हिंदीतील दोन मराठी दत्ता

माझी खात्री आहे, गेल्या तीन पिढ्यांनी हिंदी संगीताच्या क्षेत्रातील दोन नावं ऐकलीसुद्धा नसतील. एक म्हणजे के. दत्ता आणि दुसरं एन. दत्ता. हे दोन्ही दत्ता मराठी होते, हे तर त्या आधीच्या पिढीलाही माहीत नसावं.
N datta and k datta
N datta and k dattasakal

माझी खात्री आहे, गेल्या तीन पिढ्यांनी हिंदी संगीताच्या क्षेत्रातील दोन नावं ऐकलीसुद्धा नसतील. एक म्हणजे के. दत्ता आणि दुसरं एन. दत्ता. हे दोन्ही दत्ता मराठी होते, हे तर त्या आधीच्या पिढीलाही माहीत नसावं. माझ्या पिढीतल्या मंडळींनासुद्धा त्यांची जुजबी माहिती असावी; पण माझ्या पिढीतली जी दर्दी मंडळी आहेत, त्यांना त्यांचं मोठेपण नक्की ठाऊक असेल.

आज मी हा विषय निवडला, कारण काळाच्या उदरात ते पूर्णपणे गडप होऊ नयेत म्हणून. काळ भल्याभल्यांना गिळून पचवतो. हिंदी सिनेमावर प्रेम करणाऱ्या मंडळींच्या मनातल्या म्युझियममध्ये त्यांना काही काळ छोटी जागा मिळावी, ही त्यामागची इच्छा.

के. दत्ता यांचं खरं नाव दत्ता कोरगावकर. त्या काळामध्ये शांताराम वणकुद्रे यांनी व्ही. शांताराम असं नाव घेतलं आणि तिथपासून अशा नावांची फॅशन हिंदी सिनेमात आली. के. दत्ता यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना द्वंद्वगीत पहिल्यांदा दिलं. तो सिनेमा होता ‘दामन’ आणि गाणं होतं, ‘ये रुकी रुकी हवाये’.

तुम्ही लतादीदींवर अनेक लेख वाचले असतील, तर एखाद-दोन लेखांचं शीर्षक नक्की असेल, ‘गाये लता, गाये लता’. हे कुठून आलं, याची तुम्हाला कल्पना आहे? के. दत्तांचं तसं गाणं आहे आणि सिनेमा आहे ‘दामन’. पण, तरीही के. दत्तांची लाडकी गायिका लता मंगेशकर नव्हती. ती होती, नूरजहाँ. ते म्हणत की, संगीतात नूरजहाँपुढं काहीही नाही. ‘बडी माँ’ नावाच्या सिनेमात त्यांनी लता आणि नूरजहाँ या दोघींकडून गाणी गाऊन घेतली.

दोघींची गाणी असलेला हा एकमेव सिनेमा. तो काळ असा होता की, नूरजहाँ ही लतादीदींची आयडॉल होती. लतादीदी तेव्हा नूरजहाँसारख्या गात. त्यातली नूरजहाँची दोन गाणी अतिशय गाजली. एक होतं, ‘आ इंतजार है तेरा’ अन् दुसरं, ‘दिया जला के आप बुझाया’ नूरजहाँ पुढं पाकिस्तानात गेली असली तरी तिच्यावर भारतीय संस्कार होते.

के. दत्ता सांगत की, ‘दिया जला के आप बुझाया’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी पांढऱ्या साडीत ती आली होती. तिनं आधी प्रार्थना केली आणि मग गळ्यातून एखादा दैवी सूर लागावा, तसा सूर उमटला होता हृदयस्पर्शी. ती गाणं म्हणजे खुदा की पूजा मानायची. देवघरात, मंदिरात जाताना आपण चप्पल बाहेर काढून ठेवतो, तसं ती स्टुडिओत रेकॉर्डिंग रूममध्ये शिरताना चप्पल बाहेर काढून ठेवत असे. पुढं ती पाकिस्तानात गेल्यावर तिथल्या गायकांनी त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली.

के. दत्तांनी फक्त दोन सिनेमांत नूरजहाँचा आवाज वापरला - एक ‘नादान’ आणि दुसरा ‘बडी माँ’ तरीदेखील भारतातली नूरजहाँची गाणी आठवताना पहिल्यांदा आठवतात ती के. दत्ता यांची गाणी. ते पुरतं नूरजहाँमय झाले होते. ‘दिया जला के आप बुझाया’ या गाण्यानं एका पिढीला पूर्णपणे झपाटून टाकलं होतं. त्या झपाटल्या गेलेल्या मंडळींत ओ. पी. नय्यरही होते. या गाण्याचं कौतुक म्हणून त्यांनी के. दत्तांना एक पेटी भेट म्हणून दिली होती, ती दत्तांसाठी मौल्यवान अशी भेट ठरली.

नूरजहाँ मुंबईत अजिंक्य हॉस्पिटलच्या इमारतीत रहात होती. त्याच्याजवळ असलेल्या नवरोझ मॅन्शनमध्ये के. दत्ता रहायचे. फाळणीच्या वेळी जिवाला घाबरून ती पाकिस्तानात पळाली. जाताना धाय मोकलून रडली. के. दत्तांनी नंतर लता, आशाकडून कितीतरी चांगली गाणी गाऊन घेतली; पण नूरजहाँचा त्यांच्यावरचा प्रभाव कधी कमी झाला नाही. त्यांना खात्री होती की, ती कधीतरी परत येईल. त्या दुर्दम्य आशावादानं ते स्वतः गाणं म्हणत, ‘आ इंतजार है तेरा’.

नूरजहाँ पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांनी दोन वर्षं संगीत दिलं नाही, इतकं ते कोलमडले. काळ आणि हिंदी सिनेमा कुणासाठी थांबत नाही.

त्यांना हिंदी सिनेमात परत येणं कठीण झालं. एक तर मोठे बॅनर मिळाले नाहीत आणि दुसरं म्हणजे, त्यांच्या संगीतात मेलडी काठोकाठ भरलेली असली तरीदेखील त्यांच्या चाली थोड्या कठीण असत, त्यामुळं त्या गुणगुणणं फार कठीण होतं. त्यांच्या डोक्यात नूरजहाँचा आवाज इतका फिट बसला होता की, इतरांसाठी सुद्धा ते नूरजहाँचा आवाज डोळ्यांसमोर ठेवून चाली बांधत. म्हणून त्यांना यश मिळणं कठीण गेलं. १९८२ मध्ये नूरजहाँ भारतात परत आली. तिनं अकरा फेब्रुवारी १९८२ ला षण्मुखानंद हॉलमध्ये एक भव्य कार्यक्रमसुद्धा केला. त्यात ‘आ इंतजार है तेरा’ गाणंसुद्धा म्हटलं. पण, तोपर्यंत तिची वाट पाहून के. दत्ता हे जग सोडून गेले होते आणि आता ते विस्मृतीच्या पडद्याआड कधीच गेले आहेत.

आता आणखी एक दत्ता! या दत्तांचं नाव दत्ता नाईक. यांचा जन्म १९३० मध्ये गोव्यात ओरोबाला झाला. बाराव्या वर्षी ते पळून मुंबईला आले. कारण काय असेल? त्यांना संगीत शिकायचं होतं. मुंबईत ते थोडं शास्त्रीय संगीत शिकले. मग विख्यात संगीतकार गुलाम हैदरचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत. तिथं त्यांना एकदा बर्मनदांनी परफॉर्म करताना पाहिलं आणि तिथून उचलून आपला साहाय्यक केलं.

ते बर्मनदांचे साहाय्यक असले तरी देवघरात मात्र त्यांनी सी. रामचंद्र यांचा फोटो लावला होता. संगीतकार म्हणून स्वतःच्या पायांवर उभं राहिल्यावर त्यांना मदत झाली त्यांच्या एका मित्राची. मित्राचं नाव होतं साहिर लुधियानवी. साहिर कामाच्या शोधात मुंबईत फिरत असताना एन. दत्तांना विलेपार्ले स्टेशनवर तो भेटला. एन. दत्ता साहिरला बर्मनदांकडे घेऊन गेले. तिथून दोघांची घट्ट मैत्री झाली.

पुढं साहिर बी. आर. चोप्रा यांचा राजकवी झाला आणि साहिरनं एन. दत्तांच्या उपकाराची परतफेड केली. एन. दत्ता बी. आर. चोप्रांच्या सिनेमाचे संगीतकार झाले. बी. आर. चोप्रांकडचा एन. दत्ता यांचा लँडमार्क सिनेमा म्हणजे ‘धूल का फूल’. त्यातलं प्रत्येक गाणं गाजलं. साहिरच्या प्रत्येक शब्दाचा त्यांच्या संगीतानं मान राखला. उदा. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे गाणं म्हणजे निधर्मीवादाचं राष्ट्रगीत. साहिरनी अप्रतिम लिहिलं आणि त्या शब्दांची सुंदर पालखी वाहिली दत्तांच्या सुरांनी. त्यात आणखीन एक गाणं आहे, ‘तू मेरे प्यार का फूल है.’ पु. ल. देशपांडे यांनी या गाण्याबद्दल असं म्हटलं की, हे गाणं ऐकताना प्रत्येक शब्द आणि त्यातल्या नोटशनबरोबर एक एक पाकळी वाहत्या पाण्यात सोडल्याचा भास होतो.

यातलं आणखी एक प्रणयगीत अंगावरून मोरपीस फिरवतं. ते ऐकताना नेहमी वाटतं की, पुन्हा कॉलेजात जावं, पुन्हा प्रेमात पडावं आणि प्रेयसीला म्हणावं, ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया.’ महेंद्र कपूर आणि आशा भोसले ह्यांचं हे प्रेमात पाडणारं प्रणयगीत आहे.

गाण्यांच्या बाबतीत ‘धूल का फूल’ हा त्यांचा पहिला सुपरहिट सिनेमा नव्हता. त्याआधी १९५५ मध्ये ‘मिलाप’ येऊन गेला. त्याचं संगीत गाजलं. पहिल्या दहा संगीतकारांमध्ये एन. दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. त्यातली दोन गाणी तर अफलातून सुंदर होती. एक हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचं ‘ये बहारो का समा चांद तारों का समा’, देव आनंद आणि गीता बाली सादर करतात आणि दुसरं गीता दत्तचं ‘जाओगे तो जाओ पर जाओगे कहाँ.’

या संगीतकाराने प्रेमात पडणाऱ्या आणि प्रेमभंगात होरपळणाऱ्या प्रेमींना आपल्या भावना व्यक्त करायला उत्तम गाणी दिली. कॉलेजमध्ये असताना सुंदर मुलगी दिसणं हा प्रेमात पडण्याचा पासपोर्ट होता. त्या वेळी ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूँ’ हे गाणं उपयोगी पडायचं. बऱ्याचदा ती आसरा द्यायची नाही. मग ‘चंद्रकांता’मधलं ‘मैने चांद और सितारों की तमन्ना कि थी’ हे गाणं आम्ही गुणगुणत असू. खोडी काढताना ‘लाल लाल गाल’ गाणं मदतीला यायचं आणि मग कधीतरी मूडमध्ये आलेली प्रेयसी विचारायची, ‘मै तुम्ही से पूछती हु, मुझे तुमसे प्यार क्यू है.’

बी. आर. चोप्रांसाठी तीन सिनेमा केल्यानंतर त्यांना ‘गुमराह’च्या वेळेला हृदयविकार झाला. त्यांना चित्रपट सोडायला लागला. त्यांची जागा रवीने घेतली आणि रवीने ती जागा कधी सोडली नाही. ‘गुमराह’ची पुरणपोळी रवीच्या ताटात पडली आणि पुन्हा दत्तांना मीठ-भाकर खावी लागली. त्या हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ते कधी फारसं सावरले नाहीत.

त्यांना मृत्यू भेडसावत राहिला. पुढं त्यांना चित्रपट मिळाले; पण मोठे बॅनर मिळाले नाहीत आणि १९८१च्या ‘चेहरे पे चेहरे’पर्यंत त्यांनी काम केलं. मराठीकडे ते क्वचित वळले; पण जेव्हा वळले, तेव्हा ‘अपराध’ आणि ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ यासाठी खूप चांगली गाणी दिली. तलतला त्यांनी एक अप्रतिम गाणं दिलं होतं. ते होतं, ‘अश्कोने जो पाया है, वो गीतोने दिया हैं, इस पर भी सुना है के जमाने को गिला है.’ त्यांच्या भावना शेवटी वेगळ्या नव्हत्या.

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून त्यांची या विषयांवरची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com