संवेदनशील रफी

‘हरी ओम हरी ओम’ हे मालकंस रागावर आधारित गाणं आहे. रफी हा जबरदस्त भाविक माणूस होता. त्याची भजनं गळ्यातून नाही, तर हृदयातून येत असत.
mohammad rafi
mohammad rafisakal

मी कुठंतरी वाचलं की ‘मन तडपत हरी दर्शन को आज’ हे गाणं काशिविश्वेश्र्वराच्या मंदिरात सकाळी लावलं जातं.

गंमत पहा. ह्या गाण्याचा गीतकार कोण? शकील बदायुनी. ह्या गाण्याचा संगीतकार कोण? नौशाद. ह्या गाण्याचा गायक कोण?

मोहम्मद रफी. तिघंही तसे मुस्लिम; पण ते गाणं ठाव घेतं हिंदुहृदयाचं. जवळपास हिंदूंचं ते प्रार्थनागीत. हिंदी चित्रपट, त्यांतील गाणी ह्यांनी ह्या देशात सर्वधर्म समभाव जपला.

ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी, नौशादने सर्व वादकांना सांगितलं, ‘‘ उद्या आपण कृष्णाचं भजन रेकॉर्ड करणार आहोत. सर्वांनी पूजा करून पवित्र मनानं स्टुडिओत यावं.’’ स्टुडिओत आल्यावर सर्वांनी प्रार्थना केली. मग रफीने गायला सुरुवात केली...

‘हरी ओम हरी ओम’ हे मालकंस रागावर आधारित गाणं आहे. रफी हा जबरदस्त भाविक माणूस होता. त्याची भजनं गळ्यातून नाही, तर हृदयातून येत असत. त्याचं हृदयसुद्धा विशाल होतं. एक किस्सा सांगतो - कलकत्त्याला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं रफी एका हॉटेलमध्ये उतरला होता.

सकाळी फिरायला जाताना जवळच्या एका चौकात एक अंध भिकारी मंदिराबाहेर, ‘भगवान के घर देर है, अंधेर नही है’ हे गाणं गाताना त्याला दिसला. काय केलं असेल त्यानं? तो त्या भिकाऱ्याच्या शेजारी बसला, त्याने भिकाऱ्याच्या हातातली ताटली घेतली आणि तो स्वतः गाणं म्हणायला लागला.

लोक जमले, भिकाऱ्यापुढची चादर पैशांनी भरली, मग तो हळूच उठला आणि हॉटेलवर परत आला. त्या भिकाऱ्याला मिळालेल्या पैशांचा अंदाज आला आणि आज कुणीतरी देवदूत बाजूला बसून गाऊन गेला हे कळलं. हिंदी सिनेमासृष्टीत असे देवदूत फार फार कमी होते.

‘सुनो सुनो ये दुनियावालो बापूजी की अमर कहानी’ या गाण्यामुळे रफी खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. राजेंद्र कृष्णने हे गाणं लिहिलेलं आहे आणि त्याला संगीत दिलंय हुस्नलाल भगतरामने. रफी होतासुद्धा बापूजींसारखाच. बापूजी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात धार्मिक होते, रफीसुद्धा धार्मिक होता. बापूजी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात कमालीचे उदारमतवादी होते, त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान केला, रफीनेसुद्धा तेच केलं.

एकदा रफी परदेशातून डायलिसिसचं मशिन घेऊन आला. त्या वेळी डायलिसिस सर्रास होत नसत. भारतात नुकतीच सुरुवात झाली होती. त्याला सी. रामचंद्रांनी विचारलं, ‘हे मशिन कशाला आणलंस?’

तो काय म्हणाला असेल? तो म्हणाला, ‘‘आपल्याकडे डायलिसिस सर्वत्र होत नाही, कुठल्यातरी हॉस्पिटलला भेट देतो. निदान गरिबांना तरी त्याची मदत होईल.’’ तसा तो हाडाचा सर्वधर्मसमभावी. तो रमजानची गाणी जेवढ्या समरसतेने गायचा तेवढीच हिंदूंची भक्तिगीतं समरसतेने गायचा. ‘तुलसीदास’ चित्रपटात एक गाणं आहे, ‘मुझे अपनी शरण में लेलो राम’.

निर्माते हरसुखभाई भट्टांचं असं म्हणणं होतं की, हे गाणं मन्ना डेंकडून गाऊन घ्यावं. चित्रगुप्त या संगीतकाराने हट्ट धरला की, नको, रफी गाईल. शेवटी रफीने ते गाणं गायलं. महिपाल नावाच्या नटावर ते चित्रित करण्यात आलं. ते चित्रित करताना महिपालच्या डोळ्यांत ग्लिसरीनशिवाय पाणी आलं. महिपालने अभिनय केल्याचा त्याच्या आयुष्यातला हा एकमेव प्रसंग.

रफीचं भजन दगडालाही पाझर फोडायचं. रफी एकदा चित्रगुप्तना म्हणाला, ‘मी भजन गातो तेव्हा परमेश्वराला आळवतो. त्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं. त्याने कधी भेदभाव केला नाही, आपण राम-रहीम निर्माण केले. धर्मांच्या भिंती आपण उभारल्या.’ एका साध्या सज्जन माणसाचं किती उदात्त तत्त्वज्ञान होतं, याची यावरून आपल्याला कल्पना येईल.

ह.भ.प. श्री. गजाननबुवा राहीलकर हे नाव तुम्ही कधी ऐकलंय? ते सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. वांग्याच्या विठ्ठल मंदिरात त्यांची कीर्तनं होत. रफी त्यांच्या कीर्तनाला जाऊन बसायचा आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या अभंगांचा अर्थ समजावून घ्यायचा, त्यामुळे रफीला मराठीची गोडी लागली आणि त्याचबरोबर मराठी भावगीतांचीसुद्धा. एकदा रफीने कीर्तनकारांकडून गीतेतला एक श्लोक समजावून घेतला आणि त्या पार्श्वभूमीच्या आधारे श्रीकांत ठाकरेंनी सांगितलेल्या ‘शोधीशी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी’ हे भक्तिगीत गायलं.

रफी हा लता मंगेशकरप्रमाणे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, रफी जाऊन आज ४३ वर्षं झाली. त्यानंतर अनेक गायक आले, अनेक येऊन गेले; पण रफीचं स्थान ध्रुवताऱ्यासारखं आहे. आपल्या आयुष्यात असा दिवस क्वचित येत असेल की, ज्या दिवशी आपण रफी ऐकला नाही.

यूट्यूब, पेनड्राइव्ह, रेडिओ-टीव्हीतून रफीचा स्वर उमटतो आणि थेट आपल्या हृदयाला जाऊन मिळतो. तो अष्टपैलू गायक होता. हिंदी सिनेमाला आवश्यक अशा प्रत्येक प्रकारचं गाणं त्याने गायलं. खेळकर, रोमँटिक, दर्दभरं, शास्त्रीय बैठकीचं, देशप्रेमावर आधारित, धांगडधिंगा टाइप, गझल वगैरे कुठलंही. क्रिकेटमध्ये सोबर्स, साहित्यात अत्रे, तसा हिंदी सिनेमाच्या गाण्यांत रफी! तरीसुद्धा चित्रपटसृष्टीत असे दिग्गज संगीतकार होते, ज्यांना रफी मनापासून आवडला नाही.

त्यातील एक अनिल विश्र्वास. राजू भारतन या लेखकानं एकदा फिल्मफेअरसाठी अनिल विश्वास यांची मुलाखत घेतली होती. १९७० ची गोष्ट असेल. त्या मुलाखतीत अनिल विश्वासनी आपलं मत मांडलं की, मोहम्मद रफी हा गायकच नाही. बाप रे! केवढा गदारोळ तेव्हा उठला! शेवटी किशोर कुमारने फिल्मफेअरला पत्र लिहून सांगितलं, ‘‘मी रफीचा चाहता आहे.’

अर्थात, ‘हीर’ नावाच्या सिनेमात अनिल विश्वासने रफीचा आवाज वापरला होता. पुढे असं घडलं की, अनिल विश्वास चित्रपटसृष्टीतून बाहेर फेकले गेले, त्यांचा मुलगा हा संगीतकार म्हणून उभा राहत होता, तो एकदा रफीकडे आला आणि रफीला म्हणाला, ‘माझ्यासाठी तू गाणं म्हणशील का?’ रफीने क्षणाचाही विचार न करता त्याला होकार दिला.

रफीचा एक जवळचा मित्र हे ऐकत होता. तो अनिलदांचा मुलगा गेल्यानंतर रफीला म्हणाला, ‘तू याला हो का म्हणालास? याच्या वडिलांनी तुला गायक मानलं नाही. तुला फारशी गाणी दिली नाहीत. आता काळ बदलला, त्यामुळे हा मुलगा तुझ्या दारी आलाय.’ रफी त्या मित्राला म्हणाला, ‘अरे त्याच्या वडिलांनी मला गाणी दिली नाहीत, त्यात त्याची काय चूक?’ असंच एकदा काही कारणाने लता मंगेशकरने ओ.पी.ला नाही म्हटलं होतं; पण तोच ओ.पी. पुढे अत्यंत लोकप्रिय असा संगीतकार झाला. कुणाच्या नशिबात काय असतं, हे सांगता येत नाही.

माझ्या अण्णा चितळकरांवरील लेखात मी म्हटलं होतं की, त्यांनासुद्धा रफी आवडायचा नाही. पण, तरीही एकदा अशोक कुमारला फसवून ‘साजन’मध्ये अण्णा चितळकरांनी रफीकडून गाणं गाऊन घेतलं होतं. अशोक कुमार हा तेव्हा त्यांचा मालक होता. तो स्वतः गायचा.

एकदा दुसरे मालक शशधर मुखर्जी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मागे लागले. अशोक कुमार काही दिवसांसाठी बाहेर गेला होता. त्या संधीचा फायदा घेऊन अण्णांनी रफीच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं. अशोक कुमार परतल्यावर अण्णांनी त्याला गाणं ऐकवलं. अशोक कुमार म्हणाला, ‘काय सुंदर आवाज आहे? कुणाचा आहे?’

अण्णा म्हणाले, ‘‘रफी नावाचा एक गायक आहे.’ अशोक कुमार म्हणाला, ‘यापुढे माझी सर्व गाणी याच्याकडून गाऊन घ्या.’

त्यानंतर रफी अण्णांसाठी २३ सोलो, १९ द्वंद्वगीतं गायला. त्यांचं म्हणणं रफी सांगितल्याप्रमाणे उत्तम गातो. किशोर इम्प्रोवाईज करतो. रफी राहुल द्रविड आहे, तर किशोर ए. बी. डिव्हिलियर्स.

आर. डी. बर्मन याचाही कल रफीपेक्षा किशोरकडे. ‘तिसरी मंझिल’ चित्रपटात शम्मीसाठी आर.डी.ने रफीला वापरलं होतं; पण तेव्हा आर.डी. नवखा होता. दादागिरी शम्मीची होती. शम्मीचा लाडका आवाज रफी. त्यामुळे आर.डी.चं काही चाललं नाही.

विजय आनंदने हट्ट धरला म्हणून तो सिनेमा आर.डी.ला मिळाला, नाहीतर तो शंकर जयकिशनकडेच जायचा. त्यातलं ‘आजा आजा मैं हू प्यार तेरा’ हे गाणं आर.डी.च्या मनासारखं रफीकडून उतरेना. रफीला ही गोष्ट लक्षात आली. रफी बिझी होता; पण त्याने सलग दीड महिना रीहर्सल केली. आर.डी.चं समाधान होईपर्यंत प्रयत्न केला.

पुढे एकदा आर.डी.ला किशोर एका गाण्याकरिता हवा होता; पण तो बिझी होता, आर.डी.ला तो मिळू शकला नाही, त्याने रफीला बोलावलं. रफीचे पुन्हा कान भरण्यात आले की, त्याने जाऊ नये. पण रफी म्हणाला, ‘गाणं माझा पेशा आहे. मी त्याला नाराज का करू?’ त्या सिनेमातलं, ‘मैने पूछा चांदसे’ हे गाणं त्याने जीव ओतून गायलं.

रफी असा होता. व्यावसायिक; पण समुद्रासारखा विशाल मनाचा.

(क्रमशः)

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत. त्यांची या विषयावरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com