साधा-सोपा संगीतकार

गायक-संगीतकार म्हणून हेमंतकुमार यांचा दर्जा वरचा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत काही संगीतकार हे गायकही होते.
Musician hemantkumar
Musician hemantkumarsakal

गायक-संगीतकार म्हणून हेमंतकुमार यांचा दर्जा वरचा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत काही संगीतकार हे गायकही होते.

सी. रामचंद्र हे स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात होते; पण अर्थातच त्यांची काही गाणी इतरांनी गायिली असती तर जास्त चांगलं झालं असतं असं वाटत राहतं; विशेषतः तलत महमूद यांनी गायिली असती तर. सी. रामचंद्र संगीतकार म्हणून अर्थातच महान होते.

मदनमोहन यांनी सुरुवात गायक म्हणून केली; पण त्यांना स्वतःच्या गळ्याच्या मर्यादा ठाऊक होत्या. त्यामुळे ते गायक व्हायच्या भानगडीत पडले नाहीत. संगीतकार रवी यांना गायक व्हायचं होतं; पण महंमद रफी यांनी त्यांना शहाणं केलं आणि ते संगीतकार झाले.

मन्ना डे यांनी काही सिनेमांना संगीत दिलं; पण त्यांचा खरा पिंड हा गायकाचा.

सचिनदेव बर्मन अर्थात् बर्मनदा हे बंगालीत मोठे गायक होते; पण आपला आवाज हा हीरोसाठीचा आवाज नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी हिंदीत, प्रसंग साजरा करू शकणारी चार-दोन गाणी गायिली. मात्र, हेमंतकुमार हे ‘दादा गायक’ होते; किंबहुना हेमंतकुमार यांची गाणी म्हटल्यावर आपल्याला फक्त त्यांनी संगीत दिलेली गाणीच आठवतात असं नाही; त्यांनी इतरांकडे गायिलेली गाणीही आठवतात.

त्यांनी त्यांची बहुसंख्य गाणी स्वतःच्या चित्रपटांत गायिली; पण स्वतः गायक असले तरी महंमद रफी, किशोरकुमार, तलत महमूद यांनासुद्धा गाणी दिली. ‘खामोशी’च्या वेळी राजेश खन्नानं त्यांना सांगितलं :‘‘दादा, हमारा गाना किशोर से गवाईये.’’ तो चित्रपट सुरू झाला तेव्हा राजेश खन्ना हा मोठा नट नव्हता. तो १९६९ मधला चित्रपट आहे. बर्मनदांना राजेश खन्ना खूप आवडायचा. राजेश खन्ना त्या वेळी कोलकत्यात राहायचा. तो हेमंतकुमार यांना म्हणायचा :‘दादा, हमारे घर नही आना. सिगारेट-दारू सब यहाँ होता है. आप के सामने वो अच्छा नही लगता.’

‘खामोशी’मध्ये राजेश खन्नाचं त्यांनी ऐकलं आणि किशोरकुमारसा ‘वो शाम कुछ अजीब थी...’ हे गाणं दिलं. ते गाणं अतिशय गाजलं.

हेमंतकुमार यांचा जन्म १९२० मधला. घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचा कल संगीताकडे होता. तेराव्या वर्षी त्यांनी रेडिओवर गाणं गायिलं. मात्र, हेमंतकुमार यांनी शिकावं, मोठं व्हावं असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. ते हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिकला त्या काळात ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. पुढं इंजिनिअरिंगच्या चार वर्षांच्या डिप्लोमा कोर्सला त्यांनी प्रवेश घेतला. मात्र, संगीत याच विषयाची त्यांना अनिवार ओढ होती. अखेर, वडिलांचं मन मोडून त्यांनी इंजिनिअरिंग सोडलं. त्या वेळी त्यांची तिसरी ध्वनिमुद्रिका बाजारात आली होती.

पोट भरण्यासाठी त्यांनी गाण्याच्या शिकवण्या केल्या. ते संगीतशिक्षकांकडून संगीताचे धडे घेत. त्यासाठी त्यांना बरीच पायपीट करावी लागे. सन १९४० नंतर त्यांनी बंगालीत हळूहळू बस्तान बसवलं. त्यांनी रवींद्रसंगीत श्रीमंतांच्या दिवाणखान्यातून सर्वसामान्य माणसाच्या ओठावर आणलं.

सन १९५१ मध्ये ‘फिल्मीस्तान’च्या शशधर मुखर्जी यांनी त्यांना पंधराशे रुपये महिना पगारावर ‘फिल्मिस्तान’मध्ये आणलं. ‘आनंदमठ’हा चित्रपट त्यांना दिला. शशधर मुखर्जी यांना लता मंगेशकर यांचा आवाज फारसा आवडायचा नाही.

जगात काही विचित्र माणसं असतात, त्याचंच हे उदाहरण! मात्र, ‘ ‘वंदे मातरम्’ हे गाणं मी लता मंगेशकर यांच्याकडूनच गाऊन घेणार,’ असं हेमंतकुमार यांनी मुखर्जी यांना सांगितलं. हेमंतकुमार यांचा त्या वेळी लता मंगेशकरांशी परिचयही नव्हता. ते त्यांच्या थेट घरी गेले. त्यांनी लता मंगेशकरांना आपली ओळख करून दिली आणि गाणी गायची विनंती केली. त्या ‘फिल्मिस्तान’मध्ये आल्या. ‘वंदे मातरम्’ या गाण्याचे पस्तीस रिटेक मुखर्जी यांनी घेतले; पण लता मंगेशकर गातच राहिल्या.

हेमंतकुमार यांनी यासंदर्भात म्हटलं आहे : ‘ ‘वंदे मातरम्’ मी लहानपणापासून अनेकदा ऐकलं; पण लता मंगेशकर यांनी गायिल्यावर मला त्या गीताचा अर्थ नीट उमगला.’

त्यानंतर लता मंगेशकर आणि हेमंतकुमार यांची गाण्यांसाठी जोडी जमली ती शेवटपर्यंत. पुढं चाळीस चित्रपटांमध्ये त्यांनी लता मंगेशकरांकडून १३९ गाणी गाऊन घेतली. त्यात १०५ सोलो गाणी आहेत. मुखर्जी यांची संगीताबद्दलची मतं ठाम असत; पण ओ. पी. नय्यर म्हणत : ‘मुखर्जी यांना चित्रपटप्रेक्षकांची नाडी अचूक कळत असे.’ (लता मंगेशकरांचा आवाज न आवडणं ही मात्र शशधर मुखर्जी यांची एकमेव घोडचूक.)

त्या वेळी ‘फिल्मिस्तान’साठी अनेक संगीतकार काम करत असत.

मुखर्जी यांची पद्धत अशी होती : मुखर्जी हे आरामखुर्चीत बसलेले असत. समोर संगीतकार गाणं तयार करत. मुखर्जी यांना चाली ऐकवत. चाली ऐकताना काही वेळा मुखर्जी झोपीसुद्धा जात!

एका चित्रपटाच्या वेळी हेमंतकुमार त्यांना महिनाभर चाली ऐकवत होते. शेवटी, त्यांना एक चाल पसंत पडली...पण काय चाल होती ती! ते गाणंच पाहा :

न ये चाँद होगा, न तारे रहेंगे

मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे

‘फिल्मिस्तान’च्या पहिल्या दोन चित्रपटांत हेमंतकुमार यांना यश मिळालं; पण ते घवघवीत यश नव्हतं. त्यातच त्यांना मुंबई मानवेना. त्यांनी कोलकत्याला परत जायचं ठरवलं. मुखर्जी त्यांना म्हणाले : ‘तू मला एक मोठा हिट चित्रपट दे आणि मग कोलकत्याला जा.’ नियतीनं ‘तथास्तु’ म्हटलं. त्यांना हेमंतकुमार यांनी ‘नागीन’ हा सुपरडुपर हिट चित्रपट दिला.

खरं तर त्या चित्रपटात हेमंतकुमार यांचं संगीत आणि वैजयंतीमाला यांच्याव्यतिरिक्त काय होतं?

‘नागीन’ या विषयावर पुढं अनेक चित्रपट आले; पण १९५४ च्या ‘नागीन’च्या यशाच्या तुलनेत त्यांना अजिबातच यश मिळालं नाही. ‘नागीन’ची गाणी सतत दोन वर्षं ‘चार्ट-टॉपर’ होती. ‘फिल्मफेअर’चा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार त्याला मिळाला.

लता मंगेशकर म्हणतात : ‘नागीन’नंतर मला माझी खरी व्यावसायिक किंमत कळली. त्या चित्रपटाचं संगीत गाजण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यातली ती नागीनची बीन. नागीण आली म्हणजे पुंगी आली. हेमंतकुमार यांनी आधी खऱ्याखुऱ्या पुंगीचा वापर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून फक्त तीन-चार सूर निघत.

त्यामुळे मग त्यांनी क्ले व्हायोलिनचा उपयोग केला. ते वाजवलं होतं कल्याणजी यांनी आणि त्यात रवी यांनी तबला मिक्स केला आणि मग केवळ नागच नव्हे तर, माणसंसुद्धा ‘मन डोले मेरा तन डोले’ या गाण्यावर डोलायला लागली. खरं तर ‘नागीन’मधल्या प्रत्येक गाण्यावर लोक डोलले.

मुखर्जी यांनी हेमंतकुमार यांना सांगितलं होतं : ‘काहीतरी वेगळं कर. आजच्या संगीतातला तोच तोचपणा संपवून टाक.’ हेमंतकुमार यांनी क्ले व्हायोलिनचा वापर केला. त्या वेळी हेमंतकुमार आणि कल्याणजी हे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करत असत. एकदा नागपूरच्या कार्यक्रमाला अतिशय गर्दी झाली.

‘बीन हवी,’ अशी जोरदार मागणी उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांनी केली. कल्याणजी यांनी क्ले व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. उपस्थित चिडले. हे असं अचानक काय झालं ते हेमंतकुमार यांना कळेना. त्यांनी उपस्थितांना विचारलं :‘बीन तोंडानं वाजवली जाते, हे (कल्याणजी) बोटांनी का वाजवत आहेत?’

कारण, ती पुंगीच आहे असं प्रेक्षक-श्रोत्यांना वाटत होतं!

‘नागीन’ हा चित्रपट हेमंतकुमार यांच्या कारकीर्दीचं ‘कांचनगंगा शिखर’ ठरलं!

हेमंतकुमार यांच्या ‘नागीन’नंतर कल्याणजी संगीतकार बनले.

रवीसुद्धा आधी हेमंतकुमार यांचे सहाय्यक होते. तेही नंतर स्वतंत्रपणे संगीत द्यायला लागले. कल्याणजी आणि हेमंतकुमार यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे होते. हेमंतकुमार नेहमी म्हणत : ‘कल्याणजीला बरोबर घेऊन प्रवास करणं हा धमाल अनुभव असे. त्याच्याकडच्या जोक्सचा साठा कधी संपतच नसे. अतिशय आनंदी असं ते व्यक्तिमत्त्व. तो काम करत आहे असं कधी वाटायचंच नाही. तो धमाल करतोय असंच वाटायचं...’ मात्र, धमाल करता करता त्यांनी काही उत्कृष्ट गाणीही दिली. त्यातलं हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांचं ‘ओ ऽऽ निंद ना मुझ को आए’ हे गाणं कोण विसरेल? ‘पोस्ट बॉक्स नंबर ९९९’ या चित्रपटात ते सुनील दत्त आणि शकीला यांच्या तोंडी आहे.

हेमंतकुमार यांना सी. रामचंद्र यांनीसुद्धा काही चांगली गाणी दिली. उदाहरणार्थ : ‘जाग दर्द-ए-इश्क जाग’ किंवा ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’. हेमंतकुमार हे सी. रामचंद्र यांना खूपच मानत असत. ‘फार मोठी गुणवत्ता असलेला संगीतकार’ असं हेमंतकुमार यांचं सी. रामचंद्र यांच्याबद्दल मत होतं. ‘सी. रामचंद्र एका मिनिटात अचानक एखादी चाल तयार करत व तीसुद्धा हसत हसत, विनोद करत,’ असं हेमंतकुमार म्हणत. ‘अनारकली’ची चालही त्यांना अशीच पटकन् सुचली होती. हेमंतकुमार यांना सी. रामचंद्र यांचं ‘शिन शिना की बुबला बू’ या चित्रपटातलं ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोये’ हे गाणं एवढं आवडलं की, त्यांनी ती चाल बंगाली गाण्यात वापरली.

तो बंगाली चित्रपट होता ‘सूर्यतोरण’ आणि गाणं होतं ‘तुमी तो जानो ना...’ हेमंतकुमार यांना नौशाद, रोशन आणि शंकर-जयकिशन यांनीसुद्धा काही गाणी दिली. ‘याद किया दिल ने कहाँ हो तुम’ हे ‘पतीता’मधलं नितांतसुंदर प्रेमगीत आठवतं? देव आनंदला हेमंतकुमार यांचा आवाज द्यावा असं बर्मनदांप्रमाणेच शंकर-जयकिशन यांनासुद्धा वाटलं.

रोशन यांनीसुद्धा हेमंतकुमार यांना एक अप्रतिम गाणं ‘ममता’ या चित्रपटात दिलं. ते म्हणजे - ‘छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा..’

पण सिनेमात ते गाणं अर्धंच आहे.

का, ठाऊक आहे? कारण, दिग्दर्शकाला वाटलं की, ते अर्धं गाणंच चांगलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या गाण्यांची वाट लावली, त्यातलं हे एक.

संगीतकार स्नेहल भाटकर यांनी ‘छबीली’ या चित्रपटात एक सुंदर गाणं हेमंतकुमार यांना दिलं :‘लहरों पे लहर...उल्फत है जवाँ.’

या गाण्याची चाल डीन मार्टिनच्या एका इंग्लिश गाण्यावरून घेतली असल्याचं स्वतः भाटकर यांनीच कबूल केलं आहे.

‘साहिब, बीबी और गुलाम’ हा गुरुदत्तचा बंगाली पार्श्वभूमीवरचा आणि जमीनदारीवरचा चित्रपट खरं तर बर्मनदांच्याच पारड्यात जाणार होता; पण तो हेमंतकुमार यांच्याकडे गेला आणि गुरुदत्तची निवड योग्य ठरली. त्यातली सगळीच गाणी ग्रेट होती. मग आशा भोसले यांनी लाडिकपणे गायिलेलं, ‘भँवरा बडा नादान...’ असो किंवा गीता दत्त यांनी गायिलेलं ‘न जाओ सैंय्या छुडा के बैंया’ हे गाणं असो.

त्या चित्रपटात गुरुदत्त याला जमीनदाराची छोटी बहू गुलामांच्या मिठीत दाखवायची होती. तसं चित्रीकरणही झालं; पण सेन्सॉरनं सांगितलं - ‘जमीनदाराची बायको गुलामांच्या मिठीत दाखवता येणार नाही.’

त्या शॉटबरोबर एक गाणंही असणार होतं. गुरुदत्तनं ते रद्द केलं. मग त्या गाण्याची धून ‘अनुपमा’मध्ये वापरण्यात आली. धर्मेंद्रच्या तोंडी. ते गाणं धर्मेंद्र पेश करतो तेव्हा अंगावर येतं. ते गाणं होतं - ‘या दिल की सुनो दुनियावालो...’

हेमंतकुमार हे निर्माता-लेखकसुद्धा होते. त्यांना हॉरर चित्रपटांची आवड होती, म्हणून त्यांनी ‘बीस साल बाद’, ‘कोहरा’ यांसारखे चित्रपट काढले आणि ते यशस्वी झाले.

लता मंगेशकर यांनी त्यांची गूढ गीतं अजरामर केली. उदाहरणार्थ : ‘कहीं दीप जले, कहीं दिल...’

हेमंतकुमार यांच्या चाली सोप्या असत. ऑर्केस्ट्रासुद्धा कधी जड नसे. मेलडी हा त्यांच्या संगीताचा आत्मा होता. ‘धीरे धीरे मचल...’ हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण. आपल्या आवाजानं, संगीतानं त्यांनी गानरसिकांचे कान तृप्त केले. अमर संगीताचं संचित मागं ठेवून ते १९८८ मध्ये हे जग सोडून गेले. आधीच्या अनेक पिढ्या त्यांची गाणी गुणगुणत राहिल्या आणि पुढंही गुणगुणत राहतील.

(लेखक हे चित्रपट आणि क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक असून, त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com