esakal | पर्यावरणपूरक व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

sayali joshi gunari

पर्यावरणपूरक व्यवसाय

sakal_logo
By
सायली जोशी-गुणारी

बिझनेस वुमन
सायली जोशी-गुणारी, संस्थापक, बी बायोटिक्स 
पर्यावरण आणि व्यवसाय याचे गणित बऱ्याचदा विषम असते, मात्र पर्यावरणपूरक व्यवसाय करता येतो हे सिद्ध करणारेही अनेक आहेत. सायली गुणारी या त्यांपैकीच एक. सामाजिक बांधिलकी जपत व्यवसाय नावारूपास आणता येतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक कुंड्या तयार करीत त्यांनी आपला व्यवसाय फुलवला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास अतिशय वेगाने होत आहे. शहरांमधील वायू प्रदूषणामुळे श्‍वसनविषयक आजारांचे प्रमाण वाढते आहे. याचाच विचार करून सायली यांनी समाजाला आपण काही देणे लागतो, या भावनेतून ‘बी बायोटिक्स’ची स्थापना केली. शहरांमध्ये कमी होत चाललेली झाडे, मोकळ्या जागा आणि वाढणाऱ्या काँक्रीटच्या जंगलांमुळे शहराचा श्‍वास अधिकच कोंडत जाणार व प्रत्येकाच्याच आयुष्यावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याने त्यांनी याच विषयावर काम करण्याचे ठरविले. शहरांतील सिमेंटच्या जंगलांतही हिरवळ फुलण्यासाठी सायली यांनी ‘बी बायोटिक्स’च्या माध्यमातून कमी जागेत झाडे लावण्यासाठी एक कीट तयार केले आहे. यात नारळाच्या काथ्यापासून कुंडी तयार करण्यात आली आहे. या कुंडीमधील रोप मोठे झाल्यानंतर ते आपल्याला मोकळ्या जागेत कुंडीसकट लावता येते. कुंडीतून ते रोप वेगळे करावे लागत नाही, जेणेकरून रोपाला कसलीही इजा न पोचता ते हलविणे शक्य होते. ती कुंडी मातीत मिसळून जाते. याव्यतिरिक्त सायली यांनी या किटमध्ये ‘मड बॉल’देखील दिले आहेत. त्यामुळे कुंडीत जमा झालेले जास्तीचे पाणी शोषून घेतले जाते. अशा प्रकारचे अनेक पर्यावरणपूरक आणि पर्यावरणस्नेही किट त्यांनी तयार केल्या आहेत. 

सायली म्हणाल्या, ‘‘मला ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवायचा आहे. बागकाम हा तणाव कमी करणारा, रोग प्रतिकारशक्ती वाढविणारा व्यायामाचाच प्रकार आहे. शिवाय नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे, की बागकाम केल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका ३६ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.’’

सुरवातीला सायली यांनी जैविक खते विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतर लक्षात आले, की शहरांमध्ये जागा कमी असल्यामुळे खताऐवजी घराच्या गॅलरीत बागकाम करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यामुळे सायली यांनी ‘बिझनेस मॉडेल’ बदलण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘मी ‘जस्ट डू इट’ हे मनाशी पक्के केले आणि व्यवसाय सुरूच ठेवला. व्यवसायाला प्रतिसाद कसा मिळतोय, यावर लक्ष ठेवून मी अधिक चांगले उत्पादन देण्याचा प्रयत्न करत राहिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना नेमके काय पाहिजे आहे, याचा अभ्यास करून उत्पादनात बदल केले. मी पॅकेजिंगवर खास लक्ष दिले. लहान मुलांना आकर्षून घेईल, असे पॅकिंग केले. यामागचे मुख्य कारण म्हणजे मुलांनी आपल्या पालकांना विचारावे, की यात नेमके काय आहे? म्हणजे लहानपणापासून त्यांची आणि पर्यावरणाशी, झाडांशी, बागकामाशी मैत्री होईल. मुलांवर लहानपणी आपण जे संस्कार करतो ते कायम त्यांच्या मनावर ठसतात. यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून संस्काराचे मनात आणि खरे ‘बी’ जमिनीत रोवले जाऊन भविष्यात झाडाची मधुर फळे  प्रत्येकाला चाखता येतील.’’
(शब्दांकन - गौरव मुठे)

loading image
go to top