विराटचे सोने चकाकेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli
विराटचे सोने चकाकेल!

विराटचे सोने चकाकेल!

विराट कोहली सध्या धावांच्या दुष्काळातून जातोय. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत तो दुष्काळ जायची चिन्हं दिसली तर खूप बरं वाटेल. विराटला फलंदाजी करताना त्याच्या करिअरमध्ये इतकं गोंधळलेलं मी कधी पाहिलं नव्हतं. २०१४ मध्ये इंग्लडमध्ये अँडरसनच्या समोर त्याची बॅट आउटस्विंग होणाऱ्या चेंडूकडे अशी ओढली जायची, जशी सारस्वताची जीभ माशाकडे ओढली जाते. पण, तेव्हा त्यानंतर इतरत्र त्याने तुफान धावा केल्या आणि त्या सर्व प्रसंगांत केल्या. मॅच वाचवताना केल्या, मॅच जिंकून देताना केल्या; वन डेत केल्या, टी-ट्वेन्टीमध्ये केल्या, आयपीएलमध्येसुद्धा केल्या आणि भरभरून केल्या. अदानी, अंबानीला शंभरची नोट जेवढी क्षुल्लक, तेवढ्या त्याकाळात धावा या विराट कोहलीला क्षुल्लक होत्या. तो पॅव्हेलियनमधून बाहेर पडला की, धावा त्याच्या बॅटला अशा चिटकून बाहेर पडत. त्याची बॅट हलली की, पारिजातकाचं झाड हलवल्यावर सडा पडावा असा धावांचा सडा पडत असे. कव्हर ड्राईव्ह मारताना त्याचा पाय चेंडूच्या जवळ येत असे, डोकं जवळ असे आणि मग तो ड्राईव्ह असा जाई की, जणू चेंडूला हरणाचे पाय फुटलेत. तो पहिला चेंडू अक्रॉस खेळे, तरी बॅटच्या मध्यावरून मिड विकेटला धावत जात असे. कमकुवत धावफलक, जिंकण्याचं आव्हान, समोरचा संघ, कर्णधाराची जबाबदारी... काही काही म्हणून कशाचाही त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला नाही.

२०१८ मध्ये इंग्लडमध्ये धावा केल्यानंतर तर तो त्याक्षणी जगातल्या सर्व फलंदाजांचा शहेनशहा वाटला. अगदी २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे सगळं छान, मस्त, निवांत चाललेलं होतं. बांगलादेश विरुद्ध कसोटीत त्याने १३७ धावा केल्या आणि तिथून मात्र त्याचं नशीब फिरलं. धावा त्याच्यावर रुसल्या आणि त्या अजून त्याच्यावर रुसून आहेत. अर्थात, त्याच्या दर्जाचा विचार केला तर. २०१९ मध्ये त्याची त्या वर्षाची कसोटी सरासरी होती ६८. पुढे २०२० मध्ये ती घसरली थेट १९.३३ वर. २०२१ मध्ये ती होती २८.२१ आणि २०२२ मध्ये होती ३७.१८; म्हणजे कुठून कुठे घसरलं तुम्हाला लक्षात येईल.

वन डेच्या बाबतीतही ती घसरण जाणवते. २०१९ मध्ये त्याची वन डेची सरासरी होती ५९.८६. पुढे २०२० मध्ये ती ४७.८८ वर आली. २०२१ मध्ये ४३.०० वर आली आणि २०२२ मध्ये ती २३.६७ वर आली. त्या बांगलादेश विरुद्धच्या शतकानंतर त्याने आतापर्यंत एकही शतक ठोकलेलं नाही. ना टेस्टमध्ये, ना वन डेत, ना टी-ट्वेन्टीमध्ये. म्हणजे एकेकाळी शतक ही ज्याची खासगी प्रॉपर्टी असं वाटत होतं आणि ३० धावा ओलांडल्यानंतर तो शतकाजवळ पोचणार असा आत्मविश्वास वाटायचा, म्हणजे त्याच्या स्कोअरकार्डवर सहज शतक लिहून जावं असं वाटायचं, त्या विराट कोहलीला अजून एकही शतक मिळालेलं नाही.

त्याच्या कसोटी कारकीर्दीची आणखीन एक उतरण पाहू या. कसोटी कारकीर्दीमध्ये २०११ पासून २०१९ पर्यंत त्याची धावांची सरासरी होती ५४.९८, म्हणजे जवळजवळ ५५. महान फलंदाजांची जी सरासरी असते, ती त्याची सरासरी होती. ती आता ४९.९५ म्हणजे पन्नाशीत आलेली आहे. त्या काळामध्ये त्याने २७ शतकं ठोकली होती आणि २८ अर्धशतकं. २०२० पासून आजपर्यंत मात्र त्याने कसोटीत फक्त ६ अर्धशतकं ठोकलेली आहेत, शतक नाही.

एवढंच नाही, तर काही जुनी दुखणी जी होती त्याच्या फलंदाजीतली, ती उसळून बाहेर आली. विकेट कीपर आणि स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे कव्हर ड्राईव्ह करताना किंवा खेळताना वारंवार झेल जायला लागले, लेग स्पिनरच्या गुगलीचा अंदाज चुकायला लागला, चांगला फिरकी गोलंदाज त्याच्या विकेट्स काढायला लागला आणि शतक जी त्याची एकेकाळी खासगी मालमत्ता वाटत होती, त्याबाबतीत तो चक्क कर्जबाजारी झाला. ह्या परिस्थितीतून पुजारा किंवा रहाणे गेल्या काही वर्षांत गेले आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव आला. भारतीय संघातून त्यांना बाहेर पडावं लागलं. साधारण तशाच, पण किंचित बऱ्या परिस्थितीतून विराट कोहली चाललाय. अर्थात, विराट कोहलीला भारतीय संघाच्या बाहेर पडावं लागणार नाही. कारण, शेवटी तो विराट कोहली आहे आणि त्याच्यामागे आधीची त्याची प्रचंड पुण्याई उभी आहे. विराट कोहलीला या बॅड पॅचमधून बाहेर यायलाच लागेल. तो बाहेर येऊ शकतो का? मला खात्री आहे, तो येऊ शकतो. विराट कोहली ज्या त्याच्या बॅड पॅचमधून जातोय, तसा बॅड पॅच एक सर डॉन ब्रॅडमन सोडले तर जगातल्या प्रत्येक फलंदाजाला आलाय. मग तो सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्हिव्ह रिचर्ड्स लारा, गॅरी सोबर्स किंवा कुणीही असो. सर डॉन ब्रॅडमन हा एकमेव अपवाद. बॉडी लाइन सीरिजमध्ये त्यांची सरासरी ५७ ते ५८ च्या आसपास होती. कुठे ९९ ते १००, तर कुठे ५७ ते ५८; पण स्वतःचं शरीर वाचवताना सरासरी कमी झाली. म्हणजे ब्रॅडमनला शेकवूनच काढायचा, हाच डावपेच वापरला गेला असल्यामुळे ते खाली आलं. बॉडी लाइन सीरिज संपली आणि ब्रॅडमनच्या सरासरीने पुन्हा शंभरीकडे झेप घेतली. मला आठवतंय, १९९६ मध्ये अझरुद्दीन त्याच्या सर्वात वाईट फॉर्ममधून जात होता. १९९० मध्ये जी बॅटिंग त्याने इंग्लडमध्ये केली, ते पाहून इंग्लडला असं वाटलं की, नवीन रणजी जन्माला आलाय. तोच अझर १९९६ मध्ये प्रत्येक धावेसाठी मोहताज झाला होता. भारतीय संघाची एकदा नेट प्रॅक्टिस सुरू होती आणि अझरुद्दीन प्रॅक्टिस करत होता. त्यावेळेला मी अझरला गमतीने म्हटलं, ‘‘बॉलिंग टाकू का?’’ तो म्हणाला, ‘‘ टाक रे. तुझीही कधीतरी इच्छा असेल ना, की अझरची विकेट काढावी. काढून घे. हीच संधी आहे. माझा फॉर्म असा आहे की, तुलाही विकेट मिळू शकेल.’’

सचिन तेंडुलकर जेव्हा टेनिस एल्बोच्या त्रासातून जात होता, त्यावेळेला तो असाच फॉर्मशी झगडत होता. पण मी एक गोष्ट पाहिलीय की, महान फलंदाज त्यातून बाहेर येतात आणि ते फॉर्म नाही म्हणून हातावर हात ठेवून बसत नाहीत; तर कुठेतरी तांत्रिक चूक होत नाहीये ना, किंवा मानसिक ताणामुळे आपल्या हातून चुका होताहेत का, या सगळ्याचा विचार करतात आणि ते परत येतात. एकदा सुनील गावस्करचे दोन शॉट्स वरती गेले आणि सुनीलला ही गोष्ट खटकली की, ‘आपला फटका हा जमिनीलगत जायच्याऐवजी वर कसा जातो?’ त्यावेळेला इंटरनेट वगैरे काही नव्हतं. व्हॉट्सअप नव्हतं की पट्कन कॉन्टॅक्ट करावा. त्याने वसंत अमलाडी या मुंबईच्या महान कोचला सांगितलं की, ‘‘माझ्यात काहीतरी चूक होतेय, असं मला वाटतंय. तुम्ही टेलिव्हिजनवर माझी फलंदाजी पाहून अंदाज घ्याल का?’’ वसंत अमलाडींनी पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की, त्याची जी ग्रीप होती ती किंचित बदलली होती आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता. त्यांनी सुनीलला तसं कळवलं आणि सुनीलने नंतर धावा केल्या.

सुनीलला कधीही असं वाटलं की, आपल्या फलंदाजीमध्ये कुठेतरी एखादी छोटीशी कमतरता घुसलेली आहे, किंवा कुठेतरी चूक होतेय, की तो एखाद्या कोचकडे जायचा. असाच त्याने एकदा पुण्याच्या कमल भांडारकरांचा दरवाजा ठोठावला होता. मला असं वाटतं की, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

अझर आणि अरविंद डिसिल्व्हा या दोघांची ग्रीप झहीर अब्बासने थोडीशी बदलली आणि त्यांच्या फलंदाजीमध्ये प्रचंड फरक पडला. बऱ्याच वेळेला मानसिक ताणसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. एकामागोमाग शतकं ठोकणाऱ्या विराट कोहलीला आपल्याला शतक मिळत नाहीये, याचा एक ताण पडू शकतो; आणि मानसिक ताण ज्यावेळेला येतो, तेव्हा तुमच्या हालचाली ज्या असतात ना, त्या हालचाली मंदावतात. आणि मग जो शॉट कव्हरमधून जायचा असतो, तो स्लिप किंवा गलीमध्ये जाऊ शकतो.

सचिन तेंडुलकर ज्यावेळेला ३४ वरून ३५ व्या शतकावर गेला, तेव्हा त्याला खूप वाट पाहायला लागली होती, कारण त्याच्यावर कुठेतरी मानसिक दबाव होता, किंवा तो जेव्हा शंभरव्या शतकाकडे निघाला, तेव्हा अख्ख्या जगाचं त्याच्याकडे लक्ष होतं. तो माणूस असल्यामुळे त्याच्यावर मानसिक दबाव नक्की आला. त्या दबावामुळे त्याचं ते शतक व्हायला ३४ खेळी लागल्या.

३४ वरून ३५ चं त्याचं जाणं मला आजही आठवतंय. त्याला एक वर्ष लागलं. पण, त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक मस्त असा सुगीचा काळ आला. म्हणजे अशी वेळ आली की, तो ८ ते १० शतकं धाडधाड करून गेला. त्या दबावातून बाहेर पडणं हे महत्त्वाचं असतं. विराट कोहलीच्या बाबतीतसुद्धा तेच महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराट कोहलीकडे ती मानसिक ताकद प्रचंड प्रमाणात आहे आणि म्हणूनच त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त आशा वाटते. ग्रेग चॅपेलसारखा खडूस माणूस त्याला ‘मोस्ट ऑस्ट्रेलियन नॉन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ऑफ ऑल टाइम’ म्हणतो. म्हणजे एकंदरीत त्याची वृत्ती, खेळाकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन, त्याची आक्रमकता आणि प्रतिस्पर्ध्याशी अत्यंत आक्रमकपणे झुंजणं ही ऑस्ट्रेलियन वृत्ती आहे, ती त्याच्यात दिसते. आणि म्हणून तो म्हणतो, ‘‘मोस्ट ऑस्ट्रेलियन नॉन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ऑफ ऑल टाइम.’’

जेव्हा विराट कोहली अंडर १९ खेळत होता, तेव्हा लालचंद राजपूतने एक भाकीत केलं होतं की, ‘हा खेळाडू उद्या चॅम्पियन होणार.’ आणि तो चॅम्पियन झाला. २०१४ मध्ये अँडरसनच्या आउट स्विंगवर त्याची बॅट झिम्मा खेळायला लागली, तेव्हा त्याने पुन्हा १४ दिवस लालचंद राजपूतकडे घालवले आणि लालचंद राजपूतने त्याच्यावर मेहनत घेऊन जे काही छोटे तांत्रिक बदल फलंदाजीत करायचे होते ते करून घेतले. मग त्याने सचिनला बोलावलं. सचिनने काही टिप्स दिल्या. इतकंच नाही, तर लालचंद राजपूत त्याला म्हणालासुद्धा, ‘‘तू व्हिव्ह रिचर्ड्ससारखा खेळ खेळू शकतोस.’’ त्यावर विराट कोहली म्हणाला, ‘‘नाही सर, तो खूप महान फलंदाज आहे. मी कसा तिथपर्यंत पोचेन?’’ तेव्हा लालचंद राजपूतने त्याला पुन्हा आत्मविश्वास देऊन सांगितलं की, ‘‘तुझ्यात ती गुणवत्ता आहे, तुझ्यात ती ताकद आहे.’’ तो व्हिव्ह रिचर्ड्स नसेल झाला; पण तरीसुद्धा व्हिव्ह रिचर्ड्सला तो खूप आवडायला लागला. कारण त्याचीच आक्रमक वृत्ती त्याच्या फलंदाजीत जोपासतोय असं व्हिव्ह रिचर्ड्सला वाटायला लागलं; आणि तो काही अशा खेळी खेळला की, ज्या खेळी व्हिव्ह रिचर्ड्सलासुद्धा मिरवाव्याशा वाटल्या.

आपल्या करिअरच्या एका स्तरावर क्रिकेटमधून त्याचं लक्ष उडतंय की काय असं वाटत होतं. त्या वेळी त्याच्या कोचनी त्याला गदगदा हलवून जागं केलं. एका खोडकर, गुलझबू मुलाचं परिवर्तन एका ज्येष्ठ स्टेस्टमनमध्ये झालं, जे तो आज आहे. एखादी गोष्ट त्याने मनावर घेतली तर तो करू शकतो, हे आपण त्याच्या फिटनेस आणि डाएटच्या बाबतीत पाहिलेलं आहे. लहानपणी दुःख सावरून तो मैदानावर परतू शकतो हेसुद्धा पाहिलेलं आहे. २००६ मध्ये त्याचे वडील गेले आणि त्यावेळेला दिल्ली विरुद्ध कर्नाटक ही रणजी मॅच सुरू होती. दिल्ली पराभवाच्या छायेत होती. त्या वेळेला विराट कोहली येऊन खेळेल असं वाटलं नव्हतं. पण, विराट कोहली दुसऱ्या दिवशी आला, खेळला, ९० धावा केल्या आणि दिल्लीला पराभवातून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा जो स्वभावधर्म आहे, जी स्वभावातली आक्रमकता आहे, या आक्रमकतेमुळे तो या बॅड पॅचमधून बाहेर येईल, असं चित्र मला तरी दिसतंय.

माझा एक पुण्याचा सायकॉलॉजिस्ट मित्र आहे, गिरीश लाड नावाचा. त्याचं म्हणणं असं आहे की, ‘विराट कोहलीने आपल्या एकंदर परफॉर्मन्सबद्दल किंवा न मिळणाऱ्या शतकाबद्दल अतिविचार करू नये. अतिविचार केला की माणसामध्ये एन्झायटी वाढते आणि माणसामध्ये एन्झायटी वाढली की, त्याच्या हालचाली बरोबर होत नाहीत आणि मग मन आणि शरीर यांचं सिक्रोनायझेशन झालं नाही, तर जो फटका त्याला खेळायचा असतो, तो फटका त्याला मारता येत नाही. त्याच्यावर दबाव येतो आणि तो बाद होतो. या सगळ्यातून विराट कोहली नक्की बाहेर येईल, जसं सचिन तेंडुलकर आणि इतर खेळाडू आले.

परवा मी झिंबाब्वेत असलेल्या लालू राजपूतशी बोललो. तो म्हणाला, ‘‘अलीकडे माझं आणि विराटचं बोलणं झालं नाही; पण त्याने दोन आठवडे क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी, कुटुंबाबरोबर राहावं. फार तर स्वतःच्या जुन्या शतकी खेळी पहाव्यात. एक मोठी खेळी त्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल. बऱ्याचदा काही चुकीच्या गोष्टी नकळत खेळात शिरतात. धावा होताना त्या लक्षात येत नाहीत. धावा थांबल्या की त्याचं भान येतं. त्याबाबतीत तो कोचशी बोलेलच.’’ विराट कोहलीसाठी ही एक अपूर्व संधी आहे. सिद्ध करण्यासाठी की, कुठल्याही कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन यशस्वी होऊ शकतो. या प्रसंगातून तावून आणि सुलाखून बाहेर आल्यानंतर त्याचं सोनं हे जास्त चकाकेल.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून साहित्यिकही आहेत)