यॉर्कर आणि स्विंगमधला चमत्कार | yorker and swing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alan davidson
यॉर्कर आणि स्विंगमधला चमत्कार

यॉर्कर आणि स्विंगमधला चमत्कार

ॲलन डेव्हिडसन हा क्रिकेटच्या इतिहासातला एक महान अष्टपैलू खेळाडू. परवाच तो स्वर्गाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला.

रिची बेनॉ हा त्याचा जिवलग मित्र. तो तिथे आधीच पोचला होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्राचं स्वागत वर नक्कीच केलं असेल. आमच्या वासू परांजपेने त्याचे किस्से त्याला तिखट मीठ लावून एव्हाना ऐकवले सुद्धा असतील.

देवाने अचानक तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ७२ तासांच्या आत वर पाचारण केलं. ते तिघं म्हणजे ॲलन डेव्हिडसन, ॲशली मॅलेट आणि पीटर फिलपॉट. या तिघांनी मिळून ९० कसोटीत भाग घेतला होता. १९४९ ते १९८१ या काळामध्ये ४५० पेक्षा जास्त पहिल्या दर्जाचे सामने खेळले. १ हजार ६१० बळी घेतले. आणि १२ हजार ६ धावा केल्या. त्यात १३ शतकं होती.

परमेश्वराचा वरती ‘आयपीएल’सारखी एखादी स्पर्धा सुरू करायचा विचार असावा. कदाचित कुबेराचे डोळे आयपीएलमधल्या दोन नव्या संघांच्या पैशाच्या बोलीने विस्फारले असावेत. पण या तिघांमधला ॲलन डेव्हिडसन हा खरा खुरा ऑल टाईम ग्रेट. म्हणजे किती मोठा? आजच्या पिढीला सांगायचं तर वासिम अक्रम नसता तर वादातीतपणे क्रिकेटच्या इतिहासातला तो सर्वश्रेष्ठ डावखुरा वेगवान गोलंदाज ठरवला गेला असता.

आता वाद होईल. भीमसेन मोठे की कुमार गंधर्व मोठे असा. किंबहुना मोठेपणा पेक्षा अधिक लाडका कोण? असा तो वाद असेल. कारण त्या दोघांमधलं मोठेपण ठरवणं ना हे तसं फार कठीण आहे.

मला ॲलन डेव्हिडसनला मैदानावर डोळे भरून कधीच पाहता आलं नाही. पण इतर खेळाडूंच्या डोळ्यातून आणि नंतर क्रिकेटच्या व्हिडीओमधून मी त्याला डोळे भरून पाहिलं.

परवा पाकिस्तान विरुद्ध टी - ट्वेन्टी सामन्यामध्ये शाहीन आफ्रिदीच्या आत स्विंग होणाऱ्या चेंडूवर रोहित शर्मा कधी बाद झाला कळलंच नाही. मला ॲलन डेव्हिडसनची आठवण आली. ती आठवण येण्याचं कारण असं की, असे आत स्विंग होणारे चेंडू हे त्याच्या हातातले हुकमी एक्के होते. अर्थातच तो बाहेरही चेंडू आरामात काढायचा. मलींगाच्या केसासारखं त्याच्या स्विंगच वळण असे. जणू घाटाच वळण. त्याच म्हणणं होतं की, ‘‘ डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाकडे इनस्विंग हा असायलाच हवा. डावखुऱ्या गोलंदाजाने ओव्हर द विकेट गोलंदाजी टाकली पाहिजे आणि चेंडू आत आणलाच पाहिजे.’’

त्या काळातही तो उत्कृष्ट यॉर्कर टाकायचा. किंबहुना त्याचं असं म्हणणं होतं की, ‘‘ यॉर्कर हा नेट प्रॅक्टिसमध्ये इतका गिरवला पाहिजे की यॉर्कर म्हणजे अर्जुनाचा बाण व्हायला हवा. पक्षाच्या डोळ्याचा वेध घेणारा! , जेव्हा हवं तेव्हा.''''

त्याचं म्हणणं होतं की ‘‘ प्रॅक्टिस संपताना शेवटच्या ओव्हरमधला प्रत्येक चेंडू हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करावा. त्याचा खूप फायदा होतो.’’ आजच्या ऑस्ट्रेलियन मिशेल स्टार्कने सुद्धा ॲलन डेव्हिडसनचा हा उपदेश शिरसावंध मानला होता.

वासिम अक्रमप्रमाणे तो कमी स्टार्ट घेऊन वेगात चेंडू टाकायचा. त्याने कधी १५ पावलांपेक्षा जास्त स्टार्ट घेतलाच नाही. चेंडू उगाचच वेगात टाकणं त्याला अजिबात आवडायचं नाही. त्याचं म्हणणं असं होतं की, ‘‘ आजकाल गोलंदाज त्यांच्या कुवतीपेक्षा चेंडू अधिक वेगात टाकायचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना दुखापती होतात.’’

पण ज्यावेळेला गरज असेल ना तेव्हा ॲलन डेव्हिडसन भन्नाट वेगामध्ये चेंडू टाकू शकायचा. त्याची ॲक्शन ही ऋषिकेशच्या वाहत्या गंगेसारखी होती. वेगवान गोलंदाजी टाकताना त्याला मेहनत पडतेय असं कधी वाटलंच नाही. त्याच्या ॲक्शनमधली सहजता ही बेदी, लिंडवॉल, मायकल होल्डिंग वगैरेंच्या जातकुळीतली. लहानपणी तो थोडासा कृश आणि बुटका होता. तो शरीराने थोडा उशिरा वाढला. पण जेव्हा वाढला तेव्हा त्याची उंची आणि त्याची देहयष्टी अक्षरश: डोळ्यात बसायची. त्याच्या खांद्यातला रूंदपणा नजरेत बसायचा.

१९५० मध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध एका मॅचमध्ये एका डावात त्याने १० विकेट्स घेतल्या होत्या. फक्त २९ धावा देऊन. आणि मग नाबाद १५७ धावा केल्या. क्रिकेटच्या कुठल्याही स्तरावर असा दुसरा पराक्रम नोंदवलेला नाहीये. सुरवातीला ऑस्ट्रेलियाकडे मिलर, लिंडवॉल सारखे गोलंदाज होते. त्यामुळे त्याला फारसा वाव मिळाला नाही. पण नंतर मिलर निवृत्त झाला. आणि लिंडवॉल सुद्धा सातत्याने खेळला नाही. त्यामुळे मग त्याने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या रुंद खांद्यावर अगदी आरामात झेलली. ४४ कसोटीच तो खेळला. पण त्यात त्याने १८६ बळी घेतले. आणि बळी मागे त्याने २० पेक्षा जास्त धावा दिलेल्या नाहीत. कमी धावा देण्याच्या बाबतीत तो जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असावा. आणि लक्षात ठेवा हा त्याकाळात रिव्हर्स स्विंग वगैरे नव्हता. त्याच्या विकेट्स ज्या आहेत त्या नैसर्गिक स्विंग, सीम आणि कटर्सच्या आहेत.

भारताविरुद्ध तो १९५९ मध्ये भारतात खेळला. आणि त्याने बळी मागे १५ पेक्षा कमी धावा देऊन चक्क २९ बळी घेतले होते. आणि त्यावेळच्या भारतातल्या खेळपट्ट्या या इतक्या दगडी असत की, वेगवान गोलंदाज त्यांना पाझर फोडू शकत नसे. त्यामुळे भारतात ना ट्रूमन आला, ना डेनिस लिली आला. कानपुरला जी कसोटी जसू पटेलने आपल्या ऑफ स्पिनच्या जीवावर जिंकून दिली ना, त्या खेळपट्टीवर चेंडू भुईचक्रासारखा फिरत होता. पटेलने पहिल्या डावात ९ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. त्या विकेटवर डेव्हिडसनने ९३ धावत ७ बळी घेतले. त्याची सर्वात गाजलेली सिरीज म्हणजे १९६० - ६१ ची ऑस्ट्रेलियामधली वेस्टइंडीज विरुद्धची टाय सिरीज. ती ऑस्ट्रेलिया कशीबशी २ - १ अशी जिंकली. पण त्यात डेव्हिडसनचा वाटा होता १८.५५ च्या सरासरीने ३३ बळी. त्यातली पहिली टेस्ट तर सगळयात ऐतिहासिक. टाय टेस्ट मॅच. त्याने त्यात १० बळी घेतले आणि १०० धावा केल्या. त्यानंतर हा पराक्रम फक्त तीन खेळाडूंनी केला. त्याचा मित्र रिची बेनॉ त्याला उगाच अष्टपैलू खेळाडू म्हणत नाही. तो आक्रमकपणे फलंदाजी करायचा. आणि मोठे फटके त्या काळातही मारायचा. आणि त्याचं क्षेत्ररक्षण ओss हो. त्याच्या हाताला ."Claws" असं म्हटलं जायचं. कारण त्याच्या पंज्यातून झेल कधी सुटायचेच नाहीत.

तो आयुष्यात फक्त कसोटी सामने खेळला. पण जर त्या काळात टी ट्वेन्टी असतं ना तर ॲलन डेव्हिडसनने ते नक्की गाजवलं असतं. कारण त्याचे ते सुरवातीचे आत येणारे स्विंग आणि मग खाली येऊन उंच, उंच फटके मारायचं कसब हे टीट्वेन्टीमध्ये शोभलं असतं. आणि मुख्य म्हणजे वृत्ती सुद्धा आक्रमक होती. त्या टाय टेस्टची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकायला २३२ धावा हव्या होत्या. रिची बेनॉ आणि डेव्हिडसन पॅड लावून ड्रेसिंग रूममध्ये बसले होते. आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलियाची परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. ४ बाद ४९ वगैरे झाले होते. डॉन ब्रॅडमन तिथे आला आणि त्याने रिची बेनॉला विचारलं की, ‘‘ तू काय ठरवलंय? मॅच जिंकण्यासाठी जायचं की ड्रॉ करायचा विचार आहे?’’

क्षणाचाही विचार न करता बेनॉ म्हणाला, ‘‘ अर्थात आम्ही जिंकण्यासाठी जाणार आहे.’’ त्यानंतर विकेट पडली आणि डेव्हिडसन बॅटिंगला गेला आणि त्याने ८० धावा केल्या. जेव्हा बेनॉ बॅटिंगला आला तेव्हा डेव्हिडसनने पुन्हा त्याला विचारलं की, ''''आपण काय करतोय?'''' तो म्हणाला ''''अर्थातच जिंकायला जातोय.'''' आणि ते जवळ जवळजिंकले. म्हणजे डेव्हिडसन जर ८० धावांवर धावचीत झाला नसता ना तर ती मॅच ऑस्ट्रेलियाने आरामात जिंकली असती. मग हॉलच्या ऐतिहासिक शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच टाय झाली. वयाच्या ३३ व्या वर्षी ॲलन डेव्हिडसनने आपलं क्रिकेट संपवलं. त्याने त्याच्या टेस्टच्या करिअरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट काढली आणि पहिल्या दर्जाच्या मॅचमध्ये सुध्धा. ती विकेट सर गारफील्ड सोबर्सची होती.

मी एकदा ऑस्टेलियात असताना एका मॅचच्या वेळेला ॲलन डेव्हिडसनला अक्षरश: शोधून काढून भेटलो. कारण ॲलन डेव्हिडसन हे आमच्यासाठी दैवत होतं. ॲलन डेव्हिडसन बरोबर त्याचा खास मित्र नील हार्वेसुद्धा तिथे होता. निल हार्वे हे आमचं अर्थातच दुसरं दैवत. मी बोलता बोलता नील हार्वेला त्याने सुभाष गुप्तेला मुंबईत जे ठोकून काढलं होतं ना त्याची आठवण जागवली. हार्वे पेक्षा जास्त मला डेव्हिडसन खुश झालेला वाटला आणि मी सहज विचारलं, ''''समजा शेन वॉर्नने तुला गोलंदाजी टाकली असती तर तू काय केलं असतंस?'''' हार्वेने उत्तर द्यायच्या आत डेव्हिडसन म्हणाला की, ''''It wouldn''t have been the contest. - ती स्पर्धा झालीच नसती. नील हार्वेने त्याला संपवून टाकलं असतं.''''

हे नुसतं मित्र प्रेम नव्हतं. हा हार्वेबद्दलच्या बॅटींगचा आदर होता. त्यावेळेला हार्वे आणि डेव्हिडसन या माझ्या दोन लाडक्या खेळाडूंबरोबर मी फोटो काढला. आमच्या गल्लीत माझा एक मित्र लहानपणी राहायचा, तो बॉलिंग टाकायला आला की आम्ही सगळेजण ॲलन डेव्हिडसन आला, ॲलन डेव्हिडसन आला असं म्हणायचो. आणि बॅटिंगला आला की आम्ही त्याची तुलना नील हार्वे बरोबर करायचो. मोठ्या उत्साहात मला तो फोटो त्याला दाखवायचा होता. पण मी भारतात परत येण्यापूर्वी तो या जगातून निघून गेला. मी अत्यंत हळहळलो. परवा डेव्हिडसन गेल्यावर त्या मित्राची मला तीव्रतेने आठवण झाली.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत.)

loading image
go to top