

आराधना सिनेमाची गाणी गाजल्यानंतर एस. डी. बर्मन यांना कुणीतरी म्हटलं की, या वयातही तुम्ही तरुणांचे संगीतकार आहात. एस. डी. बर्मन लगेच त्यांना बोलले, ‘तरुणांचा संगीतकार एकच, तो शिवाजी पार्कला राहतो, त्याचं नाव सी. रामचंद्र.’
पंचमने ऱ्हिदमच्या अंगाने जायचं, संगीत द्यायचं असं ठरवलं. त्यावेळेला बर्मनदा पंचमला म्हणाले, ‘तू सी. रामचंद्रला आपला गुरू कर.’ दादांना सी. रामचंद्र यांच्याबद्दल एवढा आदर होता.
का होता?
कारण ते वेगळंच पाणी होतं.
युद्धाच्या कथा रम्य, तशा सी. रामचंद्र ह्यांच्या गाण्यांच्या कथाही रम्य. एकदा बर्मनदा ह्यांच्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. ते गाणं होतं ‘थंडी हवाए लहराके आये’ सी. रामचंद्र तिथं रेकॉर्डिंगच्या वेळेला आले होते. त्यांनी ते गाणं ऐकलं आणि ते दादांना म्हणाले, ‘त्या गाण्याच्या सुरुवातीला लाला, लाला असे शब्द टाका. गाणं अधिक सुंदर होईल.’ दादांनी ते ऐकलं आणि गाणं खरंच अप्रतिम झालं. एकमेकांना मदत करायचा तो काळ होता, आदर बाळगायचा तो काळ होता. सी. रामचंद्र यांचं खरं नाव अण्णा ऊर्फ राम चितळकर!
त्या काळातल्या शांताराम स्टाइलप्रमाणे त्यांनी सी. रामचंद्र असं नाव घेतलं, त्यामुळे अनेक जण गोंधळातही पडले. अनेकांना ते दक्षिणेकडचे वाटले. एकदा अभिनेते-दिग्दर्शक गजानन जहागीरदार सी. रामचंद्र यांना भेटले. त्यांनी विचारलं, ‘राम काय करतोस रे?’
सी. रामचंद्र म्हणाले, ‘मी संगीत देतो.’ ते त्यांना म्हणाले, ‘खूप मेहनत कर, त्या दक्षिणेतल्या सी. रामचंद्रसारखी. तो किती पुढे गेला पहा.’ म्हणजे त्यांना कल्पनाही नव्हती की, ते ज्यांच्याशी बोलत होते, तेच सी. रामचंद्र होते.
अण्णा चितळकरांचे हिंदी संगीतात गुरुवर्य मित्र म्हणजे अनिल विश्वास. त्यांचा मार्ग हा मेलडीचा मार्ग होता. तशी मेलडी कुणी निर्माण केली नाही. अण्णांना वाटलं की, आपण आपला मार्ग वेगळा करावा. एकदा त्यांच्याकडे फिल्मीस्तानचा ‘शहनाई’ हा सिनेमा आला. त्यांनी ठरवलं की सामान्यांसाठी संगीत द्यायचं या कल्पनेच्या वाटेवरून चालायचं.
तिथं पी. एल. संतोषी होते. ते म्हणाले, ‘त्याबाबतीत मी तुझा सोबती. मी तुला गाणं लिहून देतो.’ आणि त्यांनी गाणं लिहून दिलं. हे गाणं होतं ‘आना मेरी जान संडे के संडे’. गोव्यात एक बटलर होता, तो एक गाणं गायचा. त्या गाण्याची चाल अण्णांनी उचलली.
अण्णांनी ते गाणं अनिल विश्वास यांना ऐकवलं. त्यांनी ते गाणं ऐकलं. मग उठले आणि कोपऱ्यातली चप्पल उचलली आणि म्हणाले, ‘‘असं गाणं मला ऐकवायची तुझी हिम्मत कशी झाली?’ अण्णांना ते अपेक्षित होतं. ते अनिलदांना म्हणाले, ‘अनिलदा तुमचं स्थान इथलं पक्कं आहे. तुम्ही मेलडीच्या रस्त्यावरून धावत आहात.
मला माझा एक वेगळा रस्ता तयार करू दे. पहा हे गाणं फक्त संडे टू संडे नाही, तर रोज लोकप्रिय होईल. मला आशीर्वाद द्या.’ अनिलदांनी अण्णांना आशीर्वाद दिला. मग प्रश्न होता शशधर मुखर्जींना खूष करण्याचा. अण्णांनी गाणं रेकॉर्ड केलं आणि येता-जाता सर्वांना ऐकवलं. हळूहळू स्टुडिओमधले सर्वजण ते गाणं गुणगुणायला लागले. त्या वेळी ते मुखर्जींच्या कानावर पडलं. त्यांनी कोणाला तरी विचारलं, ‘हे कुठल्या सिनेमातलं गाणं आहे?’ त्यांनी सांगितलं ‘शहनाई’मधलं.
एक दिवस मुखर्जी साहेब आले आणि अण्णांना म्हणाले, ‘अरे सर्वजण गाणं गुणगुणत आहेत, मला तरी ऐकव.’ त्यांना अण्णांनी ते गाणं ऐकवलं. लोकप्रियतेच्या नाडीवर हात ठेवून बसलेला तो माणूस होता. पटकन हो नाही म्हणाला. पण गाणं पास झालं. प्रचंड लोकप्रिय झालं आणि म्हशीच्या पाठीवर बसून नदीकडं निघालेला गुराखीसुद्धा म्हणायला लागला, ‘‘मेरी जान संडे के संडे.’
ग. दि. माडगूळकर हे शीघ्रकवी होते. अनेक गाणी त्यांना कुठंही सुचत. कधी घरात, कधी बसमध्ये, कधी कुठंही. अण्णा चितळकर चालींच्या बाबतीत तसेच होते. ते शीघ्र संगीतकार होते, त्यांना चाली पटापट सुचत. त्या संबंधातील काही किस्से मी तुम्हाला सांगतो. ‘अलबेला’ सिनेमात एक अंगाई गीत घ्यायचं ठरलं. राजेंद्र कृष्ण यांना सांगण्यात आलं की लवकर लिहून द्या. एरवी ते पटकन देत; पण त्यांना अंगाई गीत पटकन सुचेना.
एक दिवस अण्णांनी त्यांना घरी बोलावलं. त्यांच्या बायकोने, म्हणजे बेंन हिने छान जेवण केलं. अण्णांनी बियरच्या बाटल्या आणल्या. त्या बाटल्या आणि ते जेवण यांसह राजेंद्र कृष्णना एका खोलीत कोंबण्यात आलं आणि त्यांना सांगितलं गेलं की, ‘‘गाणं लिहून झालं की कुलूप उघडणार.’’
कधी उघडलं गेलं असेल कुलूप? संध्याकाळी उघडलं गेलं. तोपर्यंत जेवण संपलं होतं; पण गाणं तयार होतं. दुसऱ्या दिवशी त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. त्या दिवशी कुठल्यातरी कारणाने अण्णा आणि लता मंगेशकर यांच्यात भांडण झालं. चिडलेली लतादीदी अण्णांकडे पाठ करून बसली होती, त्यांच्याकडे पाहायलासुद्धा तयार नव्हती.
अण्णांनी पेटी काढली आणि ‘धीरे से आजा रे अंखियनमें’ गाण्याची चाल वाजवली; पण तिच्याकडून प्रतिक्रिया आली नाही. तिने मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. अण्णांनी काय ते ओळखलं. त्यांनी तात्काळ दुसरी चाल लावली आणि ती ऐकल्यावर लतादीदींचा राग पळाला. ती गरकन वळली आणि म्हणाली, ‘‘काय सुंदर चाल आहे रे राम.’
लतादीदी ती चाल गुणगुणायला लागली. ती चाल अधिक सुंदर झाली. तिच्या गळ्यात जादू होती. तिथून गाणं बाहेर आलं की, पितळी गाणंही सोन्याचं व्हायचं... आणि क्षणात सुचलेली ती चाल आजही तितकीच लोकप्रिय आहे. अंगाई गीत म्हटलं की पहिल्यांदा हेच गाणं आठवतं.
अचंबित करणारे आणखी दोन किस्से सांगतो तुम्हाला. ‘अनारकली’च्या वेळी अण्णा आणि सलील चौधरी गप्पा मारत बसले होते. इतक्यात शैलेंद्र त्या सिनेमाचं एक गाणं घेऊन आला. ते गाणं होतं, ‘दुवा कर गमे दिल, खुदासे दुवा कर’. अण्णांनी ते वाचलं आणि अक्षरशः ३० सेकंदांत चाल लावली. सलीलदा आणि शैलेंद्र दोघेही वेडे झाले.
असाच एक किस्सा ‘आझाद’ या सिनेमाच्या गाण्याचा. मद्रासच्या नायडूंनी ‘मल्लिकानन’ नावाचा सिनेमा काढला. एम. जी. रामचंद्र, म्हणजे एमजीआर त्यात हिरो होते. तो सिनेमा तुफान चालला. नायडूंना वाटलं की, त्यावर लगेच हिंदी सिनेमासुद्धा काढावा, कारण त्या सिनेमाचे सेट तयार होते. त्यांनी दिलीप कुमार आणि मीनाकुमारीला घेऊन ‘आझाद’ नावाचा सिनेमा काढला. त्या सिनेमाच्या संगीतासाठी ते आधी नौशादकडे गेले.
नौशाद यांना त्यांनी सांगितलं की, ‘माझा सेट तयार आहे, मला वीस दिवसांत गाणी हवीत.’’ नौशाद हा माणूस प्रत्येक गाणं घासून पुसून तयार करायचा. त्याने स्पष्टपणे सांगितलं, ‘वीस दिवसांत दहा गाणी काय, मी एक गाणंसुद्धा देऊ शकेन की नाही मला ठाऊक नाही. मी गाण्याचं डिपार्टमेंटल स्टोअर चालवत नाही; पण तुम्हाला पटकन चाली करून हव्या असतील, तर सी. रामचंद्र यांच्याकडे जा.’’ नायडू त्यामुळे अण्णांकडे गेले. अण्णांनी सांगितलं, ‘हो मी देतो.’
नायडूंनी मग अण्णा आणि राजेंद्र कृष्ण यांच्यासाठी मद्रासला हॉटेल बुक केलं. त्या दोघांची मस्त बडदास्त ठेवली. उत्तम जेवण, बरोबर स्कॉच व्हिस्की वगैरे वगैरे. अण्णा आणि राजेंद्र कृष्ण यांनी दहा दिवस धमाल केली. दहाव्या दिवशी नायडू आले आणि त्यांनी अण्णांना विचारलं, ‘‘गाणी कुठे आहेत? कोइंबतूरला सेट रेडी आहे.’
अण्णा म्हणाले, ‘उद्या सकाळपर्यंत पाच गाणी देतो.’ आणि दिलीसुद्धा. ‘राधा ना बोले ना बोले ना बोले रे’, ‘जा रे जा रे ओ कारे बदरीया’, ‘अपलम चपलम’ वगैरे वगैरे. सकाळी ते गाणं रेकॉर्ड व्हायचं आणि रात्री त्याचं शूटिंग... २३ दिवसांत अशी दहा गाणी संपवली गेली.
बरं गाणी नुसती उजवली गेली नव्हती, तर त्या गाण्यांना दर्जा होता. एका गाण्याला तलत मेहमूद येऊ शकला नाही म्हणून अण्णांनी स्वतः ते म्हटलं. अण्णांना स्वतःला गायला आवडायचं आणि त्यांचा आवाज थोडा तलतच्या जवळचा होता आणि ते गाणंसुद्धा खूप गाजलं होतं.
त्यानंतर अण्णांनी आपलं मानधन थेट एक लाख रुपये केलं. बरोबर नौशादएवढं. दिलीप कुमारसुद्धा त्या वेळी एवढं मानधन घेत नव्हता. एक मराठी माणूस फिल्म इंडस्ट्रीमधला हायेस्ट पेड संगीतकार झाला. आहेत की नाही अण्णा चितळकरांच्या कथा रम्य?
(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून त्यांची या विषयांवरची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.