पाचारण केलं. त्या वेळी, मन्ना डे हे बर्मनदांचे सहाय्यक होते. ते बर्मनदा यांनी ठरवलेल्या गायकाकडून सराव करून घेत.

बर्मनदा आधी एखाद्या गायकाच्या आवाजाचा टेलिफोनवर अंदाज घेत आणि मग रिहर्सलमध्ये ऐकत आणि खात्री पटली की रेकॉर्ड करत. अर्थात्, हिंदीत येण्यापूर्वी हेमंतकुमार बंगालीत स्थिरावलेले गायक होते. ‘सजा’मधलं ते गाणं होतं - ‘आ गुपचुप गुपचुप प्यार करें.’ या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशन खूप सुंदर आहे.

कोरसचा वापर त्यांनी ठेक्यासारखा केलाय. बर्मनदांची ही सवय ‘ये गुलिस्ताँ हमारा’मधल्या ‘क्या ये जिंदगी है’ मध्येही दिसते. तो गुपचूप गुपचूप प्रेम करण्याचा जमाना होता.

तो चित्रपट साधारणतः सन १९५१ मधला. पुढं ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ ही आरोळी येईपर्यंत वीस वर्षं गेली; पण या गाण्यानं देव आनंद, हेमंतकुमार, सचिनदेव बर्मन या त्रिकुटाचा पाया रचला गेला. 

हेमंतकुमार यांचा भरदार आवाज रोमॅंटिक हीरोला योग्य ठरू शकतो हे बर्मनदांना कसं सुचलं असेल? का वाटलं असेल? भजनाची वगैरे उपमा लता मंगेशकर देतात हे ठीक आहे; पण चक्क रोमान्ससाठी हेमंतकुमार यांचा आवाज? पण पुढं असं लक्षात आलं की, सौम्य रोमान्ससाठी हेमंतकुमार यांचा आवाज योग्य आहे.

सन १९५१ ते १९६२ या अकरा वर्षांत बर्मनदांनी हेमंतकुमार यांना ११ गाणी दिली. ती सर्वच्या सर्व सुपरहिट झाली. त्यातली दहा गाणी ही देव आनंदसाठी होती आणि एक होतं गुरुदत्तसाठी. ते होतं - ‘जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला...’ हे गाणं म्हणजे प्रेमभंगाची व्याख्या ठरू शकते. 

बर्मनदांनी देव आनंदसाठी किशोरकुमार, महंमद रफी यांचा आवाज घेतला. अधूनमधून मन्नाडेचाही ...पण हेमंतकुमार यांचा आवाज घेतला तेव्हा प्रत्येक गाणं हिट झालं. पुढं बंगालीत हेमंतकुमार हे उत्तमकुमारचा ‘आवाज’ झाले. सन १९६२ नंतर बर्मनदांनी देव आनंदसाठी हेमंतकुमार यांचा आवाज वापरला नाही. असं अचानक का झालं?

एक कारण अस दिलं जातं की, हेमंतकुमार संगीतकार म्हणून यशस्वी झाल्यावर इतर संगीतकार त्यांना पार्श्वगायक म्हणून टाळू लागले. बर्मनदा, हेमंतकुमार आणि देव आनंद या तिघांच्या चित्रपटाचं शेवटचं गाणं ‘बात एक रात की’ मधलं ‘न तुम हमे जानो, न हम तुम्हे जाने’ हे होतं.

देव आनंदसाठी हेमंतकुमार यांनी गायिलेल्या दहा गाण्यांची यादी नजरेखालून घाला...१. गुपचुप गुपचुप प्यार करे...( सजा - संध्या मुखर्जी यांच्यासह) २. ये रात, ये चांदनी फिर कहाँ... (जाल - लता मंगेशकर यांच्यासह) ३. तेरी दुनिया में जीने से... (हाऊस नंबर ४४४) ४. चुप है धरती, चुप है चाँद-सितारे...( हाऊस नंबर ४४), ५. पीछे पीछे आकर (हाऊस नंबर ४४) ६. दिल की उमंगे है जवाँ...( मुनीमजी - गीता दत्त यांच्यासह), ७. शिवजी बिहाने चले...(मुनीमजी) ८. है अपना दिल तो आवारा...(सोलवाँ साल),९. याद आ गयी वो नशीली निगाहें...(मंझिल), १०. न तुम हमे जानो...(बात एक रात की -सुमन कल्याणपूर यांच्यासह)  

हेमंतकुमार हिंदीमध्ये पहिलं सोलो गाणंसुद्धा बर्मनदांकडे गायिले. ते गाणं होतं ‘ये रात, ये चांदनी फिर कहाँ...’ 

पुरुषांच्या भाग्यात कधी काय लिहिलं जाईल ते सांगता येत नाही. त्याविषयीचा हा किस्सा पाहा - सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला एकदा गुरुदत्तकडे गेले. त्यांना गायक व्हायचं होतं. गुरुदत्तनं त्यांना बर्मनदांकडे पाठवलं. त्या वेळी गुरुदत्त ‘जाल’ हा चित्रपट करत होता. गुरुदत्त बर्मनदांना म्हणाला : ‘ये रात, ये चाँदनी फिर कहाँ...’ हे गाणं त्याला द्या.’ बर्मनदांनी त्यांचा आवाज ऐकला आणि गुरुदत्तला सांगितलं : ‘गुरू, त्याला काहीतरी वेगळं काम दे. हा गायक नाही होऊ शकत.’ गुरुदत्तनं त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घेतलं. मग आता गाणं कुणाला द्यायचं? गुरुदत्त म्हणाला :‘हे गाणं तलतसाठीच आहे.’

बर्मनदा म्हणाले :‘मी हे गाणं हेमंतकुमारला देतोय...’

गुरुदत्त आश्चर्यचकित झाले. कारण, बंगालीत हेमंतकुमार यांचं नाव असलं तरी हिंदीत तसे ते त्या वेळी नवीनच होते. त्यांचं ‘सजा’मधलं गाणं गाजत होतं..पण तेवढंच. बर्मनदांच्या या म्हणण्याला गुरुदत्तनं मान दिला. त्यांचं ऐकलं; पण त्याचा धक्का ओसरला नव्हता. गुरुदत्तनं ते गाणं खूप सुंदर घेतलं आहे.

देव आनंदची त्यातली भूमिका ही थोडीफार गुन्हेगारी वृत्तीच्या माणसाची आहे. तो आपल्या प्रेयसीवर प्रेमाचं जाळं टाकतो आणि ती अस्सल प्रेमिका देव आनंदकडे ओढली जाते. रात्रीची वेळ आहे...वारा वाहतोय...देव आनंद गिटार वाजवत बसलाय... रात्रीचा निसर्गच शारीरिक आकर्षण निर्माण करतोय... गीताचे शब्द आहेत साहीर लुधियानवी यांचे.

हेमंतकुमार यांच्या आवाजात रोमँटिक मूड व्यक्त होईल का अशी शंका गुरुदत्तला होती; पण गाणं सुपरहिट झालं आणि हेमंतकुमार यांचं गायक म्हणून बस्तान बसलं. बर्मनदा जेव्हा कोलकत्यात गायक म्हणून गाजत होते तेव्हा हेमंतकुमार त्यांच्या गायकीचे चाहते होते; किंबहुना बर्मनदा जेव्हा सकाळी रियाज करत असत तेव्हा हेमंतकुमार त्यांचा रियाज ऐकायला त्यांच्या घरी जात.

हेमंतकुमार यांची आई नेहमी म्हणायची : ‘माझा मुलगा पंकज मलिक आणि सचिनदेव बर्मन यांच्याइतका चांगला गायक होऊ शकतो.’

गायक म्हणून लोकप्रियतेच्या बाबतीत हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी पंकज मलिक आणि सचिनदेव बर्मन यांनाही मागं टाकलं. अर्थात्, त्यात बर्मनदांचा संगीतकार म्हणून वाटा मोठा होता. त्यांनी हेमंतकुमार यांच्यासाठी अचूक गाणी शोधली. ‘हाऊस नंबर ४४’मध्ये ‘चुप है धरती, चुप है चाँद-सितारे...’ हे गाणं तशी चाल ठेवून इतर कुण्या संगीतकारानं केलं असतं तर त्यानं ते गाणं तलत महमूदला दिलं असतं; पण बर्मनदांनी ते हेमंतकुमार यांना दिलं आणि त्यांची निवड किती योग्य होती हे ते गाणं ऐकल्यानंतर जाणवतं.

बर्मनदांनी ‘मुनीमजी’मधलं ‘जीवन के सफर में राही...’ हे गाणं गायला हेमंतकुमार यांना बोलावलं. तीन-चार रिहर्सल झाल्यावर त्यांना वाटलं की, हे गाणं किशोरकुमार चांगलं गाईल. त्यामुळे त्यांनी ते गाणं किशोरकुमारला दिलं आणि त्यानं त्या गाण्याचं सोनं केलं. मात्र, त्याच चित्रपटात बर्मनदांनी हेमंतकुमार यांना दोन गाणी दिली. 

‘दिल की उमंगे है जवाँ’ आणि ‘शिवजी बिहाने चले...’  शंकराच्या लग्नाची कथा या गाण्यात सांगितली आहे. काय गाणं आहे! काय गाण्याचं ऑर्केस्ट्रेशन आहे! हे गाणं ऐकताना, बर्मनदांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना गाण्याचं ऑर्केस्ट्रेशन कसं करायचं हे जमत नव्हतं आणि त्यांना सी. रामचंद्र यांनी मदत केली होती, यावर विश्वास बसत नाही.

एकदा बर्मनदांचा हेमंतकुमार यांना फोन आला : ‘माझ्याकडे तुझ्यासाठी एक ट्यून तयार आहे. माझ्याकडे ये.’ हेमंतकुमार गेले आणि गाणं ध्वनिमुद्रित करूनच आले. ते गाणं होतं : ‘जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला... 

‘प्यासा’ची इतर गाणी महंमद रफीनं गायिली आहेत; पण हे गाणं हेमंतकुमार यांनी गावं असं बर्मनदांना वाटलं.

गाण्याची चाल तयार झाली की बर्मनदा गायकाची निवड करत आणि बहुतेक वेळा त्यांची निवड अत्यंत योग्य ठरली. गुरुदत्तचा त्या चित्रपटातील एकटेपणा आणि दुर्भाग्याशी दोस्ती जमण्याचा मूड हेमंतकुमार यांनी आपल्या गळ्यातून सुंदर व्यक्त केला आहे.

राहुलदेव बर्मन यांचा लाडका गायक अर्थात् किशोरकुमार होता; पण हेमंतकुमार यांचं किमान एक सोलो गाणं करायचं अशी राहुलदेव यांची इच्छा होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही, याची राहुलदेव यांना खंत होती. राहुलदेव यांचं मत होतं की, हेमंतकुमार यांच्या आवाजाची गुणवत्ता इतर कुणाकडे नव्हती. राहुलदेव यांनी

हेमंतकुमार यांच्या एका गाण्यात माऊथ ऑर्गन वाजवला आहे. ते गाणं आहे : ‘है अपना दिल तो आवारा...’ त्या काळात तरुणांना त्या माऊथ ऑर्गनच्या तुकड्यांनी वेड लावलं होतं. बांगलादेशात हे गाणं अनेक वर्ष लग्नातलं लोकप्रिय गाणं होतं. सन १९५८ मध्ये हे गाणं ‘बिनाका गीतमाला’मध्ये पहिलं आलं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्या गाण्याला ३२४ गुण मिळाले.

तीस वर्षांत एवढे गुण कुठल्याही गाण्याला मिळाले नाहीत. ‘बात एक रात’की चित्रपटाच्या ‘न तुम हमे जानो...’ या गाण्यानंतर बर्मनदांना वाटलं की, हेमंतकुमार यांचा आवाज आता पूर्वीचा राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी हेमंतकुमार यांना पुढं एकही गाण दिलं नाही...

(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com