घराण्याचे फायदे नाकारणारा ‘अष्टपैलू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kapoor

माझं आयुष्य सिनेमा पाहण्यात गेलं. अगदी १९४५ मधल्या सिनेमापासून आजपर्यंतच्या सिनेमापर्यंत मी अनेक सिनेमे पाहिले आहेत. आमच्या वेळचं चांगलं, ही माझी भूमिका कधीही नव्हती.

घराण्याचे फायदे नाकारणारा ‘अष्टपैलू’

माझं आयुष्य सिनेमा पाहण्यात गेलं. अगदी १९४५ मधल्या सिनेमापासून आजपर्यंतच्या सिनेमापर्यंत मी अनेक सिनेमे पाहिले आहेत. आमच्या वेळचं चांगलं, ही माझी भूमिका कधीही नव्हती. किंबहुना आज निर्माण होणारे सिनेमा हे पूर्वीपेक्षा फारच चांगले असतात, नट-नट्या खूप चांगला अभिनय करतात, हे माझं मत आहे. पण, तरीही एक गोष्ट मी अत्यंत आवर्जून सांगेन की, मी पाहिलेल्या कमर्शिअल हिंदी सिनेमांतला सर्वांत मोठा कलाकार म्हणजे राज कपूर. खराखुरा अष्टपैलू.

मॅग्नम ओपस सिनेमाच्या निर्मितीची सुरुवात त्याने केली. तो महान दिग्दर्शक होता, तो उत्कृष्ट नट होता, तो महान एडिटर होता... तो मेकअपसुद्धा करू शकायचा. फोटोग्राफी, कॅमेरा वर्कमध्ये त्याचा हातखंडा होता.

लता मंगेशकरदेखील म्हणायच्या की, ‘राज कपूरच्या सिनेमाचा संगीतकार कुणीही असो, खरा संगीतकार राज कपूरच असायचा.’ म्हणजे मग त्याने करायचं राहिलं तरी काय?

...आणि हे सर्व कुठल्याही शाळा, कॉलेज, फिल्म इन्स्टिट्यूट, अभिनयशाळा वगैरे ठिकाणी शिक्षण न घेता त्याने केलं. त्याला कुणीही गॉडफादर नव्हता. आज आपण सर्वच घराणेशाहीबद्दल बोलतो, मला त्यात चुकीचंही काही वाटत नाही. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर, क्रिकेटपटूच्या मुलाला क्रिकेटपटू, राजकारण्याच्या मुलाला राजकारणी व्हावंसं वाटलं तर त्यात चुकीचं काय; पण त्यांना यश मिळण्यासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असतो. त्यामुळे तुमच्या घराण्यातल्या कुणीही तुमच्यापुढे संधीचं ताट ठेवलं, तरीही तुमच्याकडे गुणवत्ता नसेल तर यश तुम्हाला चुंबन सोडा, साधा फ्लाइंग किससुद्धा देत नाही. किंबहुना बापाने मुलाला त्याची भाकरी स्वतः कमवायला लावल्यामुळे खरीखुरी गुणवत्ता असलेला माणूस वडिलांच्याही पुढे निघून जातो. नुसतं त्या वातावरणात राहिल्यामुळे मिळणारं बाळकडू पुरेसं ठरतं.

राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे त्या वेळी फिल्म इंडस्ट्रीतलं मोठं नाव होतं; पण त्यांनी मुलाला काही मदत केली नाही. सुरुवातीला तर पृथ्वीराज कपूरना आपला मुलगा वकील व्हावा असं वाटत होतं.

राज कपूरने त्यांना सरळ सांगितलं, ‘ज्यांना डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हायचं असेल, ते त्या त्या कोर्सला जातात, मला सिनेमे काढायचे आहेत, मग त्या शिक्षणाचा काय उपयोग?’

त्याने पृथ्वी थिएटरमध्ये काम केलं. त्याला मालकाचा मुलगा म्हणून स्पेशल ट्रीटमेंट नव्हती. एकदा पृथ्वीराज कपूर पृथ्वी थिएटरमध्ये जायला निघाले होते, त्यांना राज कपूर घरात रेंगाळताना दिसला. त्यांनी राज कपूरला विचारलं, ‘आज घरात कसा ? स्टुडिओत नाही गेलास ?’ मग ते स्वतः गाडीने स्टुडिओत गेले. राज कपूरला त्यांनी बरोबर नेलं नाही, त्याला बसने जावं लागलं. त्यांनी राज कपूरला केदार शर्मांकडे चक्क तिसरा असिस्टंट म्हणून नोकरीला ठेवलं. राज कपूरने स्टुडिओची जमीनसुद्धा पुसली आहे.

केदार शर्मांकडे त्याने क्लॅपरबॉयपासून साफसफाईपर्यंत सर्व कामं केली. राज कपूरला कॅमेऱ्यासमोर यायची प्रचंड आवड होती, त्यामुळे शॉटला क्लॅप देतानासुद्धा तो आपले केस नीट विंचरायचा. केदार शर्मांना त्याची ही सवय माहीत होती. एकदा एक शॉट अत्यंत घाईत घ्यायचा होता. त्यांनी राज कपूरला बजावलं होतं, ‘तू केस विंचरायच्या भानगडीत पडू नकोस,’ तरीही क्लॅप द्यायच्या वेळी राज कपूर भांग पाडायला गेला, त्यामुळे केदार शर्मा भयंकर चिडले आणि त्यांनी राज कपूरच्या थोबाडीत मारली. केदार शर्मांना त्या रात्री झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी राज कपूरला त्यांनी ‘नीलकमल’ या सिनेमात हिरोची भूमिका दिली, हिरॉईन होती मधुबाला. राज कपूर केदार शर्मांना ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हणायचा. बऱ्याच गोष्टी तो तिथे शिकला.

कपूर आणि कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांचे संबंध चांगले होते, त्यामुळे ‘वाल्मीकी’ सिनेमात राज कपूरला त्यांनी छोट्या नारदाची भूमिका दिली. त्या सिनेमात वाल्मीकीची भूमिका पृथ्वीराज कपूर करत होते. त्यात एक शॉट असा आहे की, वाल्मीकी नारदाच्या पाया पडतात. पृथ्वीराज कपूर चक्क राज कपूरच्या पाया पडले. राज कपूरला त्या छोट्या भूमिकेसाठी भालजींनी पाच हजार रुपये दिले होते. ही गोष्ट १९४४-४५ मधली.

पृथ्वीराज भालजींना म्हणाले, ‘तो केवळ माझा मुलगा आहे म्हणून तू त्याला एवढे पैसे दिलेस, नाहीतर त्याची आज तेवढी किंमत नाहीये. तू ते पैसे परत घे.’’ पुढे काय घडलं याबद्दल दोन कथा आहेत. सिनेमाचा ज्ञानकोश मानले जाणारे इसाक मुजावर म्हणतात, ‘भालजींना ते पैसे परत करण्यात आले आणि त्याबदल्यात भालजींनी राज कपूरला चेंबूरला एक जागा घेऊन दिली; पण त्या जागेवर राज कपूरने स्टुडियो उभारला नाही. त्या जागेवर अनधिकृत झोपडपट्टी उभी राहिली आणि राज कपूरने त्याच्या समाजवादी विचाराला जागून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला नाही.’ दुसरी कथा अशीही सांगितली जाते की, ते पाच हजार रुपये राज कपूरने आर.के. स्टुडिओच्या जागेत गुंतवले. पण, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, पृथ्वीराज कपूरनी आपल्या मुलाला वर येण्यासाठी खास अशी कोणतीही मदत केली नाही, उलट त्याला सामान्य मुलासारखं वागवलं जावं, अशी त्यांची अपेक्षा होती.

नाही म्हणायला त्याच्या आईने त्याला मदत केली; पण स्वतःहून, राज कपूरने मागितली नाही. त्याने ‘आर.के.’च्या बॅनरखाली काढलेला पहिला सिनेमा ‘आग’, तो पडल्यावर ‘बरसात’साठी कुणी पैसे देईनात. त्याची आई त्याला म्हणाली, ‘अरे थुंकीमध्ये भजी तळता येतात का, त्याला तेलच लागतं. तुला सिनेमा काढायला पैसे कोण देणार?’ ...आणि तिने राज कपूरला थोडे पैसे दिले. एवढं होऊनही त्याने सिनेमा काढताना कंजूषी केली नाही. त्याच्यातला मॅग्नम ओपस निर्माता ‘बरसात’मध्येच दिसला. त्याला काश्मीरमध्ये शूटिंग करायचं होतं. लक्षात ठेवा, हे सगळं मी १९४८ मधलं सांगतोय. त्या वेळी ते तितकंसं सोपं नव्हतं; पण नर्गीसच्या आईने शूटिंगसाठी तिला काश्मीरला पाठवायला नकार दिला, त्यामुळे राज कपूरने बॅटरी ऑपरेटेड कॅमेरा विकत घेतला आणि कॅमेरामन ‘जाल मिस्त्रीं’ना घेऊन तो काश्मीरला गेला. तिथं निसर्गाचे शॉट्स घेतले आणि सिनेमाचं शूटिंग महाबळेश्वरला केलं. सगळे शॉट्स असे बेमालूम मिसळले की जणूकाही शूटिंग काश्मीरलाच केलंय.

त्याने स्वतःची एक टीम उभी केली. त्यात होतं कोण कोण? शंकर जयकिशन, लता मंगेशकर, नर्गीस, शैलेंद्र, हसरत जयपुरी, राघू कर्मकार, एम. आर. आचरेकर, इंदरराज आनंद वगैरे, वगैरे. ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील हिरे होते.

पृथ्वीराज कपूरना राज कपूर हा पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा म्हणून मोठा व्हावा असं वाटत नव्हतं आणि राज कपूरलाही पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा ही ओळख नको होती. तो स्वतः उभा राहिला. बरं, त्याने भावांनाही मदत केली नाही. शम्मी कपूरचे लागोपाठ अठरा सिनेमे पडल्यावरही राज कपूरने त्याला वर येण्यासाठी मदत केली नाही. सुरुवातीला धडपडणाऱ्या शशी कपूरला हात द्यावासं राज कपूरला वाटलं नाही. त्या दोघांनाही त्याने आपल्या सिनेमांत घेतलं; पण ते स्टार झाल्यावर. पण, त्याच राज कपूरने आपल्या मुलांसाठी सिनेमे काढले.

एक ऋषी कपूर सोडला, तर बाकी दोघं ‘ढं’ च निघाले. पण एक गोष्ट मात्र कबूल करायला हवी की, राज कपूरने कधी कलेशी प्रतारणा केली नाही. ‘बॉबी’ सिनेमात ऋषी कपूर हिरो होता; पण सिनेमाच्या नावापासून ‘डिंपल’ वर फोकस होता. ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये राजीव कपूर हिरो असला तरी त्याने मंदाकिनीला असं पेश केलं की, ती स्टार बनली. राजीव कपूरला या गोष्टीचा एवढा राग होता की, तो राज कपूर गेल्यावर त्याच्या क्रियाकर्मासाठीसुद्धा गेला नाही.

सांगायचा मुद्दा हा की, मोठं खानदान तुम्हाला संधी देऊ शकतं; पण यश नाही. यशस्वी होण्यासाठी तुमच्यातच गुणवत्ता असावी लागते. म्हणून, ना देव आनंदचा मुलगा देव आनंद झाला, ना माला सिन्हाची मुलगी माला. संजय दत्त, सनी देओल असे काही अपवाद सोडले, तर ज्यांच्या पुढे भरलेलं ताट ठेवलं, ते पुढं उपाशी राहिले. म्हणून पृथ्वीराज मोठा.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)